सोमवार, 27 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. बीबीसी मराठी बातम्या
Written By BBC|
Last Modified: गुरूवार, 13 ऑक्टोबर 2022 (14:25 IST)

कॉम्रेड कृष्णा देसाई हत्या प्रकरण, ज्यामुळे शिवसेनेचा पहिला आमदार विधानसभेवर निवडून गेला

balasaheb thackeray
- नामदेव काटकर
6 जून 1970 चा सूर्य मुंबईकरांसाठी एक रक्तरंजित बातमी घेऊन उगवला.
 
मुंबईतला लालबाग-परळचा भाग म्हणजे प्रचंड वर्दळीचा. मुंबईतल्या गिरण्या या भागात होत्या. त्यामुळे या भागात राहणाऱ्यांमध्ये कामगारांची संख्या अधिक होती.
 
पहाटे पहाटे कामगार कामावर जायला निघाले तेव्हा काहीतरी अरिष्ट कोसळल्यासारखी भयावह शांतता सर्वत्र पसरली होती. दिवस हळूहळू उजाडू लागलं. मात्र, वर्तमानपत्रं अजून घरोघरी पोहोचली नव्हती.
 
मुख्य रस्त्यांवर लिहिलेलं एक वाक्य सर्व कामगारांना गारठवून टाकणारं होतं. ते वाक्य होतं - 'कॉम्रेड कृष्णा देसाई यांचा भीषण खून'
 
हे वाक्य वाचून अनेक कामगारांच्या पायाखालची वाळूच सरकली.
 
नंतर हळूहळू वर्तमानपत्राचे गठ्ठेही पोहोचू लागले. त्या दिवशी म्हणजे 6 जूनचं वर्तमानपत्र खरंतर शालान्त परीक्षेच्या निकालाच्या मुख्य मथळ्यासह येणं अपेक्षित होता. मात्र, सर्वच वर्तमानपत्रांचा मथळा होता तो कृष्णा देसाईंच्या हत्येचा.
 
आदल्या रात्री घडलेल्या घटनेचं वृत्तांकन या वर्तमानपत्रांमध्ये वाचून, लालबाग-परळ किंवा केवळ मुंबईच नव्हे, तर महाराष्ट्राला हादरा बसला.
 
कारण कृष्णा देसाई कुणी साधासुधा माणूस नव्हता. तर ते या भागातील तत्कालीन आमदार होते.
 
हत्येच्या रात्री काय घडलं?
कॉ. कृष्णा देसाई हे लालबागमध्ये राहत आणि तिथेच ललित राईस मिल होती, तिथं ते कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी घेत. इथं 5 जूनच्या मध्यरात्री कॉ. देसाईंची कार्यकर्त्यांसोबत बैठक सुरू होती.
 
दुसऱ्या दिवशी कॉ. देसाईंनी कार्यकर्त्यांसोबत सहल आयोजित केली होती. या सहलीची आखणी तिथं सुरू होती.
 
हे सर्व सुरू असताना काही जणांनी कॉ. कृष्णा देसाईंना बोलावून बाहेर नेलं. बाहेर रस्त्यावर प्रचंड काळोख होता. रस्त्यावरील दिवे बंद करून हा काळोख जाणीवपूर्वक करण्यात आला होता.
 
या काळोखातच कॉ. कृष्णा देसाईंवर गुप्तीने वार करण्यात आले.
 
ज्येष्ठ पत्रकार प्रकाश अकोलकर हे त्यांच्या 'जय महाराष्ट्र... हा शिवसेना नावाचा इतिहास आहे' या पुस्तकात 'मराठा' दैनिकातील वृत्ताचा संदर्भ देत या हत्येच्या घटनेबद्दल लिहिलंय की, कॉ. देसाईंचं हाडपेर मुळातच मजबूत होतं. वार करून मारेकरी पळून गेल्यानंतरही ते 15-20 पावलं धावत गेले. रात्री त्यांनी व्यायाम केला होता. त्यामुळे त्यांचं रक्ताभिसरण वेगानं चालू होतं. याच वेळी हा हल्ला झाल्यानं त्यांचं खूपच रक्त गेलं.
 
कॉ. कृष्णा देसाई हे डाव्या विचारांचे जुने आणि आक्रमक कार्यकर्ते होते.
 
