- समीरात्मज मिश्र
उत्तर प्रदेशमधील रामपूरमध्ये बलात्काराच्या आरोपीला गोळी झाडून पकडणाऱ्या पोलीस अधीक्षक अजयपाल शर्मा यांच्या कृतीची सोशल मीडियावर खूप चर्चा होत आहे.
काही जणांनी अजयपाल शर्मा यांच्या कृतीचं समर्थन केलं आहे तर काहींनी या कारवाईवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे. अजयपाल शर्मा यांच्या कृतीमुळं केवळ पोलिसांची कार्यपद्धतीच नाही तर राज्याची एकूणच कायदा आणि सुव्यवस्था संशयाच्या भोवऱ्यात सापडली आहे.
जवळपास दीड महिन्यांपूर्वी सहा वर्षांच्या एका मुलीची हत्या करून तिचा मृतदेह फेकून देण्यात आला होता. बलात्कार करून या चिमुकलीची हत्या करण्यात आली असावी असा संशय व्यक्त केला गेला.
याप्रकरणी नाजिल नावाची व्यक्ती ही मुख्य संशयित होती. दोन दिवसांपूर्वी पोलिसांसोबत नाजिलची चकमक झाली. या चकमकीदरम्यान अजयपाल शर्मांनी नाजिलच्या पायावर गोळी झाडली. त्यानंतर त्याला ताब्यात घेऊन उपचारांसाठी रूग्णालयात पाठविण्यात आलं.
स्वसंरक्षणासाठी कारवाई?
माध्यमांशी बोलताना पोलीस अधीक्षक अजयपाल शर्मांनी सांगितलं, की सिव्हिल लाइन्स पोलीस स्टेशनच्या अधिकाऱ्यांसोबत नाजिलची चकमक झाली, ज्यामध्ये त्याच्या पायावर गोळी झाडण्यात आली.
मात्र संबंधित आरोपीला शर्मा यांनीच गोळी झाडली, असा दावा सोशल मीडियावर अजयपाल शर्मांच्या फोटोसोबत व्हायल होत आहे.
गोळी अजयपाल शर्मांनी चालवली की अन्य कोणी हे जाणून घेण्यासाठी त्यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही.
पोलिसांनी पीडित मुलीच्या कुटुंबाला न्याय मिळवून दिला आहे, त्यांना किमान दिलासा मिळालाय, यामुळे गुन्हेगारांच्या मनात कायद्याचा धाक निर्माण होईल, गुन्ह्यांची संख्या कमी होईल, अशा प्रतिक्रिया सोशल मीडियावर उमटत आहेत. अजयपाल शर्मांना अनेकांनी सिंघमच बनवून टाकलंय.
अजयपाल शर्मा काही दिवसांपूर्वीच रामपूरला आले आहेत. यापूर्वी ते प्रयागराज इथल्या पोलीस मुख्यालयात कार्यरत होते.
मात्र या कारवाईवर प्रश्नचिन्ह उपस्थित करणाऱ्यांची संख्याही मोठी आहे. उत्तर प्रदेशचे माजी पोलीस महासंचालक ए. के. जैन म्हणतात, की जर आरोपीने गोळी चालवली आणि पोलिसांनी स्वसंरक्षणार्थ गोळीबार केला असेल तर त्यात काहीच गैर नाहीये. मात्र बलात्कार आणि हत्येचा आरोपी म्हणून त्याच्यावर गोळी चालवली असेल, तर ही चुकीची गोष्ट आहे.
बीबीसीशी बोलताना एके जैन यांनी म्हटलं की, "आरोपीला अटक करण्याच्या प्रयत्नात असताना पोलिसांनी गोळीबार केला असं मी बातम्यांमधून वाचलं आहे. जर पोलीस अधिकाऱ्यानं स्वतःच्या रक्षणासाठी गोळीबार केला असेल तर ते पूर्णपणे न्याय्य आहे. मात्र ज्या व्यक्तिचा गुन्हेगारी स्वरुपाचा कोणताही पूर्वेतिहास नाही त्याच्यावर केवळ बलात्काराचा आरोपी म्हणून गोळ्या झाडणं पूर्णपणे चुकीचं आहे.
"अगदी एखाद्यावर आरोप सिद्ध जरी झाले तरी पोलिसांना गोळ्या घालण्याचा कोणताही अधिकार नाही. कारण शिक्षा देणं हे न्यायालयाचं काम आहे, पोलिसांचं नाही," असं एके जैन म्हणतात.
'पब्लिसिटी स्टंट'
पोलीस दलातील एका अधिकाऱ्यानं नाव न छापण्याच्या अटीवर या संपूर्ण प्रकरणावर प्रतिक्रिया दिली. त्यांनी गोळी चालवण्याचा प्रकार म्हणजे पब्लिसिटी स्टंट असल्याचं म्हटलं.
