सोमवार, 23 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. बीबीसी मराठी बातम्या
Written By
Last Modified: बुधवार, 4 डिसेंबर 2019 (13:39 IST)

हैदराबाद बलात्कार : ‘माझ्या मुलाने हे केलं असेल तर त्याला फासावर चढवा’- आरोपीच्या वडिलांची प्रतिक्रिया

दीप्ती बतिनी
हैदराबादमध्ये 27 वर्षीय पशुवैद्यक तरुणीवर बलात्कार करून तिची निर्घृण हत्या केल्याच्या घटनेनंतर संपूर्ण देशात संतापाची लाट उसळली आहे.
 
बलात्कारविरोधी कायद्यांमध्ये कठोर सुधारणा केल्यानंतरसुद्धा अशा घटना घडत असल्याने भारतात मुली किती सुरक्षित आहे, हा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. या घटनेनंतर बीबीसी तेलुगुच्या प्रतिनिधी दीप्ती बतिनी यांनी या प्रकरणातील चारपैकी तीन आरोपींच्या कुटुंबीयांची भेट घेतली.
 
तीन आरोपी हैदराबादपासून 160 किमी अंतरावर असलेल्या गावात राहतात. तर चौथा आरोपी शेजारच्या गावातील आहे.
 
या प्रकरणातील सर्व आरोपींना अटक झाल्यानंतर त्यांची पार्श्वभूमी जाणून घेण्यासाठी, त्यांच्या कुटुंबीयांच्या प्रतिक्रिया घेण्यासाठी या गावात प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींची गर्दी झाली आहे.
 
आम्ही गावात पोहोचलो तेव्हा एक गावकरी स्वतःहून आम्हाला एका आरोपीच्या घरी घेऊन गेला. त्याने म्हटलं, "आम्हा सर्वांनाच मोठा धक्का बसला आहे. आमच्या गावातील कुणीतरी इतकं निर्घृण कृत्य करेल, असं वाटलंही नव्हतं."
 
त्याने पुढं म्हटलं, "गावात बहुतांश लोक शेतमजूर आहेत. छोटी-छोटी कामं करून आम्ही आपला उदरनिर्वाह चालवतो."
 
एका उघड्या गटाराच्या शेजारी असलेल्या घराकडे बोट दाखवत तो म्हणाला हे त्या आरोपीचं घर.
दोन खोल्यांच्या त्या झोपडीवजा घरात एका आरोपीची आई पडून होती. त्या इतक्या अशक्त होत्या की त्यांना उठून बसताही येत नव्हतं. त्यांनी त्यांच्या नवऱ्याकडे म्हणजे आरोपीच्या वडिलांकडे बोट दाखवलं.ते रोजंदारीवर काम करतात.
 
काय घडलं, याची आपल्याला काहीच कल्पना नसल्याचं सांगत त्यांनी म्हटलं, "मला दोन मुलं आणि एक मुलगी आहे. उद्या असं काही माझ्या मुलीच्या बाबतीत घडलं तर मी शांत बसणार नाही. म्हणूनच ते जे म्हणत आहेत तसं माझ्या मुलाने खरंच काही केलं असेल तर त्याला फासावर चढवा."
 
28 नोव्हेंबरला तो कामावरू घरी आला त्या रात्री आपण त्याच्याशी शेवटचं बोलल्याचं ते सांगतात.
 
त्यांनी सांगितलं, "माझ्या मुलाने मला काहीच सांगितलं नाही. तो फक्त झोपून होता. मध्यरात्रीच्या जवळपास पोलीस आले आणि त्याला घेऊन गेले. तेव्हासुद्धा मला माहिती नव्हतं की असं काहीतरी घडलं आहे. पोलिसांनी मला पोलीस स्टेशनला यायला सांगितलं तेव्हा मला प्रकरण कळलं. माझ्या मुलासाठी वकील करण्याचीही माझी ऐपत नाही. तसं करायची माझी इच्छाही नाही. माझ्या मुलाने खरंच तसं केलं असेल तर मी त्याच्यावर पैसा आणि मेहनत खर्च करू इच्छित नाही."
 
'या गोष्टीवर अजूनही विश्वास बसत नाही'
त्याच गल्लीत काही घरं सोडून दुसऱ्या आरोपीचं घर आहे. तिथे तो आपल्या कुटुंबासोबत राहतो. तीन खोल्यांच्या या घराच्या अंगणात आरोपीची आई आणि पत्नी बसल्या होत्या.
 
