सोमवार, 23 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. बीबीसी मराठी बातम्या
Written By
Last Modified: बुधवार, 27 मे 2020 (14:47 IST)

आदित्य ठाकरे: मुंबई मधल्या कोरोना परिस्थिती आणि महाराष्ट्रात राजकीय घडामोडींवर बीबीसी मुलाखत

राज्यात वाढणारा कोरोनाग्रस्तांचा आकडा, मुंबईतली कोरोनाची परिस्थिती आणि या सगळ्यातच राजकीय घडामोडींना सध्या आलेला वेग, या सगळ्याविषयी महाराष्ट्राचे पर्यटन मंत्री, मुंबईचे पालकमंत्री आणि युवासेना नेते आदित्य ठाकरे यांनी मयांक भागवत यांच्याशी केलेली ही एक्सक्ल्युझिव्ह बातचीत.
 
राहुल गांधींनी म्हटलं की, सरकारमध्ये आमचं ऐकून घेतलं जात नाही. यावर देवेंद्र फडणवीसांनी असं म्हटलंय की, बहुदा काँग्रेस कोव्हिडचं सगळं खापर उद्धव ठाकरेंच्या नावावर फोडण्याचा प्रयत्न करतेय. याबद्दल तुमचं म्हणणं काय आहे?
 
मी राजकीय वक्तव्यांवर जाणार नाही. काँग्रेसनी जी पत्रकार परिषद घेतली, ती सगळ्यांनी पाहिली. राज्य सरकारवर सगळ्यांचा विश्वास आहे, हे स्पष्ट झालंय. मुख्यतः मी विरोधी पक्षांना सांगेन की यामध्ये राजकारण न करता आपण सगळ्यांनी एकत्र काम करणं गरजेचं आहे.
 
जसं देशात वातावरण आहे - कुठेही काही चुकीचं होत असेल तर आम्ही बोलत नाही, कारण विरोधी पक्ष असेल वा सत्ताधारी पक्ष असेल, आपण पक्षभेद विसरून आपण काम करणं गरजेचं आहे. लोकांची सेवा करणं गरजेचं आहे. कुठेही राजकीय मतभेद मध्ये न आणता एकमेकांची मदत करणं गरजेचं आहे.
 
टीका-टिप्पणी तर होतच राहील. याच्यासाठी आपल्याकडे खूप वेळ आहे. पण आता लोकांचे जीव वाचवणं महत्त्वाचं आहे.पण राजभवनावरच्या अचानक फेऱ्या वाढणं, 'सरकार काम करत नाही, राष्ट्रपती राजवट लावा,' असं विरोधी पक्षांनी म्हणणं. याबाबत तुम्ही काय सांगाल?
 
कदाचित आपलंच एक राज्य आहे, जिथे विरोधी पक्ष अशा भावनेने काम करतोय जिथे महाराष्ट्र जर खाली गेला, जगाच्या मीडियात खाली दिसला तर त्यांना बरं वाटतं. जगात असं कुठेही होत नाहीये. ही खरंतर दुःखद घटना आहे. किंवा त्यांची ही भावना चुकीची आहे.
 
मुख्यतः त्यामागचं एकच कारण आहे - सत्ता हातात नसल्याचं अपचन. आणि याला डायजीन किंवा जेल्युसिल हेच चालू शकतं.
 
जागतिक साथीच्या आजारादरम्यान आपल्याला आकड्याला घाबरून चालणार नाही. या आकड्यांना आपल्याला सामोरं जावं लागेल. जेव्हा एखादी साथ असते तेव्हा तुम्ही आकडे किती ओळखता, त्या रुग्णांना शोधून त्यांना आयसोलेट करता, यात सरकारचं यश असतं.
 
