शनिवार, 9 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. बीबीसी मराठी बातम्या
Written By
Last Modified: रविवार, 30 मे 2021 (13:01 IST)

छत्रपती संभाजी महाराजांनी सोयराबाईंची हत्या केली, या कथनाला ऐतिहासिक पुरावे आहेत का?

प्राजक्ता धुळप
शिवाजी महाराजांच्या पत्नी सोयराबाई यांची हत्या शिवाजी महाराजांचे पुत्र संभाजी महाराज यांनीच केल्याचं कथन अलीकडेच प्रकाशित झालेल्या एका पुस्तकात करण्यात आलं. त्यामुळे राजकीय प्रतिक्रिया तर उमटल्याच, पण मराठा इतिहासाच्या काळजावरची ही जखम पुन्हा भळभळू लागली आहे.
 
'लोकसत्ता'चे संपादक आणि लेखक गिरीश कुबेर यांचं 'रेनेसाँ स्टेट: द अनरिटन स्टोरी ऑफ मेकिंग ऑफ महाराष्ट्र' हे इंग्रजी भाषेतील पुस्तक अलीकडेच प्रकाशित झालं. महाराष्ट्राची जडण-घडण उलगडून दाखवताना त्यांनी 'डेक्कन आफ्टर शिवाजी' या प्रकरणामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतर काय झालं, याची मांडणी केली आहे.
 
कुबेर लिहितात: 'अखेर वारशाचा वाद संपुष्टात आणण्यासाठी संभाजींनी सोयराबाई आणि त्यांच्याशी निष्ठा असणाऱ्यांना ठार केलं. त्यांपैकी काही जण शिवाजींच्या अष्टप्रधान मंडळातील होते. या रक्तपातामुळे शिवाजींनी तयार केलेल्या मौल्यवान अशा कतृत्ववान मंडळीच्या फळीचा अंत झाला. नंतर संभाजींना याची मोठी किंमत चुकवावी लागली.'
 
पुस्तकात छत्रपती संभाजी यांच्याविषयीचं लिखाण "खोडसाळपणाचं" असल्याचा आरोप करत भाजपने पुस्तकावर बंदीची मागणी केली आहे. राष्ट्रवादीच्या अमोल कोल्हेंनी पुस्तकातून हा भाग वगळण्याची मागणी केली आहे. तर गिरीश कुबेरींनी माफी मागावी, असं काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंनी म्हटलं आहे. संभाजी ब्रिगेड आणि इतर मराठा संघटनांनी आक्रमक भूमिका घेतल्या आहेत.
पण या गोंधळात मूळ मुद्द्यांबद्दल बोलणं आवश्यक आहे. संभाजी महाराज आणि सोयराबाईंचं नातं नेमकं कसं होतं? शिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतर रायगडावर काय नाट्य घडत होतं? सोयराबाईंनी संभाजी महाराजांविरोधात कट रचले होते का? सोयराबाईंचा मृत्यू नेमका कसा झाला? याबद्दल इतिहासात काय पुरावे आहेत? इतिहासकारांची काय मतं-मतांतरं आहेत? आणि त्याबद्दल कुबेरांचं काय म्हणणं आहे? या प्रश्नांची उत्तरं ऐतिहासिक पुराव्यांच्या आधारे शोधण्याचा प्रयत्न करत आहोत.
 
'पट्टराणी' सोयराबाई आणि 'युवराज' संभाजी
शिवाजी महाराजांची पट्टराणी म्हणून मान मिळालेल्या सोयराबाई या मोहिते घराण्यातल्या. धाराजी मोहिते आणि संभाजी मोहिते या मातब्बर लढवय्यांनी शहाजी राजेंच्या सैन्यात पराक्रम गाजवला. त्यातील संभाजी मोहिते यांची मुलगी सोयराबाई. शिवाजी महाराजांसोबत त्यांचा विवाह झाल्याची निश्चित तारीख सापडत नाही. त्यांना पुढे बाळीबाई उर्फ दीपाबाई आणि राजाराम ही दोन अपत्ये झाली.
6 जून 1674 या दिवशी रायगडावर झालेल्या शिवराज्याभिषेक सोहळ्यात सोयराबाईंना पट्टराणीचा मान मिळाला. त्यावेळी सोयराबाईंखेरीज महाराजांच्या इतर तीन पत्नी हयात होत्या.
 
