शुक्रवार, 29 नोव्हेंबर 2024
  1. धर्म
  2. सण-उत्सव
  3. श्री स्वामी समर्थ
Written By
Last Modified: मंगळवार, 7 मे 2024 (08:01 IST)

श्री आनंदनाथ महाराज कृत श्रीगुरुस्तवन स्तोत्र

ॐ नमोजी श्रीगुरुनाथा || भक्तवत्सल समर्था || तव पदी ठेऊनि माथा || स्तवितो ताता तुजलागी || १ || 
तू नित्य निरंजन || तुज म्हणती निर्गुण || तूच जगाचे कारण || अहंभावे प्रगटलासि || २ || 
तुझी स्तुती करावया || शक्ति नसे हरिहर ब्रह्मया || परि अघटित तुझी माया || जी संशयभया निवारीत || ३ || 
मूळ मूळीचा आकारू || तुज म्हणती श्रीगुरू || सच्चित शक्तीचा आधारू || पुर्णाधारू ॐकारासी || ४ || 
ऐसा तू देवाधिदेव || हे विश्व तुझेचि लाघव || इच्छेचे वैभव || मूळब्रह्मी नटविले || ५ || 
ऐसा तू बा अपरंपारू || या अनंत ब्रह्माचा आधारू || चराचरीचा आकारू || पुर्णाधारू म्हणविले || ६ || 
ऐशा तुजप्रती || स्तवावया अल्प माझी मती || तू जाणसि हे चित्ती || विश्वव्यापक म्हणवूनी || ७ || 
तरी देवा मतिदान || देणे तुझचि कारण || जरी करणे समाधान || तरी दातृत्वपूर्ण ब्रीद बोलिले || ८ || 
अहा जी निर्गुणा || विश्वव्यापक सगुणा || सत्य निराकार निरंजना || भक्तांकारणे प्रगटलासी || ९ || 
रूप पहाता मनोहर || मूर्ति केवळ दिगंबर || कोटी मदन तेज निर्धार || ज्याच्या स्वरूपी नटले || १० || 
कर्ण कुंडलाकृती || वदन पाहता सुहास्य मूर्ति || भ्रुकुटी पहाता मना वेधती || भक्त भाविकांचे || ११ || 
भोवयांचा आकारू || जेथे भुले धनुर्धरु || ऐसे रूप निर्धारु || नाही नाही जगत्रयी || १२ || 
सरळ दंड जानु प्रमाण || आजानबाहु कर जाण || जो भक्तां वरद पूर्ण || ज्याचे स्मरणे भवनाश || १३ || 
ऐसा तू परात्परु || परमहंस स्वरूप सद्गुरू || मज दावुनि ब्रह्म चराचरू || बोलविला आधारू जगतासी || १४ || 
ऐशा तुज स्तवुनी || मौन्य पावले सहस्त्रफणी || वेद श्वान होऊनी || सदा द्वारी तिष्ठती || १५ || 
तेथे मी लडिवाळ || खरे जाणिजे तुझे बाळ || म्हणवोनी पुरवि माझी आळ || माय कणवाळ म्हणविसी || १६ || 
 
