गुरूवार, 14 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. बीबीसी मराठी बातम्या
Written By
Last Modified: गुरूवार, 9 डिसेंबर 2021 (14:29 IST)

कॅटरिना-विकी कौशलः बॉलिवुडमधल्या लग्नांचं मार्केटिंग का होतं?

- मधू पाल
बॉलिवुडमधले तारे विकी कौशल आणि कॅटरिना कैफ यांच्या विवाहाचा समारंभ सुरू झाला आहे. हा सोहळा 10 डिसेंबरपर्यंत सुरू राहाणार आहे. या दोघांचं लग्न राजस्थानमध्ये एका 700 वर्षं जुन्या किल्ल्यातील हॉटेलमध्ये होत आहे.
 
या दोघांच्या प्रेमाची चर्चा गेला काही काळ दबक्या आवाजात सुरू होती मात्र ते यावर बोलणं टाळत होते. अखेर त्यांच्या लग्नाची बातमी आल्यावरच त्यांच्या प्रेमाची माहिती समोर आली.
 
मीडियापासून लांब राहात एकदम लग्नापर्यंत गेल्याचं हे काही पहिलंच जोडपं नाहीये.
 
पहाटे 4 वाजता पुजाऱ्याला उठवून शम्मी कपूर-गीता बालीचं लग्न
विकी कौशल आणि कॅटरिनाच्या लग्नाबाबतची गुप्तता पाळल्याने एक कुतुहल निर्माण झालं आहे. ज्येष्ठ पत्रकार जयदीप चौकसे यांनी बीबीसीला हा किस्सा सांगितला, 'या दोघांसारख्या अनेक अभिनेते तारकांनी लग्नाचा अचानक निर्णय घेऊन चकीत केलेलं आहे.'
 
'त्यात पहिलं नाव माझ्या डोक्यात येतं ते शम्मी कपूर आणि गीता बाली यांचं. त्यांचं प्रेमप्रकरण तर सुरू होतंच. शूटिंग संपल्यावर ते दोघे संध्याकाळी रस्त्यावर फिरताना दिसत.'
 
एके दिवशी अचानक दक्षिण मुंबईतल्या एका मंदिरातल्या पुजाऱ्याला त्यांनी पहाटे पाट वाजता उठवलं आणि लग्न केलं होतं. शम्मी यांनी आपले वडील पृथ्वीराज कपूर आणि भाऊ राज कपूर यांनाही ही माहिती दिली नव्हती.
 
लग्नानंतर फोनवरुन त्यांनी घरी कळवलं. अभिनेत्री गीता बाली यांनी लग्नाची माहिती आपले सेक्रेटरी सुरेंद्र कपूर यांच्याकडून माध्यमांना दिली. सुरेंद्र कपूर हे बोनी कपूर आणि अनिल कपूर यांचे वडील होते.
 
टॅक्सी ड्रायव्हर सिनेमाच्या सेटवरच लग्न
प्रसिद्ध अभिनेते देव आनंद आणि सुरय्या याचं प्रेम विवाहापर्यंत पोहोचलं नाही. मात्र देव आनंद यांनी अचानक विवाहाचा निर्णय घेऊन सर्वांनाच चकीत केलं होतं. टॅक्सी ड्रायव्हर सिनेमाच्या चित्रीकरणाच्या सेटवरच त्यांनी अभिनेत्री कल्पना कार्तिकशी विवाह केला.
 
जयप्रकाश चौकसे सांगतात, 'शूटिंगवर जेवणाची सुटी झाल्यावर त्यांनी तात्काळ पुरोहितांना बोलावलं आणि कल्पना कार्तिकशी लग्न केलं.'
 
लग्न झाल्यावर काही तासांत ते शुटिंगला परतले आणि काम पूर्ण केलं. अशा प्रकारच्या लग्नाची बातमी ऐकून त्यांचे चाहते आणि माध्यमं चकित झाले होते.
 
राजेश खन्ना आणि डिंपल
राजेश खन्ना यांचा विवाहपण असाच चर्चेत राहिला होता. जयदीप सांगतात, "राजेश खन्ना यांचं अंजू महेंद्रूशी 6 वर्षं प्रेमप्रकरण सुरू होतं मग त्यांचं फिसकटलं.
 
