रविवार, 8 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. आवश्यक माहिती
Written By
Last Modified: रविवार, 17 सप्टेंबर 2023 (17:55 IST)

UPI: ऑनलाईन पेमेंटच्या नादात तुम्ही भरपूर पैसे खर्च करत असाल तर हे वाचा

digital payment app
मला अनेक वर्षांपासून सकाळी फिरायला जायची सवय आहे. मला आठवतं मी पूर्वीच्या काळी फिरायला जाताना केवळ दहा-वीस रुपये रोख स्वरुपात खिशात घेऊन निघायचो.
 
सकाळी फिरून घराकडे परत निघालो की नाक्यावर एके ठिकाणी जरुर थांबायचो. तिथे माझ्या आवडीचा एक चहावाला होता. अगदी फक्कड चहा तो बनवत असे. हा चहा घेऊनच घरी परतायचं, असा माझा दिनक्रम बनला होता. तिथे जो काही खर्च करायचा तो मला दहा-वीस रुपयांमध्येच करावा लागायचा.
 
काळ बदलला. ऑनलाईन पेमेंटच्या जमान्यात सगळेच व्यवहार मोबाईलवरून होऊ लागले. सोयीचं म्हणून मी सकाळी खिशात पैसे नेण्याऐवजी मोबाईल नेऊ लागलो आहे.
 
खिशात मोबाईल असल्याने सकाळचा खर्च दहा-वीस रुपयांमध्येच भागवला पाहिजे, अशी बंधने माझ्यावर नव्हती.
 
मग काय, ऑनलाईन पेमेंट करून कधी बाहेर नाश्ता करणं, एखादा फळविक्रेता दिसला की फळे घेणं, ब्रेड, दूध, अंडी आणणं, मध्येच लहर आली तर एखादी भाजी घरी नेऊन आईला ती बनवण्यास सांगणं, हे माझ्यासाठी सोपं बनलं.
 
एकूण काय, तर ऑनलाईन पेमेंटच्या तंत्रज्ञानाचा मी मोठ्या प्रमाणावर वापर करून घेतला.
 
नंतर, एके दिवशी फिरून आल्यानंतर मी नेहमीप्रमाणे टपरीवर चहा-खारी खाल्ली. बिलाचे 20 रुपये ऑनलाईन भरत असताना माझ्या मोबाईलमधलं UPI चालतच नसल्याचं माझ्या लक्षात आलं. नेटवर्कचा काहीतरी प्रॉब्लेम होता.
 
मी माझी अडचण चहावाल्याला सांगितली. हे पैसे नंतर देतो, असं म्हणून मी घराकडे निघालो. रोजची ओळख आणि कमी रक्कम असल्यामुळे माझं निभावलं. रस्त्यातून जात असताना एक फळविक्रेताही मला दिसला. पण UPI चालत नसल्यामुळे मी त्याच्याकडे दुर्लक्ष करून घरी निघून आलो.
 
हा प्रसंग मी नंतर विसरून गेलो. त्याच्या काही दिवसांनी मी माझ्या मित्रासोबत एके ठिकाणी फिरायला गेलो होतो. आम्हाला काहीतरी खायचं होतं, पण दोघांचंही UPI चालत नसल्यामुळे आम्ही आमचा प्लॅन रद्द केला.
 
घरी परतलो, तर आईने माझ्या आवडीचं जेवण बनवलेलं होतं. मी बाहेर मित्रासोबत तो पदार्थ खाल्ला असता तर मी घरी पोटभर जेवू शकलो असतो का, तर नाही.
 
याबाबत विचार करत असताना एक गोष्ट माझ्या लक्षात आली. ती म्हणजे, ऑनलाईन पेमेंट हे तंत्रज्ञान आपल्यासाठी कितीही सोयीस्कर असलं तरी त्यामुळे आपला खर्च विनाकारण वाढू लागला आहे.
 
