१० दिवसांत सरकारने मराठा समाजाला आरक्षण द्यावे नाहीतर... जरांगे पाटलांनी सरकारसमोर मांडल्या 'या' प्रमुख मागण्या
जालना : मनोज जरांगे पाटील यांची अंतरवाली सराटी गावात भव्य सभा पार पडत आहे. या सभेला लाखोंचा जनसमुदाय उपस्थित राहिला. यावेळी त्यांनी समाजाशी संवाद साधला. मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी त्यांनी सरकारला अल्टिमेटम दिला होता. त्याला आज ३० दिवस पूर्ण झाले आहेत. यावेळी त्यांनी सरकारसमोर काही मागण्या ठेवल्या आहेत.
मराठा समाजाच्या आरक्षणासाठी आज झालेल्या सभेत जरांगे पाटलांच्या काही प्रमुख मागण्या खालीलप्रमाणे:
१. मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र देत प्रत्येक मराठ्याचा ओबीसीमध्ये समावेश करण्यात यावा.
२. कोपर्डीच्या ताईवर बलात्कार करणाऱ्या दोषींना तातडीने फाशीची शिक्षा देण्यात यावी.
३. मराठा समाजासाठी बलिदान दिलेल्या ४५ बांधवांना सांगितलेला निधी, आणि कुटुंबाला सरकारी नोकरी द्यावी.
४. ओबीसी आरक्षण दिलेल्या बांधवांचे दर दहा वर्षांत एकदा सर्व्हे करण्यात यावेत. तो सर्व्हे करुन प्रगत असलेल्या जाती बाहेर काढण्यात याव्यात.
५. पुढील १० दिवसांत सरकारने मराठा समाजाला आरक्षण द्यावे.
६. सारथीमार्फत पीएचडी करणाऱ्या विद्यार्थ्यांना जास्तीचा निधी देण्यात यावा.
७. NT, VJNT प्रवर्गासारखे टिकणारे आरक्षण द्या. महाराष्ट्रातील मराठा समाजाचा वेगळा प्रवर्ग करा आणि आरक्षण द्या.
आरक्षणासाठी ४० दिवसांची दिलेली मुदत आता संपत आली आहे. राज्य सरकारकडे फक्त १० दिवस शिल्लक आहेत. त्यामुळे आता तात्काळ आरक्षण देण्यात यावे. चाळीस दिवसानंतर आरक्षण दिलं नाही तर काय ते तुम्हाला सांगू, मराठे अंगावर घेऊ नका. त्यांच्या विरोधात जाऊ नका.' असे यावेळी जरांगे पाटलांनी यावेळी म्हटलं. तसेच यावेळी या १० दिवसांत आरक्षण मिळालं नाहीतर पुन्हा उपोषण करून माझी अंतयात्रा निघेल नाही तर आरक्षणासह विजययात्रा निघेल, असं देखील जरांगे पाटलांनी यावेळी म्हटलं.
Edited By - Ratnadeep Ranshoor