शुक्रवार, 24 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. बीबीसी मराठी बातम्या
Written By
Last Modified: मंगळवार, 20 सप्टेंबर 2022 (13:22 IST)

लंडनजवळील लेस्टर शहरात हिंदू-मुस्लीम तणाव, 47 जण अटकेत

UK police
- कॅरोलिन लॉब्रिज, जेम्स लिन, डॅन मार्टिन
युनायटेड किंग्डम अर्थात युकेच्या लेस्टर शहरात शनिवारी (17 नोव्हेंबर) हिंदू-मुस्लीम धर्मियांमध्ये तणावाचं परिस्थिती निर्माण झाली आहे. ही घटना समोर आल्यानंतर स्थानिक पोलीस घटनास्थळी दाखल झाले.
 
तणावाच्या पार्श्वभूमीवर लेस्टर शहरात आगामी काही दिवस मोठ्या संख्येने पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात येणार आहे. पोलीस प्रशासन आणि स्थानिक नेत्यांनी लोकांना शांतता राखण्याचं आवाहन केलं आहे.
 
या प्रकरणात आतापर्यंत 47 लोकांना अटक करण्यात आली आहे.
 
त्यानंतर झालेल्या न्यायालयीन कार्यवाहीत 20 वर्षीय अमोस नोरान्हाला या निदर्शनात सहभागी झाल्याबद्दल आणि अराजक पसरवल्याबद्दल 10 महिन्यांची शिक्षा ठोठावली आहे.
 
शहरात तणावाचे वातावरण निर्माण केल्याबद्दल शिक्षा होणारा ही पहिलीच व्यक्ती आहे. नोरान्हाने हत्यार बाळगल्याचं मान्य केलं होतं.
 
युकेमधील लेस्टर शहर हे राजधानी लंडनपासून सुमारे 150 किलोमीटर अंतरावर आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, लेस्टर येथे शनिवारी (17 नोव्हेंबर) अचानक दोन्ही धर्माच्या नागरिकांनी एकमेकांच्या विरोधात आंदोलन सुरू केलं. यानंतर संपूर्ण परिसरात तणाव निर्माण झाल्याचं पाहायला मिळालं.
 
तत्पूर्वी, आशिया कप क्रिकेट स्पर्धेत 28 ऑगस्ट रोजी झालेल्या भारत-पाकिस्तान सामन्यानंतर अनेक ठिकाणी दोन्ही समुदायांच्या लोकांमध्ये तणावजन्य परिस्थिती निर्माण झाली होती. तेव्हापासून वारंवार अशा प्रकारच्या घटना निदर्शनास आल्या आहेत.
 
लेस्टर येथील फेडरेशन ऑफ मुस्लीम ऑर्गनायझेशन्सचे सुलेमान नगदी यांनी याबाबत बीबीसीशी बोलताना म्हटलं, "आम्ही याठिकाणच्या रस्त्यांवर पाहिलं, ते दृश्य चिंताजनक आहे. भारत-पाकिस्तान सामन्यापासूनच येथे तणावपूर्ण वातावरण होतं. इथे खेळाच्या निमित्ताने लोकांची प्रचंड गर्दी जमते. कधी-कधी परिस्थिती आणखीनच बिघडते."
 
"आपल्याला शांतता राखणं आवश्यक आहे. हा तणाव कमी झाला पाहिजे. काही तरुण या गोष्टींमध्ये सहभाग नोंदवत आहे. त्यांनी हे थांबवावं, असं आवाहन आम्ही करतो. आम्ही या तरुणांच्या घरातील ज्येष्ठांनी त्यांना समजावून सांगावं, अशी विनंती आम्ही त्यांच्याकडे करणार आहोत," असंही ते म्हणाले.
 
लेस्टरमध्ये हिंदू आणि जैन मंदिरात नेहमी जाणारे संजीव पटेल म्हणाले की, शनिवारी घडलेला प्रकार हा दुःखदायक होता.
 
ते सांगतात, "आम्ही कित्येक दशकांपासून या शहरात शांततेने राहतो. पण गेल्या काही आठवड्यांपासून अशा काही गोष्टी घडल्या, ज्यांच्याविषयी चर्चा होणं गरजेचं आहे. लोक नेमके कशामुळे नाराज आहे, ते समजून घ्यायला हवं."
 
"कोणत्याही परिस्थितीत हिंसेचा मार्ग स्वीकारणं योग्य राहणार नाही. गेल्या काही दिवसांत, विशेषतः शनिवारी घडलेल्या घटनेमुळे आमच्यात भीतीचं वातावरण आहे. हिंदू, जैन आणि मुस्लीम समुदायांचे नेते वारंवार शांतता राखण्याचं आवाहन करत आहेत."
 
'लोकांनी अफवांपासून दूर राहावं'
संजीव पटेल यांनी लोकांना आवाहन केलं आहे की, त्यांनी सोशल मीडियावर पसरवल्या जाणाऱ्या भ्रामक माहितीपासून दूर राहावं.
 
त्यांनी म्हटलं, "हिंसा हे कोणत्याही समस्येवरचं उत्तर असू शकत नाही. ही एकमेकांसोबत शांततेने संवाद साधण्याची वेळ आहे."
 
या प्रकरणी पोलिसांनी सांगितलं की, त्यांनी या प्रकरणी एका व्यक्तीला कारस्थान रचण्याच्या संशयावरून ताब्यात घेतलं आहे. याच प्रकरणी दुसऱ्या एका व्यक्तीला धारदार शस्त्र बाळगल्याच्या संशयावरून ताब्यात घेण्यात आलं आहे. हे दोघंही सध्या पोलिस कोठडीत आहेत.
 
लेस्टर शहराचे महापौर सर पीटर सोल्सबी यांनी सांगितलं, "शनिवारी असं काही होईल याची कोणालाही कल्पना नव्हती. पोलिस लोकांना शांततेचं आवाहन करत आहेत."
 
"शनिवारी रात्री परिस्थिती अगदीच चिघळली आणि या घटनेत अडकलेल्यांची मला काळजी वाटत होती. मात्र पोलिसांनी तातडीनं कारवाई केली. हे काम तितकं सोपं नव्हतं."
 
"या संघर्षात सहभागी झालेले बहुतांश जण तरुण होते, त्यांचं वय वीस वर्षांच्या आसपास होतं. तणावाची परिस्थिती निर्माण करण्याची संधीच शोधत असलेले हे लोक शहराच्या बाहेरून आले असल्याचं मी ऐकलं. ज्या भागात ही घटना झाली, तिथल्या लोकांसाठी ही काळजीची परिस्थिती आहे."