शनिवार, 3 डिसेंबर 2022
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. बीबीसी मराठी बातम्या
Written By
Last Modified बुधवार, 10 मार्च 2021 (17:45 IST)

कोरोना: ऑनलाईन शिक्षणाचा असाही फटका, ऐन परीक्षेआधी मुलांना 'ही' भीती

दीपली जगताप
"वर्षभरापासून ऑनलाईन शाळा सुरू असल्याने लिहिताना त्रास होतोय. लिहिण्याचा सराव झालेला नाही. तीन तासाची प्रश्नपत्रिका पूर्ण करण्यासाठी आम्हाला चार तासाचा वेळही अपुरा पडतोय.
 
"आम्ही बोर्डाची प्रश्नपत्रिका कशी पूर्ण करणार?" दहावीची विद्यार्थिनी असलेल्या मैत्रीने बीबीसी मराठीशी बोलताना आपली व्यथा सांगितली.
 
"तीन तासाची परीक्षा आहे. पण आमचा लिहिण्याचा वेग एवढा कमी झाला आहे की पेपर वेळेत पूर्ण होणार नाही याची आम्हा विद्यार्थ्यांना खात्री वाटते. अशा परिस्थितीत भीती वाढत चालली आहे," ही प्रतिक्रिया आहे मुंबईतील प्रभादेवी येथे इंग्रजी माध्यमाच्या शाळेत शिकणाऱ्या स्वराची.
 
लिहिण्याची सवय मोडली आणि टायपिंगची सवय झाली त्यामुळे आता लिहिताना त्रास होतोय ही तक्रार एकट्या मैत्रीची किंवा स्वराची नाही तर असंख्य विद्यार्थ्यांची आहे.
 
याची सर्वाधिक भीती दहावी आणि बारावीची परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये असल्याचे दिसून येते. राज्यात 23 एप्रिल ते 21 मे बारावीची परीक्षा होणार आहे. तर 29 एप्रिल ते 20 मे दहावीची राज्य शिक्षण मंडळाची परीक्षा होणार आहे.
 
'परीक्षा लेखीच होणार'
मार्च 2020 रोजी राज्यात कोरोना रुग्णसंख्या झपाट्याने वाढू लागली आणि लॉकडॉऊन लागू झाले. शाळा बंद झाल्या आणि सलग 12 महिने विद्यार्थ्यांना बंद खोलीत ऑनलाईन शाळेला हजेरी लावावी लागली.
 
ऑनलाईन शिक्षणामुळे विद्यार्थ्यांना पर्यायी शिक्षण व्यवस्था मिळाली असली तरी त्याचे काही दुष्परिणाम आहेत असं विद्यार्थी सांगतात.
 
मोबाईलवर टाईप करायची सवय आधीपासूनच मुलांना होती. पण डिजिटल शिक्षणासाठी पालकांना दिवसभरासाठीच मुलांच्या हातात मोबाईल किंवा लॅपटॉप देण्याची वेळ आली.
 
शिक्षण ऑनलाईन पण परीक्षा मात्र ऑफलाईन हा विरोधाभास आहे असं विद्यार्थ्यांचं म्हणणं आहे. प्रश्नपत्रिका सोडवताना अपेक्षित वेगाने उत्तरं लिहिली नाहीत तर मार्क कमी मिळतील अशी भीती मुलांमध्ये आहे. यामुळे परीक्षा ऑनलाईन व्हावी किंवा ऑब्जेक्टिव्ह स्वरुपात व्हावी अशी काही विद्यार्थी आणि पालक संघटनांची मागणी आहे.
 
पण ही परीक्षा ऑफलाईन म्हणजे लेखी स्वरुपात असेल असे शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी अर्थसंकल्पीय अधिवेशनात स्पष्ट केले.
 
त्या म्हणाल्या, "दहावी आणि बारावीच्या परीक्षा ऑनलाईन होणार की ऑफलाईन याबाबत विद्यार्थ्यांच्या मनात संभ्रम निर्माण झाला होता. पण या परीक्षा ऑफलाईन होणार आहेत."
 
