गुरूवार, 26 डिसेंबर 2024
  1. धर्म
  2. गणेशोत्सव
  3. गणेश महिमा
Written By

संकटी पावावे, निर्वाणी रक्षावे

कौटुंबिक पातळीवर घरोघरी आणि सामाजिक पातळीवर सार्वजनिक ठिकाणी आपण श्री गणेश देवतेची स्थापना आनंदाने आणि उत्साहाने केली असून रोज त्याचे पूजन, सकाळ-संध्याकाळ आरती-नैवेद्य, याबरोबरच मनाशी संकल्प करून तो सिद्धीस जावा, यासाठी अंतःकरणपूर्वक प्रार्थना करतो. ही उपासना कशासाठी? तर आपल्या सर्वच कार्यात यश मिळावे, आपले प्रयत्न सफल व्हावेत, शिवाय अशा उपासनेतून श्री गणेशाने प्रसन्न होऊन आपल्या अपेक्षांची परिपूर्ती करावी, हीच आपली इच्छा-आकांक्षा असते. श्री गणेश ही बुद्धीची देवता असल्याने 'बुद्धी दे गणनायका' अशी आपण त्याच्याचरणी विनवणी करतो.
 
प्रबोधन व मनोरंजन
सामाजिक पातळीवर गणेशोत्सवात लहान-लहान मुलांची छोटी-छोटी मंडळे स्थापन करून तेथेही श्री गणेश वंदना केली जाते. तरुण व मोठी माणसेही चौका-चौकातून 'श्रीं'ची स्थापना करतात. आरास-देखावे करून उत्सवाची शोभा वाढवितात. या दोन्ही ठिकाणी एकत्रित जमून आणि विविध कार्यक्रमांचे आयोजन करून नेतृत्वगुणांना प्रोत्साहन दिले जाते. विविध मंडळांकडून कौटुंबिक, सामाजिक, राजकीय अशा प्रश्नांवर प्रबोधनपर व्याख्याने आयोजित केली जाऊन त्यातून सद्य:स्थितीची जाणीव आणि ती समजून घेणारी आपली भूमिका यांचाच अंतर्मेळ घातला जातो. प्रबोधनाबरोबरच विविध स्पर्धांचे आयोजन करून त्याद्वारे मनोरंजनही केले जाते. विविध देखाव्यांतून सद्य:स्थितीवर भाष्देखील केले गेलेले असते. आरती-प्रसाद या निमित्ताने समाज एकत्र येतो. रोज दोन्हीवेळा केल्या जाणार्‍या आरतीप्रसंगी आपण श्रीगणेशाला काय मागतो? आणि तो तुम्हा-आम्हाला कोणते वरदान देतो? हे श्री समर्थ रामदास स्वामींनी 'आरती'ची जी शब्दरचना केली आहे त्यातच प्रकट केले आहे. श्री गणेशदेवाला ते म्हणतात, तू सुखकर्ता आहेस आणि दुःखहर्ताही आहेस. 
 
'दास रामाचा वाट पाहे सदना। संकटी पावावे । निर्वाणी रक्षावे। सुरवर वंदना॥ जयदेव जयदेव जय  मंगलूर्ती। दर्शन मात्रे मनःकानापूर्ती॥' इथे त्यातला भाव असा आहे की, तू आमच्या घरी येऊन कधी स्थानापन्न होशील, याची आम्ही वाट पाहात आहोत. कारण तुझी स्थापना करून आम्हाला तुझे चरणी एक मागणे मागायचे आहे. कोणते? तर आच उपासनेने तू आम्हाला संकटातून सोडवावेस. संकट प्रसंगी तू धावून यावेस. निर्वाणी म्हणजे कठीण काळीही तू आमचे रक्षण करावेस.
 
उपासनेचे स्वरूप
श्री गणेशाच्या उपासनेचे स्वरूप कोणते? तर दर चतुर्थीला उपवास करतात. श्री गणेशाला अथर्वशीर्षाचे पठण, पारायण, आवर्तन करतात. त्यामुळे 'संकष्टी' उपवास करण्याच्या आमच्या उपासनेला तू प्रसन्न होऊन आम्हावर कृपा कर, अशी प्रार्थनाही केली जाते. 'संकष्टी' हे व्रत आहे. कुणी अष्टविनायकाचे दर्शनही घेतात. दर चतुर्थीला श्री गणेश मंदिरात जाऊन दर्शन घेतात. श्री गणेश ही अधिष्ठात्री देवता असून संकल्प करून पूजाविधी केल्यास ती मनोवांछित कार्याची पूर्ती करते. त्याचे वाहन उंदीर आहे. तो कुरतडण्यात पटाईत आहे. म्हणून काळस्वरूपही मानला गेला आहे. त्यालाच जिंकून श्री गणेशाने त्याला आपले वाहन केले आहे. 
 
काळाला जिंकणे म्हणजे काळ सार्थकी लावणे होय. म्हणून तुम्ही आम्ही काळाचा (आयुष्य) सदुपयोग करून जीवन सार्थकी लावले पाहिजे. सत्कार्यात सहभाग, सदाचरणाचे अनुसरण, सद्‌विचारांचे प्रसारण ही त्रिपादी त्यात महत्त्वाची ठरते. व्यक्ती सुधारली की, समाजही सुधारतो. समाज सुधारला की, राष्ट्रही सुधारते. अशा परिवर्तनासाठी श्री गणेशाकडे हेच मागणे की, 'बुद्धी दे गणनायका'.

प्रा. डॉ. नरेंद्र कुंटे