संभाजी दोन वर्षांचे असताना त्यांच्या आई सईबाई यांचा बाळंतपणानंतरच्या आजारपणात मृत्यू झाला होता.
 
शिवराज्याभिषेक सोहळ्यात संभाजींना युवराजपदाचा मान देण्यात आला. शिवाजी महाराजांच्या पश्चात संभाजी हे वारसदार असतील हे गृहित धरून इंग्रजांनी संभाजींना नजराणा दिला. पण राजारामाला नजराणा दिल्याची नोंद इंग्रजांच्या कागदपत्रांमध्ये नाही, असं इतिहास संशोधक डॉ. कमल गोखलेंनी लिहिलं आहे.
 
सोयराबाईंविषयी महाराष्ट्रातल्या अनेक इतिहासकारांनी जे संशोधनपर लेखन केलं आहे, ते प्रामुख्याने त्यांचे सावत्र पुत्र संभाजी महाराज यांच्या चरित्राच्या निमित्ताने.
 
रायगडावरील गृहकलह
शिवराज्याभिषेक सोहळ्याच्या वेळी सोयराबाईंचा पुत्र राजाराम याचं वय अवघं 4 वर्षं होतं.
 
"संभाजीसारखा मानपान आपल्या मुलाला मिळाला नाही, याचा अर्थ याच्यापुढे चालून येणारा वारसा हक्कही राजारामला मिळणार नाही, असे मनात येऊन सोयराबाईंना दुःख झाले असेल तर ते सर्वसाधारपणे मनुष्यस्वभावाला धरून स्वाभाविकच वाटते," असं डॉ. कमल गोखले लिहितात.
शिवराज्याभिषेकानंतर रायगडावर भोसले घराण्यात अंतर्गत कलह सुरू झाले होते, याविषयीचे संदर्भ 'शिवदिग्विजय' बखरीत आहेत. शिवाजी महाराज, सोयराबाई आणि संभाजी यांच्यातल्या तथाकथित कलहाचं वर्णन त्यात दिसतं. राजारामाला गादी मिळावी असा हट्ट सोयराबाईंनी केल्याचं हे बखरकार सांगतात.
 
'शिवदिग्विजय' बखर इ.स. 1810 साली बडोदे येथे छापली गेल्याचं वि. का. राजवाडे यांच्या 'मराठ्यांच्या इतिहासाची साधने' या ग्रंथात म्हटलंय.
 
या बखरीत एक प्रसंग रेखाटला आहे. सोयराबाई शिवाजी महाराजांना भेटायला येतात, तेव्हा हा प्रसंग घडतो: 'त्यात महाराजांस एके दिवशी बाई विचारू लागली की. ज्येष्ठ पुत्र दौलतीचे अधिकारी आहेत. त्यांचे व पदरच्या मनुष्याचे बनत नाही. माझा मूल लहान आहे. याजवरि सरकारचा लोभ आहे. त्यास संस्थान, त्याजला अधिकार द्यावयाचा की वडिलाचा वडिलाकडे सोपवायचा, हे सांगावे.'
 
इथे सोयराबाई राजारामाला अधिकार देण्याविषयी शिवाजी महाराजांना सांगत आहे, असं बखरकार म्हणतो. पुढे जाऊन बखरकाराने असं लिहिलंय की शिवाजी महाराजांचा सोयरा बाईंवर पूर्ण भरवसा नव्हता: 'सोयराबाई स्वार्थासाठी कोणतेही कृत्य करावयास कमी करणार नाही. त्यामुळे सरकारी पत्रांची नीट खातरजमा करावी,' असा संदेश शिवाजी महाराजांनी बाळाजी आवजीकडून सर्व किल्ल्यांवर दिला, असं या बखरीत लिहिलं आहे.
 
मराठा इतिहासात बखरींना महत्त्व आहे कारण त्यांतून त्या काळातली बरीच माहिती मिळते. पण ती बऱ्याचदा अतिरंजित अथवा एका बाजूचं गुणगान करणारी असू शकते. त्यामुळे सर्व बखरींवर डोळे झाकून विश्वास ठेवता येत नाही.
 
