सोमवार, 27 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. बीबीसी मराठी बातम्या
Written By

बिनधास्त जगणाऱ्या पण माफी न मागणाऱ्या बायका... ब्लॉग

- अनघा पाठक
या पोरी... या पोरी रफ अँण्ड टफ आहेत, जी परिस्थिती समोर येईल तिला धडक द्यायची धमक यांच्यात आहे, बिनधास्त आहेत, त्यांना खळखळून हसायला आवडतं, आम्हाला कोणी अडवू शकत नाही, थांबवू शकत नाही. थोडक्यात रापचिक ग्रुप आहे आमचा.
 
हे उद्गार होते मेगन रिपोनीचे, अमेरिकेच्या फुटबॉल टीमच्या कॅप्टनचे... ती मेगन जिने स्पर्धा सुरु व्हायच्या आधी सांगितलं होतं, काहीही झालं तरी मी त्या (*शिवी*) व्हाईट हाऊसमध्ये पाऊल ठेवणार नाही.
 
आणि अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी फक्त एवढंच म्हटलं, आधी जिंकून तर दाखवा, मग बघू तुम्हाला बोलवायचं की नाही ते.
 
ट्रंप, वाट्टेल ते बोलण्यासाठी आणि वादग्रस्त विधानं करण्यासाठी प्रसिद्ध आहेत, ते फक्त एक विधान करून गप्प बसले.
 
आपली मतं ठामपणे मांडणाऱ्या बाईला आरडाओरड करून गप्प बसवणं अवघड असतं. राजकीय व्यासपीठावर सगळे संकेत पाळून वादविवाद करणाऱ्या राजकारणी महिलेला भर सभेत 'नॅस्टी वुमन' (कजाग बाई) म्हणणं वेगळं, आणि जी बाई स्वतःच जाहीरपणे सांगते की माझ्याशी नडलात तर माझ्याइतकी कजाग बाई नाही कोणी. तिला कसं नॅस्टी वुमन म्हणणार?
 
तर अशा या गुलाबी केसांच्या, बॉयकटवाल्या, लेस्बियन खेळाडूचं तडाखेबाज भाषण अमेरिकेत चर्चेचा विषय ठरलाय. अमेरिकेतल्या आणि जगातल्या मुलींची ती आदर्श ठरू पाहतेय.
 
आणि म्हणूनच कदाचित या मुलींना ताब्यात ठेवू पाहणारे, त्यांनी 'मुलीसारखंच' चाकोरी न सोडता आयुष्य जगावं अशी इच्छा बाळगणारे अनेक पालक, शिक्षक, तिऱ्हाईत धास्तावलेत.
 
म्हणूनच कदाचित ज्या दिवशी रिपोनी आणि पोरींच्या गँगने फ्रान्स गाजवून महिला फुटबॉलचा वर्ल्डकप जिंकला, त्या दिवशी तिच्या मायदेशात तिची पोस्टर फाडली गेली, तिच्या पोस्टर्सवर घाणेरड्या कमेंटस केल्या गेल्या. तिचा तिरस्कार करणाऱ्या घोषणा लिहिल्या गेल्या.
 
मी विचार करतेय, जर एखादा पुरुष कॅप्टन फुटबॉलचा वर्ल्डकप जिंकला असता तर देशातले लोक असेच वागले असते का? तो सोडा, आपले धोनी-कोहली वर्ल्ड कप घेऊन घरी आले असते तर आपण त्यांना डोक्यावर घेऊन नाचलो असतो की त्यांचे पोस्टर फाडले असते?
 
मग मेगनच्या बाबतीत असं का? मग लक्षात आलं, तिच्याविषयी काही लोकांच्या मनात राग आहे कारण ही बाई दबत नाही, तिला दडपता येत नाही, ती याला त्याला सॉरी म्हणत बसत नाही.
 
एवढा वर्ल्डकप जिंकला, पण अमेरिकेतल्याच काही लोकांची प्रतिक्रिया काय होती, "ते ठीक आहे, जेतेपद वगैरे, पण वागायची काही पद्धत? ही कसली तऱ्हा धांगडधिंगा घालायची? आपल्या चँपियनशिपचा एवढा कसला माज? विनम्र राहावं की."
 
म्हणजे खरी मेख इथे आहे. महिलांना उद्देशून 'ग्रॅब देम बाय देअर पुसी' म्हणणारे राष्ट्राध्यक्ष चालतात अमेरिकेला, पण आपलं ते खरं करणारी, गुलाबी केसांची, लेस्बियन, आक्रमक फुटबॉल प्लेअर चालत नाही. सहाजिक आहे, तिला पाहून आता 12-15 वर्षांच्या पोरींना स्वातंत्र्यांची, आणि हक्कांची भलती स्वप्न पडू लागली तर?
 
मेगन रिपोनी तिच्या भाषणात तिच्या टीममधल्या इतर खेळाडूंविषयी सांगते, "आम्ही सगळ्या आहोत, गुलाबी जांभळ्या केसांच्या, काळ्या पांढऱ्या रंगाच्या, टॅटूवाल्या, झिपऱ्या, समलिंगी-भिन्नलिंगी... मला अभिमान आहे आमचा. आम्ही जिंकलोय, मस्त चिल मारतोय."
 
