शनिवार, 11 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. रशिया - युक्रेन संघर्ष
Written By
Last Modified: बुधवार, 2 मार्च 2022 (13:36 IST)

खारकीव्ह येथील पोलीस इमारतीवर रशियाचा हल्ला, खर्सन शहर रशियाच्या ताब्यात

रशियाच्या हल्ल्यांनी खारकीव्ह शहरातील पोलिसांच्या इमारतीला लक्ष्य केलं. टेलिग्रामवर आलेल्या व्हीडिओत युक्रेन सरकारचा सल्लागार धुराच्या लोळांमध्ये पडझड झालेली इमारत दाखवताना दिसतो आहे.
 
याच भागात असलेल्या कराझिन नॅशनल युनिव्हर्सिटीलाही लक्ष्य करण्यात आलं.अँटॉन गेराश्नेको हे युक्रेन सरकारचे सल्लागार आहेत.
 
बीबीसीने स्वतंत्रपणे या व्हीडिओच्या सत्यासत्यतेची शहानिशा करू शकलेलं नाही.
 
खारकीव्हमध्ये गोळीबारात 21जणांचा मृत्यू
 
रशियाने लक्ष्य केलेल्या खारकीव्ह शहरात गोळीबारात 21जणांचा मृत्यू झाला आहे तर 112 जण जखमी झाले आहेत.
 
रशियाच्या हल्ल्यांना जोरदार प्रत्युतर देण्यात आलं आहे आणि सातत्याने लक्ष्यस्थानी असूनही आम्ही रशियाच्या फौजांना चोख टक्कर दिली आहे असं खारकीव्ह प्रादेशिक प्रशासनाने सांगितलं.
 
रशियावर प्रतिबंध घालण्यास मेक्सिकोचा नकार
 
युक्रेनविरुद्ध युद्ध केल्याप्रकरणी रशियावर कोणत्याही स्वरुपाचे प्रतिबंध लादण्यास मेक्सिकोने नकार दिला आहे. मेक्सिकोच राष्ट्राध्यक्ष आंद्रे मॅन्युएल लोपेझ ओब्राडोर यांनी सोशल मीडिया कंपन्यांवर टीका केली. रशियाच्या सरकारी प्रसारमाध्यमांच्या स्वातंत्र्याची गळचेपी केल्याबद्दल त्यांनी निषेध व्यक्त केला.
 
"जगातल्या विविध देशांशी चांगले संबंध राखण्याचा आमचा प्रयत्न आहे. आम्ही रशियावर कोणत्याही स्वरुपाचे निर्बंध लादणार नाही", असं लोपेझ यांनी सांगितलं.
 
लोपेझ यांनी याआधी अमेरिकेच्या परराष्ट्र धोरणावर टीका केली होती. अमेरिका आणि मेक्सिको यांचे संबंध चांगले असतानाही त्यांनी टीका केली होती. रशियाशी मेक्सिकोचे संबंध दृढ स्वरुपाचे नाहीत. रॉयटर्स वृत्तसंस्थेने दिलेल्या बातमीनुसार मंगळवारी अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री एंटनी ब्लिंकन यांनी मेक्सिकोचे परराष्ट्र मंत्र्यांशी फोनवरून चर्चा केली.