अष्टगणेश : विकट
विकटो नाम विख्यात: कामासुरविदाहक:।
मयूरवाहनाश्चायं सौरब्रम्हाधर: स्मृत: ।।
विकट नावाचा प्रसिद्ध अवतार कामासुराचा संहारक आहे. मयूर त्याचे वाहन आहे. श्री विष्णू जेव्हा जालंधराची पत्नी वृंदाजवळ गेले तेव्हा त्यांच्या शुक्रापासून अत्यंत तेजस्वी अशा कामासुराचा जन्म झाला. त्याने शुक्राचार्यांकडे जाऊन त्यांना श्रद्धापूर्वक प्रणाम केला. शुक्राचार्यांनी त्याला शिव पंचाक्षरी मंत्राची दीक्षा दिली. त्याने पुन्हा आपल्या गुरूला प्रणाम केला आणि नंतर तपश्चर्या करण्यासाठी जंगलात निघून गेला.
तेथे त्याने महादेवाला संतुष्ट करण्यासाठी अन्न, पाण्याचा त्याग करून पंचाक्षरी मंत्राचा जप करत तपस्या सुरू केली. अत्यंत कठीण परिस्थितीत कामासुराने तपश्चर्या केली. त्याने प्रसन्न होऊन महादेव प्रकट झाले आणि त्याला वर मागण्यासाठी सांगितले. त्याने ब्रम्हाडांचे राज्य प्रदान करण्याचा वर मागितला. मी बलवान, निर्भय आणि मृत्युंजयी झालो पाहिजे याचीही मागणी केली.
तेव्हा शिवाने त्याला म्हटले, तू अत्यंत दुर्लभ आणि देवाला दु:ख देणारे वर मागितले आहेत. तरीही तुझ्या कठोर तपश्चर्याने प्रसन्न होऊन मी तुझी कामना पूर्ण करतो. कामासुर प्रसन्न होऊन गुरू शुक्राचार्याकडे गेला आणि त्यांना शिव दर्शनाचा वृत्तांत सांगितला. दैत्याचार्यांने खूश होऊन त्याचा विवाह महिषासुराच्या रूपवान कन्येशी लावून दिला. या दरम्यान सर्व दैत्य एकत्र आले आणि त्यावेळी शुक्राचार्यांनी कामासुराची दैत्यराजपदी नियुक्ती केली. सर्वांनी त्याच्या अधीन राहण्याचे मान्य केले.कामासुराने अत्यंत सुंदर रतिद नावाच्या नगरात आपली राजधानी निर्माण केली. रावण, शंबर, महिष, बळी आणि दुर्मद हे पाच त्याचे शूर प्रधान होते. कामासुराने आपल्या पाच प्रधानांबरोबर चर्चा करून पृथ्वीवर आक्रमण केले. नंतर स्वर्गावर आक्रमण केले त्याच्या शस्त्रासमोर देवांचाही टिकाव लागला नाही. सर्वजण त्याला शरण आले. काही कालावधीतच कामासुराने त्रैलोक्यावर सत्ता मिळवली. त्याने सर्व धर्मकार्ये बुडवली. त्याच्या त्रासाला कंटाळलेले सर्व देव एकत्र आले तेव्हा तेथे योगीराज मुदगल ऋषी आले. भगवान शंकराने त्यांना कामासुराच्या विनाशापासून मुक्ती मिळविण्यासाठी मार्ग विचारला. योगीराज मुदगल यांनी सांगितले की आपण सर्वजण सिद्धक्षेत्र मयुरेश येथे जाऊन तप करा. तेथे तुमच्या तपाने संतुष्ट होऊन गणेश प्रकट होतील आणि आपल्या संकटाचे निवारण करतील.