रविवार, 5 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. बीबीसी मराठी बातम्या
Written By
Last Modified: गुरूवार, 12 डिसेंबर 2019 (14:57 IST)

गोपीनाथ मुंडेंचा मृत्यू कसा झाला होता? तो अपघात होता की हत्या?

3 जून 2014 चा दिवस उजाडला तोच भाजपसाठी अशुभ बातमी घेऊन. पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि केंद्रीय मंत्री गोपीनाथ मुंडे दिल्लीवरून मुंबईला जाण्यासाठी विमानतळाकडे निघाले होते. मुंडेचं दिल्लीतील शासकीय निवासस्थान आणि विमानतळ हा अवघा अर्ध्या तासाचा प्रवास. पण तेवढ्या वेळात होत्याचं नव्हतं झालं आणि गाडीला झालेल्या अपघातात गोपीनाथ मुंडे यांना आपले प्राण गमवावे लागले.
 
मुंडेच्या गाडीला झालेल्या अपघाताचे तपशील समोर आल्यानंतर अनेकांनी त्यांचा मृत्यू हा अपघात होता की घातपात अशी शंका उपस्थित करायला सुरूवात केली. मुंडेंच्या मृत्यूबद्दलचा हाच वाद पुन्हा नव्यानं उफाळून आला आहे. गोपीनाथ मुंडेंना ईव्हीएम हॅकिंगची कल्पना असल्यामुळं त्यांची हत्या केल्याचा खळबळजनक आरोप सय्यद शुजा या सायबर एक्सपर्टनं केला.
 
शुजानं लाइव्ह प्रेस कॉन्फरन्समध्ये ईव्हीएम हॅकिंग आणि मुंडेंच्या हत्येचा संबंध जोडल्यानं गोपीनाथ मुंडे यांच्या मृत्यूबद्दल पुन्हा संशय निर्माण झाला आहे. त्यामुळेच साडेचार वर्षे मागे जात मुंडेंच्या अपघाताचं गूढ तेव्हाही का कायम होतं, हे जाणून घेण्याचा प्रयत्न आम्ही केला.
 
अपघाताच्या वेळेची परिस्थिती संशयास्पद
गोपीनाथ मुंडे यांच्या मृत्यूबद्दल बीबीसी मराठीशी बोलताना ज्येष्ठ पत्रकार सुनील चावके यांनी म्हटलं, "ज्या परिस्थितीत मुंडे यांचा अपघात झाल्याचं सांगितलं गेलं, त्यावर अनेकांचा विश्वास बसला नाही, डॉक्टरानी अंतर्गत रक्तस्त्राव हे त्यांच्या मृत्यूचं कारण असल्याचं म्हटलं होतं. मात्र या अपघातात त्यांच्या ड्रायव्हर किंवा पीएला कोणतीही इजा झाली नाही. त्यामुळेत लोकांच्या मनात त्यांच्या अपघाताबद्दल संशय निर्माण झाला. आता ईव्हीएम हॅकिंगचा मुंडे यांच्या मृत्यूशी संबंध जोडला गेल्यामुळे त्यासंबंधीच्या चर्चांना नवीन अँगल मिळाला आहे."
 
ज्येष्ठ पत्रकार व्यंकटेश केसरी यांनी गोपीनाथ मुंडेचा अपघात हा अनपेक्षित असल्यानं त्याबद्दल संशय निर्माण झाल्याचं म्हटलं.
 
