शुक्रवार, 19 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. बीबीसी मराठी बातम्या
Written By
Last Modified: बुधवार, 27 जानेवारी 2021 (21:08 IST)

शेतकरी आंदोलकांनी लाल किल्ल्यावरचा तिरंगा उतरवून खलिस्तानी झेंडा फडकवला का?

सुमनदीप कौर
बीबीसी पंजाबी
 
दिल्लीत मंगळवारी प्रजासत्ताक दिनाच्या परेडनंतर शेतकऱ्यांनी ट्रॅक्टर रॅलीचं आयोजन केलं होतं. यादरम्यान आंदोलक शेतकऱ्यांपैकी काहीजण लाल किल्लावरच्या बुरूजावर चढले.
 
हे शेतकरी कृषी कायद्यांच्या विरोधात आंदोलन करत असलेल्या शेतकरी संघटनांशी संबंधित असल्याचं सांगितलं जात आहे.
 
यामध्ये काही जणांनी लाल किल्ल्याच्या बुरूजावर काही झेंडे फडकवले. या प्रकारानंतर सोशल मीडियावर याचे पडसाद उमटू लागले आहेत.
 
आंदोलकांनी बुरूजावरचा भारतीय झेंडा उतरवून खलिस्तानी झेंडा फडकवल्याचा दावा अनेकांकडून केला जात आहे. हे कृत्य करणाऱ्या आंदोलकांवर कारवाई करण्याची मागणी लोकांकडून केली जात आहे.
 
ट्विटर युजर श्याम झा यांनी लिहिलं, "काय चाललंय, हे गावातल्या तान्ह्या बाळालासुद्धा माहीत आहे. आम्ही याच मास्टरस्ट्रोकची प्रतीक्षा करत होतो. नरेंद्र मोदी यांच्या कार्यकाळात लाल किल्ल्यात लोक घुसले होते, त्यांनी खलिस्तानी झेंडे फडकवले होते, हे इतिहासात कायम लक्षात राहील."
 
लोक लाल किल्ल्यात घुसलेले आणि झेंडे फडकवतानाचे व्हीडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहेत. या व्हीडिओंमध्ये लोक लाल किल्ल्यावर काही झेंडे फडकवताना दिसतात. पहिल्या नजरेत हे झेंडे केशरी आणि पिवळ्या रंगाचे दिसून येतात.
 
ट्विटरवरच श्वेता शालिनी नामक एका महिलेने या दोन्ही झेंड्यामधील फरक दर्शवला आहे.
 
त्यांनी लिहिलं, "काही लोकांच्या माहितीस्तव - कृपया दोन झेंडे पाहा, एक झेंडा म्हणजे 'केसरिया निशान साहिब.' हा झेंडा तुम्हाला प्रत्येक गुरुद्वारेत भगव्या रंगात मिळेल. दुसरा झेंडा पिवळ्या रंगाचा चौकोनी झेंडा आहे. तिसऱ्या फोटोमध्ये याचा काय अर्थ होतो, हे कळेल. #KHALISTANIflag"
 
PTI वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने या घटनेचा निषेध नोंदवला आहे.
 
लाल किल्यावर जे काही घडलं, तो प्रकार म्हणजे भारताच्या स्वातंत्र्यासाठी आपलं बलिदान दिलेल्या लोकांचा अपमान आहे. पण अनेक ज्येष्ठ पत्रकारांनी लाल किल्ल्यावर फडकवण्यात आलेला झेंडा खलिस्तानी झेंडा असल्याचं नाकारलं आहे.
 
"निशान साहिब झेंडा हा खलिस्तानी झेंडा नाही. हा शीख धर्मातील पूजनीय झेंडा आहे. पण प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी लाल किल्ल्यावर हा झेंडा जबरदस्तीने फडकवण्याची कोणतीच गरज नव्हती," असं ज्येष्ठ पत्रकार राजदीप सरदेसाई यांनी आपल्या ट्विटवर अकाऊंटवरून लिहिलं.
 
सोशल मीडियावर पसरवल्या जाणाऱ्या फेक न्यूजची सत्यता पडताळून पाहणाऱ्या ऑल्ट न्यूजनेही यावर एक बातमी दिली. त्यांच्या मते, आंदोलकांनी लाल किल्ल्यावरच्या तिरंगा झेंड्याला कोणतंही नुकसान पोहोचवलं नाही.
 
