गुरूवार, 26 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. बीबीसी मराठी बातम्या
Written By
Last Modified: गुरूवार, 9 डिसेंबर 2021 (17:49 IST)

बिपीन रावत हेलिकॉप्टर अपघात : ‘मी त्या भाजलेल्या माणसाला म्हणालो, घाबरू नका, आम्ही तुम्हाला वाचवू’

"मी माझ्या डोळ्यादेखत फक्त एका माणसाला जळताना पाहिलं, त्यांच्या संपूर्ण शरीराला आग लागली होती. मी अंतर्बाह्य हादरलो."
 
कृष्णास्वामींनी हे सांगितलं.
 
8 डिसेंबरला चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ (सीडीएस) यांच्या हेलिकॉप्टरला अपघात झाला. यात जनरल बिपिन रावत, त्यांची पत्नी मधुलिका आणि 11 लोकांचाही मृत्यू झाला.
 
या अपघातात फक्त ग्रुप कॅप्टन वरूण सिंह वाचले आहेत आणि त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
 
वायुसेनेने म्हटलंय की, अपघात का झाला याची चौकशी सुरू आहे.
68 वर्षांचे कृष्णास्वामी जिथे अपघात झाला तिथून जवळच राहातात. त्यांनी या पूर्ण घटनेचं वर्णन केलं.
कृष्णास्वामी यांना काय दिसलं?
ते म्हणाले, "माझं नाव कृष्णास्वामी आहे, मी नानजप्पा सैथिरामचा राहाणारा आहे. मी लाकड गोळा करायला घराबाहेर पडलो. घरात पाणी नव्हतं कारण पाईप तुटला होता. चंद्रकुमार आणि मी याची दुरुस्ती करत होतो, तेवढ्यात मला जोरात आवाज आला."
 
ते पुढे म्हणतात, "स्फोटाने विजेचे खांबही हादरले. झाडं उन्मळून पडली. काय झालं हे पहायला आम्ही गेलो तेव्हा तिथून धूर निघताना दिसला. सगळ्या भागावर धुराचे लोट दाटले होते. झाडांवर आगीचे लोळ उठत होते. एका माणसाच्या शरीराला आग लागलेली दिसत होती. मी धावत परत आलो, आणि लोकांना सांगितलं की फायर ब्रिगेड आणि पोलिसांना बोलवा. काही वेळाने काही अधिकारीही आले. मी मृतदेह नेताना पाहिले नाहीत. मला प्रचंड धक्का बसला होता. मी घरी आलो आणि शांतपणे पडलो."
त्याच भागातल्या दुसऱ्या एका रहिवाशाने बीबीसीशी बोलताना सांगितलं,
 
"माझं नाव शिवकुमार आहे. मी कुन्नूरला राहातो. अपघाताच्या दिवशी साडेबारा वाजता मला माझ्या साल्याचा फोन आला आणि तो म्हणाला की इथे झाडांमध्ये एक हेलिकॉप्टर पडलं आहे. माझ्या घरापासून जंगलात जायला एक शॉर्टकट आहे. मी त्या रस्त्याने आलो. समोर पाहातो तर हेलिकॉप्टरला आग लागली होती."
 
शिवकुमार पुढे म्हणतात, "मी विचारलं यातले प्रवासी कुठे आहेत, यांनी उड्या मारल्या का? मला माझ्या साल्याने सांगितलं की चार जळत्या लोकांनी खाली उड्या मारल्या. मी स्थानिक तरूणांसोबत लगेचच जंगलात गेलो. आम्ही तीन लोक खाली पडलेले पाहिले. ते जिवंत होते. त्यांच्या अंगावर जळाल्याच्या खुणा होत्या. त्यांना वाचवण्यासाठी आम्हाला ब्लँकेट आणि सुऱ्यांची गरज होती. आम्ही मागे आलो, तिथे मला कुन्नूरचे पोलीस इन्स्पेक्टर दिसले. मी त्यांना काय घडलं ते सांगितलं.
 
आम्ही तातडीने पुन्हा ती माणसं पडली होती तिथे गेलो. तिथली झुडपं हटवली आणि त्या माणसांना वाचवून घेऊन आलो. तोवर ते लोक जिवंत होती. त्यातल्या एका माणसाला मी म्हटलं, घाबरू नका. आम्ही तुम्हाला वाचवू. तोवर ती माणसं आम्हाला साधे सैनिक वाटत होती. नंतर कळलं की ते सैन्याचे उच्चपदस्थ अधिकारी होते."
नेमकं काय घडलं होतं?
राजनाथ सिंह यांनी सांगितले की "Mi 17 V 5 या हेलिकॉप्टरने सुलूर या एअर बेसवरून सकाळी 11.48 वाजता उड्डाण घेतले. ते वेलिंगटन येथे दुपारी 12.15 पोहचणार होते. 12.08 मिनिटांनी हेलिकॉप्टरचा संपर्क तुटला.
"त्यानंतर काही लोकांनी कुन्नूरच्या जंगलात आग लागलेली पाहिली आणि ते घटनास्थळाकडे निघाले. त्या ठिकाणी हेलिकॉप्टर कोसळल्याचे त्यांना दिसले. त्यानंतर त्यांनी प्रशासनाशी संपर्क साधला आणि प्रशासनाने तिथे धाव घेतली."
 