"या काळात रायगडावर परिस्थिती तणावपूर्ण होती आणि त्याला कारणीभूत राणी सोयराबाई, त्यांचे पाठीराखे प्रधान मोरोपंत पेशवे, अण्णाजी दत्तो सचिव, राहुजी सोमनाथ इत्यादी होते," असं इतिहास संशोधक डॉ. जयसिंगराव पवार म्हणतात.
 
या काळात संभाजी महाराज रायगडापासून दूर पन्हाळगडावर होते. त्यामुळे सोयराबाईंचा राजधानीतला दबदबा वाढू लागला.
'छत्रपती संभाजी: एक चिकित्सा' या ग्रंथात डॉ. जयसिंगराव पवार लिहितात: 'शिवराज्याभिषेकानंतर रायगडावर संभाजी महाराजांचे वास्तव्य ऑक्टोबर 1676 पर्यंत म्हणजे सव्वा दोन वर्षं झाले. 1776 मध्ये शिवाजी महाराज कर्नाटक स्वारीवर बाहेर पडले, त्यांच्यासोबत संभाजीराजेही पडले. ते पुन्हा महाराजांच्या मृत्यूपर्यंत रायगडावर गेलेच नाहीत. रायगडावर महाराजांचे अधूनमधून वास्तव्य होत असले तरी संभाजीराजे तिकडे साडेतीन वर्षं फिरकलेले नाहीत. या प्रदीर्घ अनुपस्थितीच्या कालखंडात सोयराबाई आणि तिच्या बाजूच्या प्रधानांचा राजधानीतील राजकारणावर प्रभाव निर्माण झाला असला पाहिजे.'
 
'अनुपुराण' हा संभाजींच्या कारकिर्दीविषयीचा त्यांच्याच काळातला काव्यग्रंथ आहे. संभाजी महाराजांची बाजू मांडणारा हा ग्रंथ कवी परमानंद यांचे पुत्र देवदत्त यांनी रचल्याचं इतिहासकार सांगतात.
 
या 'अनुपुराणा'त नाट्यमय प्रसंगाचं वर्णन आहे. शिवाजी महाराज आणि संभाजींमधला संवाद स्वराज्याच्या विभाजनविषयीचा आहे:
 
'शिवाजी महाराज: उतारवयामुळे मला स्वराज्याचे रक्षण करणे जड जात आहे. तरी हे राज्य मी तुला देतो. राज्यातील कोणताही भाग तुझ्या सावत्र भावाला देणार नाही. त्याच्यासाठी मी नवीन राज्य जिंकेन. राजाराम लहान आहे तो स्वतः राज्य भोगावयास मागत नाही. तुझे गुण मोठे आहेत. पृथ्वी मी तुझ्या ताब्यात द्यायला तयार आहे. जशी शरीराची वाटणी होऊ शकत नाही तशी राज्याची वाटणी होऊ शकत नाही. हे राज्य कोणातरी एकालाच दिले पाहिजेय. मी दुसरे राज्य जिंकून येईपर्यंत तू रायगडाला सोयराबाईंच्या सहवासात न राहता शृंगारपूरला राहून प्रभावली सुभ्याचा कारभार पाहा.
 
संभाजी: 'आमचे दैव हे आमच्या सुखदुःखाचे कारण आहे. त्याला आईबाप कोणी जबाबदार नाहीत. तुम्ही नसलात तर स्वराज्यात माझे मन रमणार नाही. तुम्ही येथेच राहा. तुम्हा असलात म्हणजे बरे. वाटणीची कल्पना चूकच. व्यवहाराला धरून नाही. बापाजवळ राज्य मागणारा पुत्रच नव्हे.'
 
राज्यविभाजनाच्या प्रस्तावाची 1675-76 या काळात रायगडावर चर्चा झाली असावी असा तर्क इतिहासकार काढतात.
शिवाजी महाराजांच्या अष्टप्रधान मंडळातील काही अधिकाऱ्यांचा युवराज संभाजींना विरोध होता. तो कशामुळे होता, यावरून मात्र मतभेद आहे.
 
