मंगळवार, 24 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. बीबीसी मराठी बातम्या
Written By

शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेस-काँग्रेसच्या आमदारांना एकत्र ठेवण्याची सर्कस

'आम्ही 162' असं म्हणत काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेच्या आमदारांचं मुंबईतील हॉटेल ग्रँड हयातमध्ये शक्तिप्रदर्शन करण्यात आलं. वेगवेगळ्या हॉटेलमध्ये ठेवण्यात आलेल्या तीनही पक्षाच्या आमदारांना ग्रँड हयातमध्ये एकत्र करण्यात आलं.
 
बहुमताचा आकडा टिकवण्यासाठी आणि सत्ता स्थापनेचा आपला दावा कायम राहावा, या उद्देशानं काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेकडून आपापले आमदार एकत्र ठेवण्याची शिकस्त केली जात आहे. 'नॉट रिचेबल' असलेल्या आमदारांना शोधून आणलं जातंय.
 
या सगळ्याची सुरुवात झाली 23 नोव्हेंबर 2019 ला. सकाळी आठच्या सुमारास देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रिपदाची तर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. त्यानंतर राज्याच्या राजकारणात एकच खळबळ उडाली.
 
राष्ट्रवादी कॉंग्रेस फुटली का? अजित पवार किती आमदारांना घेऊन बाहेर पडले? ही शरद पवारांचीच खेळी आहे का? असे सगळे प्रश्न पुढे येऊ लागले.
 
मात्र "अजित पवारांचा हा वैयक्तिक निर्णय आहे. याला राष्ट्रवादी काँग्रेसचा पाठिंबा नाही," असं ट्वीट शरद पवारांनी केल्यानंतर राष्ट्रवादी कॉंग्रेसचा एक गट फुटल्याचं स्पष्ट झालं. मग सुरू झाली सर्व आमदारांना एकत्र ठेवण्याची कसरत.
 
फुटलेल्या आमदारांचा शोध
शपथविधी झाल्यानंतर नेमके कोणते आमदार अजित पवारांसोबत गेले, याची शोधाशोध सुरू झाली.
दुपारी 12 वाजल्यापासून रात्री 10 वाजेपर्यंत शरद पवार वाय. बी. चव्हाण सेंटरला बैठका घेत होते. रात्री 10 पर्यंत राष्ट्रवादीचे 42 आमदार शरद पवारांकडे परत आले. रात्री 10 वाजता वाय. बी. चव्हाण सेंटरला 'मर्सिडीज बेंझ'च्या दोन बसेस लागल्या आणि त्या बसेसमधून 42 आमदारांना पवईच्या पंचतारांकित हॉटेल रेनेसाँमध्ये पाठवण्यात आलं.
 
ही शोधमोहीम रविवार (24 नोव्हेंबर) आणि सोमवारी (25 नोव्हेंबर) सुरू होती. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार नरहरी झिरवळ, अनिल पाटील, नितीन पवार आणि दौलत दरोडा यांनीही पुन्हा आपल्या मूळ पक्षाशी निष्ठा जाहीर केली. यातल्या तीन आमदारांना सोमवारी (25 नोव्हेंबर) हरियाणामधील गुरुग्राम येथून राष्ट्रवादी काँग्रेसच्या युवा संघटनेनं मुंबईला परत नेलं.
 
गुरुग्राममधून आमदारांची सुटका
राष्ट्रवादी काँग्रेसच्या युवक संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष धीरज शर्मा आणि विद्यार्थी संघटनेच्या राष्ट्रीय अध्यक्षा सोनिया दुहान आणि त्यांच्या टीमने आमदारांची "सुटका" केली.
 
