मंगळवार, 24 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: रविवार, 7 जानेवारी 2024 (10:35 IST)

काय म्हणता, मुंबई विद्यापीठात विद्यार्थ्यांना दुहेरी पदवीचे शिक्षण शक्य

Mumbai University
राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी मुंबई विद्यापीठाने आघाडी घेत दुहेरी पदवीच्या शिक्षणासाठी पुढाकार घेतला आहे. याअनुषंगाने आता मुंबई विद्यापीठात विद्यार्थ्यांना दुहेरी पदवीचे शिक्षण मिळणार आहे. मुंबई विद्यापीठाच्या अब्जांश विज्ञान आणि अब्जांश तंत्रज्ञान (नॅनोसायन्स आणि नॅनो टेक्नॉलॉजी) विभागाने फ्रांसमधील प्रतिष्ठित ट्रॉयस विद्यापीठासोबत शैक्षणिक सामंजस्य करार केला आहे.
 
अब्जांश विज्ञान आणि अब्जांश तंत्रज्ञान विभागात प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्याला ६ ते ९ महिन्यांच्या कालावधीसाठी फेलोशिपवर ट्रॉयस विद्यापीठात शिकता येणार असून त्या विद्यापीठातील तज्ज्ञांसोबत काम करण्याची मोठी संधी मिळेल. दुहेरी पदवी कार्यक्रमाअंतर्गत विद्यार्थ्यांस दोन्ही विद्यापीठाची पदवी मिळणार आहे. आंतरराष्ट्रीय मान्यताप्राप्त विद्यापीठांच्या या दुहेरी पदवीमुळे प्रत्येक संस्थेच्या सामर्थ्याचा आणि कौशल्याचा विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक उत्कृष्टता वृध्दीस हातभार लागणार आहे.
 
मुंबई विद्यापीठाच्या अब्जांश विज्ञान आणि अब्जांश तंत्रज्ञान (नॅनोसायन्स आणि नॅनोटेक्नॉलॉजी) विभाग आणि ट्रॉयस विद्यापीठ फ्रान्स या दोन्ही उच्च शिक्षण संस्थामध्ये झालेल्या कराराअंतर्गत विद्यार्थी विनिमयामुळे विद्यार्थ्यांना आंतरराष्ट्रीय वातावरणात अब्जांश विज्ञान आणि अब्जांश तंत्रज्ञान क्षेत्रातील विविध संशोधन पद्धती आणि उपकरणांचा अभ्यास करता येईल तर, प्राध्यापक विनिमयाअंतर्गत संशोधकांना संयुक्त आणि सहयोगी प्रकल्पांवर एकत्रित काम करण्याची संधी मिळणार आहे.
 
संशोधन सहयोगाअंतर्गत दोन्ही विद्यापीठातील पायाभूत व अनुषंगिक सुविधा, कौशल्य आणि आधुनिक उपकरणे आणि संसाधनाच्या एकत्रित वापरामुळे संशोधनातील संभाव्य परिणाम साध्य करता येऊ शकतील. त्याचबरोबर या सहयोगी कार्यक्रमामुळे संशोधन प्रकाशने आणि संयुक्त प्रकाशनावरही काम करण्याची संधी मिळू शकणार असल्याचे अब्जांश विज्ञान आणि अब्जांश तंत्रज्ञान विभागाचे प्रभारी संचालक प्रा. विश्वनाथ पाटील यांनी सांगितले. तसेच या पदव्युत्तर एम.एस्सी दुहेरी पदवी अभ्यासक्रमाची व्याप्ती वाढवून पीएच.डी.साठीही सामायिक कार्यक्रम राबविण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
 
Edited by -Ratnadeep Ranshoor