इतिहासकारांमध्ये छत्रपती संभाजी यांच्या व्यक्तिमत्त्वाविषयी दोन टोकाची मतं दिसतात. काही जाणकारांना संभाजी अतिशय विचारी, विद्वान ग्रंथलेखक, मुत्सद्दी आणि दूरदृष्टी असणारे दिसतात. तर काही ऐतिहासिक दस्तावेजात संभाजी हे अतिशय बेजबाबदार, बेभरवशाचे, व्यसनी आणि अविचारी होते, अशा आशयाची वर्णनं आढळतात. यांतल्या कोणत्या संभाजीवर आणि कोणत्या ऐतिहासिक कागदपत्रांवर विश्वास ठेवायचा, या प्रश्नाशी महाराष्ट्र गेली साडे तीनशे वर्षं झगडतो आहे.
डॉ. जयसिंगराव पवार म्हणतात, "रायगडावरील गृहकलहाची कारणे इतिहासकार समजतात त्याप्रमाणे संभाजीराजांच्या दुर्वर्तनात नव्हती, तर ती राणी सोयराबाई आणि प्रधान यांच्या महत्त्वाकांक्षेत होती.
 
"रायगडावर काही प्रमाणात संभाजींविरुद्ध वातावरण तयार झालं होतं हे उघड आहे. महत्त्वाकांक्षी राणी आणि कुटिल राजकारणी प्रधान यांनी डावपेच करायला सुरुवात केली. संभाजींचं चारित्र्यहनन हा त्याच डावपेचाचा भाग होता," असं पवार पुढे म्हणतात.
 
शिवाजी महाराजांचा वारसदार कोण?
याच काळात संभाजी राजे हे मोगलाईच्या दिलेरखानाच्या गोटात गेले. याचे कारण रायगडावरचा गृहकलह असू शकतो असं काही इतिहासकारांचं मत आहे. तर काहींच्या मते पुढे वाटाघाटी फिसकटल्याने ते पुन्हा स्वराज्यात परत आले.
 
'संभाजी राजे 1678 मध्ये मुघलांना जाऊन मिळाल्याने अष्टप्रधान मंडळात त्यांच्याविषयी अविश्वास आणि कटुता निर्माण होणे अगदी स्वाभाविक होते. अशा परिस्थितीत शिवाजी महाराजांना वारसा हक्काबद्दल निश्चित असा निर्णय करणे कठीण झाले असावे. त्यामुळेच त्यांनी हा प्रश्न अनिर्णितच ठेवला असावा,' असं डॉ. कमल गोखले लिहितात.
 
शिवाजी महाराजांनी मृत्यूपूर्वी एक अधिकृत आज्ञापत्र प्रधानांसाठी लिहिलं होतं, असा उल्लेख रायरीच्या बखरीत आहे. पण मूळ रायरीची बखर उपलब्ध नसून तिचं इंग्रजी भाषांतर उपलब्ध झाल्याने काही इतिहासकारांना तिच्यातील लेखनाबद्दल संशय वाटतो.
सभासदाच्या बखरीत शिवाजी महाराजांनी मृत्यूपूर्वी काय म्हटलं याविषयी लिहिलंय: 'मज माघारे हे राज्य संरक्षण करणारा ऐसा पुत्र दिसत नाही. कदाचित धाकटा कुंवार राजाराम वाचला तर तो हे राज्य वृद्धीने करेल. संभाजी राजे वडील पुत्र जाणता आहे, परंतु बुद्धी फटकळ आहे. अल्पबुद्धी आहे, यांस काय करावे. आपण तो प्रयाण करतो. तुम्ही कारकून व हुजरे मराठे कदीम या राज्यातील आहां. तुम्हास या गोष्टी कळल्या असाव्या.'
 
म्हणजे सभासदाच्या बखरीनुसार शिवाजी महाराजांनी वारसा हक्काचा प्रश्न अष्टप्रधान मंडळावर सोपवलेला होता, असे मानावे लागेल.
 
सभासदी बखर कृष्णाजी अनंत सभासद यांनी राजाराम महाराजांच्या आज्ञेवरून इ.स. 1697 साली लिहिली. या बखरीत संभाजी महाराजांविषयी कठोर शब्द वापरले आहेत आणि राजाराम महाराजांची स्तुती केली आहे.
 