यापैकी सोनिया दुहान स्वतः गुरुग्राममध्ये राहातात. 'ऑपरेशन गुरुग्राम'बद्दल बोलताना त्यांनी बीबीसी मराठीला सांगितलं, "आमच्या (राष्ट्रवादी) काँग्रेसच्या आमदारांना ओबेरॉय हॉटेलमध्ये बंद केल्याची माहिती आम्हाला मिळाली होती. परंतु नक्की कोणतं ओबेरॉय हॉटेल, हे आम्हाला समजलं नव्हतं. दिल्ली आणि गुरुग्राम या दोन्ही ठिकाणी ओबेरॉय हॉटेल्स आहेत.
 
"आमच्या आमदारांनांही आपल्याला कोठे ठेवण्यात आलंय, हे माहिती नव्हतं. त्यांनी फूड ऑर्डर बुकवरून ओबेरॉयमध्ये आहोत इतकाच मेसेज कसाबसा पक्षाध्यक्ष शरद पवार यांच्यापर्यंत पोहोचवला होता. त्यामुळे आम्ही हे रेस्क्यू ऑपरेशन सुरू केलं," असं दुहान यांनी सांगितलं.
 
सोनिया पुढे सांगतात, "या लोकांना सोडवण्यासाठी आमच्या टीमने हॉटेलमध्ये रूम्स बुक केल्या आणि दिवसभर हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी आम्ही तिथे राहिलो. जसे आमचे एकेक आमदार दृष्टीस पडले तसतसं एकेकाला हॉटेलच्या काही स्टाफच्या मदतीनं मागच्या दाराने आम्ही बाहेर काढलं. त्यानंतर गो एअरच्या विमानानं त्यांना मुंबईत आणलं. आता ते तिघेही आपल्या इतर सहकारी आमदारांबरोबर आहेत आणि आनंदी आहेत."
 
हॉटेलमधील व्यवस्था
मुंबईत शिवसेनेनं आपल्या आमदारांना हॉटेल ललितमध्ये ठेवलं होतं तर काँग्रेसचे आमदार JW मॅरिएटमध्ये होते. राष्ट्रावादीचे आमदार रेनेसाँमध्ये होते.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांसाठी 50 हून अधिक रूम बुक होत्या. त्याठिकाणी शिवसेनेचे नेते, पदाधिकारीही उपस्थित होते. आमदारांना संपर्क करण्याचं काम सुरू होतं. राष्ट्रवादीच्या नेत्या सुप्रिया सुळे या सगळ्यावर जातीने लक्ष ठेवून होत्या.
 
प्रत्येक आमदाराच्या हालचालीवर शिवसेना आणि राष्ट्रवादीचे पदाधिकारी बारकाईने लक्ष ठेवून होते. शिवसेनेचे खासदार श्रीकांत शिंदे, खासदार राजन विचारे यांच्यासह ठाण्याचे महापौर, नगरसेवक आणि इतर पदाधिकारी हॉटेल रेनेसाँमध्ये रात्रीपासूनच तळ ठोकून होते.
 
ज्या ठिकाणी या आमदारांना ठेवण्यात आलं त्या प्रत्येक मजल्यावर शिवसेना आणि राष्ट्रवादीचे मिळून 8-10 पदाधिकारी रूमबाहेर लॉबीमध्ये पाळत ठेवून होते. कुठल्याही आमदाराला बाहेर पडण्याची परवानगी नव्हती. आमदारांना जे हवं ते रूममध्येच मिळेल, याची व्यवस्था पदाधिकारी करत होते.
शनिवारी (23 नोव्हेंबर) रात्री 1.30च्या सुमारास राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड आणि खासदार श्रीकांत शिंदे हे गप्पा मारत असताना साध्या वेशातील पोलीस नजर ठेवत असल्याचं माजी खासदार आनंद परांजपे यांच्या लक्षात आलं. आव्हाड यांनी त्यांना विचारलं तेव्हा, "आम्ही इथे सहज आलो," असं त्यांनी आव्हाडांन सांगितलं.
 
पण सत्ताधारी साध्या वेशातील पोलिसांमार्फत आमच्यावर नजर ठेवून असल्याचा आरोप जितेंद्र आव्हाड यांनी केला.
 