आता लेखी परीक्षा होणार असल्याने लिहिण्याशिवाय पर्याय नाही हे विद्यार्थ्यांच्या लक्षात आले. पण विद्यार्थ्यांचा लिहिण्याचा वेग कमी झाल्याने त्यांच्यासमोर अनेक प्रश्न आहेत.
 
केवळ बोर्डाच्या विद्यार्थ्यांना नव्हे तर इतर मुलांनाही मोबाईलच्या किपॅडची सवय झाल्याने बोटांना तसे वळण लागले आहेत आणि यामुळे लिहिताना त्रास होत असल्याच्या तक्रारी आहेत.
 
'विषय कळाले नाहीत, लिहिण्याचा सराव नाही'
मैत्री सांगते, "वर्षभरात अजिबात लिहिण्याचा सराव झालेला नाही. मार्चमध्ये शाळा बंद झाल्यापासून फक्त आणि फक्त मोबाईल आणि लॅपटॉपवर व्हिडिओ पाहून शिक्षण सुरू आहे. गृहपाठ दिला जातो पण त्यात पुरेसे लिखाण होत नाही. गणित, विज्ञान यांसारखे विषय सुद्धा व्हिडिओच्या माध्यमातून शिकवले गेले आहेत. त्यामुळे लिहिण्यासाठी पुरेसा वेळ मिळाला नाही."
 
मुंबईतील प्रभादेवी येथे राहणाऱ्या स्वराला देखील वेळेत पेपर पूर्ण होणार नाही याची भीती वाटते. स्वरा इंग्रजी माध्यमात शिकते. पण ऑनलाईन शिक्षणामुळे अनेक विषय नीट समजले नाही अशी तिची तक्रार आहे. त्यात लिहिण्याचा सराव न झाल्याने परीक्षेची अधिक भीती वाटत असल्याचं ती सांगते.
 
बीबीसी मराठीशी बोलताना स्वराने सांगितलं, "आम्हाला कॉन्सेप्टच नीट कळाल्या नाहीत तर आम्ही कशी परीक्षा देणार आहोत? आमच्या शंका कोण सोडवणार? शाळेत प्रत्यक्षात शिकता येत होतं. एखादा विषय समजला नाही तर शिक्षकांची थेट संपर्क करणं शक्य होतं. पण आता छोट्या छोट्या गोष्टींसाठी शिक्षक केवळ एका विद्यार्थ्याला वेळ देत नाहीत."
 
"तीन तासाची परीक्षा आहे. पण आमचा लिहिण्याचा वेग एवढा कमी झाला आहे की पेपर वेळेत पूर्ण होणार नाही याची आम्हा विद्यार्थ्यांना खात्री वाटते. अशा परिस्थितीत भीती वाढत चालली आहे. शिवाय, या शंका कधीच दूर झाल्या नाहीत तर पुढील वर्षाचे विषय आम्हाला कळणार नाहीत.
 
"याचा निकालावरही परिणाम होणार आहे. पालकांच्या अपेक्षा आहेत आम्ही परीक्षा द्याव्या आणि आमचे वर्ष वाया जाऊ नये. पण आमच्यासाठी सगळंच अवघड झालं आहे असं वाटतं," स्वरा सांगते.
 
केईएम रुग्णालयाच्या माजी अधिष्ठाता, मानसोपचार विभागाच्या प्रमुख आणि लेखक डॉ. शुभांगी पारकर यांनी बीबीसी मराठीशी बोलताना सांगितलं, "मुलांच्या या तक्रारी स्वाभाविक आहेत. माझ्यापर्यंतही अशा तक्रारी पालकांनी सांगितल्या आहेत. वर्षभर परिस्थिती बिघडली होती. त्यात त्यांच्या शिक्षणाची पद्धत बदलली. त्यामुळे मुलांमध्येही शिक्षणाचे तेवढे गांभीर्य नव्हते. अशा काळात त्यांना ताण वाटत आहे तर यात तथ्य आहे असे मला वाटते."
 
