शुक्रवार, 3 जानेवारी 2025
  1. धर्म
  2. शीख
  3. शीख धर्माविषयी
Written By
Last Modified: मंगळवार, 26 डिसेंबर 2023 (09:01 IST)

वीर बालपणाच्या आदर्शाची : साहिबजादांच्या हौतात्म्याने मुघल साम्राज्याच्या ढिगाऱ्यातून शीख साम्राज्याच्या निर्मितीची घोषणा झाली

काही कृत्ये आणि कर्मे इतकी प्रगल्भ असतात की ते इतिहासाचा मार्ग बदलतात ! असाच एक म्हणजे शिखांचे दहावे गुरू, गुरू गोबिंद सिंग यांच्या चार साहिबजादांचे (मुलांचे) हौतात्म्य !
 
तरूण, निरागस आणि निष्पाप सुपुत्र, साहिबजादा (प्रिन्स) अजीत सिंग, साहिबजादा जुझार सिंग ज्यांना चमकौरच्या युध्दात 23 डिसेंबर 1704 रोजी हौतात्म्य आले. छोटे साहिबजादे, बाबा जोरावर सिंग आणि बाबा फतेह सिंग यांना 26 डिसेंबर 1705 रोजी सरहिंदच्या (पंजाब) मुघल (Governor) शासक वजीर खान याने निघृणपणे ठार मारले. ते शहीद झाले.
 
मागील वर्षापासून 26 डिसेंबर हा दिवस ‘वीर बाल दिवस’ पाळला जावा असे केंद्र शासनाकडून सर्व राज्यांना व केंद्र शासित प्रदेशांना आदेश प्राप्त झाले आहेत. या अन्वये या दिवसाचे औचित्य साधून, गुरू गोबिंद सिंग यांचे चार साहिबजादा यांच्या हौतात्म्यावर तसेच त्यांच्या शौर्यावर प्रकाश टाकणारा विशेष लेख.
 
शीख समाजासाठी डिसेंबर महिन्याचे अनन्यसाधारण महत्त्व आहे. याच महिन्यात मुघल आणि डोंगरी संस्थानिकांच्या एकत्रित सैन्याने गुरू गोबिंद सिंग, त्यांचे कुटुंब आणि अनुयायांना आनंदपूर साहिब किल्ल्यातून बाहेर काढण्यासाठी कपटाचा वापर केला आणि नंतर त्यांचा नाश करण्याचा प्रयत्न केला गेला.
 
गुरू गोबिंद सिंगांचे शूर आणि निर्भय शीख आनंदपूरच्या किल्ल्याबाहेर मुघल सैन्याशी प्रदीर्घ युध्दात काही महिने एकत्र गुंतले होते. सम्राट औरंगजेबने शपथेवर संदेश पाठवला की जर गुरू आणि त्यांच्या शिखांनी किल्ला सोडला तर त्यांना त्यांच्या इच्छेनुसार जाण्याची परवानगी दिली जाईल. गुरू गोबिंद सिंग यांना शंका होती पण, सरहिंदचे शासक वजीर खानाच्या नेतृत्वाखाली या सैन्याने गुरूंना आनंदपूर साहिबमधून सुरक्षित मार्गाचे वचन दिले. तथापि, ते बाहेर आल्यावर त्यांच्यावर प्रचंड संख्येने हल्ला केला गेला.
 
नऊ वर्षे आणि सात वर्षे वयाचे दोन लहान साहिबजादे, त्यांची आजी माता गुर्जर कौर यांच्यासोबत किल्ला सोडताना मुख्य दलापासून विभक्त झाले. त्यांना गंगू नावाच्या वृध्द सेवकाने त्यांच्या मूळ गावी सहेडी येथे आश्रय देण्याचे वचन दिले. तथापि, त्याने विश्वासघात केला व त्यांना मुघलांच्या सरहिंद प्रशासनाकडे सोपविले.
 
