शुक्रवार, 8 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. बीबीसी मराठी बातम्या
Written By
Last Modified: शुक्रवार, 30 एप्रिल 2021 (17:43 IST)

हिटलरनं लग्न केलं, पार्टी केली आणि नंतर गोळी मारून आत्महत्या केली...

रेहान फजल
25 एप्रिल 1945 नंतर हिटलरच्या आयुष्याचं एकच ध्येय होतं, स्वतःच्या मरणाची तयारी करणं.
25 एप्रिलाच त्याने आपला अंगरक्षक हींज लिंगेला बोलवून म्हटलं की, "मी स्वतःला गोळी मारली की तू माझ्या मृत शरीराला चॅन्सलरी बागेत घेऊन जा आणि आग लावून टाक. माझ्या मृत्यूनंतर कोणी मला ना मला पाहिलं पाहिजे, ना माझी ओळख पटली पाहिजे. यानंतर तू माझ्या खोलीत परत जा, माझा गणवेश, माझे कागद, ती हरेक गोष्ट जी मी वापरली आहे ती जमा करून बाहेर आणून सगळ्याला आग लावून टाक. फक्त अंटन ग्राफने काढलेल्या फ्रेडरिक ग्रेट यांच्या तैलचित्राला हात लावू नकोस. ते माझा ड्रायव्हर माझ्या मृत्यूनंतर सुरक्षितरित्या बर्लिनच्या बाहेर घेऊन जाईल."
आपल्या आयुष्याच्या अखेरच्या काळात हिटलर जमिनीच्या 50 फुट खाली बनलेल्या बंकरमध्ये राहात होता. फक्त आपली लाडकी कुत्री ब्लाँडीला फिरवायला कधीकधी चॅन्सलरी बागेत जायचा तेव्हा चारी बाजूला बाँम्बमुळे उद्धवस्त झालेल्या इमारतींचे अवशेष पडलेले असायचे.
 
कोण कोण होतं हिटलरबरोबर?
हिटलर सकाळी पाच किंवा सहा वाजता झोपायला जायचा आणि दुपारी झोपून उठायचा. हिटलरची स्वीय सहायक त्राउदी जुंगा शेवटच्या क्षणांपर्यंत हिटलरबरोबर त्या बंकरमध्ये होती.
बीबीसीशी बोलताना तिने एकदा सांगितलं होतं, "शेवटचे दहा दिवस आमच्यासाठी एका दुःस्वप्नासारखे होते. आम्ही बंकरमध्ये लपून बसलो होतो आणि रशियन सैन्य आमच्या जवळ येत होतं. आम्ही त्यांच्या गोळीबाराचा, बॉम्बचा, तोफांचा आवाज सहज ऐकू शकत होतो. हिटलर बंकरमध्ये बसून वाट पाहात होते की कोणी येऊन त्यांचा जीव वाचवेल. पण एक गोष्ट त्यांनी आधीच स्पष्ट केली होती जर लढाईत ते जिंकले नाहीत तर ते बर्लिन कधी सोडणार नाहीत आणि स्वतःच्याच हाताने स्वतःला गोळी मारून घेतील, त्यामुळे आम्हाला माहिती होतं की काय होणार आहे."
"जेव्हा 22 एप्रिल 1945 साली हिटलरने आम्हा सगळ्यांना सांगितलं की तुमची इच्छा असेल तर तुम्ही बर्लिन सोडून जाऊ शकता तेव्हा त्यांची प्रेयसी इव्हा ब्राऊन सगळ्यात आधी म्हणाली, 'तुम्हाला माहितेय मी तुम्हाला सोडून जाणार नाही. मी इथेच राहीन.' आणि माझ्या तोंडातूनही हेच शब्द निघाले."
 