"नंतर अचानक ते डिंपल कपाडियाशी लग्न करत असल्याची बातमी चाहते आणि माध्यमांना मिळाली. राजेश खन्ना विवाहासाठी वरात घेऊन गेले तेव्हा ते अंजू महेंद्रूला जळवण्यासाठी तिच्या घरावरुन गेले आणि बराचवेळ नृत्य करत राहिले, यामुळेही हे लग्न चर्चेत राहिलं."
अभिषेक, ऐश्वर्याचं लग्न आणि नाराज बॉलिवुड
अभिषेक बच्चन आणि ऐश्वर्या राय यांच्या लग्नानेही सर्वांची नजर आपल्याकडे वेधून घेतली होती. अभिषेकचं लग्न करिश्मा कपूरशी ठरलं होतं मात्र ते नातं तुटलं आणि काही वर्षांनी अभिषेक-ऐश्वर्या यांच्या लग्नाची बातमी माध्यमांना आणि चाहत्यांना अचानक मिळाली.
 
बहुतांश लोकांना आमंत्रण न मिळाल्यामुळे हे लग्न चर्चेत राहिलं. जयदीप चौकसे सांगतात, "इतक्या मोठ्या संख्येनं रिझर्वेशन करणं शक्य नसल्यामुळे अमिताभ यांनी अभिषेकच्या लग्नाला फार पाहुणे बोलावले नव्हते.
 
"आमंत्रण नसल्यामुळे शत्रुघ्न सिन्हासारखे अनेक अभिनेते नाराज होते. सर्वांत जास्त धक्का बसला ते प्रकाश मेहरा यांना कारण त्यांच्याच जंजीर सिनेमातून अमिताभना मोठा ब्रेक मिळाला होता.
 
"इंडस्ट्रीमधल्या व्यावसायिक नात्यांना कौटुंबिक नात्यांच्या कार्यक्रमात कसं बोलवलं जाऊ शकतं असं अमिताभ यांचं म्हणणं होतं."
 
हेमा मालिनी-धर्मेंद्र यांचा विवाह
ज्येष्ठ पत्रकार अजय ब्रह्मात्मज सांगतात, "बॉलिवुडमधील ही-मॅन धर्मेंद्र आणि ड्रीम गर्ल म्हणून ओळखल्या जाणाऱ्या हेमा मालिनी यांच्या लग्नांच्या बातम्याही भरपूर आल्या होत्या.
 
हेमा मालिनी यांचा विवाह अत्यंत नाट्यमय पद्धतीने झाला होता असं ते सांगतात. त्यांचं लग्न जितेंद्र यांच्याशी होणार होतं. मांडव ही घालण्यात आला होता.
 
परंतु नेमक्या त्याचवेळेस जितेंद्र यांची प्रेयसी शोभाला घेऊन धर्मेंद्र चेन्नईला पोहोचले होते. मग ते लग्न झालं नाही. मग त्याच मांडवात धर्मेंद्र बसले आणि हेमा मालिनी-धर्मेंद्र यांचं लग्न झालं.
 
धर्मेंद्र यांनी हेमा मालिनी यांच्याशी लग्न करण्यासाठी इस्लाम धर्म स्वीकारला कारण ते विवाहित होते आणि हिंदू असल्यामुळे ते दुसरा विवाह करू शकत नव्हते.

 
अक्षय-ट्विंकलने सर्वांना चकित केलं
अजय सांगतात, "अक्षय कुमार आणि ट्विंकल खन्ना यांच्या लग्नानेही सर्वांना चकित केलं होतं. कारण अधयचं लग्न रविनाशी ठरलं होतं. त्या लग्नाच्या पत्रिकाही वाटल्या गेलेल्या पण ते लग्न मोडलं आणि ट्विंकलशी लग्न झालं."
 