मी अन्यायी नानापरी || कर्मे केली दुर्विचारी || ती क्षमा करोनि निर्धारी || मज तारी गुरुराया || १७ || 
मनाचिया वारे || जे उठवि पापांचे फवारे || तेणें भ्रमे भ्रमलो बारे || चुकवि फेरे भवाचे || १८ || 
कायिक वाचिक मानसिक || सर्व पापे झाली जी अनेक || ती क्षमा करुनी देख || मज तारी गुरुराया || १९ || 
माता उदरी तुम्ही तारिले || ते विस्मरण जिवासी पडिले || हे क्षमा करोनि वहिले || मज तारी गुरुराया || २० || 
पर उपकार विस्मरण || पापे केली अघटित कर्म || अहंभाव क्रोधा लागून || सदाचि गृही ठेवियले || २१ || 
हे क्षमा करोनि दातारा || मज तारावे लेकरा || तुजविण आसरा || नाही नाही जगत्रयी || २२ || 
मज न घडे नेम धर्म || न घडे उपासना कर्म || नाही अंतरी प्रेम || परी ब्रीदाकरण तारणे || २३ || 
नाम तुझे पाही || कदा वृथा गेले नाही || ऐसे देती ग्वाही || संत सज्जन पुराणे || २४ || 
मागे बहुत तारिले || हे त्यांही अनुभविले || मज का अव्हेरिले || निष्ठुर केले मन किंनिमित्त || २५ || 
तू विश्वाकारु विश्वाधारू || त्वांचि रचिले चराचरू || तूचि बीज आधारू || व्यापक निर्धारु जगत्रयी || २६ || 
चार देहाच्या सूक्ष्मी || तूचि झुलविशी निज लगामी || हे ठेऊनी कारणी || अहंभाव तोडावया || २७ || 
जन्ममरणाच्या व्यापारी || जे भ्रमुनी पडले माया भरारी || ते सोडविशी जरी || निजनामे करुनिया || २८ || 
ऐसा तू अनादि आधारू || तुज म्हणती वेद्गुरू || परी हे व्यापुनी अंतरु || स्थिरचरी व्यापिले || २९ || 
भावभक्ती चोखट || करणे नेणे बिकट || नाम तुझे सुभट || तोडी घाट भवाचा || ३० || 
हे जाणुनी अंतरी || पिंड ब्रह्मांड शोधिले जरी || तरी सूक्ष्मीच्या आधारी || व्यापक निर्धारी तूचि एक || ३१ || 
म्हणोनि मौन्यगती || तुज निजानंदी स्तविती || जरी बोलविसी वाचाशक्ती || तरी हाती तुझ्या दयाळा || ३२ || 
म्हणोनि स्तवने स्तवनी || तुज सांगणे एक जनी || वश व्हावे भक्ती लागुनी || अवतार करणी जाणोनिया || ३३ || 
अहंभाव तुटोनि गेला || प्रेमभाव प्रगटला || देव तेथेचि राहिला || अनुभवशुद्धी खेळवी || ३४ || 
यज्ञ कोटी करू जाता || जे फळ न ये हाता || ते प्रेमभावे स्तविता || हरिते व्यथा भवाची || ३५ || 
म्हणोनि सांगणे खूण || हा स्तव नित्य प्रेमे जाण || जो वाचील अनुप्रमाण || अकरा वेळा निर्धारे || ३६ || 
शुचिस्मित करूनि चित्ता || जो जपे प्रेमभरिता || पुरवि तयांच्या मनोरथा || सत्य सत्य त्रिवाचा || ३७ || 
हे लघु स्तव स्तवन || तारक जगाच्या कारण || भक्तिभावे पूर्ण || चुके चुके भव फेरा || ३८ || 
जो हा स्तव करील पठण || त्या घरी आनंद प्रकटेल जाण || देवोनि भक्ता वरदान || तारक त्रिभुवनी करील || ३९ || 
 
हा स्तव नित्य वाचा || भाव धरुनि जीवाचा || फेरा चुकवा चौऱ्यांशीचा || गर्भवास पुन्हा नाही || ४० || 
हे जगा हितकारी || चुकवि चुकवि भ्रमफेरी || मृगजळ दाऊनि संसारी || मग तारी जीवाते || ४१ || 
हे आनंदनाथांची वाणी || जग तारक निशाणी || स्मरता झुलवी निरंजनी || योगी ध्यानी डुलविले || ४२ || 
ऐसा ऐकता गुरुस्तवन || जागे केले सच्चित गुरुकारण || केवळ तो हरि हर ब्रह्म || मुखयंत्रीचा गोळा पूर्ण || गुरुहृदय भुवन व्यापिले || ४३ || 
तेणे होवुनि स्मरती || स्वये प्रगटली स्फूर्ती || नाभी नाभी आवरती || अवतार स्थिती बोलतो || ४४ || 
अयोनिसंभव अवतार || हिमालय उत्तरभागी निर्धार || होऊनी पूर्ण हंस दिगंबर || व्यापू चराचर निजलीले || ४५ || 
तेथून प्रगट भुवन || मग उद्धरु धरा जाण || धर्माते वाढवून तोडू बंधन कलीचे || ४६ || 
ऐशी ध्वनी निर्धार || गर्जला गुरु दिगंबर || सर्व देवी केला नमस्कार || आनंद थोर प्रगटला || ४७ || 
शालिवाहन शके तिनशे चाळीस || शुद्धपक्ष पूर्ण चैत्र मास || अवतार घेतला द्वितीयेस || वटछायेसी दिगंबरु || ४८ || 
तै धरा आनंदली थोर || मज दावा रूप सुकुमार || सेवा करीन निर्धार || पादकिंकरी होऊनिया || ४९ || 
ऐसी गर्जना प्रकट || आनंद बोधवी हितार्थ || गुह्य हे निजबोधार्थ || न बोलावे दांभिका || ५० || 
 
|| श्रीगुरुस्वामीसमर्थापर्णमस्तु ||