सोमवार, 11 नोव्हेंबर 2024
  1. धर्म
  2. »
  3. सण-उत्सव
  4. »
  5. श्रावण
Written By वेबदुनिया|

नागपंचमीच्या कथा

WD
'नागपंचमी' या सणाविषयी आपल्या भारतीय संस्कृतीत विविध कथा प्रचलित आहे. अशाच प्रकारच्या या दोन कथा.
कथा. 1
एका राज्यात एक गरीब शेतकरी कुटुंब होते. त्या शेतकर्‍याला दोन मुले व एक मुलगी होती. एकदा शेतात नांगर फिरवत असताना शेतकर्‍याकडून नागाची तीन पिल्ले चिरडून मरण पावतात. मरण पावलेल्या पिल्लांकडे पाहून नागिणीने आक्रोश केला. त्यानंतर नागिणीच्या मनात त्या शेतकर्‍याविषयी सूडाची आग धगधगू लागली. एके दिवशी तिने शेतकर्‍याचा सूड घ्यायचे ठरवले. रात्री अंधाराचा फायदा घेऊन नागीण शेतकर्‍यासह त्याची पत्नी व दोन मुलांना डसली.

दुसर्‍या दिवशी नागीण पुन्हा शेतकर्‍याच्या मुलीला डसण्यासाठी त्याच्या घरी आली. परंतु नागीणीला पाहताच शेतकर्‍याच्या मुलीने नागिणीसमोर दुधाने भरलेली वाटी ठेवली व तिची क्षमा मागितली. शेतकर्‍याच्या मुलीची श्रद्धा पाहून नागीण तिच्यावर प्रसन्न झाली. त्यानंतर नागिणीने तिचे आई-वडील व दोन भाऊ यांना जिवंत केले. तो दिवस श्रावण शुक्ल पंचमीचा. या दिवसापासून नागदेवतेचा कोप दूर करण्यासाठी श्रावण महिन्यात येणार्‍या पंचमीला नागाचे विधिवत पूजन केले जाते.

कथा. 2
एक राजा होता. त्याला सात मुले होते. राजाच्या सातही मुलांची लग्ने झाली होती. सातपैकी सहा मुलांना मुलंबाळं झाली होती. परंतु, सगळ्यात लहान मुलाकडे अजून पाळणा हललेला नव्हता. त्यामुळे त्याच्या पत्नीला इतर जावा वांझ म्हणून नेहमी हिणवत असायच्या. ती बिचारी रडत बसायची. जगाला बोलू दे, मुलं होणं हे परमेश्वराच्या हातात असते, अशी तिचा नवरा तिची समजूत काढत असे. एके दिवशी नागपंचमी होती. चतुर्थीच्या दिवशी रात्री तिच्या स्वप्नात पाच नाग आले. त्यांनी तिला सांगितले, 'उद्या नागपंचमी आहे. तू आमचे श्रद्धापूर्वक पूजन करशील तर तुला पुत्ररत्न प्राप्त होईल'. ती झोपेतून जागी आणि आपल्या पतीला स्वप्नातील हकीकत सांगितली.

तिने दुसर्‍या दिवशी पाच मातीचे नाग तयार करून त्यांचे विधीवत पूजन करून त्यांना दूधाचा नैवेद्य दाखविला. त्यानंतर तिने नऊ महिन्यांनतर सुंदर मुलाला जन्म दिला.