रविवार, 22 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. बीबीसी मराठी बातम्या
Written By
Last Modified: बुधवार, 27 जानेवारी 2021 (21:42 IST)

आंध्र प्रदेश : अंधश्रद्धेपोटी आई-वडिलांनीच त्रिशूळ आणि डंबेलने केला स्वतःच्याच तरुण मुलींचा खून

देशात तुलनेने सुशिक्षित मानल्या जाणाऱ्या दक्षिण भारतातील आंध्र प्रदेशमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे.
 
इथे एका शिक्षक जोडप्याने स्वतःच्याच दोन उच्चशिक्षित तरुण मुलींचा त्रिशूळ आणि डंबेलने खून केल्याचे आरोप होतोय.
 
अंधश्रद्धेतून हे खून करण्यात आल्याचं सांगण्यात येतंय. अंगावर काटा आणणारी ही घटना आंध्र प्रदेशमधल्या चित्तूर जिल्ह्यातल्या मदनपल्ली शहरात रविवारी रात्री घडली.
 
जोडप्याला मदनपल्ली पोलिसांनी अटक केली असून या कथित खुनाचा पुढील तपास सुरू आहे.
 
या दोन मुलींपैकी एक साई दिव्या हिने काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर पोस्ट टाकली होती. ही पोस्ट या प्रकरणात महत्त्वाचा पुरावा ठरण्याची शक्यता आहे. खुनाच्या तीन दिवस आधी तिने ही पोस्ट केली होती. त्यात ती लिहिते, "शिव आलेला आहे. काम झालं आहे."
 
गेल्या आठवडाभरापासून तिचं वागणंही बदललं होतं. शिवाय गेल्या काही दिवसांपासून काही अनोळखी लोकांचं तिच्या घरी जाणं-येणं होतं, असं पोलिसांचं म्हणणं आहे.
 
पोलिसांच्या हाती सीसीटीव्ही फुटेज लागलं आहे आणि यात दिसत असलेल्या सर्व व्यक्तींची चौकशी करणार असल्याचं पोलिसांचं म्हणणं आहे.
 
काय घडलं?

या प्रकरणातील आरोपी वडील पुरुषोत्तम नायडू मदनपल्लीमधल्या गव्हर्नमेंट वुमेन्स डिग्री कॉलेजमध्ये उप-प्राचार्य आहेत. तर त्यांच्या पत्नी पद्मजा एका खाजगी शिक्षण संस्थेत प्राचार्या आहेत.
 
या जोडप्याला आलेख्या (27) आणि साई दिव्या (22) अशा दोन मुली होत्या. त्यांच्या मोठ्या मुलीने भोपाळमधल्या इंडियन मॅनेजमेंट ऑफ इंडियन फॉरेस्ट सर्विसमधून पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केलं होतं.
 
तर धाकटी मुलगी बीबीएचं शिक्षण पूर्ण करून ए. आर. रहमान म्युझिक अकॅडमीमध्ये संगीताचं शिक्षण घेत होती. ऑगस्ट 2020 मध्येच ते नवीन घरात रहायला गेले होते.
 
हे जोडपं घरात कायमच वेगवेगळ्या पूजा करायचे, असं शेजारी सांगतात. रविवारी रात्रीदेखील त्यांनी घरात पूजा केली आणि धाकटी मुलगी साई दिव्याचा त्रिशुळाने खून केला. त्यानंतर थोरली मुलगी आलेख्याच्या तोंडात तांब्या ठेवून तिच्या डोक्यात डंबेलने वार करत तिचाही खून केला, असं पोलिसांच्या एफआयआरमध्ये म्हटलं आहे.
 
मुलींच्या वडिलांनीच त्यांच्या एका सहकाऱ्याला ही माहिती दिली. त्याने ती पोलिसांना सांगितली. पोलीस ताबडतोब या जोडप्याच्या घरी गेले. मात्र, तोवर दोन्ही मुलींचा मृत्यू झाला होता. एकीचा मृतदेह देवघरात पडला होता तर दुसरीचा मृतदेह पहिल्या मजल्यावरच्या बेडरूममध्ये होता.
 
पोलिसांनी आई-वडील दोघांनाही ताब्यात घेऊन खुनाचा गुन्हा दाखल केला आहे.
 
घरातच चौकशी

पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतलं असलं तरी दोघांना त्यांच्या घरीच ठेवण्यात आलं आहे आणि पोलीस तिथेच तपास करत आहेत. दोघंही वेगळं आणि विचित्र वागत असल्याचं पोलिसांचं म्हणणं आहे.
 
आमच्यावर दबाव आणू नका, अशी धमकीच या जोडप्याने दिली आहे. परिस्थिती बघता पोलीस काळजीपूर्वक तपास करत असून मानसोपचारतज्ज्ञांची मदत घेण्याचाही त्यांचा विचार आहे.
 
पोलीस चौकशी दरम्यान या जोडप्याला शांत ठेवण्यासाठी केवळ जवळच्या नातेवाईकांना घरात प्रवेश दिला जातोय.
 