बॉलीवुड तारकांचे विवाह चर्चेत का येतात?
बॉलिवुड ताऱ्यांचे विवाह आता फक्त विवाहापुरतेच मर्यादित राहिलेले नाहीत तर ते कमाईचं चांगलं साधनही झाल्या आहेत. या समारंभाच्या बातम्यांसाठी मोठ्या मीडिया कंपन्यांना कोट्यवधी रुपयांचं कंत्राट दिलं जातं..
 
ट्रेड अॅनालिस्ट अतुल मोहन सांगतात, "कोण येणार लग्नाला, फोटो, व्हीडिओ यासाठी मीडिया मागेच लागते. कारण त्यामुळे वाचक, प्रेक्षक आकर्षित होतात हे माध्यमांना माहिती असतं."
 
हे सारं बिझनेस डीलसारखं असतं. एखाद्या लग्नामुळे किती प्रेक्षक मिळू शकतात याचा अंदाज वाहिन्या घेतात, त्यातून किती फायदा होऊ शकतो याचं मूल्यांकन केलं जातं आणि त्यावरच करार केले जातात.
 
अतुल मोहन पुढे सांगतात, "हॉलीवुडच्या लग्नांशी तुलना केली तर त्यांच्यासाठी 100 कोटी म्हणजे 1.30 कोटी डॉलर्स आहेत. त्यांच्या विवाहाच्या कव्हरेजची किंमत यापेक्षा कित्येक पटीने जास्त असते."
 
मोठ्या सेलिब्रिटिजच्या लग्नामध्ये पाहुण्यांना गुप्त स्थळी बोलावलं जातं. त्यांना एक कोड दिला जातो. ज्यांना आमंत्रण आहे त्यांनाच हा कोड मिळतो.
 
हे सगळं त्या सोहळ्याची चर्चा होण्यासाठी केलेली मार्केटिंग स्ट्रॅटेजी असते. जुन्या सिनेमात एखादा स्मगलर कोड विचारुनच माल देत असे त्याप्रमाणेच हे आहे.
 
आता रोज कॅट्रिना आणि विकी कौशल यांच्या लग्नाचे एकेक अपडेट्स येत आहेत. हे सगळं स्टार कपल व्हॅल्यू वाढण्यासाठी मार्केटिंग म्हणून केलं जातं.
 
ब्रँड प्रमोशनच्या स्ट्रॅटेजीप्रमाणे विवाह
आता बॉलीवुड स्टार्सचं लग्न असलं की बातम्या येऊ लागतात. कुठे लग्न आहे, कोणाला बोलावलं, कोणाला बोलावलं नाही. हे सगळं ब्रँड प्रमोशनसारखं असतं. फिल्म स्टार्सचं लग्न कव्हर केल्यामुळे त्यांचं मूल्य आणखी वाढतं.
 
बॉलिवुडमधल्या मोठ्या स्टार्सना पॉवरहाऊस कपल्स म्हणतात. लग्नानंतर त्यांची जोडी म्हणून किंमत आणखी वाढते. रणवीर-जीपिका, शाहरुख-गौरी, विराट-अनुष्का सारखी एकत्र जाहिरात करणारी कपल्स त्यात आहे.
 
त्यात विकी आणि कॅटरिनाचा समावेश होतोय. समजा आता एखाद्या एंडॉर्समेंट डीलमध्ये विकीला 2 कोटी आणि कॅटरिनाला 3 कोटी मिळत असतील तर लग्नानंतर त्यांना 10 कोटीही मिळू शकतात.
 
एकत्र येण्याने पॉवरकपलची किंमत वाढते. पहिल्या व्यावसायिक जाहिरातीला खास मानलं तर त्यासाठी भरपूर पैसे मिळू शकतात. हे सगळं सिनेमाच्या प्रमोशनसारखं असतं.
 
माध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार विकी कौशल-कॅटरिना यांच्या लग्न सोहळ्याच्या प्रक्षेपणाचे राइट्स अॅमेझॉन प्राइमने 80 कोटी रुपयांना विकत घेतले आहेत.
 
पूर्वी असं व्हायचं नाही. आता लग्नाच्या दिवसापर्यंत लग्नावर बोलणं टाळतात. त्याला लपवून सिक्रेट बनवतात. हे सगळं मार्केटिंग स्ट्रॅटेजीमध्येच असतं.