आकडे जेवढे वाढतील, तेवढे लवकर आपण पीकच्या जवळ जाऊ. तेवढ्या लोकांना आयसोलेट करू शकू आणि बरं करू शकू. कारण हा विषाणू एकामधून दुसऱ्यामध्ये प्रादुर्भाव होतो. जेवढे आकडे आपण ओळखू ते लोकांना दिसेल, पण तितक्यांना बरं करून आपण साथ आटोक्यात आणू शकू.
 
फील्ड हॉस्पिटल्सची गरज का पडली? BKC, नेस्को ग्राऊंड्स, वरळीच्या डोममध्ये व्यवस्था उभारण्यात येत आहेत. महाराष्ट्रातली, विशेषतः मुंबईतली पालिकेची रुग्णालयं कुठे कमी पडली की इतक्या मोठ्या प्रमाणात फील्ड हॉस्पिटल्स उभारावी लागली?
 
यात दोन-तीन गोष्टी पाहायला हव्यात. आपल्याकडची सगळी हॉस्पिटल्स, मग ती सरकारी असोत वा खासगी, ही सध्या कोव्हिडवर उपचार करत आहेत. देशभरातल्या इतर सर्जरीज पुढे ढकलण्यात आलेल्या आहेत. आपल्याला जर या हॉस्पिटल्समधली कोव्हिड-19 खेरीज इतर कामं आणि उपचार सुरू करायचे असतील तर मग फील्ड हॉस्पिटल्समध्ये कोव्हिडच्या साथीचे उपचार करावे लागतील. या फील्ड हॉस्पिटल्समध्ये एक्स-रे, स्वॉब्जपासून ते ऑक्सिजन आणि ICU यासाठीची आपली तयारी सुरू आहे.
 
काही ठिकाणी कोव्हिड डायलिसिसही सुरू आहे, कारण काही ठिकाणी डायलिसिससाठी गेलेली व्यक्ती कोव्हिड पॉझिटिव्ह आली आणि ती इमारत तीन दिवस बंद झाली. आणि इतरांना याचा त्रास होऊ शकतो. म्हणून आपण फील्ड हॉस्पिटल्स करतोय. म्हणजे हळुहळू इतर रोगांचे उपचार हॉस्पिटलमध्ये होतील आणि कोव्हिडवर फील्ड हॉस्पिटल्समध्ये उपचार होतील.
 
आपल्याकडे सध्या 30 हजारांच्या आसपास आयसोलेशन बेड्स असल्याचा दावा BMC कडून केला जातोय. ICU आणि ऑक्सिजन बेड्सची संख्याही वाढवण्यात येतेय. मग बेड्स मिळत नसल्याच्या, एका हॉस्पिटलमधून दुसरीकडे जावं लागत असल्याच्या तक्रारी लोकांकडून का येत आहेत?
काही ठिकाणी हॉस्पिटलमध्ये बेड्स रिकामे झाल्यावर लगेच भरूनही जात आहेत, कारण येणाऱ्या पेशंट्सची संख्या तेवढी आहे. दुसरी गोष्ट म्हणजे जोपर्यंत आपण एखाद्याला तपासत नाही, तो 100 टक्के कोव्हिड पॉझिटिव्ह आहे, याची खात्री होत नाही, तोपर्यंत त्याला तो बेड देणं हे त्याच्यासाठीही हानिकारक ठरू शकतं, कारण आजूबाजूचे इतर सगळेजण पॉझिटिव्ह असतात.
 
एखादी इतर रोग असलेली व्यक्ती निगेटिव्ह असेल, आणि तिला पॉझिटिव्ह व्यक्तींसोबत ठेवलं गेलं तर तो पॉझिटिव्ह ठरू शकतो. त्यामुळे ही थोडी तफावत आहे.
 
काही दिवसांपूर्वी KEM आणि सायन हॉस्पिटलमधले काही व्हीडिओ आले होते. त्यावरही राजकारण झालं होतं. रुग्णांना अशाप्रकारे का वागवलं जातंय, याविषयीचे प्रश्न उपस्थित करण्यात आले होते. मुंबईकरांना तुम्ही काय सांगाल?
 
