गुरूवार, 28 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. बीबीसी मराठी बातम्या
Written By

'संघ समजून घ्यायला आलो'; जर्मनीच्या राजदूतांची नागपूर भेट

जर्मनीचे भारतातील राजदूत वॉल्टर जे लिंडनर यांनी नागपूरमध्ये रा. स्व. संघाच्या मुख्यालयाला भेट दिली. या भेटीमध्ये त्यांनी सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट घेतल्यावर तयार झालेल्या वादानंतर आपण संघाबद्दल जाणून घ्यायला तेथे गेलो होतो असं त्यांनी सांगितलं.
 
'द हिंदू' या वर्तमानपत्राला दिलेल्या मुलाखतीमध्ये 'आपण या संस्थेबद्दल माहिती घ्यायला गेलो होतो', असं लिंडनर यांनी म्हटलं आहे.
 
ते म्हणाले, "या संघटनेबद्दल मी अनेक सकारात्मक आणि नकारात्मक लेख वाचले होते. त्यांच्या सामाजिक कार्यापासून फॅसिजमशी असलेल्या संबंधांच्या आरोपापर्यंत सर्व वाचलं होतं. मला माझं स्वतःचं मत बनवायचं होतं म्हणून मी गेलो. मी भागवत यांना अनेक प्रश्नही विचारले."
 
भारतात राहाणाऱ्या राजदूतांनी संघाशी असा सार्वजनिकरित्या संवाद साधण्याच्या घटना फारशा घडलेल्या नाहीत. त्यामुळे लिंडनर यांनी संघाच्या मुख्यालयात जाणं असामान्य मानलं जात आहे.
 
नागपूर भेटीनंतर लिंडनर यांनी आपल्या पदाचा राजीनामा द्यावा यासाठी एक ऑनलाइन मोहीम चालवली जात आहे. दक्षिण आशियातील घडामोडींचे विश्लेषक पीटर फ्रेडरिक यांनी ही मोहीम सुरू केली आहे. या मोहिमेला आतापर्यंत 1 हजार लोकांनी पाठिंबा दिला आहे.
 
लिंडनर यांनी 17 जुलै रोजी संघाच्या मुख्यालयात भागवत यांच्याशी झालेल्या भेटीचे फोटो ट्विटरवर प्रसिद्ध केले होते.
 
"नागपूरमध्ये रा. स्व. संघाच्या मुख्यालयाला भेट देऊन सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांच्याशी प्रदीर्घ चर्चा केली. 1925 मध्ये स्थापन झालेली ही संघटना जगातील सर्वांत मोठी स्वयंसेवी संघटना आहे. अर्थात इतिहासात ती पूर्ण निर्विवाद नव्हती."
 
लिंडनर यांनी फॅसिस्ट आंदोलनांनी प्रेरित संघाला भेट दिली असं त्यांच्याविरोधात ऑनलाइन मोहिमेत म्हटलं आहे.
 
जर्मनीनं कोणत्याही प्रकारच्या फॅसिजमबाबतीत सहिष्णूता दाखवता कामा नये. नाझी जर्मनी आणि इतर फॅसिस्ट शक्तींकडून प्रेरणा घेणाऱ्या संघासारख्या फॅसिस्ट संघटनांबाबतीत तर आजिबातच अशी भावना ठेवता कामा नये असं या ऑनलाइन पिटिशनमध्ये म्हटलं आहे.
 
जर्मनीच्या चॅन्सेलर अँजेला मर्केल आणि परराष्ट्र मंत्री हिको मास यांनी प्रकरणामध्ये हस्तक्षेप केला पाहिजे असंही ही मोहीम चालवणाऱ्यांनी म्हटलं आहे.
 