पूर्वी, खिशात 100 रुपये असले, तर सगळा खर्च त्याच पैशात भागवावा लागायचा. पण आता, UPI मुळे मोबाईलवरून कितीही पैसे खर्च करता येतात.
 
पण यातूनच आपल्या पैशांना पाय फुटतात का? ऑनलाईन पेमेंटच्या नादात आपण विनाकारण पैशांचा अपव्यय करू लागलो आहोत का? जर हे खरं असेल, तर ते कसं टाळावं, या प्रश्नांची उत्तरे मी शोधण्याचा प्रयत्न करू लागलो.
 
नोटाबंदीनंतर UPI व्यवहार लोकप्रिय
2016 साली नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (NPCI) कडून UPI सुरू करण्यात आलं. या माध्यमातून आपण कोणत्याही मोबाईलवरून कोणत्याही बँक खात्यात पैसे पाठवू शकतो, असं हे तंत्रज्ञान आहे.
 
हा व्यवहार करत असताना बँक डिटेल्स टाकण्याची कोणतीही गरज नसते. केवळ एका क्यूआर कोडच्या माध्यमातून हे सर्व व्यवहार केले जातात.
8 नोव्हेंबर 2016 रोजी केंद्र सरकारकडून नोटाबंदी करण्यात आली. त्यानंतरच्या काळात ऑनलाईन व्यवहारांना चालना देण्याच्या दृष्टिकोनातून UPI सुरू करण्यात आलं होतं.
 
नंतरच्या काळात UPI वरून व्यवहार मोठ्या प्रमाणात वाढले. नोव्हेंबरपर्यंत UPI वरील व्यवहारांनी 100 कोटी रुपयांचा आकडाही पार केला.
 
UPI वरून व्यवहार वाढत असूनही त्यावेळी सर्वच ठिकाणी त्याची सोय होती, असं नाही. तर, पुढील काळात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी BHIM अपची घोषणा केली. यानंतर विविध खासगी फिन-टेक कंपन्या या क्षेत्रात उतरल्या.
 
15 लाख कोटींचे व्यवहार
2017 च्या जानेवारी महिन्यात 1 हजार कोटी रुपयांचे व्यवहार UPI मार्फत करण्यात आले होते. तर त्याच वर्षी डिसेंबरमध्ये हाच आकडा 10 हजार कोटींवर पोहोचला. डिसेंबर 2018 मध्ये हे व्यवहार 1 लाख कोटी रुपयांपर्यंत वाढले. तर मे 2022 मध्ये या व्यवहारांनी 10 लाख कोटी रुपयांचा आकडाही ओलांडला आहे.
 
ताज्या आकडेवारीनुसार, ऑगस्ट 2023 मध्ये UPI च्या माध्यमातून सुमारे 100 कोटी वेळा व्यवहार करण्यात आले. तर, या दरम्यान पाठवण्यात आलेली रक्कम ही 15 लाख कोटी रुपयांपेक्षाही जास्त आहे. आगामी सणासुदीच्या दिवसांत हा आकडा आणखी वाढू शकतो, अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे.
 
केवळ भारतच नव्हे, तर सौदी अरेबिया, फ्रान्स, सिंगापूर, नेपाळ आणि भूतान यांच्यासारख्या देशांमध्ये UPI ला मान्यता देण्यात आली आहे.
 
UPI ने केली क्रांती
म्हणजेच, वरील आकडेवारी पाहिल्यास गेल्या दोन वर्षांत, विशेषतः कोव्हिडपश्चातच्या काळात आपला सर्वांचाच रोख रकमेचा वापर खूप कमी झाला आहे.
 
आपल्यापैकी अनेकजण आता रोख रक्कम बिलकुल बाळगत नाहीत. अगदी पाच रुपयांपासून ते 5 हजार रुपयांसाठी ऑनलाईन व्यवहारांवर आपण अवलंबून आहोत. ATM सेंटरमध्ये जाऊन पैसे काढणं हेसुद्धा बऱ्यापैकी कमी झालं आहे.
 
