शुक्रवार, 29 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. खेळ मराठी
  3. क्रीडा वृत्त
Written By
Last Modified: शनिवार, 30 सप्टेंबर 2023 (07:26 IST)

एशियन गेम्स : निखत झरीन सेमीफायनलमध्ये, ऑलिंपिकवारी निश्चित

Nikhat Zareen
Asian Games 2023:चीनमध्ये सुरू असलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत पुरुष संघाने 50 मीटर रायफल 3 पोझिशन स्पर्धेत सुवर्णपदक पटकावलं आहे.
 
हा सामना जिंकून ऐश्वर्या प्रताप सिंग तोमर, स्वप्नील कुसळे आणि अखिल शेओरान यांनी नेमबाजीत पाचवे सुवर्णपदक जिंकले आहे.
 
निखत झरीन सेमीफायनलमध्ये, ऑलिंपिकवारी निश्चित
 
दोनवेळा जागतिक बॉक्सिंग चँपियन झालेल्या निखत झरीन जॉर्डनच्या हनान नासरला पराभूत करुन एशियन गेम्सच्या सेमीफायनलमध्ये पोहोचली आहे. त्यामुळे भारताचं आणखी एक पदक निश्चित झालं असून पॅरिस ऑलिपिंकमध्ये तिनं आपली जागा निश्चित केली आहे.
 
शुक्रवारी (29 सप्टेंबर) महिलांच्या 10 मीटर एअर पिस्तूल सांघिक स्पर्धेत ईशा सिंग, पलक आणि दिव्या थडीगोल यांच्या संघाने रौप्यपदक जिंकले.
 
तर याआधी (28 सप्टेंबर) सरबज्योत सिंग, अर्जुन सिंग चीमा आणि शिव नरवाल यांनी पुरुषांच्या 10 मीटर एअर पिस्तूल सांघिक स्पर्धेत सुवर्णपदक जिंकले.
 
त्याचवेळी महिलांच्या 60 किलो वुशू फायनलमध्ये रोशिबिना देवीने रौप्यपदक जिंकले.
 
घोडेस्वारी स्पर्धेत अनुष अग्रवालने भारतासाठी कांस्यपदक जिंकले.अनुषने घोडेस्वारीत पहिले पदक जिंकून इतिहास रचला.
 
आतापर्यंत भारताने 33 पदकांची कमाई केली आहे.
 
याआधी सिफतनं नेमबाजीच्या 50 मीटर रायफल थ्री पोझिशन प्रकारात 469.6 गुणांसह अव्वल स्थान गाठलं आणि नव्या विश्वविक्रमाची नोंही केली.
 
या स्पर्धेत भारताच्याच आशी चौकसीनं कांस्यपदक मिळवलं. त्याआधी पात्रता फेरीत सिफत आणि आशीनं मानिनी कौशिकच्या सहाय्यानं 1766 गुणांसह सांघिक रौप्यपदकही पटकावलं.
 
21 वर्षांची सिफत पंजाबच्या फरीदकोटची आहे. मार्च 2023 मध्ये तिनं आयएसएसएफ शूटिंग वर्ल्जकपमध्ये 50 मीटर रायफल नेमबाजीत ब्राँझ मिळवलं होतं.
 
त्याआधी 25 मीटर पिस्टल प्रकारातही भारतानं सुवर्णपदक पटकावलं. मनु भाकर, ईशा सिंह आणि रिदम सांगवान या तिघींनी पात्रता फेरीत 1759 गुणांसह सुवर्णकमाई केली.
 
मनु आणि ईशाला फायनलमध्ये वैयक्तिक पदकासाठी खेळण्याची संधी मिळाली. ईशानं तिथे कांस्यपदक मिळवलं.
 
दरम्यान, पुरुषांच्या स्कीट नेमबाजीत भारताच्या अनंतजीत सिंग नारुकानं रौप्यपदक मिळवलं. अनंतजीतनं गुरजोत आणि अंगदवीर यांच्या साथीनं सांघिक कांस्यपदकाचीही कमाई केली आहे.
 
अश्वारोहणात ऐतिहासिक पदक
26 सप्टेंबर रोजी दिव्याकृती सिंग, सुदिप्ती हाजेला, हृदय छेडा, अनुश अगरवाला यांचा समावेश असलेल्या भारतीय टीमनं घोडेस्वारीच्या 'ड्रेसाज' या प्रकारात मिश्र सांघिक सुवर्णपदक मिळवलं. त्यासोबतच चौघांनी अंतिम फेरीही गाठली.
 
1982 नंतर म्हणजे जवळपास 41 वर्षांनंतर भारतानं घोडेस्वारीत सुवर्ण मिळवलं आहे.
 
ड्रेसाज हा शब्द फ्रेंचमधल्या ड्रेस्यर (dresseur) वरून आला आहे. त्याचा अर्थ होतो ट्रेनिंग देणे.
 
घोड्याचं ट्रेनिंग कसं झालं आहे, हे दाखवण्यासाठी घोड्याकडून काही विशिष्ठ करामती करून घेतल्या जातात. जजेसचं एक पॅनेल घोडेस्वारांना पॉइंट्स देतं, त्याआधारावर विजेता ठरवला जातो.
 