लिंडनर यांनी दिलेल्या स्पष्टीकरणावर पीटर फ्रेडरिक यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे. "तुम्हाला या फोटोत संघाबाबत माहिती मिळवणारी व्यक्ती दिसत आहे की ज्यांनी आपली मतं ठामपणे तयार करून ठेवली आहेत अशी व्यक्ती दिसत आहे? राजदूत लिंडनर संघाचे सहसंस्थापक हेडगेवार यांचा सन्मान करत आहेत. फॅसिझमबाबतच्या आरोपांची माहिती असूनही जर्मन राजदूतांनी नाझींकडून प्रेरणा घेणाऱ्या संघाच्या संस्थापकांचा सन्मान केला," असं ट्वीट त्यांनी केलं.
 
जर्मनीच्या आर्थिक सहाय्याने नागपूरमध्ये तयार होत असलेल्या मेट्रोची पाहाणी करायलाही लिंडनर गेले होते. भागवत यांच्या भेटीबरोबर त्यांनी हेडगेवार यांच्या मूळ घराचा दौराही त्यांनी केला.
 
संघाने या भेटीबाबत केलेल्या ट्वीटमध्ये म्हटलं आहे, "जर्मनीचे भारतातील राजदूत श्री. वॉल्टर जे. लिंडनर यांनी आज नागपूरमध्ये सरसंघचालक मोहनजी भागवत यांची भेट घेतली. त्यांनी डॉक्टर हेडगेवार यांच्या मूळघरालाही भेट दिली आणि स्मृती मंदिरामध्ये श्रद्धांजली वाहिली."
 
लिंडनर यांच्या नागपूर भेटीवर ट्विटरवर अनेक लोकांनी टीका केली आहे. लेखिका आणि दक्षिण आशियाचा इतिहास या विषयाच्या जाणकार ऑड्री ट्रश्की यांनी केलेल्या ट्वीटमध्ये त्या म्हणतात, "राजदूत लिंडनर यांच्या वागण्यातली अनैतिकता आणि नैतिक बेजबाबदारपणा पाहून मी चकित झाले आहे. विसाव्या शतकाच्या पहिल्या पन्नास वर्षांमध्ये संघाला द्वेषाचे धडे देणाऱ्या जर्मनीच्या काळ्या देणगीचा हा हिस्सा आहे. किमान आता तरी ते संघापासून दूर राहू शकतात."
 
आणखी एका ट्वीटमध्ये त्या म्हणाल्या, "इल्हाम ओमर आणि इतर काँग्रेस खासदारांवर ट्रंप यांनी केलेल्या टिप्पणीवर चॅन्सेलर मर्केल यांनी टीका केली आहे. जसे नाझी लोक ज्यू लोकांकडे पाहायचे त्याच नजरेने मुसलमानांकडे पाहाणाऱ्या संघटनेला आपल्या राजदूताने भेट देणं त्यांना धोकादायक वाटत नाही."
 
द हिंदूला दिलेल्या मुलाखतीमध्ये वॉल्टर लिंडनर म्हणतात, एक जर्मन नागरिक म्हणून त्यांना या संघटनेच्या 1939-40 च्या कालावधीतील इतिहासाची माहिती आहे. संघाच्या काही नेत्यांनी नाझी जर्मनीकडून प्रेरणा घेतली होती हे मला माहिती आहे आणि त्याबद्दल मी भागवत यांच्याशी चर्चा केली. ते म्हणाले, 'मी कट्टरपंथाबद्दल अनेक प्रश्न विचारले आणि अशा प्रश्नांची सरळ उत्तरे नसतात.'
 
आपली भेट म्हणजे 'भारत नावाचं मोझेक' जाणून घेण्यासाठी आपण करत असलेल्या प्रयत्नांचा हा भाग आहे. असं सांगत लिंडनर यांनी संघाला जन आंदोलन म्हटलं आहे.
 
संघसुद्धा या मोझेकचा एक भाग आहे. हे एक जनआंदोलन असल्याचं तुम्ही नाकारू शकत नाही. कोणाला ते आवडो किंवा न आवडो ते जनआंदोलन आहे.