राजारामाचा लग्नसोहळा आणि महाराजांचा मृत्यू
याच काळात 15 मार्च 1680 या दिवशी सोयराबाईंचे पुत्र राजाराम यांचा मौंजीबंधन आणि लग्नसोहळा पार पडला. तेव्हा राजाराम यांचं वय साधारण 10 वर्षं होतं.
 
शिवाजी महाराजांच्या मृत्यूच्या दोन आठवडे आधी हा विवाहसोहळा पार पडला. सावत्र भावाच्या लग्नात संभाजी हजर नव्हते. ते तेव्हा पन्हाळगडावर वस्तव्यास होते. मुघलांसोबत सुमारे वर्षभर जाऊन आल्यानंतर संभाजी महाराजांकडे अनेक जण संशयाने पाहत होते.
तत्कालीन कागदपत्रांच्या आधारे जवळपास 40 वर्षं संभाजींवर संशोधन करणारे वा.सी.बेंद्रे लिहितात: 'शिवाजी महाराजांच्या मृत्यूपूर्वी झालेल्या राजाराम महाराजांच्या मौजीबंधन आणि लग्न सोहळ्यात संभाजीराजांना मोगली स्वारीत अडकल्याने हजर राहता आले नाही.'
 
वा. सी. बेंद्रे काही काळ 'भारत इतिहास संशोधन केंद्रात' कार्यरत होते. त्यांनी लिहिलेला 'छत्रपती संभाजी महाराज' हा ग्रंथ 1958मध्ये लिहून पूर्ण झाला. लंडनमध्ये इंडिया हाऊस आणि ब्रिटीश लायब्ररीमधून मराठ्यांच्या इतिहासाची अनेक कागदपत्रं त्यांनी मिळवली.
 
पण वस्तुस्थिती वेगळी होती असं जयसिंगराव पवार यांचं म्हणणं आहे, "संभाजीराजांचा रायगडावरील सोयराबाई आणि प्रधान यांच्यावरील राग गेलेला नव्हता. पुढे राज्यावर आल्यानंतर दिलेल्या संस्कृत दानपत्रात ते सोयराबाईंचा उल्लेख 'सवतीचे पोर म्हणून आपणावर रागावलेली राणी' असाच करतात."
 
राजाराम महाराजांच्या लग्नानंतर शिवाजी महाराज आजारी पडले आणि त्यांचं 3 एप्रिल 1680 या दिवशी निधन झालं. शिवाजी महाराजांच्या मृत्यूविषयी काही तर्क-वितर्क इतिहासकारांनी मांडले आहेत. महाराजांवर विषप्रयोग झाला, अशी अफवाही पसरली होती.
 
बेंद्रे लिहितात: 'सोयराबाईने विष घालून शिवाजीस मारले अशी कंडी उठली होती हे डच बातमीवरूनही सिद्ध आहे. परंतु या कंडीत फारसे तथ्य असेल असे वाटत नाही.'
 
शिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतर...
शिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतर रायगडावरील घटनांना कमालीचा वेग आला. राजाराम यांना गादीवर बसवण्यासाठी प्रयत्न सुरू झाले.
 
शिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतर काही दिवसांनी राजाराम यांचं मंचकारोहण घाईघाईत करून घेतलं गेलं अशी नोंद जेधे शकावलीमध्ये आहे. मंचकारोहण म्हणजे सत्तेच्या गादीवर बसवण्याचा विधी.
राजाराम यांना सत्तेवर बसवत असताना संभाजी महाराजांना कैद करण्याचीही योजना आखली गेली, असं जेधे शकावलीत नोंदवलं आहे: 'महाराजांच्या मृत्यूच्या वेळी आण्णाजी दत्तो आणि मोरोपंत पेशवे हे मुख्य प्रधान रायगडावर नसले तरी ते लवकरच गडावर हजर झाले. आण्णाजी दत्तो प्रथम आला आणि त्याने पुढे होऊन राजाराम महाराजांचे मंचकारोहण घडवून आणले. एवढ्यात मोहिमेवर असलेला मोरोपंत पेशवेही आला. त्या दोघांनी सोयराबाईंशी मसलत करून संभाजीराजांना कैद करण्याची योजना आखली.'
 
