शुक्रवार, 27 डिसेंबर 2024
  1. धर्म
  2. गणेशोत्सव
  3. अष्टविनायक
Written By
Last Updated : शनिवार, 7 सप्टेंबर 2024 (12:56 IST)

अष्टविनायक

ashtavinayak
अष्टविनायक म्हणजे महाराष्ट्रातील आठ मानाची व प्रतिष्ठेची गणपतीची देवळे. पश्चिम महाराष्ट्र व कोकणात असलेल्या ह्या देवळांना पेशव्यांचा आश्रय असल्यामुळे त्यांना पेशवाईच्या काळात महत्त्व प्राप्त झाले. मुद्गल पुराणातही अष्टविनायकांचे वर्णन आढळते. महाराष्ट्रातील या विशिष्ट ‘आठ’ ठिकाणच्या गणेश मंदिरांना खास महत्त्व आहे. या आठ मंदिरांस मिळून ‘अष्टविनायक’ म्हटले जाते. 
 
गणपतीचे असंख्य भाविक अष्टविनायकाची यात्रा करतात. अष्टविनायकाची सर्व मंदिरे ही अंतराच्या दृष्टीने परस्परांच्या जवळ आहेत. साधारणपणे दीड ते दोन दिवसांत ही अष्टविनायक यात्रा पूर्ण होऊ शकते. पुणे जिल्ह्यात पाच (मोरगाव, थेऊर, रांजणगाव, ओझर, लेण्याद्री), रायगड जिल्ह्यात दोन (महड, पाली) व अहमदनगर जिल्ह्यात एक (सिद्धटेक) या ठिकाणी ‘अष्टविनायक स्थाने’ आहेत. या गणपतींपैकी महड, सिद्धटेक व रांजणगावचा गणपती हे उजव्या सोंडेचे आहेत. बाकीचे डाव्या सोंडेचे. या सर्व गणपतींची सविस्तर माहिती पुढीलप्रमाणे -
 
मोरगांव
थेऊर
सिद्धटेक
रांजणगाव
ओझर
लेण्याद्री
महड
पाली
 
मोरगांव
अष्टविनायकांपैकी पहिला गणपती हा मोरगावचा मोरेश्र्वर. या गणपतीस श्री मयुरेश्वर असेही म्हणतात. थोर गणेशभक्त मोरया गोसावी यांनी येथील पूजेचा वसा घेतला होता. श्री मोरेश्वर गणेशाचे, हे स्वयंभू व आद्यस्थान आहे. प्रत्येक घरात म्हटली जाणारी ‘ सुखकर्ता दु:खहर्ता’ ही आरती श्री समर्थ रामदास स्वामींना याच मंदिरात स्फुरली, असे म्हटले जाते. श्री मोरेश्र्वराच्या डोळ्यांत व बेंबीत हिरे बसवलेले आहेत. पुणे जिल्ह्यातील बारामती तालुक्यात मोरगांव हे ठिकाण आहे. मोरगाव हेरावर आहे. महाराष्ट्राचे कुलदैवत जेजुरीचा खंडोबा हा मोरगावपासून अगदी १७ कि. मी. अंतरावर आहे. 
 
थेऊर
अष्टविनायकांपैकी थेऊरचा श्री चिंतामणी हा दुसरा गणपती आहे. भक्तांच्या चिंतेचे हरण करणारा म्हणून याला चिंतामणी म्हणतात. थेऊरचा विस्तार हा माधवराव पेशवे यांनी केला. थेऊर पुणे-सोलापूर महामार्गाला जोडलेल्या रस्त्यावर, तालुक्यात असून पुण्यापासून हे ३० कि. मी. अंतरावर आहे. 
 
सिद्धटेक
सिद्धटेकचा श्री सिद्धिविनायक हा अष्टविनायकांपैकी तिसरा गणपती आहे. हे भीमा नदीवर वसलेले सिद्धिविनायकाचे स्वयंभू स्थान आहे. पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांनी जीर्णोद्धार करून मंदिर बांधले आहे. मंदिरात पितळी मखर असून त्याभोवती चंद्र-सूर्य-गरुड यांच्या प्रतिमा आहेत. अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत तालुक्यात हे ठिकाण असून दौंडपासून १९ कि. मी. अंतरावर आहे.
 
रांजणगाव
अष्टविनायकांपैकी चौथ्या गणपतीला महागणपती असे म्हणतात. हे महागणपतीचे स्वयंभू स्थान आहे. पुणे-अहमदनगर मार्गावर शिरूर तालुक्यात हे ठिकाण आहे. अष्टविनायकांपैकी सर्वाधिक शक्तिमान असे महागणपतीचे रूप आहे. श्री महागणपती उजव्या सोंडेचा असून गणेशाला कमळाचे आसन आहे. माधवराव पेशव्यांच्या काळात या मंदिराचा जीर्णोद्धार केल्याचे इतिहासात आढळते. श्री गणेशाला दहा हात आहेत आणि प्रसन्न व मनमोहक अशी श्रींची मूर्ती आहे.
 
ओझर
अष्टविनायकांपैकी ओझरच्या विघ्नेश्र्वर हा पाचवा गणपती आहे. येथील श्रींची मूर्ती लांब रूंद असून अष्टविनायकापैकी सर्वात श्रीमंत गणपती म्हणून श्री विघ्नेश्र्वराला ओळखले जाते. श्रींच्या डोळ्यात माणिक असून, कपाळावर हिरा आहे. ही गणेशाची स्वयंभू मूर्ती आहे. 
 
लेण्याद्री
अष्टविनायकापैकी सहावा गणपती लेण्याद्रीचा श्री गिरिजात्मज. किल्ले शिवनेरीच्या सान्निध्यात, जुन्नर तालुक्यातील प्राचीन जुन्नर लेण्यांच्या समुदायात आणि कुकडी नदीच्या परिसरात डोंगरावर श्री गिरिजात्मज गणेशाचे हे स्वयंभू स्थान आहे. श्री गणेशाची प्रसन्न मूर्ती असून ती दगडामध्ये कोरलेली आहे. मंदिरात दगडी खांब आहेत व त्यावर वाघ, सिंह, हत्ती असे सुंदर नक्षीकाम केलेले आहे. मंदिरात जाण्यासाठी डोंगरावर सुमारे ४०० पायऱ्या आहेत.
 
महड
महडचा वरदविनायक हा अष्टविनायकांपैकी सातवा गणपती आहे. हे स्वयंभू स्थान असून त्याला मठ असेही म्हणतात. श्री वरदविनायकाचे मंदिर साधे, कौलारू असून मंदिराला घुमट आहे व त्याला सोनेरी कळस आहे. कळसावर नागाची नक्षी आहे.
 
पाली
पालीचा गणपती हा अष्टविनायकांपैकी आठवा गणपती आहे. या गणपतीला श्री बल्लाळेश्वर म्हणतात. बल्लाळेश्वर गणपतीचे हे स्वयंभू स्थान आहे. मंदिर पूर्वाभिमुख आहे. गणेशाचे कपाळ विशाल असून डोळ्यात हिरे आहेत.