आरोपीच्या पत्नीने सांगितलं, की सात महिन्यांची गरोदर आहे. ती म्हणाली, "आमचा प्रेमविवाह आहे. मी त्याला जवळपास दीड वर्षांपासून ओळखते. आठ महिन्यांपूर्वी आमचं लग्न झालं. त्याच्या आई-वडिलांचा सुरुवातीला विरोध होता. मात्र, नंतर ते तयार झाले."
बोलणं सुरू असतानाच आरोपीच्या आईने सांगितलं, की त्याला किडनीचा आजार आहे आणि गेल्या दोन वर्षांपासून तो उपचार घेत आहे. त्या पुढे म्हणाल्या, "माझ्या मुलाने असं काहीतरी केलं आहे यावर माझा अजूनही विश्वास बसत नाही. दारुच्या नशेत कुणीतरी त्याच्यावर दबाव टाकून या गुन्ह्यात गोवलं असणार, असंच मला वाटतं."
 
मात्र, ही बातमी बघून आपल्याला खूप वाईट वाटल्याचं आरोपीच्या पत्नीने सांगितलं. तिनं म्हटलं, "पीडितादेखील एक स्त्री आहे. मला खूप वाईट वाटलं. माझ्या पतीने हे केलं की नाही, याविषयी मला बोलायचं नाही. पण, जे काही घडलं ते योग्य नाही. आता काय व्हायला हवं, त्याबद्दल मी खात्रीशीरपणे सांगू शकत नाही."
 
याच गावात तिसऱ्या आरोपीचंही घर आहे. मात्र, आम्ही त्याच्या घरी पोचलो तेव्हा तिथे कुणीच नव्हतं.
 
'घडलेल्या प्रकाराबद्दल माहिती नाही'
या गावापासून जवळच असलेल्या एका गावात चौथ्या आरोपीचं घर होतं. गावातील लोकांनी आम्हाला दूरूनच त्याचं घर दाखवलं. एका खोलीच्या या घराबाहेर आरोपीचे आई-वडील बसून होते. त्यांची प्रकृती ढासळली होती. अशक्तपणा त्यांच्या चेहऱ्यांवर स्पष्ट जाणवत होता. आमच्या मुलाने काय केलं, याबाबत काहीच माहिती नसल्याचं ते म्हणत होते.
 
आरोपीच्या आईने सांगितलं, "तो घरी खूप कमी वेळ असतो. तो घरी येतो, आंघोळ करतो आणि पुन्हा जातो. तो घरातला एकुलता एक कमावता आहे. त्यामुळे आम्ही त्याला फारसं काही विचारत नाही."
 
आम्ही बोलत असताना शेजारी-पाजारीही तिथे पोचले आणि त्यांनीही सांगितलं, की यांना घडलेल्या प्रकाराबद्दल काही माहिती नाही.
आरोपीच्या वडिलांनी सांगितलं, की 28 नोव्हेंबरच्या संध्याकाळी त्यांचा मुलगा घरी आला. त्यांनी पुढे म्हटलं, "त्याच्या ट्रकला अपघात झाल्याचं त्यानं सांगितलं. त्याने सांगितलं, की तो चालवत असलेल्या ट्रकने स्कूटरवर जात असलेल्या एका मुलीला धडक दिली आणि त्यात ती दगावली. मी त्याच्यावर चिडलो आणि त्याला म्हटलं, की त्याने जबाबदारीने वागायला हवं होतं. ती पहिलीच वेळ होती जेव्हा त्याने आम्हाला काहीतरी सांगितलं. त्या रात्री पोलीस आले आणि त्याला घेऊन गेले तेव्हाच त्याने काय केलं हे आम्हाला कळलं."
 
या घटनेमुळे सगळ्यांनाच धक्का बसल्याचं शेजारी सांगत होते. एक जण म्हणाला, "आरोपीने असं काहीतरी केलं, हे ऐकून आश्चर्य वाटलं नाही. त्याला दारूचं व्यसन होतं. मी त्याला नेहमी सांगण्याचा प्रयत्न केला, की काहीतरी चांगलं काम कर. मी त्याला जवळपास दहा वर्षांपासून ओळखतो. तो कधीच घरी नसायचा."
 
सर्व आरोपींना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी देण्यात आली आहे आणि सध्या सगळे तुरुंगात आहेत.
 
पोलिसांनी अधिक चौकशीसाठी आरोपींच्या पोलीस कोठडीची मागणी केली आहे. आरोपींच्या सुरक्षेच्या दृष्टीने पोलीस या प्रकरणाविषयी सध्यातरी अधिक माहिती देत नाही.
 
सर्व आरोपींना "अपहरण, दरोडा आणि सामूहिक बलात्कार करून निर्घृण खून आणि गुन्हेगारी कट" या आरोपाखाली अटक केल्याचं पोलिसांनी दाखल केलेल्या रिमांड लेटरमध्ये म्हटलेलं आहे.
 
दरम्यान, खटला जलदगती न्यायालयाकडे वर्ग करावा आणि सर्व आरोपींना कठोरातील कठोर शिक्षा व्हावी यासाठी प्रयत्न करावे, असे आदेश तेलंगणाच्या मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत.