रविवार, 29 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. आज-काल
  3. सावरकर
Written By
Last Modified: मंगळवार, 28 मे 2019 (10:29 IST)

सावरकरांचे अंदमान : एक अनुभव

माझ्या शालेय जीवनातच मी ‘माझी जन्मठेप’ ही स्वातंत्र्यवीर वि. दा. सावरकरांची रोमांचक जीवन कहाणी वाचली होती. तेव्हापासून मनात अंदमानला जाण्याची एक सुप्त इच्छा होती. ज्यांनी मातृभूमीला गुलामीच्या पाशातून मुक्त करण्यासाठी आपले जीवनपुष्प अर्पण करण्यासाठी मागे-पुढे पाहिले नाही. घरादाराची राखरांगोळी करून केवळ मातृभूमीला मुक्त करण्यासाठी भयंकर शिक्षा भोगली त्या महान विभूती स्वा. वि. दा. सावरकरांच्या वास्तवने पुनीत झालेल्या अंदमानला अर्थातच सेलुलर जेलला ‘याचि देही याचि डोळा’ पाहण्याचा योग आला, यासाठी मी स्वत:ला धन्य मानते. 
 
निमित्त होते पर्यटनाचे. ‘अभिरुची बुक क्लब’ म्हणून गेली 14 वर्षे आम्हा मैत्रिणींचा ग्रुप आहे. पुस्तक वाचनाबरोबरच पर्यटनाचाही आनंद आम्ही छोटय़ा मोठय़ा सहली काढून घेत असतो. दरवर्षी एखादी सहल ठरलेलीच असते. गेली 2-3 वर्षे अंदमानचा प्रस्ताव पुढे येत होता, पण योग मात्र यावर्षी आला. प्रवास खूप मोठा होता. त्यामुळे योग्य व अचूक नियोजन करणे आवश्क होते. कोणत्याही ट्रॅव्हल्स कंपनीशिवाय आम्ही स्वत: नेटवरून फेरफटका मारून सर्व अचूक नियोजन केले. त्यानुसार रेल्वे, विमान, जहाज याचा प्रवास म्हणजे आगाऊ बुकिंग करणे गरजेचे. रेल्वे आरक्षण केले पण ते कनफर्म नव्हते. त्यामुळे थोडीशी भीती होती पण प्रवास तर सुरू केला आता पुढे काय होईल ते होईल. 
 
19-20 तासाचा लांबचलांब रेल्वेप्रवास करून चेन्नईला पोहोचलो. तेथून थेट विमानतळावर. विमानाने प्रवास करण्याची माझी पहिलीच वेळ. प्रचंड मोठा बंगालचा उपसागर, निळेशार पाणी आणि त्यावर तरंगणारे पांढुरके छोटे मोठे ढग. वि. स. खांडेकरांच ‘दोन मेघ’ या रुपक कथेची आठवण झाली. विमान प्रवासाचे चेन्नई ते अंदमान 1500 किमीचे अंतर दोन तासात पार केले. वैमानिकाच्या सूचना सुरू झाल्या. आता आपण अंदमान बेटावर लँडिंग करीत आहोत. खिडकीतून खाली पाहिले तर खरंच हिरवी गर्द लहान मोठी बेटे. जणू चमकणार्‍या पाचूची बेटे ती. निळ्या हिरव्या पाण्याचा प्रचंड मोठा सागर आणि त्यात ही बेटे आकाशातून अत्यंत रमणीय दिसत होती. हळूहळू आम्ही जमिनीवर उतरलो. विमानातून बाहेर आले तर समोर स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर विमानतळ असा फलक वाचला. मन भरून आले. स्वा. सावरकरांच्या त्या भूमीचे आपल्याला दर्शन झाले. जमिनीवर पाय ठेवताक्षणी तेथील धूळ मस्तकी धारण केली. हीच ती भूमी जेथे महान क्रांतिकारक स्वा. सावरकरांनी देशासाठी अतोनात हालअपेष्टा सहन केल. 
 
लगेचच दुपारी सेलुलर जेलला भेट दिली. अंदमान निकोबार पूर्वेकडेची बेटे असलमुळे तेथे सूर्यास्त फारच लवकर होतो. त्या दिवशीही 5 वाजता अंधार पडायला सुरूवात झाली. त्यामुळे संपूर्ण जेल फिरून झालेच नाही. जेल दर्शन बंद झाले. दुरूनच सावरकरांची कोठडी पाहिली. या सेलुलर जेलचे राष्ट्रीय स्मारक करण्यात आले आहे. त्याचे समाधान वाटले. त्यावेळच सर्व स्मृती जतन करून ठेवल्या आहेत. रोज संध्याकाळी पर्यटकांसाठी तेथे लाईट व साउंड शो सादर केला जातो. सेलुलर जेलचा सारा इतिहास नसिरोद्दीन शाह व ओमपुरीच भारदस्त आवाजात सादर केला जातो. जेलमध्ये प्रवेश केल्या केल्या समोरच पिंपळाचे एक पुरातन झाड आहे. जे या सर्व इतिहासाची साक्ष आहे. तेच आपणास या सेलुलर जेलचा इतिहास सांगत आहे. तेथील घंटा, फाशी घर, सावरकरांनी ओढलेला कोल्हू, सोललेला नारळ यांच्या प्रतिकृती ठेवलेल्या आहेत. जेलमधील कैद्यांना बांधल्या जाणार्‍या बेडय़ा, हातात, गळ्यात, पात तसेच शिक्षेसाठीचा विशेष पोशाख (तरटाचा) जतन करून ठेवला आहे. जेलच्या प्रांगणात कैद्यांना खोडय़ात घालून फटक्यांची शिक्षा देत. त्याचीही प्रतिकृती आहे. ते सारे पाहून ऐकून कोणत्याही सहृदयी भारतीयांच्या डोळ्यात अश्रू येतीलच पण त्याबरोबरच ऊर मात्र अभिमानाने भरून येईल. धन्य ते देशभक्त व धन्य त्याची देशभक्ती..
 