तसंच, बीबीसीकडे उपलब्ध असलेल्या व्हीडिओमध्येही आंदोलक तिरंगा झेंडा हटवताना दिसून येत नाहीत. प्रत्यक्षात, आंदोलक लाल किल्ल्यावर चढले त्यावेळी त्यांनी अनेक ठिकाणी भगवा आणि शेतकऱ्यांचा झेंडा फडकवला.
 
आता यामधील खंड्याच्या चिन्ह्यासोबत असलेला भगवा झेंडा नेमका काय आहे, हे आपण पाहू.
 
बीबीसी पंजाबीने याबाबत पटियाला येथील पंजाबी विद्यापीठातील श्री गुरू ग्रंथ साहिब विभागाचे प्रमुख प्रा. सरबजिंदर सिंग यांच्याशी चर्चा केली.
 
झेंड्यावर माहिती देताना सरबजिंदर सिंह सांगतात, "निशान हा एक फारसी शब्द आहे. शीख धर्मात आदर व्यक्त करण्यासाठी साहिब या शब्दाचा वापर केला जातो.
 
"शीख धर्मात सर्वप्रथम सहाव्या धर्मगुरूंकडून निशान साहिब स्थापित करण्यात आलं. लाहोरमध्ये जहांगीर यांच्या आदेशावरून गुरू अर्जन देव यांची हत्या करण्यात आल्यानंतर पहिल्यांदा हा झेंडा स्थापित झाला.
 
"शीख परंपरेनुसार, सहावे गुरू हरगोबिंद यांना हा एक संदेश पाठवण्यात आला होता. गुरू अर्जन देव यांचा अंतिम संदेश म्हणून याला संबोधण्यात येतं."
 
"जा, शाही सन्मानानुसार कलगी धारण कर (राजमुकूट) घाल, सैन्य ठेव आणि सिंहासनावर बसून निशान स्थापित कर," असा त्यांचा आदेश होता.
 
गुरू हरगोबिंद यांच्यासाठी बाबा बुड्ढाजी यांच्यामार्फत परंपरागत पद्धतीने विधी केला जात होता. त्यावेळी ते म्हणाले, "या सगळ्या वस्तू राजकोषात ठेवा. मी शाही धुमधडाक्यात कलगी धारण करून निशान स्थापित करीन. सिंहासनावर बसून सैन्य ठेवीन. मी सुद्धा शहीद होईन पण त्याचं स्वरूप पाचव्या बादशाहपेक्षा वेगळं असेल. आता युद्धभूमीतच बलिदान दिलं जाईल."
 
सर्वप्रथम मीरी-पीरी या तलवारी त्यांनी परिधान केली. श्री हरमंदिर साहिबच्या समोर 12 फूट उंच स्मारक सिंहासन स्थापन करण्यात आलं.
 
दिल्लीच्या राजसत्तेचं सिंहासन 11 फूट उंच होतं. त्यावेळी भारतात त्यापेक्षा उंच सिंहासन बांधणं दंडनीय कृत्य मानलं जाई. त्यामुळे हे सिंहासन 12 फूट उंच ठेवून सरकारला आव्हान देण्यात आलं.
 
हे सिंहासन भाई गुरदास आणि बाबा बुड्ढाजी यांच्याकडून बनवण्यात आलं होतं. याआधी, जत्थेदार भाई गुरदास यांना स्वतः सहाव्या बादशाहांनी नियुक्त केलं. त्यांच्यासमोर दोन निशान स्थापित करण्यात आले.
 
हे निशान म्हणजेच मिरी आणि पीरी म्हणून संबोधले जातात. पीरीचं चिन्ह अजूनही मीरीपेक्षा सव्वा फूट उंच आहेत.
 
गुरू बादशाह यांच्या काळात याचा रंग भगवा (केसरी) होता. पण 1699 मध्ये खालसाच्या स्थापनेनंतर यामध्ये निळ्या रंगाचाही वापर करण्यात आला.
 
त्यावेळी त्याला अकाल ध्वज असंही संबोधलं जात होतं.
 
केसरी निशान साहिब प्रत्यक्षात शीख धर्माच्या स्वतंत्र ओळखीचं प्रतीक आहे. हे एक धार्मिक चिन्ह आहे. प्रत्येक गुरुद्वारेत किंवा शीख इतिहासाशी संबंधित ठिकाणांवर हे चिन्ह स्थापित केलं जातं.
 
त्यामुळे लाल किल्ल्यावर फडकवलेला केसरी झेंडा कोणत्याही राजकीय पक्षाशी संबंधित किंवा राजकीय आंदोलनाशी संबंधित झेंडा नाही. हा झेंडा शीख धर्माचं प्रतीक आहे, असं प्रा. सरबजिंदर सिंग म्हणतात.