अमोल शिंदे आहे तरी कोण ? देशाचे सर्वोच्च सभागृह मानले जाणा-या संसदेत काय करत होता?
लातूर : देशाचे सर्वोच्च सभागृह मानले जाणा-या संसदेत आज महाराष्ट्राच्या लातूर जिल्ह्यातील एका तरुणाने गोंधळ घातला. संबंधित घटनेमुळे संपूर्ण देशात एकच खळबळ उडाली आहे. संसदेवर अशाप्रकारे कुणी घुसखोरी करून गोंधळ कसा घालू शकतो? असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत आहे. संबंधित प्रकरणानंतर पोलिस प्रशासनाला खडबडून जाग आली आहे. पोलिस प्रशासनाने तातडीने तपासाला सुरुवात केली आहे. या प्रकरणी घोषणाबाजी करणा-या आणि संसदेच्या सभागृहात पिवळा धूर करणा-या तरुणाचे नाव अमोल शिंदे असून तो लातूरच्या चाकूर तालुक्यातील झरी गावचा आहे.
दिल्लीच्या वरिष्ठ पोलिसांकडून महाराष्ट्र पोलिसांना याप्रकरणी अधिकची माहिती मिळवण्याची सूचना करण्यात आली. त्यानंतर पोलिस अमोल शिंदे याच्या लातूर जिल्ह्यातील झरी गावात दाखल झाले.
अमोल शिंदे हा लातूरच्या चाकूर तालुक्यातील झरी गावचा रहिवासी आहे. संबंधित घटनेनंतर चाकूर पोलिस तातडीने झरी गावात दाखल झाले. ते झरी गावात विचारपूस करत अमोल शिंदे याच्या घरी पोहोचले. यावेळी पोलिसांनी अमोल शिंदे याच्या आई-वडिलांना त्याच्याविषयी माहिती विचारली. अमोल धनराज शिंदे असे त्याचे पूर्ण नाव आहे. अमोलची घरची परिस्थिती खूप बेताची आहे. त्याचे आई-वडील मजूर आहेत. ते मजुरी करून उदरनिर्वाह करतात. दुसरीकडे अमोल हा शिक्षण घेत असल्याची माहिती पोलिसांना चौकशीतून समोर आली आहे.
अमोल शिंदे हा गेल्या अनेक दिवसांपासून काय करत होता? याची चौकशी पोलिसांनी यावेळी केली. पोलिसांनी त्याच्या झरी गावातील नागरिकांची चौकशी केली. अमोलच्या नातेवाईकांशी चर्चा केली. गावातील नागरिकांशी चर्चा केली. गावातील कुणालाही अमोल याच्याविषयी जास्त माहिती नाही. अमोलला गावात राहायला आवडत नसे, अशी देखील माहिती पोलिसांच्या तपासातून समोर आली आहे.
पोलिसांनी अमोल शिंदे याच्या शैक्षणिक कागदपत्रांची पडताळणी केली.
तसेच त्याच्या घरात कागदपत्रे ठेवलेल्या भागाची झडती घेतली आहे. पोलिसांनी त्याच्या आई-वडिलांची चौकशी केली असता आणखी एक महत्त्वाची माहिती समोर आली. अमोल शिंदे हा गेल्या अनेक दिवसांपासून पोलिस भरतीची तयारी करत होता. तो कुटुंबीय आणि गावापासून दूर राहात होता. तो १५ दिवसांपूर्वी दिल्लीला जातो असे आई-वडिलांना सांगून निघून गेला होता, अशी माहिती समोर आली आहे. अमोल शिंदे हा दिल्लीत का गेला? नेमके काय काम होते? त्याच्यासोबत कोण-कोण होते? याचा तपास पोलिस आता करत आहेत.
- Ratnadeep Ranshoor