मंगळवार, 24 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. बीबीसी मराठी बातम्या
Written By
Last Modified: मंगळवार, 21 एप्रिल 2020 (18:52 IST)

कोरोना व्हायरस : फेसबुक, ट्विटरवरच्या या पोस्ट किती खऱ्या, किती खोट्या?- फॅक्ट चेक

एकीकडे सरकार कोरोना व्हायरस थांबवण्यासाठी प्रयत्न करत आहे, तर दुसरीकडे भारतीय प्रसारमाध्यमं आणि सोशल मीडियावर अफवा पसरवल्या जात आहेत.
श्रुती मेनन

इथं आपण यासंबंधीच्या काही प्रमुख उदाहरणांची चर्चा करणार आहोत.

वनौषधीने तुमची रोगप्रतिकारक शक्ती वाढते?

पंतप्रधान नरेंद्र मोदी कोरोना व्हायरसविरुद्धच्या लढ्यात सामान्यांना पारंपरिक वनौषधींचा वापर करण्याचा सल्ला देत आहेत.
"लोकांनी काढा बनवण्यासाठी अधिकाधिक दिशानिर्देशांचं पालन करावं, यामुळे रोगप्रतिकारक क्षमता वाढते," असं मोदींनी म्हटलं.

वेगवेगळ्या प्रकारची पानं आणि वनौषधींचा वापर करून काढा तयार केला जातो. पण, यामुळे व्हायरसविरोधात शरीरातील रोगप्रतिकारशक्ती वाढते, याचा काहीएक पुरावा नाही, असं अभ्यासकांचं म्हणणं आहे.
येल विद्यापीठातील इम्युनोलॉजिस्ट अकिको इवासाकी सांगतात की, "रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासंबंधी या पद्धतीचे जे दावे केले जातात, त्याला कोणताही आधार नसतो."
भारतातील आयुर्वेद, योग, युनानी, सिद्ध आणि आयुष मंत्रालय पारंपरिक उपचाराच्या पद्धतीला प्रोत्साहन देतं आणि रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासंबंधी अनेक दावे करतं.
यापैकी काही उपायांचा प्रसार मंत्रालयानं कोरोना व्हायरस थांबवण्यासाठी केला आहे. पण, हे उपाय प्रभावी ठरतात, या बाबीला दुजोरा देणारा कोणताही वैज्ञानिक आधार उपलब्ध नाही.
भारत सरकारच्या फॅक्ट चेक टीमनं या दाव्यांना फेटाळून लावलं आहे. यामध्ये गरम पाणी पिल्यानं, तसंच व्हिनेगार आणि मीठाच्या गुळण्या केल्याचे उपाय सांगितले आहे.

लॉकडाऊनच्या प्रभावीपणाचे चुकीचे आकडे

एबीपी न्यूजने एका रिसर्चचा आधार घेत दावा केला की, भारतात वेळेवर लॉकडाऊन केलं नसतं तर आतापर्यंत कोरोनाचे 8 लाख रुग्ण आढळले असते. इंडियन काउंसिल ऑफ मेडिकल रिसर्च (ICMR)च्या आधारे चॅनेलनं हे आकडे दाखवले.
सत्ताधारी भाजपच्या आयटी सेलचे प्रमुख अमित मालवीय यांनी ही बातमी ट्वीट केली आहे आणि त्यानंतर ही बातमी हजारो लोकांनी पाहिली.
पण, अशाप्रकारचा कोणताही अभ्यास झालेला नाही, असं भारतीय आरोग्य मंत्रालयानं स्पष्ट केलं आहे. ICMRनंही या अभ्यासाला दुजोरा दिलेला नाही.
रिसर्च मॅनेजमेंट अँड पॉलिसीचे विभागीय प्रमुख रजनीकांत यांनी बीबीसीला सांगितलं, "ICMRनं कधीच असा कोणताही अभ्यास केलेला नाही, ज्यात लॉकडाऊनच्या प्रभावीपणाचा उल्लेख केलेला आहे."
आरोग्य मंत्रालयाच्या नकारानंतरही एबीपी चॅनेल आपण या बातमीवर ठाम असल्याचं म्हटलं.
असं असलं तरी मंत्रालयाच्या मते, काही 'अंतर्गत शोध' लागलेले आहेत, ज्यात कोरोनाचा संसर्ग झालेल्या रुग्णांच्या आकडेवारीविषयी अनुमान व्यक्त करण्यात आला आहे, पण या शोधांना सार्वजनिक करण्यात आलेलं नाही.
भारतात 25 मार्चपासून सगळे जण लॉकडाऊनमध्ये आहेत. लॉकडाऊन नसतं तर किती जणांना कोरोनाची लागण झाली असती, हे सांगता येत नाही.

कोरोनावर चहा इलाज?

"एक कप चहा कोरोना व्हायरसवरील इलाज असेल, असं कुणाला माहिती होतं?"

सोशल मीडियावर चीनचे डॉक्टर ली वेनलियांग यांच्या हवाल्यानं हा खोटा दावा पसरवला जात आहे. हे तेच डॉक्टर आहेत ज्यांनी सगळ्यात आधी वुहानमधील कोरोना व्हायरसविषयी सांगितलं होतं आणि काही दिवसांनंतर त्यांचा कोरोनामुळे मृत्यू झाला.
चहामध्ये असणाऱ्या मिथाइलक्सान्थाइनमुळे कोरोना व्हायरसचा परिणाम कमी होतो, असं संशोधन ली यांनी केल्याचा दावा केला जात आहे.
याशिवाय चीनच्या दवाखान्यांमध्ये कोरोनाच्या रुग्णांना दिवसातून तीन वेळा चहा दिला जातोय, अशा अनेक पोस्ट सोशल मीडियावर शेयर होत आहेत.
हे खरं आहे की चहामध्ये मिथाइलक्सान्थाइन असतं, ते कॉफी आणि चॉकलेटमध्येही असतं.
पण, चहामधील मिथाइलक्सान्थाइनमुळे कोरोनाचा परिणाम कमी होतो, याविषयी ली वेनलियांन संशोधन करत असल्याचा काहीएक पुरावा नाहीये. खरं तर ते नेत्रतज्ञ होते, ना की व्हायरसवर संशोधन करणारे तज्ज्ञ. तसंच चीनच्या दवाखान्यात चहा पाजून कोरोनाच्या रुग्णांवर उपचार केले जात आहे, हेही साफ खोटं आहे.