आम्ही राजकारणापासून दूर राहिलो आहोत. अधिकारी, मंत्री, कार्यकर्ते या सगळ्यांनाच लोकांची सेवा करायला सांगण्यात आलेलं आहे. जिथे जिथे आम्ही कमी पडतोय, तिथे लगेच आम्ही काम करायचा प्रयत्न करतोय. जिथे राजकारण होतंय, त्याच्यापासून दूर राहातोय.
 
मला वाटतं, आता सगळ्यांचं काम एवढंच आहे की जिथे आपण चांगलं काही करू शकतो, ते आपण सोबत करूयात. एकमेकांना मदतीचा हात देऊयात. काही कमी पडत असेल तर नक्की दाखवून द्या. पण त्याच्यावरून राजकारण करणं अयोग्य आहे.
 
पण ज्याप्रकारे मृतदेहांच्या बाजूलाच रुग्णांवर उपचार केले जातायत, आपल्याकडे शवागारांची संख्या कमी असल्याने मृतदेह वॉर्डमध्ये ठेवावे लागतायत. ही परिस्थिती कशी बदलणार?
 
याविषयी या रुग्णालयाच्या डीनने तेव्हाही स्पष्टीकरण दिलं होतं. यामागे मेडिकल तसंच कायदेशीर कारणं असतात. काही ठिकाणी मृतदेह स्वीकारले जात नाहीयेत, तर काही ठिकाणी संपूर्ण कुटुंब असूनही अर्धा-पाऊण तास जातो. याच्याविषयी अधिक स्पष्टीकरण न देता, आपण जे योग्य करू शकतो, ते आपण करतोय.
 
मुंबई महापालिकेची टेस्टिंग स्ट्रॅटेजी - चाचणी करण्याची पद्धत - दोन वेळा बदलण्यात आली. असं का होतंय? यात समन्वयाचा अभाव आहे का?
 
देशभरात जी पद्धत अवलंबण्यात येतेय त्यापेक्षा वेगळं काही आपण करू शकत नाही. ICMRच्या गाईडलाईन्स पाळण्याचा आपण प्रयत्न करतोय. केंद्र सरकार आणि राज्य सरकार यांनी एकत्र काम करणं गरजेचं आहे. आणि आतापर्यंत गृहखातं, स्वतः पंतप्रधान किंवा आरोग्य मंत्रालयाकडून मुख्यमंत्र्यांना, आरोग्यमंत्री टोपेंना ते सहकार्य मिळालेलं आहे.
 
दिल्लीच्या टीम्स तीन-चार वेळा येऊन गेल्या. वरळी डोम फिरल्या, वरळीला कोळीवाड्यामध्ये गेल्या, डोमला आल्या. तर साधारण हे असं सहकार्याचं वातावरण आहे.
 
अधिकारी ऐकत नाहीत अशी एक तक्रार होती. याचमुळे प्रवीण परदेशींची बदली झाल्याचं म्हटलं गेलं. खरी परिस्थिती काय आहे ?
 
मला वाटतं तुम्ही गॉसिपवर भरवसा ठेवू नका.
 
तुम्ही एक मुंबईकर आहात. गेली जवळपास 15 वर्षं तुम्ही सामाजिक कार्यात सहभागी आहात. सगळंकाही व्यवस्थित होईल, सरकार योग्यरीतीने काम करतंय, असं आश्वासन मुंबईकरांना देणार का?
 
मी सगळ्यांना एकच सांगेन - प्रत्येक मुंबईकरच काय, प्रत्येक देशवासीयासाठी आम्ही इथे आहोत. सेवा करत आहोत, अहोरात्र मेहनत करत आहोत. जे काही करायची गरज आहे, जे करणं शक्य आहे, ते दोन्ही आम्ही करतोय. सेवा करतच राहू आणि या युद्धात आपण जिंकू.