कोकणातल्या संगमेश्वर तालुक्यातील फुणगूस गावातून 'चाकरमानी' म्हणून मुंबईत आलेल्या कृष्णा देसाई डाव्या विचारांच्या जवळ गेले. पुढे क्रांतिकारी पक्ष नावाचा पक्षही त्यांनी स्थापन केला.
 
1967 साली ते लालबागमधून आमदार म्हणून महाराष्ट्राच्या विधानसभेत पोहोचले होते. त्यापूर्वी त्यांनी चारवेळा मुंबई महापालिकेची निवडणूक जिंकली होती. त्यांचं व्यक्तिमत्त्व आक्रमक शैलीचं होतं. लालबाग-परळ भागात आणि विशेषत: कामगारवर्गात त्यांचा प्रभाव होता.
 
त्यामुळे जेव्हा 6 जूनचं वर्तमानपत्र कॉ. कृष्णा देसाईंच्या हत्येची बातमी घेऊन आलं, त्यावेळी लालबाग-परळ भागात आणि कामगारवर्गात एकच संतापाची लाट पसरली. कम्युनिस्ट आमदाराची हत्या झाल्यानं महाराष्ट्रसह संपूर्ण भारतात या घटनेची चर्चा सुरू झाली.
 
गिरणगावात तर कामगारांनी उस्फूर्त बंद पुकारला आणि गटागटानं कामगार जमू लागले. गर्दी वाढत गेल्यानंतर या हत्येमागे कोण असावा, याचीही चर्चा सुरू झाली.
 
कॉ. कृष्णा देसाईंच्या अंत्ययात्रेत शेकडो लोक सहभागी झाले होते.
 
शिवसेना आणि बाळासाहेबांचं नाव कुणी घेतलं?
या हत्येमागे शिवसेनेचा हात असल्याची चर्चा सुरुवातीला दबक्या आवाजात होत होती. मात्र, स्मशानभूमीत झालेल्याभाषणांमधून अनेक वक्त्यांनी तसा थेट आरोपच केला.
 
प्रकाश अकोलकर त्यांच्या पुस्तकात लिहितात की, मराठा दैनिकाचा आठ कॉलमी मथळा होता - 'कॉ. कृष्णाचे खरे खुनी बाळ ठाकरे आणि वसंतराव नाईक'
 
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि तत्कालीन मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांचं नाव घेऊन इतका उघड आरोप करण्याच धाडस स्मशानभूमीतील शोकसभेत लाल निशाण गटाचे नेते कॉ. यशवंत चव्हाण यांनी केलं.
 
कॉ. देसाईंच्या अंत्ययात्रेत साम्यवादी, समाजवादी आणि काँग्रेसच्या इंडिकेट-सिंडिकेटमधील नेतेही सामील झाले होते.
 
वातावरणात दहशत, भीती आणि संताप अशा विविध भावना होत्या. तरीही कॉ. कृष्णा देसाई आणि कम्युनिस्ट पक्षाबद्दलची सहवेदना व्यक्त करण्यासाठी किमान 10 हजार लोक अंत्ययात्रेत सहभागी झाले होते. अंत्ययात्रा जेव्हा शिवाजी पार्कवर कोहिनूर मिलजवळ (आताच्या शिवसेना भवनासमोर. तेव्हा शिवसेना भवन उभं राहिलं नव्हतं.) आल्यावर वातावरण अधिक स्फोटक बनलं. तिथं पोलिसांनी अंत्ययात्रा अडवली. पोलीस आणि एस. वाय. कोल्हटकर, एन. डी. पाटील यांच्यात बाचाबाचीही झाली. त्यानंतर पोलिसांनी नमतं घेतलं.
 
स्मशानभूमीत झालेल्या सभेत अनेक नेत्यांनी शिवसेनेचं नाव घेऊन आरोप आणि टीका केली.
 
कॉ. कोल्हटकर आक्रमक झाले होते. ते भाषणात म्हणाले की, 'हा हिंदू, तो मुस्लीम, हा मराठी, तो बिगरमराठी अशी वर्ग विसरायला लावणारी आणि हिटलरचा उघड उघड पाठपुरावा करायला लावणारी शक्तीच या हल्ल्यामागे आहे.'
 
बाळासाहेब ठाकरे आणि शिवसेनेवर सगळ्यांचा रोख होता.
 
