मंगळवार, 24 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. बीबीसी मराठी बातम्या
Written By
Last Modified: मंगळवार, 21 एप्रिल 2020 (16:22 IST)

चीनने कोरोना व्हायरस मृतांची आकडेवारी वेळीच सांगितली असती तर...

चीनमध्ये नव्या केसेसमध्ये भर पडत नाहीये, चीनमधील कोरोना व्हायरस आटोक्यात आला आहे, अशा बातम्या येत असतानाच 1290 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती चीन सरकारने दिली.
हे मृत्यू हॉस्पिटलबाहेर झाले त्यामुळे हे आम्हाला लवकर कळलं नाही, असं स्पष्टीकरण दिलं आहे. पण जर चीनने हे आकडे जाणून बुजून लपवले असतील तर त्यांना गंभीर परिणामांना समोर जावं लागेल असा इशारा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रंप यांनी दिला आहे.
चीनच्या वुहान शहरात गेल्या वर्षीच्या डिसेंबर महिन्यात कोव्हिडची सुरुवात झाली होती. 77 दिवसांच्या कडक लॉकडाऊननंतर इथली कोव्हिडची साथ आटोक्यात आली, असं चीन सरकारने जाहीर केलं.
आता तिथे हळुहळू गोष्टी पूर्वपदावर येत आहेत. वुहानमध्ये 2579 लोकांचा मृत्यू झालाय, असं चीन सरकारने आतापर्यंत सांगितलं होतं.

जगाने त्यावर विश्वासही ठेवला. पण अचानक आता चीन सरकारने जाहीर केलं की वुहानमध्ये आणखी 1290 लोकांचा कोरोनामुळे झाला होता. त्यामुळे आता एकूण मृतांचा आकडा 3869 एवढा झालाय. ही 50 टक्क्यांची वाढ आहे. त्यामुळे जगातल्या अनेक देशांनी चीनवर संताप व्यक्त केलाय.
जगभर आधीपासूनच शंका उपस्थित होत होत्या की चीन आकडे लपवतंय. सरकारची निष्क्रियता लपवण्यासाठी चीनने आकडे मुद्दाम कमी सांगितले, असा चीनवर वारंवार आरोप झाला.
एका नव्या आजारामुळे लोकांचे जीव जात आहेत, हे चीनने पहिल्यांदा जागतिक आरोग्य संघटनेला म्हणजे WHOला 31 डिसेंबर 2019 या दिवशी सांगितलं. पण WHOच्या तपासणी पथकाला चीनमध्ये येण्याची परवानगी 10 फेब्रुवारीला देण्यात आली.
तोवर चीनमध्ये आणि चीनबाहेर रोगाने चांगलेच हातपाय पसरले होते. या 40 दिवसांत चीनने काही गोष्टी लपवल्या, असा आरोप आता होतोय.
तुम्हाला आठवत असेल की डॉ. ली वेनलिअँग यांनी याच दरम्यान सांगितलं होतं की एक सार्ससारख्या आजाराचा उद्रेक झालाय. पण चीनमधल्या प्रशासनाने त्यांना खोटं ठरवायचा प्रयत्न केला. पुढे डॉ. ली यांचा कोव्हिडनेच मृत्यू झाला होता.
बीबीसीचे चीनमधले प्रतिनिधी स्टीफन मॅकडोनल सांगतात की, "जर चीनने हे आकडे तेव्हाच सांगितले असते तर जगाला वेळीच या आजाराचं गांभीर्य कळलं असतं. चीनने मृतांचा आकडा इतका कमी सांगितल्यामुळे कोव्हिडला अनेक देशांनी सुरुवातीला गांभीर्यने घेतलं नसावं."
अमेरिका आणि विशेषतः राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रंप चीनवर सुरुवातीपासूनच टीका करत आहेत. त्यांनी म्हटलंय की जर चीनने हे आकडे जाणून बुजून लपवले असतील तर त्यांना गंभीर परिणामांना समोर जावं लागेल.
 
"मी पत्रकार परिषदेत ऐकलं की अमेरिकेत सगळ्यांत जास्त मृत्यू झालेत. नाही. ते चीनमध्येच झाले असणार. तो केवढा मोठा देश आहे. तिथे खूप प्रॉब्लेम्स आहेत. त्यांनी आता वुहानमधले आकडे वाढवलेत. पण बाकीच्या चीनमधलं काय? हे सगळं दुर्दैवी आहे," असं ते म्हणाले.
फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इम्यान्युएल मॅक्रॉन यांनी चीनच्या भूमिकेवर प्रश्न उपस्थित केले आहेत. तर युकेचे परराष्ट्र मंत्री डॉमनिक राब यांनी म्हटलं आहे की आपल्याला चीनला कठोर प्रश्न विचारावे लागतील.
चीन सरकारने जगभरातले आरोप फेटाळले आहेत. चीनच्या आरोग्य आयुक्तालयाचे प्रवक्ते मी फेंग यांनी सांगितलं की "रुग्णालयाबाहेर कोरोना व्हायरसमुळे झालेल्या मृत्यूंची नोंद आम्ही केली नव्हती. सुरुवातीच्या काळात जास्त प्रमाणात चाचण्या झाल्या नव्हत्या. सुरुवातीला पुरेशा चाचण्या उपलब्ध नव्हत्या आता जे आकडेवारी आम्ही दिली आहेत ती अचूक आहे आणि त्याची पुन्हा पडताळणी आम्ही करून पाहिली आहे."

'लपवाछपवी करण्याचा चीनचा इतिहास'

2000च्या दशकात जेव्हा चीनमधून सार्स विषाणूची साथ आशियात पसरली होती, तेव्हा चीन सरकारने सुरुवातीला माहिती लवपली होती. नंतर आकडे सांगितले, पण कमी सांगितले. हा आजार किती धोकादायक असू शकतो, हेही लोकांना नीट समजू दिलं नाही.
त्यानंतर चीनवर जोरदार टीका झाली होती. त्यामुळे जेव्हा कोव्हिडची साथ आली, तेव्हा चीनमधल्या सत्ताधारी कम्युनिस्ट पार्टीच्या सेंट्रल पॉलिटिकल अँड लीगल कमिशनने म्हटलं की "सार्सच्या साथीतून चीन त्रासदायक मार्गाने धडा शिकलाय. यावेळी चीनने लोकांना वेळोवेळी नीट माहिती द्यावी."

कोव्हिडची साथ आल्यानंतर चीन सरकारने म्हटलं होतं की कुणीही माहिती लपवली तर त्यांना कठोर शिक्षा केली जाईल. लोकांना प्रामाणिकपणे सर्व माहिती सांगावी, असं आवाहन चीन सरकारने चीनी लोकांना केलं होतं. पण आता चीन सरकारवर पुन्हा माहिती लपवल्याचा आरोप होतोय.
जपानी वृत्तसंस्था क्योडो न्यूजने काही डॉक्टर्सच्या हवाल्याने बातमी दिली आहे की सरकारी अधिकाऱ्यांनी त्यांना काही मृतांची नोंद कोव्हिडच्या खात्यात न करण्याचे निर्देश दिले होते.
चीनमध्ये एकच पक्ष असल्यामुळे तिथे राजकीय विरोधक नसतात. तसंच तिथली वृत्तपत्रं ही सरकारी किंवा सरकारी पक्षाचीच असतात. त्यामुळे तिथे सरकारला विरोध करण्याचे किंवा प्रश्न विचारण्याचे किंवा आव्हान देण्याचे फार कमी मार्ग उपलब्ध आहेत.
अधिकृत आकडेवारी शेअर करण्याबाबत चीन सरकार सहकार्य करत नाही असा अनुभव पूर्वीपासूनच तज्ज्ञांना आहे. चीनकडून जे जीडीपीचे आकडे दिले जातात ते एखाद्या मार्गदर्शक तत्त्वाप्रमाणे घ्यावेत असा अर्थतज्ज्ञांमध्ये एक अलिखित संकेत आहे. कम्युनिस्ट पार्टीने जे उद्दिष्ट ठरवलं त्याप्रमाणेच आकडेवारी देण्याचा अधिकाऱ्यांचा कटाक्ष असतो.
चीनच्या अर्थव्यवस्थेचा स्वतंत्र्यपणे अभ्यास करणाऱ्या संस्थांचं असं म्हणणं आहे की चीन सरकारने जी आकडेवारी दिली त्यापेक्षा चीनचा जीडीपी कमी होता.
त्यामुळे चीनने सांगितलेल्या आकड्यांवर जगातले अनेक देश चटकन विश्वास ठेवत नाहीत.

WHOने केली चीनची स्तुती, पण...

WHO चे प्रमुख टेड्रोस अॅडानोम घेब्रेयेसूस यांनी सुरुवातीपासून चीनची स्तुती केली आहे. त्यांनी म्हटलं आहे की कोरोना व्हायरसच्या उद्रेकानंतर चीनने योग्य उपाययोजना केल्या आणि त्यांची पारदर्शकता वाखाणण्याजोगी आहे. पण WHO चीनधार्जिणं आहे, असा आरोप अमेरिकेने केलाय.

जगातल्या अनेक वृत्तपत्रांनी मात्र चीनवर टीकेची झोड उडवली आहे. जर्मनीच्या बिल्ड या वृत्तपत्राने म्हटलंय की चीनची सर्वांत मोठी निर्यात ही कोरोना व्हायरस आहे. चीनमुळे आमचं 130 अब्ज डॉलरचं नुकसान झालं आणि चीनने हे पैसे द्यावेत या पेपरनं म्हटलं आहे.
पण चीन ही जागतिक पातळीवरची आर्थिक महासत्ता आहे आणि त्यामुळे अनेक देशांनी चीनवर थेट टीका करणं टाळलंय. फ्रान्स, युके इत्यादी देशांनी जपूनच चीनवर नाराजी व्यक्त केलीये.