लिहिलेलं कळतच नाही तर आम्ही उत्तरपत्रिका कशा तपासणार?
राज्यातील बहुतांश शाळांमध्ये सध्या वार्षिक परीक्षा किंवा बोर्डाच्या पूर्व परीक्षा सुरू आहेत. मुलांच्या उत्तरपत्रिका पाहून शिक्षकांचीही काळजी वाढली आहे.
 
ऑनलाईन शिक्षणामुळे झालेले नुकसान आणि अस्वच्छ लिखाण यामुळे शिक्षकही हैराण आहेत.
 
दादर येथील बाल मोहन शाळेचे दहावीचे शिक्षक विलास परब यांनी बीबीसी मराठीशी बोलताना सांगितलं, "परीक्षेसाठी विद्यार्थ्यांचे अक्षर किमान वाचता येण्यासारखे असणं गरजेचं आहे. पण विद्यार्थ्यांच्या उत्तर पत्रिकेतले अक्षर आता वाचले तर अनेक गोष्टी समजणे कठीण आहे. कारण गेल्या अनेक महिन्यांपासून विद्यार्थ्यांनी लिहिण्याचा सराव नाही. घरीही त्यांनी हा सराव केलेला नाही. ऑनलाईन शिक्षणामुळे मोबाईलवर टाईप करण्याची सवय लागल्याने हाताची बोटांनाही तसेच वळण लागल्याचे दिसते."
 
"इतर परीक्षांमध्ये ठिक आहे. पण दहावी आणि बारावी बोर्डाच्या परीक्षेसाठी सलग तीन तास विद्यार्थी भाषा विषयांची परीक्षा कशी लिहिणार याची आम्हा शिक्षकांना काळजी वाटते. प्रश्नांची उत्तरं माहिती असूनही तीन तासात विद्यार्थ्यांची प्रश्नपत्रिका पूर्ण होणार नाही अशीही भीती आहे," परब सांगतात.
 
ग्रामीण भागात तुलनेने परिस्थिती बरी आहे असं शिक्षक सांगतात. अलिबाग येथील जिल्हा परिषद शाळेत शिकवणाऱ्या सुजाता पाटील यांनी बीबीसी मराठीशी बोलताना सांगितलं, "ग्रामीण भागात शहरांच्या तुलनेने लवकर शाळा सुरू झाल्या. किमान नववी, दहावी आणि बारावीचे वर्ग सुरू झाले. ऑक्टोबरमध्येच आम्हाला सांगितलं तेव्हा शाळा सुरू केली. त्यामुळे विद्यार्थ्यांना पुन्हा लिहिण्याची आणि शिकवण्याची संधी मिळाली."
 
पण सर्वच विद्यार्थ्यांना जवळपास वर्षभर शाळा बंद असल्याचा फटका बसला आहे असंही त्या सांगतात.
"मूल समोर असतं तेव्हा त्याच्या चेहऱ्यावरूनही शिक्षकांना कळतं. कुठे थांबायचे, कुठे गती कमी करायची हे प्रत्यक्षात वर्गात करता येतं. वर्गात मुलं कळत नसेल तर सांगतात. प्रत्येकाचा शिकण्याचा पेस वेगळा असतो. किमान किती मुलांना कळत आहे, उजळणी किती वेळा घ्यायची? याचा अंदाज आम्हाला येत असतो.
 
"लहान आणि मोठ्यांची सगळ्यांची लिहिण्याची सवय मोडत चालली आहे. नववी-दहावीच्या मुलांची लिहिण्याची सवय कमी होत चालली आहे हे धोक्याचे आहे," असंही सुजाता पाटील सांगतात.
 
विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास खालावला?
कोरोना आरोग्य संकटात मानसिक स्वास्थ्य बिघडल्याचीही अनेक उदाहरणं समोर आली. लॉकडॉऊनचा परिणाम मानसिक आरोग्यावर झाल्याचे दिसून आले. याला विद्यार्थी वर्गही अपवाद नाही.
 