आमच्या स्वागत रॅलीमध्ये आम्ही जगातल्या बिगेस्ट बेस्ट सिटीला बंद पाडलं, आम्ही जगातली बिगेस्ट बेस्ट टीम आहोत असं अभिमानाने सांगते, आणि अनेकांच्या दाताखाली कचखन खडा आल्यासारखं होतं.
 
जरासं सावरून वागायचं ना बाईच्या जातीने, लोकांना त्रास झाला असेल, त्याचंही सोयरसुतक नाही, मनात अपराधी भाव नाही. दीज अनअपोलोजेटिक विमेन!!!
 
लहानाची मोठी झाले तेव्हापासून पाहातेय, पावलापावलावर माफी मागणाऱ्या बायका. सातच्या आत घरी आले नाही म्हणून माफी मागणाऱ्या, भाजीत किंचित मीठ जास्त पडलं म्हणून माफी मागणाऱ्या, ताप आला म्हणून गरम पोळी वाढता आली नाही घरच्यांना म्हणून माफी मागणाऱ्या, सकाळचा गजर होऊनही डोळा उघडला नाही आणि मुलाला शाळेत उशीर झाला म्हणून माफी मागणाऱ्या, लग्न होऊन मुलं होत नाही म्हणून माफी मागणाऱ्या, सुटीच्या दिवशी ऑफिसमध्ये जावं लागलं म्हणून माफी मागणाऱ्या, जॉब करते म्हणून घरी दुर्लक्ष होतं असं लोकांनी सांगितल्यावर माफी मागणाऱ्या, घरी बसते पैसा कमवते म्हणून माफी मागणाऱ्या, पैसा कमवते पण नवऱ्याला आवडत नाही म्हणून माफी मागणाऱ्या, हुंड्याला पैसा लागतो म्हणून माफी मागणाऱ्या, भावाच्या संपत्तीत वाटेकरी झाले म्हणून माफी मागणाऱ्या, खरंतर जन्मालाच आले म्हणून माफी मागणाऱ्या...
 
आपल्या जगण्यावर कायम एका अपराधी भावनेचं सावट घेऊन जगणाऱ्या महिला सगळीकडे आपण पाहतो. आपल्याला त्यांची सवय आहे. सवय काय, तेच नॉर्मल आहे असं वाटतं. म्हणून मेगन, तिच्या सहखेळाडू आपल्याला त्रासदायक वाटतात. त्यांचं तसं जगणं खुपतं.
 
मेगन वागते ते सगळंच बरोबर आहे, असं मुळीच नाही. ती स्वतःही मान्य करते, भांडणात मी कधीकधी अशा गोष्टी बोलले असेन ज्या मी बोलायला नको होत्या. तिची आक्रमकता योग्य असाही दावा नाही. पण ती बाई आहे म्हणून यशात तिने विनम्र वागायला हवं, तिने लोकांची भीडभाड बाळगायला हवी, तिने पदर सांभाळून राहायला हवं, या अपेक्षांना मात्र जोरदार विरोध आहे.
 
कोणीही आपल्या यशात हुरळून जाऊ नये, दुःखात आक्रमक होऊ नये हे तात्त्विकदृष्ट्या, नैतिकदृष्ट्या बरोबर. क्रिकेट वर्ल्डकप हरल्यानंतरही एखादा केन विल्यमसन असतो, जो संध्यामग्न पुरुषाची लक्षण दाखवतो, आणि इंग्लंडचाच जेसन रॉय आउट असतानाही अंपायरशी कचाकचा भांडतो.
 
हाताची पाचही बोटं सारखी कशी असणार असं म्हणत आपण दोघांच्याही वागण्याचं समर्थन करतो. पण या बचावाचा फायदा मेगन रिपोनीला का मिळत नाही? हे बघत बघत आपल्या चिमुकल्या लहानाच्या मोठ्या होत आहेत. आणि पदोपदी माफी मागायला शिकत आहेत.
 
हे बदलायला हवं. सत्काराच्या आपल्या भाषणाचा शेवट करताना मेगन म्हणते, "आपण इतरांचा तिरस्कार कमी, प्रेम जास्त करायला हवं. आपण कमी बोलून, जास्त ऐकायला हवं. हे जग अधिक चांगलं करायची जबाबदारी आपली आहे. तुम्हाला जे शक्य आहे ते करा. जे आहात त्यापेक्षा चांगलं बना."
 
त्यानंतर दोन्ही हात पसरून ती तिच्या आयकॉनिक पोझमध्ये स्टेजवर उभी राहाते. फुटबॉलची फायनल जिंकल्यावर उभी राहिली होती तशी. तिच्या आसपास फॅन्स, तिच्या सहखेळाडू जल्लोष करतात. मॅच जिंकल्यावर उभी राहिली तेव्हा वाटलं, जगाला चॅलेंज करतेय, आता वाटतं जगाला कवेत घेऊ पाहातेय.
 
मला विचाराल तर दोन्ही भावना चुकीच्या नाहीत, जगाला चॅलेंज करायचं आणि कवेत घ्यायचं, दोन्हीही स्वातंत्र्य आपल्या पोरींना हवेत. त्यांना फक्त आत्मविश्वासाने जगासमोर दोन्ही हात पसरून ठस्सनमध्ये उभं राहता यायला हवं. तेही माफी न मागता.