केसरी यांनी सांगितलं, " 2014 च्या लोकसभा निवडणुकांचे निकाल लागल्यानंतर गोपीनाथ मुंडे हे केंद्रात मंत्री होणार का, असा प्रश्न उपस्थित होत होता. कारण काही महिन्यांतच महाराष्ट्रात विधानसभेच्या निवडणुका होणार होत्या आणि मुंडे हे मुख्यमंत्रीपदाचे प्रबळ दावेदार मानले जात होते. पण त्याचवेळी दिल्लीत अशी चर्चा होती, की मोदींना गोपीनाथ मुंडेंना मंत्रिमंडळात स्थान द्यायचे नव्हते. मात्र नितीन गडकरी यांनी मुंडेंच्या नावासाठी आग्रह धरला. मुंडेंचा मंत्रीमंडळात समावेश न झाल्यास महाराष्ट्रात चुकीचा संदेश जाईल असं गडकरींचं म्हणणं होतं. अशा परिस्थितीत गोपीनाथ मुंडेंचा मंत्रिमंडळात समावेश झाला होता. आणि मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर ते पहिल्यांदाच महाराष्ट्रात चालले होते. तिथे त्यांच्या स्वागताचा कार्यक्रम आयोजित केला होता. मात्र मुंबईला जाण्यासाठी निघाले असतानाच मुंडे यांचा अपघाती मृत्यू झाला. ही अतिशय अनपेक्षित अशी घटना होती."
 
काही प्रश्न अजूनही अनुत्तरित
व्यंकटेश केसरी यांनी म्हटलं, "शवविच्छेदन अहवालामध्ये मुंडे यांच्या मृत्यूचं कारण रक्तस्त्राव असं सांगितलं असलं तरी, भाजपला लोकांच्या मनातील संशय दूर होईल अशा रितीने हे कारण आजतागायत पटवून देण्यात आलं नाही. त्यामुळेच मुंडेंच्या मृत्यूबद्दल आजही संशय निर्माण होत आहे. आता निवडणुकीच्या तोंडावर पुन्हा एकदा गोपीनाथ मुंडेंच्या मृत्यूचा संबंध ईव्हीएमशी जोडला गेला आहे. त्यामुळे गोपीनाथ मुंडेंचा मृत्यू हा अपघाचीच होता, हे लोकांना पटवून देणं हे भाजपसमोरचं आव्हान आहे."
 
गोपीनाथ मुंडे यांच्या मृत्यूमुळे संशय निर्माण झाला असल्याचं भाजपचे प्रवक्ते केशव उपाध्ये यांनीही मान्य केलं. मात्र त्यांच्या मृत्यूची सीबीआय चौकशी झाल्यानंतर सर्व प्रश्नांची उत्तरं मिळाल्याचंही उपाध्ये यांनी बीबीसी मराठीशी बोलताना म्हटलं.
 
"गोपीनाथ मुंडेंनी आयुष्यभर अतिशय संघर्ष केला होता आणि यशाच्या एका टप्प्यावर ते पोहोचले होते. आणि अशावेळी त्यांचा मृत्यू होणं ही अतिशय धक्कादायक गोष्ट होती. अपघाताच्या अगदी आदल्या दिवशीपर्यंत गोपीनाथ मुंडे नीट होते, सर्वांशी हसूनखेळून बोलत होते. त्यामुळं त्यांना मानणारा जो एक मोठा वर्ग होता, त्यांच्या मनात उलटसुलट शंका येणं स्वाभाविक होतं. त्यांच्या जन्मगावी म्हणजे परळीला त्यांच्या अंतिम संस्काराच्या वेळेसही जमाव प्रक्षुब्ध झाला होता. जमावाच्या या प्रतिक्रियेनंतर मुंडे यांच्या मृत्यूची सीबीआय चौकशीही करण्यात आली. मात्र हा अपघाती मृत्यू असल्याचं या तपासातूनही निष्पन्न झालं होतं," असं केशव उपाध्येंनी म्हटलं.
 
"मुंडे यांच्या मृत्यूबद्दल नव्यानं जो वाद उफाळून आला आहे त्याबद्दल बोलताना उपाध्ये यांनी म्हटलं, गोपीनाथ मुंडे यांच्या मृत्यूबद्दल हॅकर जो दावा करत आहे, त्यासाठी कोणताही पुरावा देत नाहीये. केवळ बेछूट आणि बेलगाम आरोप करणं ही काही जणांची खासियतच आहे," असंही केशव उपाध्येंनी म्हटलं.
 