पोलिसांनी घटनास्थळावरून काही पुरावेही जप्त केले आहेत. यात देवी-देवतांच्या फोटोसोबतच काही विचित्र फोटोही पोलिसांना सापडले.
 
दरम्यान दोन्ही मुलींच्या मृतदेहांचं शवविच्छेदन झालं आहे. या प्रकरणात नेमकं काय घडलं, हे कळायला थोडा वेळ लागेल, असं पोलिसांचं म्हणणं आहे.
 
वैद्यकीय चाचणी
 
आरोपींचीही वैद्यकीय चाचणी करण्याचा पोलिसांचा प्रयत्न आहे.
 
मदनपल्लीचे डीसीपी रवी मनोहर पत्रकारांशी बोलताना म्हणाले, "हे कुटुंब आध्यात्म आणि धार्मिक श्रद्धेच्याही खूप पुढे गेलं होतं. आध्यात्माच्याही पलिकडे काहीतरी आहे, असं त्यांना वाटायचं. आम्हाला एक दिवसाचा वेळ द्या, आमच्या मुलींचे पार्थिव इथेच ठेवा, त्या पुन्हा जिवंत होतील, असं ते वारंवार म्हणत आहेत."
 
"हे सगळे उच्चविद्याविभूषित आहेत. प्राथमिक पुराव्यांवरून मुलींच्या डोक्यात डंबेलने मारून त्यांचा खून करण्यात आला असावा, असा अंदाज आहे. आई मास्टर माइंड स्कूलच्या प्राचार्या आहेत. गेल्या काही दिवसांपासून ते घरात कुणालाच येऊ देत नव्हते. कोव्हिडमुळे लॉकडाऊन लागू झाल्यापासून त्यांनी घरकाम करणाऱ्या बाईलाही घरात घेतलेलं नाही. खून झाले त्यावेळी घरात केवळ कुटुंबातील सदस्यच उपस्थित होते", असं पोलिसांचं म्हणणं आहे.
 
घरातल्या परिस्थितीचा आढावा घेतल्यानंतर घरात कसली तरी पूजा झाली असावी, असं वाटतं. संपूर्ण तपासासाठी आणखी काही वेळ लागेल. आई आणि वडील दोघांनाही मोठा धक्का बसला आहे. यातून बाहेर आल्यावर त्यांचीही चौकशी होईल.
 
साईबाबांचे होते भक्त
 
स्थानिकांच्या म्हणण्याप्रमाणे हे कुटुंब मानसिकरित्या बरंच संतुलित होतं. कुटुंबातले सगळेच शिर्डीच्या साईबाबांचे भक्त होते, असं एका नातेवाईकाने सांगितलं.
 
ते म्हणाले, "हे फारच धक्कादायक आहे. ते फक्त रडत आहेत. सध्या ते कुणाशीही बोलण्याच्या मनस्थितीत नाहीत."
 
गव्हर्नमेंट डिग्री कॉलेजमध्ये ड्रायव्हर असणारे सुरेंद्र यांनी बीबीसीशी बोलताना सांगितलं, "पुरुषोत्तम नायडू असं काही करू शकतात, यावर माझा विश्वासच बसत नाहीय. मी त्यांना चांगलं ओळखतो. ते फार शिस्तप्रिय होते. कुणासोबतही त्यांचं भांडण नव्हतं. यांची मालमत्ता हडपण्यासाठी एखाद्या नातेवाईकानेच हे केलं असावं, असं मला वाटतं. वशीकरण करून त्यांच्या हातून हे काम करण्यात आलं असावं. त्याशिवाय, हे होऊच शकत नाही."
 
पुरुषोत्तम यांच्या शेजाऱ्यांचंही हेच म्हणणं आहे. एका व्यक्तीने नाव जाहीर न करण्याच्य अटीवर सांगितलं, "कुणीतरी यांना ट्रांस स्टेटमध्ये पाठवलं. बराच विचार करून हे कृत्य करण्यात आलं आहे. ही फार चांगल्या स्वभावाची माणसं आहेत आणि सर्वांनाच मदत करायचे. यांनी स्वतःच्याच मुलींचा खून केला, यावर आमचा विश्वासच बसत नाही. ज्यांनी यांच्या हातून हे सगळं करवून घेतलं त्यांचा शोध घेतला पाहिजे."
 
स्थानिकांच्या मते पद्मजा यांच्याकडे 5 कोटी रुपयांची संपत्ती आहे. कदाचित या संपत्तीच्या ईर्शेतूनच हे कृत्य घडलं असावं.
 
साई दिव्या गेल्या काही दिवसांपासून विचित्र वागत होती आणि छतावरून उडी घेण्याची धमकी देत होती. त्यामुळेच तिच्या आई-वडिलांनी तिला बरं करण्यासाठी घरी पूजा ठेवली होती, असं पोलिसांचं म्हणणं आहे.