बुधवार, 27 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. खेळ मराठी
  3. क्रीडा वृत्त
Written By
Last Modified: सोमवार, 13 जून 2022 (15:04 IST)

वडिलांपाठोपाठ मुलगाही बनला आयर्नमॅन; रोहित पवार यांचे अमेरिकन स्पर्धेत यश

iron man
वडिलांपाठोपाठ मुलगाही आयर्नमॅन बनल्याची दुर्मिळ आणि अभिमानास्पद बाब आज घडली आहे. नाशिक येथील सातपूर परिसरातील प्रसिद्ध डॉक्टर सुभाष पवार यांनी गेल्या वर्षी आयर्नमॅनचा किताब पटकावला होता. विशेष म्हणजे, ते भारतातील सर्वात वयोवृद्ध आणि जलद आयर्नमॅन ठरले.आता त्यांचे चिरंजीव रोहित यांनी अमेरिकेतील मोइंस येथे झालेली स्पर्धा जिंकली आहे. त्यामुळे आयर्नमॅन झालेले बापलेक हे केवळ नाशिकच नाही तर भारतातच एकमेव ठरले आहेत.
 
रोहित पवार यांनी रविवारी (१२ जून) देस मोइंस (अमेरिका) येथे पार पडलेल्या आयर्न मॅन स्पर्धेत 14 तासांच्या खडतर प्रयत्नांनी जिंकली आहे. या स्पर्धेत त्यांनी १ तास २५ मिनिटात ४ किमी स्विमिंग, ६ तास ५२ मिनिटात १८० किमी सायकलिंग आणि ५ तास ५० मिनिटात  ४२ किमी रानिंग पूर्ण केले. त्यामुळे त्यांनी नियोजित वेळेच्या २ तास २८ मिनिटे आधीच ही स्पर्धा जिंकली आहे.
 
नाशिकमधील डॉ .सुभाष पवार ह्यांचे ते सुपुत्र आहेत. डॉ सुभाष पवार ह्यांनी गेल्या वर्षीच मेक्सिको येथे पार पडलेल्या आयर्न मॅन स्पर्धेत वयाच्या ६६ व्या भाग घेवुन ती स्पर्धा निर्धारित वेळेच्या २ तास आधीच जिंकून भारतातले सर्वात वयोवृद्ध व जलद आयर्न मॅन ठरले होते. रोहित पवार यांचा जन्म नाशिक येथे झाला असून शालेय शिक्षण नाशिक येथील सेंट फ्रान्सिस शाळेत झाले आहे.  पुणे येथील सिंहगड कॉलेज मध्ये त्यांनी B.E.(E&TC) पूर्ण केले. ते अमेरिकेत फ्लोरिडा येथे सॉफ्टवेअर इंजिनिअर म्हणून सध्या नोकरी करतात. गेल्या 4 वर्षांपासून त्यांनी व्यायामावर लक्ष केंद्रित करून ही स्पर्धा जिंकली. तसेच नाशिकचे नाव अमेरिकेत उज्ज्वल केले आहे.
 
गेल्या वर्षी २१ नोव्हेंबर रोजी डॉ. पवार यांनी मेक्सिको येथील Cozumel (कोझुमेल) या बेटावरील आयर्नमॅन स्पर्धेत सहभाग घेतला होता. ही स्पर्धा जगातील सर्वात खडतर समजली जाते. वयाच्या ६६ वर्षी त्यांनी सहभाग घेणे हे सुद्धा मोठ्या जिद्दीचे होते. त्यांनी ही स्पर्धा निर्धारित वेळेच्या २ तास आधीच जिंकली होती. डॉ सुभाष पवार यानी ४ किमी स्विमिंग केवळ १ तास १६ मिनिटात,  १८० किमी सायकलिंग ६ तास ५९ मिनिटात आणि ४२ किमी रनिंग  ६ तास २७ मिनिटात पूर्ण केली होती. म्हणजेच, निर्धारित वेळेच्या १ तास ५४ मिनिटे आधी त्यांनी स्पर्धा पुर्ण करुन आयर्नमॅनचा किताब पटकावला होता. या स्पर्धेत एकूण २२०२ स्पर्धक सहभागी झाले होते. त्यापैकी ६५ ते ६९ या वयोगटात जगातील फक्त 15 स्पर्धक सहभागी झाले होते. त्यात डॉ सुभाष पवार हे एकटे भारतीय होते. त्यांच्या यशामुळे ते त्यांच्या वयोगटातील भारताच्या आजपर्यंतच्या इतिहासातील एकमेव वयोवृद्ध व जलद आयर्नमॅन ठरले आहेत. डॉ. पवार यांनी टायगरमॅन ही ट्रायथल़न स्पर्धाही जिंकली आहे. तेव्हा त्यांचे वय ६४ वर्षे होते.