कॉ. कृष्णा देसाईंच्या हत्येच्या घटनेवर बाळासाहेब ठाकरेंनी प्रतिक्रिया दिली की, "राजकारणात असे खुनाचे तंत्र वापरले जाऊ लागले तर ती लोकशाहीची मृत्युघंटा ठरेल. राजकीय नेत्यावर मुंबईतला हा पहिलाच हल्ला असल्याने सरकारने त्याचा त्वरित बंदोबस्त करणे जरुरीचे आहे."
 
बाळासाहेब ठाकरेंवर डाव्या संघटनांकडून होणाऱ्या आरोपांना उत्तर देताना ते एकदा म्हणाले की, "माझ्यावर वाटेल ते आरोप होत आहेत. पण कृष्णाची आणि माझी साधी तोंडओळखही नव्हती. चौकशी सुरू असताना सर्व डाव्या पक्षांचा रोख शिवसेनेला गुंतविण्याचा आहे. विरोधी पक्षांचे हे चाळे म्हणजे आमदारकीचं दडपण आणून, सत्य काहीही असलं तरी चौकशीचा निर्णय आपल्याच मनाप्रमाणे लागावा, यासाठी सुरू असलेला दुराग्रह आहे."
 
तीन शिवसैनिकांना 14 वर्षांची शिक्षा
बाळासाहेब ठाकरेंनी डाव्या आणि समाजवाद्यांनी केलेले आरोप फेटाळले, तरी या हत्या प्रकरणात तपासाअंती दिलीप हाटे, अशोक कुलकर्णी आणि विश्वनाथ खटाटे यांना 14 वर्षांची शिक्षा झाली आणि त्यांना पुण्याच्या येरवाडा तुरुंगात डांबण्यात आलं.
 
मात्र, तुरुंगातील चांगली वर्तणूक पाहता, या गुन्हेगारांची शिक्षा कमी करून 7 वर्षे करण्यात आली.
 
2013 साली विश्वनाथ खटाटेंनी डीएनए वृत्तपत्राच्या प्रतिनिधींशी बोलताना, त्यावेळचा घटनाक्रम आणि त्यानंतरची स्थिती वर्णन केली होती.
 
खटाटे म्हणाले की, "1970 मधल्या राजकीय स्थितीची मला पूर्ण कल्पना होती. मात्र, कृष्णा देसाईला आम्ही बाजूला केलं नसतं, तर त्यांनं साहेबांना मारलं असतं."
 
यात खटाटे ज्यांना 'साहेब' म्हणतात, ते म्हणजे शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे.
 
यावेळी खटाटेंनी शिवसेनेच्या वाटचालीबाबतही खंत व्यक्त केली होती. ते म्हणाले होते की, "आता पूर्वीची शिवसेना राहिली नाहीय. आता पैसा महत्त्वाचा झालाय. साहेब चांगले आहेत. मात्र, इतर लोक खरे समर्थक नाहीत."
 
विश्वनाथ खटाटे 'डीएनए' वृत्तपत्राशी बोलण्याच्या एक वर्ष आधीच आयबीएन लोकमत वृत्तवाहिनीचे तत्कालीन संपादक आणि ज्येष्ठ पत्रकार निखील वागळे यांनी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंची मुलाखत घेतली होती.
 
या मुलाखतीत निखील वागळेंनी बाळासाहेबांना प्रश्न विचारला की, "तुमच्यावर असा आक्षेप घेतला जातो की, शिवसेनेनं महाराष्ट्राच्या राजकारणाला कृष्णा देसाई खून खटल्यापासून हिंसक वळण लावलं."
 
या प्रश्नाला बाळासाहेबांनी उत्तर दिलं होतं की, "कृष्णा देसाई मला ठार करायला निघाला होता. कृष्णा देसाई खुनी होता. आमचे नाईक मास्तर त्याने मारले."
 
बाळासाहेब ठाकरे पुढे म्हणाले की, "कृष्णा देसाईचा खुन करायला मी सांगितलंच नव्हतं."
 
एकूणच बाळासाहेब ठाकरेंनी जाहीरपणे किंवा अधिकृतपणे कधीच कॉ. कृष्णा देसाईंच्या हत्येचं समर्थन केलं नाही. मात्र, या हत्या प्रकरणात ज्यांना शिक्षा झाली, ते शिवसैनिक होते, हे निखील वागळेंना दिलेल्या मुलाखतीत बाळासाहेब ठाकरेंनी मान्य केलं.
 
