रविवार, 5 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: बुधवार, 19 जुलै 2023 (08:33 IST)

बियाणे, खतासंबंधी तक्रारींसाठी व्हॉटसअ‍ॅप क्रमांक जारी करणार -धनंजय मुंडे

dhananjay munde
बियाणे, खते, कीटकनाशके यासंदर्भात शेतक-यांना नेहमीच अडचणीचा सामना करावा लागतो. याची तक्रार कुठे करायची, हे अनेकदा शेतक-यांना प्रश्न पडलेला असतो. राज्य सरकारने आता यासाठी पावले उचलली असून, खते, बियाणे अथवा किटकनाशके यासंदर्भात तक्रार करण्यासाठी राज्य सरकारमार्फत लवकरच व्हॉट्सअ‍ॅप क्रमांक जारी करण्यात येणार आहे.
 
राज्याचे कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी याबाबत निर्देश दिले आहेत. कृषी निविष्ठा व गुण नियंत्रण तसेच बियाणे पुरवठ्याबाबत आज त्यांनी मंत्रालयात कृषी विभागाचा आढावा घेतला. यावेळी धनंजय मुंडे बोलत होते. या बैठकीला अपर मुख्य सचिव अनुपकुमार, कृषी आयुक्त सुनील चव्हाण, नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पाचे संचालक परिमल सिंग, सहसचिव गणेश पाटील, संचालक विस्तार व सेवा विकास पाटील तसेच इतर अधिकारी उपस्थित होते.
 
खत विक्रेते काही वेळा शेतक-यांना विशिष्ट कंपनीचे खत घेण्यासंदर्भात सक्ती करतात किंवा अनधिकृत खते विकून फसवणूक करतात. शेतकरी गरजेपोटी अशी सक्ती मान्य करतात. खताची लिंकिंग करणा-या अशा खत विक्रेत्यांविरुद्ध शेतक-यांना तक्रार नोंदविण्यासाठी तात्काळ व्हॉट्सअ‍ॅप क्रमांक सुरू करून तो शेतक-यांपर्यंत पोहोचवावा, असे निर्देश कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी दिले. शेतक-यांनी सदर व्हॉट्सअ‍ॅप क्रमांकावर तक्रार केल्यावर त्यांच्या नावाबाबत गोपनीयता ठेवण्यात येईल. तसेच संबंधित जिल्ह्यातील भरारी पथकांना संदेश जाऊन त्यांनी तात्काळ संबंधित ठिकाणी तपासणी करण्याच्या सूचना मुंडे यांनी दिल्या.
 
Edited By - Ratnadeep ranshoor