अंदमान बेट चारी बाजूंनी समुद्राने घेरलेले त्यामुळे चारी बाजूने समुद्रकिनारे. त्यातील महात्मा गांधी समुद्राधान ज्याचे 2012 सालीच उद्घाटन झाले आहे. तेथून समुद्रात फेरी मारली. सुरूवातीला तेथील हॉलमध्ये नॅशनल जिओग्राफी समुद्रतळाच्या खजिनंची टेली फिल्म पाहिली व नंतर बोटीतून समुद्रातफेरफटका मारला. विमानात बसण्यापूर्वी सामानाची तपासणी करतात तसे पोलीस पहार्‍यात कडक चेकिंग केले. प्लास्टिक सोबत घेत नाहीत ना, पाण्याच्या बाटल्यांसाठी वॉटर बॅग देण्यात आली. बोटीतून 15 हिरवी बेटे पाहिली. त्यातील दोनच बेटांवर आपल्याला जाता येते. पैकी जाली बॉय बीचवर आम्हाला सोडले. समुद्राखालचे विलक्षण जग येथे पाहायला मिळाले. रंगीबेरंगी प्रवाळ, विविधरंगी मासे (सी कुंकुवर) चित्रविचित्र आकाराचे कोरल्स बघितल्यावर मती गुंग होते. थोडय़ा वेळापूर्वी जी टेली फिल्म पाहिली होती त्याचा पुन:प्रत्ययाचा आनंद मिळाला. 
 
स्वा. सावरकरांनी बॅरिस्टरी करण्यासाठी इंग्लंडला गेले असताना ‘अभिनव भारत’ची स्थापना केली. सरकारविरोधी कारवा करतो म्हणून त्यांना स्थानबद्ध केले होते. तेव्हा मातृभूमीच्या आठवणींनी व्याकुळ होऊ ब्रायटनच्या किनार्‍यावर उभारून ‘सागरा प्राण तळमळला’ या अजरामर काव्याची रचना केली. आता या अथांग सागराकडे पाहून तीच कविता मनात रूंजी घालत होती. आम्ही सर्वजणीच ती गुणगुणत होतो. तेथून परतलो. पुन्हा सेलुलर जेलकडेच पाय वळले. कारण स्वा. सावरकरांची कोठी खुणावत होती. त्यामुळे आज मात्र जेलमध्ये प्रवेश केल्या केल्या सरळ सावरकरांची कोठी गाठली, ती कोठी, ती भिंत. त्या भिंतीला स्पर्श केला. शारीरिक यमयातना भोगत असतानाही ‘कमलाकाव्य’ सारखे कोमल काव्य लिहिण्यासाठी कागद बनलेली ती भिंत! तीही त्यावेळी थरारून गेली असेल. जेलमध्ये असताना सावरकरांनी वापरलेली भांडीही तेथे जतन केली आहेत. त्या पवित्र भूमीत कोठीत नुसते नतमस्तकच नाही तर साष्टांग दंडवत घातले तरीही मनाचे समाधान होत नव्हते. 
 
तेथील घनदाट जंगले पाहिली, परंतु तेथे वन्यप्राण्यांमध्ये वाघ वगैरे नव्हते. फक्त हरीण व साप असतात, असे रहिवाशांनी सांगितले. आम्हाला एक जंगल अधिकारीही भेटला होता. तेथील राधानगरी बीचवर डोमच्या आकाराची छोटी छोटी घरे दिसली, चौकशी करता ते रेस्ट हाऊस असल्याचे समजले. हॅवलॉक बेटावर तरंगल्यासारखे वाटत होते. राधानगरी, कालापत्थर अशा अनेक छोटय़ा मोठय़ा समुद्रकिनार्‍यांवर फिरलो. प्रत्येक समुद्रकिनारा स्वच्छ नितळ. कोकणातील व कर्नाटकातील, मुंबई चौपाटी कितीतरी किनार्‍यांवर आम्ही यापूर्वी फिरलो होतो. पण तेथील कचरा व घाण पाहून मन विषण्ण होते. येथे अंदमानला मात्र सर्व किनारे प्रदूषणविरहित होते. येथील लोकांची बहुतांश भाषा बंगाली होती. काही तेलुगूही बोलत होते. त्यांच्याशी संवाद साधताना प्रत्येकजण सांगत होता की, तेथे गुन्हेगारी शून्य आहे. तेथील लोक कष्टाळू व प्रामाणिक आहेत. अंदमानच्या महाराष्ट्र मंडळाला आम्ही भेट दिली. तेथे महाराष्ट्राचे सर्व कार्यक्रम साजरे केले जातात. अनेक मराठी साहित्यिक व सांस्कृतिक कार्यक्रमही साजरे होतात. अंदमानच्या बाजारपेठेतून फेरफटका मारला. थोडीफार खरेदी केली आणि परतीच प्रवासाला निघालो.
 
विमानतळावर आलो. 4-5 दिवस कसे संपले ते कळलेच नाही. पुन्हा या भूमीत याचे हे ठरवूनच जड अंत:करणाने अंदमानचे सृष्टीसौंदर्य   डोळ्यात साठवून सोलापूरचा रस्ता धरला तो परतण्यासाठी पुन्हा अंदमानला. 
 
खरंच- जन्मासी येऊन पहावे अंदमान
 
नतमस्तक व्हावे सेलुलर कोठीपुढे 
 
माणिक वैद्य