सेलिंगमध्ये पदकांची कमाई
26 सप्टेंबरचा दिवस भारताच्या सेलिंग म्हणजे नौकानयन टीमसाठीही खास ठरला.
 
नेहा ठाकूरनं मुलींच्या डिंगी-ICA4 कॅटेगरीत दुसरं स्थान मिळवलं आणि रौप्यपदकाची कमाई केली. यंदाच्या एशियन गेम्समधलं भारताचं हे पहिलं पदक ठरलं.
 
17 वर्षांची नेहा नेहा मध्यप्रदेशात भोपाळच्या नॅशनल सेलिंग स्कूलमध्ये सराव करते. ती मुळची देवास जिल्ह्यातल्या हातपिपालामधील अमलताज गावची असून तिचे वडील शेतकरी आहेत तर आई गृहिणी आहे.
 
2022 साली अबूधाबीमध्ये एशियन सेलिंग चॅम्पियनशिपमध्ये नेहानं कांस्यपदक मिळवलं होतं आणि त्यामुळेच तिला हांगझू एशियन गेम्समध्ये खेळण्याची संधी मिळाली.
 
एशियन गेम्सच्या सेलिंग क्रीडाप्रकारात एका स्पर्धेत नाविकांना ठराविक शर्यतींमध्ये खेळावं लागतं आणि त्याआधारे एकूण गुण दिले जातात. ज्या शर्यतीत सर्वात खराब कामगिरी बजावली असते, त्या शर्यतीतले गुण वगळून नेट पॉइंट्स म्हणजे अंतिम गुण दिले जातात.
 
डिंगी-ICA4 प्रकारात एकूण 11 शर्यतींनंतर नेहानं 32 गुण कमावले होते. पण पाचव्या शर्यतीत तिला केवळ 5 गुण मिळाले होते.
 
त्यामुळे नेहाचा नेट स्कोर 27 गुण एवढा झाला आणि तिनं दुसरं स्थान मिळवतं रौप्यपदक खिशात टाकलं.
 
नेहापाठोपाठ एबाद अलीनंही पुरुषांच्या विंडसर्फर RS:X प्रकारात कांस्यपदक पटकावलं.
 
तर विष्णू सर्वानन यानंही पुरुषांच्या डिंगी - ILCA7 प्रकारात कांस्यपदक मिळवलं.
 
क्रिकेटमध्ये ऐतिहासिक सुवर्ण
भारताच्या महिला क्रिकेट टीमनं आशियाई क्रीडा स्पर्धेत आपल्या देशासाठी सुवर्णपदक जिंकलं. (25 सप्टेंबर) या ट्वेन्टी20 क्रिकेट स्पर्धेच्या फायनलमध्ये भारतनं श्रीलंकेला 19 धावांनी हरवलं.
एशियन गेम्सच्या इतिहासात भारताचं हे क्रिकेटमधलं पहिलंच पदक ठरलं आहे.
 
याआधी 2010 आणि 2014 साली या क्रीडास्पर्धेत क्रिकेटचा समावेश करण्यात आला होता, पण बीसीसीआयनं तेव्हा संघ पाठवला नव्हता.
 
भारताच्या महिला टीमनं याआधी 2022 साली राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत (कॉमनवेल्थ गेम्स) रौप्यपदक मिळवलं होतं. आता हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखाली खेळताना भारतानं एशियन गेम्समध्ये सुवर्णपदकाची कमाई केली आहे.
 
हांगझूमध्ये भारतानं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. त्यानंतर स्मृति मंधानाने सर्वाधिक 46 तर जेमिमा रॉड्रिग्सनं 42 धावांची खेळी केली.
 
निर्धारित 20 षटकांत भारतीय महिलांनी सात विकेट्सच्या मोबदल्यात 116 धावा केल्या. तर श्रीलंकेच्या टीमला 20 षटकांत आठ विकेट्समध्ये 97 धावाच करता आल्या
 
भारताकडून तितास साधूनं तीन, राजेश्वरी गायकवाडनं दोन तर दीप्ती शर्मा, पूजा वस्त्रकार आणि देविका वैद्यनं प्रत्येकी एक विकेट काढली.
 
या स्पर्धेत श्रीलंकेनं रौप्यपदक मिळवलं. तर बांगलादेशनं पाकिस्तानला हरवून कांस्यपदक पटकावलं.
 
पहिलं सुवर्णपदक नेमबाजीत
25 सप्टेंबरला सकाळी रुद्रांक्ष पाटील, ऐश्वर्य प्रताप सिंग तोमर आणि दिव्यांश पनवर या नेमबाजांनी 10 मीटर एअर रायफल प्रकारात सांघिक सुवर्णपदक जिंकलं.
 
तिघांनी पात्रता फेरीत 1893.7 गुण मिळवून अव्वल स्थान गाठलंच, शिवाय नव्या जागतिक विक्रमाचीही नोंद केली. चीनचा 1893.3 गुणांचा जागतिक विक्रम भारतानं मोडला आहे.
 
ऐश्वर्यनं त्यानंतर वैयक्तिक कांस्यपदकही मिळवलं. या क्रीडाप्रकारावर भारताचं किती वर्चस्व आहे, याची झलकही या स्पर्धेत पाहायला मिळाली.
पात्रता फेरीत रुद्रांक्षनं 632.8 गुणांसह तिसरं, ऐश्वर्यनं 631.6 गुणांसह पाचवं तर दिव्यांशनं 629.6 गुणांसह आठवं स्थान मिळवलं.
 
पण एका देशाच्या दोनच नेमबाजांना फायनल गाठता येत असल्यानं, दिव्यांशला अंतिम फेरीत वैयक्तिक पदकासाठी खेळता आलं नाही.
 
फायनलमध्ये 20 शॉट्सनंतर रुद्रांक्ष आणि ऐश्वर्य बरोबरीत होते, तेव्हा शूटऑफमध्ये ऐश्वर्यनं त्याला मागे टाकलं. रुद्रांक्षचं आव्हान संपुष्टात आलं. पुढे ऐश्वर्यला कांस्यपदकावर समाधान मानावं लागलं.
दुसरीकडे, पुरुषांच्या 25 मीटर रॅपिड फायर पिस्टल नेमबाजीत विजयवीर सिद्धू, अनिश आणि आदर्श सिंगच्या भारतीय संघानं 1718 गुणांसह तिसरं स्थान मिळवत कांस्यपदकाची कमाई केली.
 
पहिल्या दिवशी पाच पदकं
एशियन गेम्समध्ये पहिल्या दिवशी (24 सप्टेंबर) भारतानं पाच पदकांची कमाई केली. पहिलं पदक महिला नेमबाजांनी मिळवून दिलं.
 
10 मीटर एअर रायफल प्रकारात मेहुली घोष, रमिता जिंदाल आणि आशी चौक्सी यांनी 1886 गुणांची नोंद करत दुसरं स्थान मिळवलं आणि सांघिक रौप्यपदक निश्चित केलं.
रमिताने 631.9, मेहुलीने 630.8 आणि आशीने 623.3 पॉइंट्स कमावले. या स्पर्धेत चीनने 1896.6 पॉइंट्सची कमाई करत सुवर्णपदक जिंकलं.
 
रमिता आणि मेहुलीनं स्पर्धेच्या फायनलमध्ये प्रवेश केला आणि रमितानं तिथे तिसरं स्थान मिळवत वैयक्तिक कांस्यपदकाची कमाई केली.
 
भारताच्या अर्जुन लाल आणि अरविंद सिंग यांनी रोईंगमध्ये लाइटवेट डबल स्कल्स प्रकारात रौप्य पदक जिंकलं.
अर्जुन आणि अरविंदनं साडे सहा मिनिटांपेक्षाही कमी कालावधीत आपली शर्यत पूर्ण केली. या शर्यतीत चीनने सुवर्णपदक, तर उझबेकिस्तानने कांस्य पदक जिंकलं.
 
रोइंगमध्येच कॉक्स एट प्रकारात भारतीय संघानं रौप्यपदकाची कमाई केली.
 
तर पुरुषांच्या कॉके्स पेअर इव्हेंटमध्ये लेख राम आणि बाबू लाल यादव यांनी कांस्य पदक जिंकलं आहे.
 
लवलिना, हरमनप्रीत भारताचे ध्वजवाहक
23 सप्टेंबर 2023 रोजी चीनच्या हांगझू शहरात आशियाई क्रीडा स्पर्धेचं उद्घाटन झालं. एशियन गेम्समध्ये यंदा 40 क्रीडाप्रकारांत 481 स्पर्धांचा समावेश आहे.
 
त्यात भारत, चीन, जपान, दक्षिण कोरिया, उत्तर कोरिया, इराण आणि इंडोनेशियासह एकूण 45 देशांचे सुमारे 12 हजार खेळाडू या स्पर्धेत सहभागी झाले आहेत.
 
उदघाटन सोहळ्यात ऑलिंपिक कांस्यविजेती बॉक्सर लवलिना बोर्गोहाईन आणि हॉकी कर्णधार हरमनप्रीत यांनी ध्वजवाहक म्हणून भारतीय पथकाचं नेतृत्व केलं.
भारतानं एकूण 634 जणांचं पथक पाठवलं असून, एकूण 38 खेळांमध्ये भारतीय खेळाडू सहभागी होतील.
 
अॅथलेटिक्स स्पर्धेसाठी भारतानं 65 खेळाडू पाठवले जात आहेत.
 
त्याशिवाय पुरुष आणि महिला फुटबॉल संघात 44 खेळाडूंचा समावेश आहे, तर नौकानयनात 33, नेमबाजीत 30 आणि बॅडमिंटनमधील 19 खेळाडूंचा संघ आशियाई क्रीडा स्पर्धा-2023 मध्ये सहभागी होणार आहे.
 
















Published By- Priya Dixit