त्यांच्या मते, "एखाद्या पोलीस स्टेशनमधील स्टाफ आरोपीला पकडण्यासाठी गेला आहे आणि पोलीस अधीक्षक दर्जाचा अधिकारी आरोपीवर गोळी चालवतो, ही गोष्टच पचनी पडणारी नाहीये. एखाद्या चकमकीचे नेतृत्व पोलीस अधीक्षकांनी करणं ही सामान्य बाब नाहीये. आणि हे प्रकरण खूप मोठं किंवा गुंतागुंतीचं नव्हतं, की त्यासाठी पोलीस अधीक्षकांनी स्वतः पुढाकार घ्यावा."
अर्थात, पोलीस अधिकाऱ्यांच्या या कारवाईची प्रशंसा केवळ सोशल मीडियावरच नाही होत नाहीये. अन्य क्षेत्रातील लोकही ही कारवाई योग्य असल्याचं सांगताहेत.
लखनऊमधील 'अमर उजाला'चे ज्येष्ठ पत्रकार आणि गेल्या दीड दशकापासून क्राइम रिपोर्टिंग करणारे पत्रकार विवेक त्रिपाठी सांगतात, की अजयपाल शर्मा यांनी काही गैर केलं नाहीये.
त्रिपाठी यांच्या मते अशा घृणास्पद कृत्यासाठी यापेक्षाही मोठी शिक्षा दिली गेली पाहिजे.
विवेक त्रिपाठी सांगतात, "गुन्हेगारांमध्ये पोलिसांचा एवढा वचक असणं गरजेचं आहे. नाहीतर गुन्हेगारी थांबविणं शक्य होणार नाही. क्राइम रिपोर्टिंग करताना गुन्हे आणि गुन्हेगारांची मानसिकताही आम्हाला कळायला लागली आहे. कायदा आणि पोलिसांचा धाक उरला नाही, तर गुन्हेगारांचं धाडस वाढतं."
उत्तर प्रदेशचे माजी पोलिस महासंचालक सुब्रत त्रिपाठी आरोपींना गोळी मारण्याच्या मताचे नाहीत. मात्र चकमकीत आरोपीला गोळी लागणं ही काही मोठी घटना नसल्याचं त्यांचं मत आहे.
दुसरीकडे ज्येष्ठ पत्रकार शरत प्रधान या घटनेकडे राज्यातील बिघडलेल्या कायदा आणि सुव्यवस्थेचं तसंच पोलिसांच्या बेलगामपणाचं लक्षण मानतात.
ते सांगतात, "पोलिसांनी आरोपींवर नेमक्या कोणत्या आधारे संशय घेतला हे अजूनही स्पष्ट नाहीये. त्याला पकडण्याऐवजी त्याच्यावर गोळी झाडून पोलीस आपलं अपयश लपवत आहेत. दीड महिन्यापासून बेपत्ता असलेल्या मुलीबद्दल पोलिसांना कोणतीही माहिती मिळवता आली नव्हती. ही एकमेव घटना नव्हती. राज्यात जवळपास दररोज अशा घटना घडत आहेत."
चकमकीच्या निमित्तानं उत्तर प्रदेश पोलिसांना यापूर्वीही प्रश्न विचारले गेलेत. मात्र जैन यांच्या मते पूर्वीच्या तुलनेत आता चकमकींच्या घटनांमध्ये घट झाली आहे.
ते सांगतात, "सत्तरच्या दशकात जेव्हा मी नोकरी सुरू केली, तेव्हा वर्षाला शेकडो चकमती व्हायच्या. त्यात किमान दोनशे-अडीचशे गुन्हेगार मारले जायचे. दरोडेखोरांचं उच्चाटन करताना अनेक कुख्यात दरोडेखोर मारले गेले. नव्वदच्या दशकानंतर चकमकीचं प्रमाण कमी झालं. मानवाधिकार आयोग, तपास यंत्रणा आणि सर्वोच्च न्यायालयाची कठोर भूमिका यांमुळेही अधिकाऱ्यांमध्ये चकमकीबद्दल भीती निर्माण झाली."
एके जैन यांच्या मते सामान्य नागरिकांकडे चकमकींवर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यासाठी आणि त्याविषयी तक्रार करण्यासाठी विविध व्यासपीठं उपलब्ध आहेत. यामुळे बनावट चकमकी कमी झाल्या आहेत. त्याचबरोबर आरोपींवर थेट गोळी झाडण्याऐवजी पायावर गोळी चालविण्याचे प्रकारही वाढले आहेत.
फोटो: फेसबुक