गुरूवार, 26 डिसेंबर 2024
  1. धर्म
  2. मुस्लिम
  3. मुस्लिम धर्माविषयी
Written By
Last Modified: रविवार, 10 जुलै 2022 (17:03 IST)

बकरी ईद : मुस्लीम समाज वर्षातून 3 वेळा ईद साजरा करतात का?

Eid al-Adha
जगभरातील मुस्लीम समुदायाचे लोक बकरी ईदचा सण साजरा करत आहेत. यावर्षी भारतात बकरी ईद 10 जुलैला रविवारी साजरा करण्यात येत आहे. तर दुसरीकडे, सौदी अरेबिया आणि आखाती देशांमध्ये हा सण एक दिवस आधी म्हणजेच 9 जुलै रोजी साजरा करण्यात आली.
 
यापूर्वी भारतात 2 मेला आणखीन एक ईद साजरी करण्यात आली. ही ईद होती 'ईद-उल-फित्र'.
 
मग प्रश्न पडतो की, मुस्लीम समाज वर्षाला अशा एकूण किती ईद साजरी करतो.
 
काही लोकांच म्हणणं आहे की, मुस्लीम समाज फक्त दोनच ईद साजरी करतात. यातली एक आहे 'ईद-उल-फित्र' आणि दुसरी म्हणजे 'ईद-उल-अझहा'. हे सांगणारे लोक त्यांच्या ठिकाणी योग्यच आहेत. या लोकांचा तर्क असा आहे की, पैगंबर म्हणजेच हजरत मोहम्मद यांच्या जन्मामुळे आनंद तर होतो. पण त्यांच्या जन्मदिनाची तुलना ईदशी होऊ शकत नाही.
 
नबी म्हणजेच इस्लामचे शेवटचे पैगंबर, हजरत मोहम्मद यांचा जन्म
(570-632) सौदी अरेबियातील मक्का शहरात इसवी सन 570 मध्ये झाला होता. इस्लामिक कॅलेंडरनुसार हा दिवस तिसरा महिना रबी-उल-अव्वालची 12 तारीख होती.
 
इस्लामिक कॅलेंडर चंद्रावर आधारित आहे, म्हणून इस्लामिक तारखा आणि इंग्रजी तारखांमध्ये फरक असतो.
 
मुस्लिम लोक असं मानतात की, "अल्लाहने आपला संदेश लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी जगाच्या प्रत्येक भागात आपले दूत पाठवले आहेत. या दूतांना नबी किंवा पैगंबर म्हटलं जातं. हजरत मोहम्मद हे अल्लाहने पाठवलेले शेवटचे दूत आहेत."
 
ईद-उल-फित्र
ईद-उल-फित्र म्हणजे मिठी ईद किंवा सेवईवाली ईद. या दिवशी शेवयांचा शिरखुरमा बनवला जातो. म्हणूनच या दिवसाला मिठी ईद असेही म्हणतात.
 
मुस्लिमांचा पवित्र महिना रमजानच्या शेवटी ही ईद साजरी केली जाते. रमजानच्या काळात मुस्लीम बांधव संबंध महिना उपवास करतात आणि रमजान महिन्याच्या शेवटी 'ईद-उल-फित्र' साजरी करतात.
 
ईद-उज-जोहा किंवा बकरी ईद
'ईद-उल-अझहा' किंवा 'ईद-उज-झोहा' ही ईद इस्लामिक कॅलेंडरनुसार जिल्हिज या शेवटच्या महिन्यात दहाव्या तारखेला साजरी केली जाते.
 
मुस्लिमांचे पैगंबर आणि हजरत मोहम्मद यांचे पूर्वज हजरत इब्राहिम यांच्या बलिदानाची आठवण म्हणून ही ईद साजरी केली जाते.
 
मुस्लिम समाजच्या मते, "अल्लाहने एकदा इब्राहिमच्या भक्तीची परीक्षा घ्यायचं ठरवलं. यासाठी त्यांना त्यांच्या सर्वात प्रिय वस्तूचं बलिदान द्यायला सांगितलं. यावर इब्राहिम यांनी आपला प्रिय मुलगा इस्माईलचं बलिदान द्यायचं ठरवलं."
 
इब्राहिम आता आपल्या मुलाची कुर्बानी देणार होतेच, तेवढ्यात अल्लाहने इस्माईलच्या जागी एक बकरा ठेवला. अल्लाह फक्त इब्राहिमची परीक्षा घेत होते.
 
या परंपरेची आठवण म्हणून, जगभरातील मुस्लिम ईद-उज-जोहा किंवा ईद-उल-अझहा साजरी करतात. या दिवशी एखाद्या प्राण्याची (प्राणी कसा असेल याबद्दल विशेष अटी देखील आहेत) कुर्बानी दिली जाते. त्यामुळे भारतात याला बकरी ईद असं ही म्हणतात.
 
ही ईद देखील हजशी संबंधित आहे. या दिवशी जगातील लाखो मुस्लिम पवित्र मक्का शहराला भेट देतात. बकऱ्याची कुर्बानी देणं हा हजच्या यात्रेतील महत्त्वाचा भाग असतो.
 
ईद मिलाद-उन-नबी
जगभरातील सर्वच मुस्लीम हजरत मोहम्मद यांचा जन्मदिवस पवित्र मानतात. पण हा दिवस साजरा करण्याचे वेगवेगळे प्रकार आहेत. हजरत मोहम्मद यांचा जन्मदिवस साजरा करण्याबाबत सुन्नी आणि शिया मुस्लिमांमध्ये विशेष असे मतभेद नाहीत.
 
इराणमध्ये झालेल्या इस्लामिक क्रांतीनंतर इमाम खोमेनी म्हणाले होते की, हजरत मोहम्मद यांचा संदेश जगभर पोहोचावा यासाठी त्यांचा जन्मदिवस साजरा केला पाहिजे. म्हणूनच शिया मुस्लिम हा दिवस लक्षात ठेवतात. परंतु या दिवशी विशेष असे कार्यक्रम आयोजित करत नाहीत.
 
पण सुन्नी मुस्लिमांमध्ये मात्र याविषयावर मतभेद आहेत. सौदी अरेबियामध्ये हा दिवस ईद म्हणून साजरा केला जात नाही. पण तुर्की आणि इतर अनेक इस्लामिक देशांमध्ये हजरत मोहम्मद यांचा जन्मदिवस मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो.
 
भारताबद्दल बोलायचं झाल्यास, इथले सुन्नी मुस्लीम दोन गटात विभागलेत. एक गट स्वतःला बरेलवी मुस्लीम म्हणवतो तर दुसरा गट स्वतःला देवबंदी मुस्लीम म्हणवतो.
 
बरेलवी मुस्लीम हजरत मोहम्मद यांचा जन्मदिवस मोठ्या थाटामाटात साजरा करतात.
 
या दिवशी बरेलवी मुस्लीम विशेष कार्यक्रम आयोजित करतात. या कार्यक्रमात लोकांना इस्लाम आणि हजरत मोहम्मद यांच्या जीवनाबद्दल माहिती दिली जाते.
 
हजरत मोहम्मद यांच्या स्मरणार्थ मिरवणुका काढल्या जातात. एकापेक्षा एक असे अप्रतिम पदार्थ बनवले जातात. गरिबांना अन्नदान केलं जातं.
 
मात्र देवबंदी मुस्लीम यानिमित्ताने कोणताही विशेष कार्यक्रम आयोजित करत नाहीत. इस्लाममध्ये जन्मदिवस साजरा करण्याची प्रथा आढळत नसल्याचं त्यांचं म्हणणे आहे.
 
भारतातही हा दिवस मोठ्या प्रमाणावर साजरा होतो अशी माहिती मिळत नाही. बरेलवी मुस्लीमांचं म्हणणं आहे की, भारतात मुघल काळातही हजरत मोहम्मद यांचा जन्मदिवस मोठ्या थाटामाटात साजरा करण्याची प्रथा होती.
 
1989 मध्ये, व्हीपी सिंह यांच्या राष्ट्रीय आघाडी सरकारने हजरत मोहम्मद यांचा जन्मदिवस सरकारी सुट्टी म्हणून घोषित केला होता. त्यानंतर याविषयी चर्चा झाली. आणि मुस्लिमांच्या एका गटाने हा दिवस मोठ्या उत्साहात साजरा करायला सुरुवात केली.
 
इथं एक विशेष गोष्ट आहे. ती म्हणजे मुस्लिमांच्या मान्यतेनुसार हजरत मोहम्मद यांचा मृत्यूही याच दिवशी झाला होता. म्हणून याला बारह-वफत (मृत्यूचा दिवस) असेही म्हणतात. जे मुस्लीम लोक ईद मिलाद-उन-नबीचा दिवस साजरा करत नाहीत ते असा तर्क लढवतात की, हजरत मोहम्मद यांचा मृत्यूही त्याच दिवशी म्हणजेच रबी-उल-अव्वलच्या 12 तारखेला झाला असेल तर आपण आनंद कसा काय साजरा करू शकतो.
 
काही लोक हजरत मोहम्मद यांच्या जन्मदिवसाला ईद मानून ती साजरी करतात तर काही लोक यापासून लांब राहणं पसंत करतात. कारण प्रत्येकाचा स्वतःचा असा एक तर्क असतो. मात्र जगातील सर्व मुस्लिम ईद-उल-फित्र आणि ईद-उल-अजहा या दोन ईद साजरी करतात.