गुरू गोबिंद सिंग यांचे दोन मोठे साहिबजादे, साहिबजादा अजीत सिंग आणि साहिबजादा जुझार सिंग दोन्ही सुपुत्रांनी शिखांच्या मुख्य तुकडी सोबत चमकौरच्या युध्दात शेवटपर्यंत लढा दिला,  गुरूंचे थोरले सुपुत्र साहिबजादा अजीत सिंग आणि साहिबजादा जुझार सिंग दोन्ही साहिबजादा यांना हौतात्म्य आले. पुढील घटनांमध्ये गुरूंनी त्यांचे चार साहिबजादा आणि त्यांची आई गमावली. तथापि, त्यांच्या समर्पित अनुयायांच्या शौर्याने आणि बलिदानामुळे ते वैयक्तिकरित्या वाचले. गुरूंना मारण्यात किंवा अटक करण्यात अयशस्वी झालेल्या वजीर खानाला नैराश्य आले व तो सरहिंदला परतला. तो ज्या फसव्या वर्तनाने वागला होता, त्याबद्दल तो घाबरून गेला होता. या पार्श्वभूमीवरच त्याने लहान साहिबजादांवर इस्लाम धर्म स्वीकारून आणि नंतर त्यांना ताब्यात ठेवून त्यांच्यावर ताबा मिळवण्याचा प्रयत्न केला. आपला दुष्ट हेतू साध्य करण्यासाठी वजीर खानाने लहान राजपुत्रांना सर्वात वाईट प्रकारचा छळ केला आणि त्यांना धमकावले. त्याने त्यांना आणि त्यांच्या आजीला थंडा बुर्ज (थंड बुरूज) मध्ये ठेवले, ज्याची रचना पाण्याच्या वाहिन्यांवरून रात्रीच्या थंड हवेच्या झुळूकांना पकडण्यासाठी करण्यात आली होती. हे ठिकाण उन्हाळ्यासाठी एक योग्य ठिकाण होते पण हिवाळ्यात आणि ते ही रात्रीच्या वेळी खूपच अस्वस्थ करणारे ठिकाण होते. अशात, विशेषत: दोन्ही लहान साहिबजादांना येथे कैद करून वजीर खानाने त्यांच्यावर अत्याचार केला.
 
वजीर खानने आपल्या सरहिंदच्या दरबारात दोन्ही राजपुत्रांवर दोन दिवस खटला चालवला. पहिल्या दिवशी साहिबजादा यांना इस्लाम धर्म स्वीकार करण्यास प्रवृत्त केले. त्यांना प्रचंड संपत्ती आणि मोठे अधिकार देऊ केले.
 
दोन्ही भावांनी गुरू नानक यांच्या अनुयायांच्या शौर्याचे किस्से, गुरू अर्जन देव आणि गुरू तेग बहादूर (साहिबजादा यांचे आजोबा, गुरू गोबिंद सिंग यांचे पिता) यांच्या अद्वितीय हौतात्म्याची कहाणी त्यांच्या आजीकडून ऐकली होती. दोन्ही साहिबजादे यांनी वजीर खानाच्या अत्याचार धैर्याने, हिम्मतीने सहन केले व खंबीर राहून इस्लाम धर्म स्वीकारण्यास नकार दिला. यामुळे वजीर खान अस्वस्थ झाला आणि प्रचंड संतापला. दुसऱ्या दिवशी त्याने त्याच्या दरबारात मलेरकोटल्याचा नवाब, शेर मोहम्मद खान याला शिक्षा सुनावण्याचा अधिकार बहाल केला. हे करण्यामागचे त्याचे कारण म्हणजे गुरू गोबिंद सिंग यांनी शेर मोहम्मद खानाच्या भावाला एका युध्दात मारले होते. मात्र, शेर खान यांनी स्त्रिया आणि मुलांवर सूड उगवण्यास नकार दिला आणि शौर्याचा सर्वोच्च परिचय दिला आणि, त्यांनी दोन्ही लहान साहिबजादे व त्यांच्या आजीला सोडण्याचा सल्ला दिला.
 
