‘पाऊ ले चालती पंढरीची वाट’ नाट्याचे आयोजन
पंढरीच्या वारीचा विलक्षण साक्षांतकार व्हावा या हेतुने ‘पाऊले चालती पांढरीची वाट’ या नाट्याचे दि. १८ जुलै रोजी आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती काँग्रेसचे शहराध्यक्ष दिलीप कंदकुर्ते यांनी पत्रकार परिषदेत दिली. शासकीय विश्रामगृहात आयोजित पत्रकार परिषदेत यासंदर्भात पुढे माहिती देतांना कंदकुर्ते म्हणाले की, माजी केंद्रीय गृहमंत्री कै.डॉ. शंकरराव चव्हाण यांची जयंती आणि आषाढीच्या मुहूर्ताचा योग साधून या नाटकाचे आयोजन करण्यात आले आहे. विठु नामाचा झेंडा घेवून राज्यातल्या काना कोप-यातून दिंड्या पंढरपुराकडे मार्गस्थ होतात. एक महिन्यासाठी प्रपंचाचे आणि प्रपंचाच्या चिंतेचे चंबु गबाळे करून वारकरी विठ्ठल नामात तल्लीन होतात. हा एक महिन्याचा प्रवास, त्या दरम्यान मानवी स्वभावाचे घडणारे दर्शन आणि मिळणारी अनुभुती हे कथासुत्र प्रसिद्ध दिग्दर्शक डॉ. संदीप माने यांनी ‘पाऊले चालती पंढरीची वाट’ या नाट्यात मोठ्या सृर्जनशिलतेने ओवले आहे. ८० कलावंतांचा संच रंग मंचावर हा अविष्कार सादर करतात. नेपथ्य, अभिनय आणि संगीता मधून अचूक परिणाम साधला जातो आणि प्रेक्षकांच्या डोळ्यांसमोर संपूर्ण वारी उभी राहते. प्रेक्षकही यात गुंतत जातो. परिणामी वारीला न जाता ही वारी घडल्याचा साक्षात्कार प्रेक्षकाला होतो हे या नाट्याचे वैशिष्ट आहे, असे कंदकुर्ते यांनी सांगितले.आगळे वेगळे नाटक नांदेडकरांना पाहता यावे या उद्देशाने कुसूम सभागृहात सायंकाळी ६ वाजता हे नाट्य सुरु होणार आहे. प्रेक्षकांचा प्रतिसाद पाहून सभागृहाबाहेर स्क्रीन प्रोजेक्टही लावण्यात येणार आहे. नांदेडच्या रसिकांनी आणि वारकरी भक्तांनी या नाट्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन शेवटी केले. यावेळी पत्रकार गोवर्धन बियाणी, पंढरीनाथ बोकारे, सुभाष रायबोले, प्रभाकर गादेवार, स्वप्नील गुंडावार आदींसह इतरांची उपस्थिती होती.निवडणुकीच्या तोंडावर देवाची आठवणमागील काही काळापासून नांदेड शहरात कार्यक्रमांची रेलचेल होत आहे. काही संघटना, राजकीय पक्षांकडून यासाठी पुढाकार घेतला जात आहे. परंतु निवडणुक आणि राजकीय गणित डोळयापुढे ठेवले जाते. येत्या काही दिवसात शिवसेनेचा आषाढी महोत्सव होत आहे. दरवर्षी हा उत्सव सेनेचा कार्यक्रम म्हणून ओळखल्या जातो. या कार्यक्रमा दरम्यानच दि.१८ जुलै रोजी पाऊले चालती पंढरीची वाट या नाट्याचेही आयोजन करण्यात आले आहे. परंतु यासाठी आगामी निवडणूक डोळ्यासमोर ठेवूनच पक्ष, संघटनांकडून देवाची आठवण केली जात आहे. अशी चर्चा शहरात ऐकावयास मिळत आहे.