8 डिसेंबर रोजी तामिळनाडूमध्ये झालेल्या एका हेलिकॉप्टर दुर्घटनेत त्यांचा मृत्यू झाला. भारतीय हवाई दलानं ट्वीट करून यासंबंधीची माहिती दिली होती.
 
जनरल बिपिन रावत यांच्याविषयी
जनरल रावत यांचा जन्म 16 मार्च 1958 रोजी उत्तराखंडमधील पौडी जिल्ह्यात एका लष्करी कुटुंबात झाला. त्यांचे वडील लष्करात लेफ्टनंट जनरल होते.
 
भारतीय लष्कराच्या वेबसाइटवरील माहितीनुसार, जनरल रावत 1978 मध्ये लष्करात दाखल झाले.
 
शिमला येथील सेंट एडवर्ड्स शाळेत शिक्षण घेतल्यानंतर त्यांनी खडकवासला येथील राष्ट्रीय संरक्षण अकादमीत लष्करी प्रशिक्षण घेतले.
डेहराडून येथील इंडियन मिलिटरी अकादमीतून प्रशिक्षण घेतल्यानंतर त्यांना 11व्या गोरखा रायफल्स तुकडीच्या पाचव्या बटालियनमध्ये सेकंड लेफ्टनंट बनवण्यात आले. गोरखा ब्रिगेडमधून सर्वोच्च पदावर पोहोचणारे ते चौथे अधिकारी होते.
 
चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ जनरल बिपीन रावत यांची संरक्षण दलातील कारकिर्द 40 वर्षांहून अधिक काळ होती. या प्रदीर्घ काळात त्यांना परम विशिष्ट सेवा पदक, अती विशिष्ठ सेवा पदक, सेवा विशिष्ट सेवा पदक आणि उत्तम युद्ध सेवा पदक प्रदान करण्यात आले.
 
लष्करात महत्त्वाचं योगदान
आपल्या चार दशकांहूनच्या अधिक कार्यकाळात जनरल रावत यांनी ब्रिगेड कमांडर, जनरल ऑफिसर कमांडिंग चीफ, दक्षिणी कमांड, मिलिट्री ऑपरेशन्स डायरेक्टोरेटमध्ये जनरल स्टाफ ऑफिसर ग्रेड अशी महत्त्वाच्या पदांवर काम केलं.
 
उत्तर-पूर्वेकडे कट्टरतावद्यांविरोधात त्यांनी केलेल्या कारवाईचं कौतुक झाले. अहवालानुसार, 2015 मध्ये म्यानमारमध्ये एनएससीएनच्या कट्टरतावाद्यांविरोधात भारतीय लष्कराच्या कारवाईसाठीही त्यांचं कौतुक करण्यात आलं. बालाकोट हल्ल्यातही त्यांची भूमिका असल्याचं सांगण्यात येतं.
भारताच्या पूर्वेकडील प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर तैनात इन्फंट्री बटालियन तसंच काश्मीर खोऱ्यातील राष्ट्रीय रायफल्स क्षेत्राची कमान त्यांनी सांभाळली. याशिवाय रिपब्लिक ऑफ कांगोमध्ये त्यांनी विविध देशांच्या सैनिकांच्या एका बिग्रेडची कमानही सांभाळली.
 
भारताच्या ईशान्य भागातही ते कोअर कमांडर होते.
जनरल रावत डिफेन्स सर्व्हिसेस स्टाफ कॉलेज (वेलिंग्टन, तामिळनाडू) आणि कमांड अँड जनरल स्टाफ कोर्स फोर्ट लीव्हनवर्थचे (अमेरिका) पदवीधर होते.
 
जनरल रावत यांनी राष्ट्रीय सुरक्षा आणि लष्करी नेतृत्वावर अनेक लेख लिहिले आहेत. तसंच व्यवस्थापन आणि संगणक अभ्यासात त्यांनी डिप्लोमा केले होते.
 
मेरठ येथील चौधरी चरणसिंग विद्यापीठाने मिलिट्री मीडिया स्ट्रॅटेजिक अभ्यासातील संशोधनासाठी त्यांना डॉक्टर ऑफ फिलोसॉफी पदवीने सन्मानित केले.