बुधवार, 13 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. बीबीसी मराठी बातम्या
Written By
Last Modified: मंगळवार, 20 जुलै 2021 (12:25 IST)

'वारकऱ्यांनी तुडूंब भरलेलं पंढरपूर पुन्हा एकदा पाहायचं आहे' - उद्धव ठाकरे

आषाढी एकादशीच्या पूर्वसंध्येला संत ज्ञानेश्वरांची पालखी निवडक वारकऱ्यांसह एसटीने वाखरी (पंढरपूर) येथे दाखल झाली. प्रथेप्रमाणे राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते विठ्ठलाची पूजा पार पडली. ते काल रात्री पंढरपूरमध्ये दाखल झाले.
 
यंदाच्या आषाढी एकादशीच्या शासकीय महापूजेत सामील होण्याचा मान विठ्ठल मंदिरातील विणेकरी केशव शिवदास कोलते व त्यांच्या पत्नी इंदुमती कोलते यांनी मिळाला.
 
आज मंगळवार, 20 जुलै रोजी पंढरपूरच्या आषाढी वारीचा सोहळा आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदाची वारी प्रातिनिधिक स्वरुपात करण्यात आली.
 
महापूजेनंतर पत्रकारांशी संवाद साधताना, "मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले, पुन्हा एकदा सर्वांना आनंदी आणि निरोगी आयुष्य जगू दे.
 
"कोरोनाच्या काळात नागरिकांच्यावतीने पाळण्यात येणारे सामाजिक अंतर मिटून, वारकऱ्यांनी तुडूंब, आनंददायी, भगव्या पताक्यांनी भरलेलं पंढरपूर पहावयाचे आहे," असे ठाकरे म्हणाले.
 
मानाच्या 10 पालख्यांमधील 400 भाविकांना या सोहळ्यात सहभागी होण्याची परवानगी प्रशासनाने दिली आहे.
 
वर्ध्याचे केशव कोलते मानाचे वारकरी
यंदाच्या आषाढी एकादशीच्या शासकीय महापूजेत सामील होण्याचा मान विठ्ठल मंदिरातील विणेकरी केशव शिवदास कोलते व त्यांच्या पत्नी इंदुमती कोलते यांनी मिळाला.
 
कोलते दाम्पत्य मुख्यमंत्र्यांसोबत या महापूजेत सहभागी झाले.
 
केशव कोलते हे वर्धा येथील रहिवासी असून 1972 पासून महिन्याची वारी करीत असत. गेल्या 20 वर्षापासून ते विठ्ठल मंदिरात विणेकरी म्हणून सेवा देत आहेत.
 
गेल्या दोन वर्षांपासून कोरोना संकटामुळे मंदिर बंद असल्याने दर्शन रांगेतील भाविकातून मानाचा वारकरी निवडता येत नसल्याने मंदिरात सेवा देणाऱ्या भविकातून ही निवड केली जाते.
 
"अनेक मंत्री पाहिले पण उद्धव ठाकरेंसारखा साधा माणूस पाहिला नाही," अशी प्रतिक्रिया मानाचे वारकरी कोलते यांनी दिली.
 
ठाकरे कुटुंबीयांबरोबर झालेल्या भेटीबद्दल कोलते म्हणाले, "महापूजेनंतर त्यांनी आपलेपणाने माझी चौकशी केली. मुलगा आदित्यही अतिशय विनम्र आहे. त्यानेही मला मानसन्मान दिला. माझ्या पत्नीची रश्मीताईंनी अदबीने चौकशी केली."
 
खरोखरच आम्ही ठाकरे कुटूंबाच्या प्रेमाने भारावलो अशी भावना कोलते दांपत्याने व्यक्त केल्या.
 
19 जुलैला मानाच्या पालख्या दाखल
राज्यभरातून एसटी बसने निघालेल्या मानच्या पालख्या सोहळा 19 जुलै सायंकाळी वाखरी (पंढरपूर) पालखी तळावर दाखल झाल्या होत्या.
 
कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये यासाठी प्रशासनानं पंढरपूर व शहरालगत असलेल्या 10 गावांमध्ये 18 ते 24 जुलै या दरम्यान संचारबंदी लागू केली आहे.
 
शहरात 3000 हजार पोलीस कर्मचारी आणि अधिकाऱ्यांचा बंदोबस्त लावण्यात आला आहे. 18 ते 24 जुलै दरम्यान कोणालाही पंढरपूर शहरात प्रवेश दिला जाणार नाही, शहराची चोख नाकाबंदी करण्यात आली आहे.
 
नाकाबंदीमुळे नेहमी गजबजणारे चंद्रभागा वाळवंट, मंदिर परिसर आणि शहरातील प्रमुख रस्ते वारकऱ्यांविना ओस पडले आहेत. शहरात सर्वत्र शुकशुकाट दिसत होता.
 
वारी म्हटलं की 'बोला पुंडलिक वरदा हरी विठ्ठल' असा टिपेचा नामघोष आसमंतात घुमत असतो. तो यंदा कानी पडत नाही.
 
टाळ, मृदुंगाचा निनाद माऊली तुकोबाचा नामजप आकाशाकडे झेपावणाऱ्या भगव्या पताका, भाविकांच्या गर्दीने ओसंडून वाहणारे रस्ते कोरोनामुळे सामसूम पडले आहेत.
 
मानाच्या 10 पालख्या
आषाढी वारीसाठी 10 पालखी सोहळ्यांना परवानगी देण्यात आली आहे.
 
1. संत निवृत्ती महाराज (त्र्यंबकेश्वर)
 
2. संत ज्ञानेश्वर महाराज (आळंदी)
 
3. संत सोपान काका महाराज (सासवड)
 
4. संत मुक्ताबाई (मुक्ताईनगर)
 
5. संत तुकाराम महाराज (देहू)
 
6. संत नामदेव महाराज (पंढरपूर)
 
7. संत एकनाथ महाराज (पैठण)
 
8. रुक्मिणी माता (कौडानेपूर -अमरावती)
 
9. संत निळोबाराय (पिंपळनेर - पारनेर अहमदनगर)
 
10. संत चांगटेश्वर महाराज (सासवड
 
(सुनील उंबरे यांच्या इनपुटसह)