याच वेळेला, वजीर खानाने सर्वात क्रूरकृत्य केले जे माणूसकीच्या तत्वांच्या विरूध्द आहे. वजीर खानाने या दोन निष्पाप राजपुत्रांना मुघल साम्राज्याचे शत्रु घोषित केले व त्यांना भिंतीत जिवंत कोंडण्याचा फतवा सोडला. दुसऱ्या दिवशी आदेशाचे पालन व्हायचे होते. निष्पाप व लहान मुलांवर एवढे जुलमी अत्याचार  करण्याचा इतिहासात अद्यापपर्यंत कदाचित हा एकमेव दुर्दैवी प्रसंग असावा. शेवटच्या क्षणालाही वजीर खानाने साहिबजादांना त्यांचे विचार बदलून इस्लाम स्वीकारण्यासाठी धमकवण्याचा प्रयत्न केला. शौर्यवान साहिबजादा यांनी मरण कबुल केले पण धर्म परिवर्तनास ठाम नकार दिला. तसेच, आम्हाला सोडल्यास आम्ही जंगलात जाऊ, काही शीख एकत्र करू, चांगले घोडे खरेदी करू आणि परत येऊन युध्दभूमीवर तुमचा व तुमच्या सैन्याचा सामना करू अशा कणखर आवाजात साहिबजादा बाबा जोरावर सिंग यांनी प्रतिक्रिया दिली.  त्याच क्षणी नवीन भिंतीची निर्मिती करून त्यांना डांबण्यात आले. तथापि, राजपुत्रांचा श्वास निघण्यापूर्वीच भिंत तुटली. वजीर खानाने जल्लादांना लहान राजपुत्रांचे गळे कापण्याचा आदेश दिला. दोन्ही साहिबजादा यांच्या हौतात्म्याची बातमी समजताच त्यांची आजी माता गुर्जर कौर यांनीही अखेरचा श्वास घेतला. दोन लहान व निष्पाप साहिबजादे अन्याय आणि भेदभावाविरूद्ध ज्या पध्दतीने उभे राहिले, त्याची इतिहासात तुलना होणे नाही. या लहान राजपुत्रांनी दाखवलेले धैर्य आणि धैर्याने शीख समुदायाला छळ आणि अन्यायाविरूध्द लढा देण्यास प्रवृत्त केले.
 
‘इन पुत्रन के सीस पर वार दिए सुत चार, चार मुए तो क्या हुआ जीवत कई हजार’
अर्थात
माझे जे हजारो पुत्र जिवंत आहेत त्यांच्या जगण्यासाठी मी चार पुत्रांचे बलिदान दिले आहे.
 
साहिबजादांच्या हौतात्म्याचे वृत्त समजताच संपूर्ण देशात दु:खाची लाट उसळली. काही काळानंतर, एकांतवासीय बंदा बैरागी (नांदेड, महाराष्ट्र येथील) गुरू गोबिंद सिंग यांच्या प्रभावाखाली आला आणि त्यांचा अनुयायी झाला. यावेळी त्यांनी ‘अमृत’ प्राशन केले आणि बंदा सिंग बहादूर या नावलौकिकाने इतिहासात नोंद झाली.
 
बाबा बंदा सिंग बहादूर नांदेडहून पंजाबमध्ये नियोजित कार्यासाठी आले. मोठ्या संख्येने शीख बांधव त्यांच्या सोबत सहभागी झाले. त्यांनी प्रथम सामना आणि सधौरा सरहिंदच्या परिघात घेतला आणि शेवटी वजीर खानावर हल्ला चढवला. 22 मे 1710 रोजी चप्पर चिरीची लढाई म्हणून ओळखली जणारी चकमक झाली. यात शिखांनी मोठ्या मुघल सैन्याचा पराभव केला. युध्दात वजीर खान मारला गेला आणि पुढच्या दोन दिवसांत त्यांनी सदहिंदचा ताबा घेतला. अशा प्रकारे साहिबजादांच्या हौतात्म्याने मुघल साम्राज्याच्या ढिगाऱ्यातून शीख साम्राज्याच्या निर्मितीची घोषणा झाली.
 
अशा पराक्रमी बालकांना, साहिबजादा अजीत सिंग, साहिबजादा जुझार सिंग, साहिबजादा जोरावर सिंग आणि साहिबजादा फतेह सिंग यांना शत शत नमन..!

Edited By-Ratnadeep Ranshoor