बदलला होता हिटलर
त्याकाळात हिटलरचे युद्ध उत्पादन मंत्री अल्बर्ट स्पीयर त्याला भेटायला आणि त्याचा निरोप घ्यायला बंकरमध्ये आले होते. नंतर स्पीयरने आपल्या आठवणींमध्ये सांगितलं की हिटलरचं व्यक्तिमत्व खूप बदललं होतं.
"आपल्या अखेरच्या दिवसात हिटलरची अवस्था अशी झाली होती की त्यांची फक्त कीव केली जाऊ शकत होती. त्यांचं संपूर्ण शरीर थरथरत होतं, आणि त्यांचं खांदे वाकले होते. त्यांचे कपडे घाणेरडे होते आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्यांचा प्रतिसाद अतिशय थंड होता. मी त्यांच्या निरोप घ्यायला आलो होतो. मला माहिती होतं की ही आमची शेवटची भेट आहे, पण माझ्या हृदयाला भावेल असं काहीही ते बोलले नाहीत."
हिटरलच्या त्याकाळातल्या अवस्थेचं वर्णन 'द लाईफ अँड डेथ ऑफ अॅडोल्फ हिटलर' लिहिणारे रॉबर्ट पेन यांनीही केलं आहे. ते लिहितात, "हिटलरचा पूर्ण चेहरा सुजला होता आणि त्यावर असंख्य सुरकुत्या पडल्या होत्या. त्यांच्या डोळ्यातली आयुष्याची ज्योत विझत चालली होती. कधी कधी त्यांचा उजवा हात खूप थरथरायला लागायचा, आणि त्याचं थरथरणं थांबवण्यासाठी ते आपल्या डाव्या हाताने तो हात गच्च पकडायचे. ज्या प्रकारे त्यांच्या खांद्यामध्ये ते आपली मान तुकवायचे त्यावरून वाटायचं की एखादं म्हातारं गिधाड बसलंय. त्यांच्या व्यक्तिमत्वातली सगळ्यात लक्षात ठेवण्यासारखी गोष्ट म्हणजे एखाद्या दारूड्या माणसासारखं अडखडळत चालायचे ते. हे कदाचित एखाद्या स्फोटात त्यांच्या कानाच्या पडद्याला झालेल्या दुखापतीमुळे होत असावं. ते थोडं चालायचे आणि थांबून आधारासाठी एखाद्या टेबलचा कोपरा पकडायचे. सहा महिन्याच्या काळात ते 10 वर्षांनी म्हातारे झाले होते."
बंकरच्या शेवटच्या दिवसात हिटलरने इव्हा ब्राऊनशी लग्न करायचं ठरवलं. 'द लाईफ अँड डेथ ऑफ अॅडोल्फ हिटलर' या पुस्तकात रॉबर्ट पेन लिहितात, "प्रश्न होता की हे लग्न लावणार कोण? गोबेल्सला आठवलं की कोण्या वॉल्टर वॅगनर यांनी त्यांचं लग्न लावलं होतं. आता अडचण ही होती की त्यांना शोधायचं कुठे? त्यांच्या शेवटच्या पत्त्यावर एका सैनिकाला पाठवलं. मोठ्या मुश्किलीने त्यांना हिटलरच्या बंकरमध्ये आणलं गेलं. पण ते आपल्याबरोबर लग्नाचं सर्टिफिकेट आणायला विसरले."
 
हिटरलचं लग्न
"ते सर्टिफिकेट आणायला ते पुन्हा आपल्या घरी गेले. रशियन सैनिकांचा भयानक गोळीबार सुरू होता. रस्त्यावर पडझड झालेल्या इमारतींच्या अवशेषाचे ढिगारे होते. तशात मार्ग काढत वॅगनर पुन्हा हिटलरच्या बंकरमध्ये पोहचले. तेव्हा लग्नाची मेजवानी सुरू होणार होती. हिटलर आणि इव्हा ब्राऊन वॅगनर यांची वाटच पाहात होते. हिटलरचा साक्षीदार म्हणून गोबेल्सने सही केली तर इव्हा ब्राऊनचा साक्षीदार बनला बोरमन. सर्टिफिकेटवर तारीख लिहिली होती 29 एप्रिल. पण ही तारीख चुकीची होती कारण रात्रीचे 12 वाजून 25 मिनिटं झाली होती, त्यामुळे त्यावर तारीख असायला हवी होती 30 एप्रिल."
लग्नानंतरच्या मेजवानीत बोरमन, गोबेल्स, माग्दा गोबेल्स, जनरल क्रॅब्स, जनरल बर्गडॉर्फ, हिटलरचे दोन स्वीय सहायक आणि त्यांचा शाकाहारी स्वयंपाकी सहभागी झाले होते. इव्हा हिटलरच्या आरोग्याची कामना करायला सगळ्यांनी आपले ग्लास उचलले. इव्हाने बरीच शँपेन प्यायली होती, पण हिटलरने एक घोट घेतला आणि जुन्या आठवणींना उजाळा द्यायला लागला. गोबेल्सच्या लग्नाच्या आठवणीही त्यांने
पण अचानक हिटलरचा मुड बदलला आणि म्हणाला, "सगळं संपलं आहे. मला प्रत्येकाने धोका दिला."
आपल्या आयुष्यातल्या शेवटच्या दिवशी हिटलरने काही तासांची झोप काढली आणि ताजातवाना होऊन उठला. सहसा मृत्युदंडाची शिक्षा दिलेले कैदी आपल्या मृत्यूच्या आधीच्या रात्री शांतपणे झोपतात असं लक्षात आलं आहे. दाढी, आंघोळ झाल्यानंतर हिटलर आपल्या सैन्य जनरल्सला भेटला आणि म्हणाला शेवट जवळ आहे. सोव्हियत सैनिक कधीही त्यांच्या बंकरमध्ये घुसू शकतात.
 
हिटलरने झाडून घेतली गोळी
रॉबर्ट पेन म्हणतात, "हिटलरने प्रोफेसर हासेना बोलवून विचारलं की सायनाईड कॅप्सुल विश्वासार्ह आहेत की नाहीत? हिटलरने असंही म्हटलं की त्यांच्या लाडक्या कुत्रीला त्या गोळ्या खायला घालून त्यांचं परिक्षण करा. टेस्ट केल्यानंतर हासेने हिटलरला रिपोर्ट दिला. परिक्षण यशस्वी ठरलं, ब्लाँडी काही सेकंदातच मेली."
"खुद्द हिटलरची हे दृश्य बघण्याची हिंमत झाली नाही. मेल्यानंतर ब्लाँडीला आणि तिच्या सहा पिल्लांना एका खोक्यात ठेवलं. हे खोकं चॅन्सलरी बागेत आणलं. तिची पिल्लं अजूनही आईच्या स्तनांना चिकटून होती. तेव्हा ओटे ग्वेंशेनी त्या पिल्लांना एकेक करून गोळ्या घातल्या आणि त्या खोक्याला बागेतच दफन केलं.
दुपारी अडीच वाजता हिटलर आपलं शेवटचं जेवण करायला बसला. ओटो ग्वेंशेला आदेश मिळाला की 200 लीटर पेट्रोलचा बंदोबस्त करा. ते पेट्रोल कॅन्समध्ये भरून बंकरच्या बाहेरच्या दरवाजात ठेवा.
हिटलरच चरित्र लिहिणारे इयान करशॉ लिहितात, "ग्वेंशेने हिटलरचा शोफर एरिक कँपकाना फोन केला तेव्हा कँपका हसायला लागला. त्याला माहिती होतं की चँन्सलरीत पेट्रोलची किती मारामारी होती. तो म्हणाला, 'आता कोणाला हवंय 200 लिटर पेट्रोल?' तेव्हा ग्वेंशे म्हणाला, 'ही हसायची वेळ नाहीये.' कँपकाने मुश्किलीने 180 लिटर पेट्रोलचा बंदोबस्त केला."
जेवण झाल्यानंतर हिटलर शेवटचं आपल्या साथीदारांना भेटायला आला. त्याने कोणाचाही चेहरा न पाहाता त्यांच्याशी हस्तांदोलन केलं. यावेळी त्याची पत्नी इव्हा ब्राऊनही त्याच्यासोबत होती.
इव्हाने गडद निळ्या रंगाचा ड्रेस आणि मातकट रंगाचे इटालियन बुट घातले होते. तिच्या मनगटावर हिरेजडीत प्लॅटिनमचं घड्याळ होतं. मग ते दोघेही आपल्या खोलीत गेले. तेव्हाच एकदम गलका झाला. माग्दा गोबेल्स ओरडत आली की हिटलरने आत्महत्या करायला नको. तिचं म्हणणं होतं की जर तिला हिटलरशी बोलू दिलं तर ती त्याचं मन वळवू शकेल.
 