मानसोपचार तज्ज्ञ डॉ. सागर मुंदडा यांनी बीबीसी मराठीशी बोलताना सांगितलं, "मुलांमध्येही कोरोनाची भीती प्रचंड आहे. त्यात शिक्षण आणि परीक्षा याचा ताण आहे. निकालाची स्पर्धा आहे. परीक्षेची भीती कायम मुलांमध्ये असते. विशेषत: दहावी,बारावी आणि प्रवेश परीक्षेआधी मोठ्या संख्येने विद्यार्थी आणि पालक चिंता व्यक्त करत असतात. अनेक विद्यार्थ्यांना समुपदेशनाचीही आवश्यकता भासते. पण कोरोना आरोग्य संकटात विद्यार्थ्यांमधील भीती तुलनेने वाढली आहे."
ऐन कोरोना काळात परीक्षेच्या पूर्वतयारीसाठी बाहेर पडावं लागल्याने आपल्याला कोरोना होईल याची धास्ती मुलांच्या मनात आहे. तसंच परीक्षा सुरू झाल्यानंतर सर्व विषयांची परीक्षा देण्याआधीच कोरोनाची लागण होईल याचीही मुलांना भीती आहे.
 
"पहिली ते नववी ऑनलाईन शिक्षण झालेले नाही. अचानक दहावी किंवा बारावीच्या वर्षात आव्हानात्मक परिस्थितीत शिकावं लागल्याने विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास खालावला आहे. वर्ष कसंतरी काढलं पण परीक्षा देताना प्रत्यक्षात काहीच लिहिता आलं नाही तर नापास होऊ किंवा कमी मार्क मिळतील. त्यामुळे आपण परीक्षेत यशस्वी होऊ असा विश्वास मुलांना नाही. यातून भीती निर्माण झाली आहे."असंही डॉ.सागर मुंदडा सांगतात.
 
मुलांनी काय करावे?
कोरोना आरोग्य संकटासारख्या आव्हानात्मक परिस्थितीत आणि विशेषत: परीक्षेच्या काळात मानसोपचार तज्ज्ञ विद्यार्थी आणि पालकांसाठी काही सल्ला देतात.
 
"याचे शास्त्रीय कारण आपण पाहिले तर मेंदुला लिहिण्याची सवय माहिती आहे. लिखाण हे विद्यार्थ्यांच्या मेंदुसाठी नवीन नाही. त्यामुळे जरी सवय मोडली असली तरी पुन्हा लिहिण्यास सुरुवात केली तर मेंदु सहकार्य करेल. कारण मेंदुला या फंक्शनची सवय आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी पुन्हा सराव सुरू करावा आणि आपल्या मेंदुवर विश्वास ठेवावा," असं डॉ.शुभांगी पारकर सांगतात.
 
तर डॉ. सागर मुंदडा याविषयी बोलताना सांगतात, "विद्यार्थी आणि पालकांना आम्ही एवढेच सांगतो की तुम्ही एकटे नाही असा विचार करा. ही परिस्थिती सर्वांसाठीच आव्हानात्मक आहे. लाखो विद्यार्थी आणि पालक अशाच पद्धतीनं परीक्षेला सामोरे जात आहेत. तेव्हा आपण एकटे नाही असा विचार केल्याने मानसिक दिलासा मिळेल."
 
"मुलांमध्ये भीती जास्त असल्यास किंवा भीतीमुळे अस्वस्थ वाटणे, झोप न येणे अशा तक्रारी असल्यास अशा विद्यार्थ्यांना समुपदेशनाची गरज आहे. त्यांनी शाळेतील शिक्षक किंवा समुपदेशकांशी संपर्क साधावा," असंही डॉ. सांगर मुंदडा यांनी सांगितलं.
 
डिजिटल शिक्षण आणि प्रत्यक्षात शाळा बंद असल्याने शालेय विद्यार्थ्यांसमोर अनेक मोठ्या समस्या आहेत. केवळ अभ्यासक्रम पूर्ण केल्याने विद्यार्थ्यांचे प्रश्न सुटणार नाहीत असे दिसून येते. त्यांच्या छोट्या छोट्या शंकांचेही निरसन होणं गरजेचं आहे.