अतिवृष्टीमुळे बाधित शेतकऱ्यांसाठी 365 कोटी 67 लाख रूपये मंजूर
जुलै 2021 मध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे राज्यात पूरपरिस्थिती उद्भवली होती. त्यात शेतपिकांचं मोठं नुकसान झालं होतं.याच पार्श्वभूमीवर आता राज्य सरकारकडून शेतपिकांच्या नुकसानाकरिता बाधितांना एकूण 365 कोटी 67 लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. यासंबंधीचा शासन निर्णय राज्याच्या महसूल आणि वन विभागाने जारी केला आहे.
अतिवृष्टीमुळे पिकांच्या झालेल्या नुकसानीकरिता बाधितांना मदतीचं वाटप विभागांनुसार पुढीलप्रमाणे होणार आहे.
यात पुणे विभागासाठी 150 कोटी 12 लाख रुपये, कोकण विभागासाठी 8 कोटी 51 लाख रुपये, अमरावती विभागासाठी 118 कोटी 41 लाख रुपये, नाशिक विभागासाठी 1 लाख रुपये, औरंगाबाद विभागासाठी 77 कोटी 97 लाख रुपये, नागपूर विभागासाठी 10 कोटी 65 लाख रुपये याप्रमाणे एकूण 365 कोटी 67 लाख इतका निधी मंजूर राज्य सरकारकडून करण्यात आला आहे.
दरम्यान, आता पुन्हा एकदा मुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. आता परतीचा पाऊस चार ते पाच दिवस रेंगाळण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी येत्या आठवड्यातच शेतीची कामं उरकून घ्यावीत, असा सल्ला देण्यात आला आहे.