कोणालाही भेटला नाही हिटलर
गरहार्ड बोल्ट आपलं पुस्तक 'इन द शेल्टर विद हिटलर' मध्ये लिहितात, "हिटलरचा अंगरक्षक ग्वेंशे सहा फुट दोन इंच उंच होता आणि एकदम गोरिलासारखा वाटायचा. माग्दा हिटलरला भेटायचा इतका आग्रह करत होती की ग्वेंशेने दरवाजा उघडायचा निर्णय घेतला. दरवाज्याला आतून कडी नव्हती.
ग्वेंशेने हिटलरला विचारलं, 'तुम्हाला माग्दाला भेटायला आवडेल'? हिटलर म्हणाला, 'मला कोणालाही भेटायचं नाही.' इव्हा तिथे दिसत नव्हती. कदाचित बाथरूममध्ये असावी, आतून पाण्याचा आवाज येत होता. यानंतर त्यांनी दार बंद करून घेतलं."
दरवाज्याबाहेर उभ्या असणाऱ्या हेंज लिंगेला कळलंही नाही हिटलरने कधी स्वतःला गोळी मारून घेतली. नाकात हलकासा बंदुकीच्या दारूचा वास आला तेव्हा त्याला जाणवलं.
रोकस मिस्च हिटलरच्या बंकरमध्ये टेलिफोन ऑपरेटर होता.
काही वर्षांपूर्वी बीबीसीशी बोलताना त्याने सांगितलं, "मी अचानक ऐकलं, कोणीतरी ओरडून सांगत होतं, लिंगे...लिंगे हिटलर नाही राहिलेत. कदाचित त्यांना गोळीचा आवाज ऐकू आला होता. पण मला तर काहीही ऐकू आलं नाही. त्याच वेळी हिटलरचे स्वीय सचिव बोरमन यांनी सगळ्यांना गप्प होण्याचा इशारा केला. प्रत्येकजण कुजबुजत बोलत होता. तेव्हाच बोरमनने हिटरलच्या खोलीचा दरवाजा उघडण्याचा इशारा केला. मी पाहिलं हिटलरचं डोक टेबलवर निपचित पडलं होतं. इव्हा ब्राऊन सोफ्यावर पडल्या होत्या. त्यांचे गुडघे त्यांच्या छातीशी होते. त्यांनी गडद निळ्या रंगाचा ड्रेस घातला होता आणि त्याला पांढऱ्या रंगाची फ्रिल होती. मरताना कदाचित त्यांनी आपला हात लांब केला होता त्यामुळे बाजूची फुलदाणी खाली पडून फुटली होती. मी ते दृश्य कधीही विसरू शकत नाही."
 
हेल हिटलरचं सत्य
यानंतर लिंगेने हिटलरचं शव चादरीत गुंडाळलं आणि ते घेऊन तो इमर्जन्सी दरवाज्यातून वरती चॅन्सलरी बागेत आला. बोरमनने इव्हा ब्राऊनचं शव आणलं.
रोकस मिस्च सांगतात, "ते हिटलरचं शव माझ्या शेजारून घेऊन गेले तेव्हा त्यांचे पाय लटकत होते. कोणीतरी मला ओरडून म्हणालं लवकर वर या, ते बॉसला जाळत आहेत. पण मी वर गेलो नाही."
हिटलरचे चरित्रकार इयान करशॉ लिहितात, "हे दृश्य हिटलरचे शेवटच्या दिवसातले सगळे सहकारी बंकरच्या दरवाजातून पाहात होते. त्यांच्या शवांना आग लावली तेव्हा सगळ्यांनी हात वर करून 'हेल हिटलर' म्हटलं आणि बंकरमध्ये परत आले. तेव्हा जोराचा वारा सुटला होता."
"जेव्हा आगीच्या ज्वाळा कमी झाल्या तेव्हा त्यांच्यावर पेट्रोल टाकलं गेलं. अडीच तास आग धगधगत होती. रात्री 11 वाजता ग्वेंशेने एसएस जवानांना त्या जळालेल्या शवांना दफन करायला पाठवलं. काही दिवसांनी जेव्हा सोव्हियत सैन्याने हिटलर आणि त्याच्या पत्नीचे अवशेष बाहेर काढले तेव्हा सगळं काही संपलं होतं. एक डेंटल ब्रिज (दातांचे अवशेष) सापडले. 1938 पासून हिटलरच्या दंतवैद्याकडे काम करणाऱ्या एका व्यक्तीने ते डेंटल ब्रिज हिटलरचेच आहेत याला दुजोरा दिला."