आमदारांसोबत भेटीगाठींचं सत्र
रविवारी बीबीसीची टीम रेनेसाँ हॉटेलला पोहोचली, तेव्हा आमदारांच्या बैठका सुरू झाल्या होत्या. सकाळीच सुप्रिया सुळे, प्रफुल्ल पटेल हे हॉटेल रेनेसाँमध्ये पोहोचले होते. दुपारपर्यंत राष्ट्रवादीचे 46 आमदार स्वगृही परतले होते. शरद पवार या आमदारांच्या भेटीला गेले. शिवसेना आणि राष्ट्रवादीची ही नजरकैद काही आमदारांना नकोशी वाटत होती.
शरद पवारांनी घेतलेल्या बैठकीत एका आमदाराने याबाबत तक्रार केली, "इतकी नजरकैद का? आमच्यावर विश्वास नाही का?" असे प्रश्न उपस्थित केले. तेव्हा शरद पवारांनी "तुम्हाला राहायचं असेल तर रहा किंवा निघून जा," अशी कठोर भूमिका घेतली.
 
उद्धव ठाकरेही राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांना भेटायला पोहोचले. पुढे काय करायचं, ही परिस्थिती कशी हाताळायची, याची चर्चा सुरू होती.
 
दुसरीकडे, आमदारांच्या सह्यांचं पत्र तयार करण्याचं काम सुरू होतं. प्रत्येक आमदाराच्या चेहर्‍यावर एक चिंता दिसत होती. पुढे काय होणार, याबद्दल प्रत्येकजण चर्चा करत होता. काही कार्यकर्ते नेत्यांबरोबर फोटो काढत होते. पण त्या फोटोतही नेत्यांच्या चेहर्‍यावरची चिंता लपत नव्हती.
रेनेसाँच्या लॉबीला पक्षकार्यालयाचं स्वरूप आल्याचं चित्र दिसत होतं. शिवसेना आणि राष्ट्रवादीचे मिळून 300 पदाधिकारी हालचालींवर नजर ठेवण्यासाठी शिफ्टमध्ये काम करत होते. शिवसेनेचे नेतेही तिथले सर्व अपडेट वरिष्ठांना कळवतं होते.
 
राष्ट्रवादीवर विश्वास नाही म्हणून आमदारांवर नजर ठेवण्यासाठी शिवसेनेचे नेते आले आहेत का, असा प्रश्‍न आम्ही शिवसेनेचे खासदार श्रीकांत शिंदे यांना विचारला तेव्हा त्यांनी हसून उत्तर दिलं, "आम्ही आता एकत्र आहोत, त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या मदतीसाठी आम्ही आलो आहोत."
 
रविवारी रात्री आमदारांना दुसर्‍या हॉटेलमध्ये शिफ्ट करणार असल्याचा निरोप आला. सर्वजण बॅग भरून तयार झाले. एका रूमचं दिवसाचं भाडं 11 हजार रुपये असलेल्या रेनेसाँमधील बिलाच्या आकड्याचा फक्त अंदाजच लावलेला बरा!
 
संध्याकाळी मर्सिडीज बेंझच्या बसेस हॉटेलच्या रिसेप्शनबाहेर लागल्या. रात्री उशिरा सर्व आमदारांना सांताक्रूझच्या 'ग्रँड हयात' हॉटेलमध्ये हलवण्यात आलं. काँग्रेसचे आमदार JW मॅरिएटमध्येच आहेत, पण त्यांची सुरक्षा राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांइतकी कडक नाही.
 
शिवसेनेचे आमदार हॉटेल ललितमध्ये होते. त्यांना हॉटेल लेमन ट्रीमध्ये हलवण्यात आलं. सर्वात महत्त्वाचं म्हणजे या तीनही पक्षाच्या आमदारांना ठेवण्यासाठी निवडलेल्या हॉटेल्समध्ये शिवसेनेची युनियन आहे. त्यामुळे शिवसेनेसाठी तीनही पक्षाच्या आमदारांवर लक्ष ठेवणं सोयीस्कर आहे.