अशा प्रकारे, आपले सगळे व्यवहार UPI वरून करणं योग्य आहे का, यासंदर्भात बीबीसीने अर्थतज्ज्ञ विवेक यांच्याशी चर्चा केली.
 
ते म्हणतात, “नक्कीच. UPI वापरणं हे फायद्याचंच आहे. आता UPI प्रत्येक ठिकाणी उपलब्ध असतं. त्यामुळे तुम्हाला रोख रक्कम जवळ बाळगण्याची गरज उरलेली नाही. पूर्वीप्रमाणे पाकिटातल्या पैशांची चोरी होण्याची भीती आता नाहिशी झाली आहे.”
 
ते म्हणतात, “पूर्वीच्या काळी आपण लहान दुकानदारांकडून काही वस्तू विकत घेतली तर आपल्याला रोखीतच व्यवहार करावा लागायचा.
 
या व्यावसायिकांकडे बँक अकाऊंट नसायचं. रोख व्यवहार होत असल्याने तो दुकानदार नेमका किती व्यवसाय करतो, हे समजू शकायचं नाही. त्यामुळे बँकही त्यांना कर्ज देण्यासाठी टाळाटाळ करायची.
 
पण आता UPI आणि ऑनलाईन व्यवहारांमुळे त्यांच्या उत्पन्नाची नोंद आपोआपच बँकेत केली जाते. त्यांचं नेमकं उत्पन्न किती आहे, हे प्रशासनाला कळतं. शिवाय, हा पुरावा दाखवून कर्ज मिळवणं व्यावसायिकांना सोपं झालं आहे.”
 
अतिरिक्त खर्च कसा रोखावा?
पण, UPI मुळे आपल्या पैशांचा अवव्यव वाढला आहे का, आपण विनाकारण जास्त खर्च करू लागलो आहोत का, तो कसा रोखावा, या प्रश्नांचं उत्तर देताना ते म्हणाले, “तुम्ही त्यासाठी UPI ला जबाबदार धरू शकत नाही. पण आपल्याला स्वतःवर नक्कीच काही बंधने घालून घेण्याची गरज पडणार आहे.”
 
“आपल्याकडे जेव्हा जास्त पैसे असतात तेव्हा ते आपल्याला खर्च करू वाटतात. इथे तर UPI मधून तुमचं बँक अकाऊंटच तुमच्यासाठी उघडं असतं. मग कळत नकळत जास्त पैसे आपल्याकडून खर्च होऊ शकतात. त्यावर आवर घालणंसुद्धा आपल्याच हातात आहे.”
 
ते म्हणतात, “समजा आपल्याकडे काही रोख रक्कम आहे, ती खर्च करताना त्याची नोंद डायरीमध्ये केल्याशिवाय आपल्याला आपण करत असलेल्या खर्चाचा हिशोब ठेवता येत नाही. पण UPI किंवा ऑनलाईन व्यवहारांबाबत असं नाही.
 
प्रत्येक ऑनलाईन व्यवहाराचा नोंद आपल्या अपवर होत असते. ते तुम्हाला कधीही पाहता येतात. महिना अखेरीस त्याचा हिशोब लावून पैसा कुठे खर्च झाला, कुठे वाचवता आला असता, याविषयी तुम्ही विचार करू शकता.”
 
ते पुढे म्हणाले, “आजकाल आपल्या खर्चाचं ट्रॅकिंग करणारे काही अॅप आले आहेत. त्यांचीही तुम्ही मदत घेऊ शकता. किंवा हातात पैसा आहे म्हणून तो खर्च होण्याची तुम्हाला भीती असल्यास पगार होताच विशिष्ट रक्कम SIP सारख्या गुंतवणुकीच्या योजनांमध्ये गुंतवावी. म्हणजे, साहजिकच खर्चावर आवर येऊन तुमचे पैसे सुरक्षित राहतात, शिवाय त्यातून चांगला परतावाही मिळतो.”
 



Published By- Priya Dixit