ज्याच्या हत्येचा आरोप, त्याच्याच जागी पहिला आमदार...
कॉ. कृष्णा देसाई हे परळमधून आमदार होते. जूनमध्ये त्यांची हत्या झाली आणि त्याच वर्षी म्हणजे 18 ऑक्टोबर 1970 रोजी परळच्या जागी पोटनिवडणूक जाहीर झाली.
 
या पोटनिवडणुकीत डाव्या पक्षांनी कॉ. कृष्णा देसाईंच्या पत्नीलाच म्हणजे सरोजिनी देसाईंना उमेदवारी दिली. सरोजिनी देसाईंना समाजवादी आणि काँग्रेस (R) नंही पाठिंबा जाहीर केला. एकूण 13 पक्ष सरोजिनी देसाईंच्या बाजूनं उभे राहिले होते.
 
तर शिवसेनेकडून परळमधून नगरसेवक असलेले वामनराव महाडिक यांना उमेदवारी देण्यात आली. वामनराव महाडिक हे बाळासाहेब ठाकरेंचे विश्वासू म्हणून ओळखले जात.
 
वामनराव महाडिकांसाठी 20 सप्टेंबर 1970 रोजी परळच्या कामगार मैदानात बाळासाहेब ठाकरेंनी सभा घेतली आणि या सभेत डाव्यांवर जोरदार टीका केली. डावे पक्षाचे लोक हे राष्ट्रवादाचे विरोधक असल्याची टीका केली.
 
29 सप्टेंबर 1970 रोजी परळच्या नरे पार्कमध्ये सरोजिनी देसाईंच्या प्रचारासाठी झालेल्या सभेत कॉ. श्रीपाद अमृत डांगे (कम्युनिस्ट पार्टी), बाबुराव सामंत (संयुक्त सोशालिस्ट पार्टी), सदानंद वर्दे (प्रजा समाजवादी पार्टी), टी. एस. कारखानीस (शेकाप) आणि दत्ता देशमुख (लाल निशाण) अश दिग्गजांची भाषणं झाली.
 
इंडिकेट काँग्रेस उघड पाठिंबा सरोजिनी देसाईंना दिला नसला, तर परळमध्ये मोहन धारियांनी सभा घेतली होती. त्यांची भूमिका होती की, कुणीही जिंकला तरी चालेल, पण शिवसेनेचा उमेदवार जिंकता कामा नये.
 
कम्युनिस्ट नेते ए. बी. बर्धन यांनीही देसाईंच्या बाजूनं प्रचार केला होता.
 
दुसरीकडे, शिवसेनेच्या उमेदवारासाठी म्हणजे वामनराव महाडिकांसाठी एकूण 28 प्रचारसभा झाल्या. त्यातील 15 सभांमध्ये शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे उपस्थित होते आणि त्यांनी भाषणं केली.
 
डावी चळवळ असो वा शिवसेना असो, दोघांसाठीही ही निवडणूक प्रतिष्ठेची बनली होती. कारण दोन्हींसाठी या निवडणुकीतला विजय-पराजय भविष्यातील वाटचाल ठरवणार होता.
 
निवडणूक अशीच अटीतटीची झाली. डाव्यांना विजयाची खात्री असताना निकालानं पुन्हा एकदा मुंबईसह महाराष्ट्राला हादरा दिला. कारण कॉ. कृष्णा देसाईंच्या पत्नी सरोजिनी देसाई या पराभूत झाल्या.
 
20 ऑक्टोबर 1970 रोजी संध्याकाळी जाहीर झालेल्या निकालात सरोजिनी देसाईंना 29 हजार 913 मतं, तर शिवसेनेच्या वामराव महाडिकांना 31 हजार 592 मतं मिळाली. 1679 मतांच्या फरकानं वामनराव महाडिक विजयी झाले.
 
परळ पोटनिवडणुकीनं केवळ डाव्यांना हादरा दिला नाही, तर महाराष्ट्राच्या विधानसभेत वामनराव महाडिकांच्या रुपात शिवसेनेच्या पहिल्या आमदाराची एन्ट्री झाली.
 
संदर्भ :-
जय महाराष्ट्र - प्रकाश अकोलकर (मनोविकास प्रकाश)
बाळ ठाकरे अँड राईज ऑफ द शिवसेना - वैभव पुरंदरे (हार्पर कोलिन्स)
सम्राट : हाऊ द शिवसेना शिवसेना चेंज्ड मुंबई फॉरेव्हर - सुजाता आनंदन (रोली बुक्स)
लोकसभा संकेतस्थळ
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंची मुलाखत