शुक्रवार, 29 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: गुरूवार, 20 जुलै 2023 (15:24 IST)

इर्शाळगड कुठे आहे? जाणून घ्या, दरड कोसळलेला परिसर नेमका कसा

irshalgad fort raigad
मुंबई-पुणे प्रवासात जुन्या महामार्गावरून गेला असाल, किंवा कर्जत-पनवेल रेल्वे लाईननं प्रवास केला असेल, तर इर्शाळगड तुमच्या नजरेतून निसटला नसेल.
 
रायगड जिल्ह्यात खालापूर तालुक्यातल्या चौक गावाच्या उत्तरेकडचा हा छोटा किल्ला त्याच्या सुळक्याच्या विशिष्ट आकारामुळे लगेच लक्ष वेधून घेतो. याच सुळक्याच्या भागाखाली, साधारण पूर्वेला डोंगरपठारावर इर्शाळवाडी ही आदिवासी वस्ती आहे.
 
याच इर्शाळवाडीवर दरड कोसळण्याची दुर्घटना घडली. हा परिसर नेमका कसा आहे? जाणून घेऊयात.
 
ज्या डोंगरावर हे गाव वसलं आहे, त्याच्या ईशान्येला माथेरानचा डोंगर आहे आणि पायथ्याशी मोरबे धरणाचा नवी मुंबईला पाणी पुरवणारा जलाशय आहे.
 
दुर्ग अभ्यासक आणि रायगड जिल्ह्यातील 59 किल्य्यांची माहती देणाऱ्या इये ‘देशीचे दुर्ग’ या पुस्तकाचे लेखक सुखद राणे यांना हा परिसर परिचयाचा आहे.
 
ते सांगतात की, इर्शाळगडाच्या पश्चिमेस पनवेल, वायव्येस प्रबळगड व मलंगगड, उत्तरेस चंदेरी व पेब, नैऋत्येला कर्नाळा किल्ला, दक्षिणेला माणिकगड व सांकशी हे किल्ले आहेत तर पूर्वेस खंडाळा घाट व नागफणी आहे.
 
इर्शाळगडाचा इतिहास
इर्शाळगडाचा इतिहासात फार कुठे उल्लेख येत नाही. पण आसपासचे गडकिल्ले आणि या परिसरातून बोरघाटाकडे म्हणजे आजच्या खंडाळा घाटाकडे जाणारी वाट पाहता, टेहळणीसाठी आणि मुख्यतः संदेशांची देवाणघेवाण करण्यासाठी या गडाचा वापर होत असावा, असं या परिसरातले इतिहास अभ्यासक सांगतात.
 
शिवरायांनी कल्याण-भिवंडी-रायरी पर्यंतचा मुलुख घेतला तेव्हा हा गड देखील त्यांच्या ताब्यात आला असावा, असं स्थानिक संशोधक सांगतात.
 
या गडाचं नाव फारसं कुठे इतिहासात घेतलं जात नसलं, तरी जवळच्या चौक गावाला ऐतिहासिक महत्त्व आहे. शिवाजी महाराजांचे सरनौबत आणि निकटवर्तीय नेताजी पालकर यांचा जन्म याच चौक गावात झाला होता.
 
सुखद राणे सांगतात, “सतराव्या-अठराव्या शतकात चौक ही या परिसरातली मध्यवर्ती बाजारपेठ होती. बाजारपेठेचे संरक्षण आणि टेहळणीसाठी इर्शाळगड महत्त्वाचा होता. चोर, लुटारू, परकीय सत्ता, दरोडेखोर यांचे नेहमीच या बाजारपेठेवर लक्ष असायचे.
 
“अशाच एका व्यंकोजी वाघ नावाच्या लुटारूला नेताजी पालकर यांनी चौक पासून पाच किलोमीटरवर असलेल्या वडगाव इथे गाठले होते आणि चकमकीत ठार केले होते.”
 
सरनौबत नेताजी पालकरांचं गाव
चौकमध्ये आज नेताजी पालकरांचं स्मृतीस्थान म्हणून चौथरा उभारला आहे आणि दरवर्षी दोन फेब्रुवारीला उंबरखिंडीतल्या लढाईची आठवण म्हणजून चौक ते उंबरखिंड अशी मशाल यात्रा जाते.
 