गोपीनाथ मुंडे यांचे पुतणे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे यांनी मात्र त्यांच्या अपघाती मृत्यूची शक्यता पूर्णपणे फेटाळून लावली. "अचानक ज्या पद्धतीनं गोपीनाथ मुंडे यांचा अपघात झाल्याचं दाखवण्यात आलं, ते संशयास्पद होतं. गाडीची गाडीला जशाप्रकारे धडक बसली होती, ते पाहता त्यांचा मृत्यू होईल हे पटत नाही. मी स्वतःही गोपीनाथ मुंडेंची गाडी पाहिली होती. म्हणूनच त्यांच्या अपघाताबद्दल प्रश्नचिन्ह तेव्हाही निर्माण झालं होतं," असं मुंडे यांनी म्हटलं.
 
गोपीनाथ मुंडेंच्या मृत्यूदिवशीचा घटनाक्रम
गोपीनाथ मुंडे यांनी 26 मे 2014 ला मोदी सरकारच्या मंत्रिमंडळात मंत्रीपदाची शपथ घेतली होती. शपथविधीनंतर 3 जून 2014 ला सकाळी मुंडे आपल्या 21 लोधी इस्टेट या सरकारी निवासस्थानावरून विमानतळाकडे जायला निघाले होते.
 
मुंडे सरकारी गाडीतून जात होते आणि त्यांच्या सोबत ड्रायव्हर आणि त्यांचा पीए होते. सकाळी साधारण 6 वाजून 20 मिनिटांच्या सुमारास त्यांची गाडी पृथ्वीराज रोड-तुघलक रोडचं इंटरसेक्शन असलेल्या अरबिंदो मार्गावर पोहोचली. इथल्या सिग्नलवर उजवीकडून येणाऱ्या इंडिका गाडीची मुंडेंच्या गाडीशी धडक झाली.
 
गोपीनाथ मुंडे गाडीच्या मागच्या सीटवर बसले होते. दोन्ही गाड्यांची धडक झाल्यानंतर मुंडेंचा चेहरा समोरच्या सीटवर आदळला.
 
त्यानंतर लगेचच मुंडेंना अस्वस्थ वाटायला लागल्यामुळे पीए आणि ड्रायव्हरनं त्यांना तातडीनं 'एम्स'च्या ट्रॉमा सेंटरमध्ये दाखल केलं. एम्समध्ये पोहचल्यावर त्यांचं ह्रदय बंद पडल्याचं डॉक्टरांच्या लक्षात आलं. डॉक्टरांच्या टीमनं सीपीआरच्या माध्यमातून सुमारे तासभर प्रयत्न केल्यानंतर सकाळी 7 वाजून 20 मिनिटांनी गोपीनाथ मुंडे यांना मृत घोषित केलं.
 
मुंडे यांच्या निधनानंतरची सर्व परिस्थिती भाजप नेते नितीन गडकरींनी हाताळली होती. गडकरी हे महाराष्ट्रातील नेते असल्यामुळं त्यांच्यावर ही जबाबदारी सोपवण्यात आली असल्याची माहिती सुनील चावके यांनी दिली. "नितीन गडकरी आणि हर्षवर्धन यांनीच गोपीनाथ मुंडे यांच्या मृत्यूबद्दल माध्यमांना सांगितलं होतं. त्यानंतर मुंडे यांचं पार्थिव भाजप मुख्यालयात आणून तिथून मुंबईला पाठविण्यापर्यंतची सर्व व्यवस्था गडकरी पाहत होते," असं चावकेंनी सांगितलं.
 
सीबीआय चौकशीनंतर या प्रकरणावर पडदा पडला होता. मात्र साडेचार वर्षांनंतर पुन्हा एकदा कथित हॅकर सय्यद शुजाच्या नव्या आरोपांनी या प्रकरणाची जोरदार चर्चा देशभर सुरू झाली आहे. त्याला ईव्हीएम घोटाळ्याची पार्श्वभूमी सय्यद शुजा यांनी जोडल्याने निवडणुकीतही हा मुद्दा तापणार आहे.