शाहिस्तेखानाचे सरदार कार्तलबखान आणि रायबाघन यांचा शिवाजी महाराजांनी या उंबरखिंडीत पराभव केला होता, त्या लढाईत नेताजी पालकरांचाही मोठा वाटा होता.
 
इंग्रजांच्या काळात हळू हळू दऱ्या-डोंगरांचं सामरिक महत्त्व कमी होत गेलं. सुखद राणे सांगतात की माथेरानला पोहोचलेल्या युरोपियनांनी इर्शाळगडाचा आकार पाहून त्याला सॅडल हिल असे नाव ठेवले.
 
“स्थानिक लोक या गडाला जिन खोड म्हणत. दोन्हीचा अर्थ एकच होतो – खोगीर.”
 
इर्शाळगड ट्रेक
इर्शाळगड हा समुद्रसपाटीपासून साधारण 3700 फूट (1127 मीटर) उंचीवर आहे.
राष्ट्रीय महामार्ग 48 (जुना NH4) पासून फार दूर नाही. या हायवेवरून गडाच्या पायथ्याशी असलेल्या नाणिवली गावापर्यंत रस्ता जातो.
नाणिवलीपासून पुढे चालत जावे लागते. साधारण 2-3 किलोमीटर पायवाटेनं इथे चढत जावं लागतं. हा रस्ता तसा थोडासा अवघड आहे.
तासभर चढाई केल्यावर माचीवर डोंगरपठारासारख्या भागात इर्शाळवाडी आहे. तिथून साधारणं शंभर मीटर उंच असा इर्शाळगड दिसतो.
सुखद राणे सांगतात, “उत्तरेकडे एक आणि दक्षिणेकडे एक असे दोन कातळ प्रस्तर गड माथ्यावर असून त्यांच्या मधोमध खिंड आहे. इर्शाळवाडी ते खिंड साधारण दीड तासांची चढाई आहे.”
 
“खिंडी पायथ्याला असणाऱ्या कातळ टप्प्यावर इर्शाळ देवीचे स्थान आहे. खिंडीत वर चढण्यासाठी साधारण वीस मीटरची चढाई असनू ही चढाई घसाऱ्याची आहे.
 
“खिंडीत पाण्याचे टाके आहे, तसेच खिंडीच्या खाली नेढे अर्थात कातळात आरपार खोदलेली गुहा आहे. या नेढ्यात बसून पूर्व आणि पश्चिम असा दोन्ही बाजूंचा परिसर न्याहाळता येतो.”
 
उत्तरेकडचा प्रस्तर वीस-बावीस मीटर उंच असून, तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली आणि गिर्यारोहणाचे, प्रस्तरारोहणाचे साहित्य वापरूनच तो चढावा लागतो, अशी माहितीही सुखद राणे देतात.
 
प्रामुख्यानं नवी मुंबई आणि कर्जत-खालापूर परिसरातले अनेक ट्रेकर्स प्रस्तरारोहणासाठी या गडाला भेट देतात.
 
विशेषतः वीकएण्डला गडावर मोठ्या प्रमाणात पर्यटकही येतात.
 
दुर्गम परिसर आणि बचावातल्या अडचणी
इर्शाळवाडी हा या ट्रेकमधला महत्त्वाचा आणि विश्रांतीचा टप्पा मानली जाते. गडावर चढाई करणाऱ्यांची जेवणाची सोयही या वाडीत होत असे.
 
इथे साधारण चाळीस घरं होती आणि 228 जण राहात होतो. त्याच परिसरात 19 जुलैच्या रात्री दरड कोसळली आहे.
 
इर्शाळगडावर दरड कोसळण्याच्या घटना घडल्याचे कुठलेच उल्लेख नाहीत. पण या भागात ट्रेकिंग करताना अनेकदा दुर्घटना घडल्या आहेत. अगदी अनुभवी ट्रेकर्सनाही त्यात जीव गमवावा लागला आहे.
 
त्यामुळेच चढाईसाठी तुलनेनं मध्यम स्वरुपाचा मानला जात असला, तरी पावसामुळे इथे पोहोचणं आधीच कठीण जातं.
 
बचावकार्यातही हा मोठा अडसर ठरतो आहे, असं घटनास्थळी उपस्थित गिर्यारोहक सांगतात.