यावर बेंद्रे लिहितात: 'या सर्व कारस्थानाच्या मुळाशी आण्णाजी दत्तोच मुख्य आहे. त्यानेच आपल्या कटात मोरोपंत आणि सोयराबाईंना ओढले. रायगडावर आण्णाजीचा पक्ष बळकट झाल्याने मोरोपंत दुर्बलावस्थेत सापडून त्यांची मती कुंठित झाली. तसेच सोयराबाईस तिच्यावर आलेल्या विषप्रयोगाच्या आळाची भीती दाखवून (व) आपल्या पुत्राच्या राजवैभवाचे आमिष दाखवून कटात गोवले गेले.'
 
सोयराबाईंना रायगडाच्या कटात गोवले गेले असं सांगताना बेंद्रे हंबीरराव मोहिते यांचा दाखला देतात. शिवाजी महाराजांच्या विश्वासातील रायगडावर असणारे हंबीरराव हे सोयराबाई यांचे भाऊ. त्यांनी अखेरपर्यंत म्हणजे 1687 पर्यंत संभाजी महाराजांशी निष्ठा ठेवली.
 
अशा या हंबीररावांचा सल्ला न घेता सोयराबाईंनी आपल्या मुलाचं मंचकारोहण करणे ही सोयराबाईंची अपरिपक्वता होती, असं जयसिंगराव पवार म्हणतात.
 
संभाजी रायगडावर दाखल झाले तेव्हा...
संभाजीराजांना कैद करून आणण्यासाठी रायगडाहून प्रधान पन्हाळगडाकडे निघाले. पण हंबीरराव मोहिते हे संभाजींच्या बाजूचे असल्याने त्यांनी उलट या प्रधानांनाच कैद केलं आणि त्यांना संभाजी महाराजांसमोर हजर केलं. त्या 'राजद्रोह्यांना' घेऊन ते राजधानी असलेल्या रायगडाकडे निघाले.
 
रायगडावर आल्या आल्या संभाजी महाराजांनी सोयराबाईंची हत्या केली असं बखरकार मल्हार रामराव यांनी चिटणीस बखरीत लिहून ठेवलं आहे.
बखरकार मल्हार रामराव चिटणीस यांनी या घटनेचं वर्णन करताना लिहिलंय: 'सोयराबाईसाहेब यांजपाशी जाऊन बाईसाहेब कोठे आहेत म्हणून बहुत क्रोधे करून विचारिले. ते समयी जवळील बायका सर्व भये करून निघाल्या. तुम्ही राज्यलोभास्तव महाराजांस विषप्रयोग करून मारिले, असा आरोप शब्द बोलून, कोनाडा भिंतीस करून त्यात सोयराबाईसाहेबांस चिणोन, दूध मात्र घालीत जावे (असे) सांगून आता पुत्रासी घेऊनी राज्य करावे असे बोल्लो. त्यानंतर तीन दिवस ती तशीच होती. तिसरे दिवशी प्राण गेला, हे कळल्यावर दहन केले.'
 
मल्हार रामराव चिटणीसांनी लिहिलेले शिवछत्रपतींचे चरित्र हे 'चिटणीस बखर' म्हणून प्रसिद्ध आहे. 1732 मध्ये ती लिहिली गेली. प्रसिद्ध इतिहास संशोधक वि. का. राजवाडे यांनी या चरित्राचा इतिहासकाराला खूप उपयोग होईल, निदान ह्या चरित्रापासून नाना प्रकारच्या शंका घेण्यास अवकाश होईल, असं लिहिलं आहे. पण या चिटणीस बखरीच्या ऐतिहासिक प्रामाण्याविषयी अनेक शंका आहेत.
 
ही बखर संभाजी महाराजांच्या कारकिर्दीनंतर सव्वाशे वर्षांनी लिहिलेली आहे. "मल्हारराव रामरावांचे लिखाण पूर्वग्रहदूषित दृष्टिकोनातून केले गेले आहे. कारण त्यांचे खापरपणजोबा बाळाजी आवजी चिटणीसांना कट केल्यावरून संभाजी महाराजांनी हत्तीच्या पायी देऊन ठार मारले. तो राग इतक्या पिढ्यांनंतरही गेला नाही आणि तो बखरीत उतरला," असं जयसिंगराव पवारांना वाटतं.
 
संभाजी महाराजांच्या बाजूने लिखाण केलेल्या अनुपुराणात वर्णन आहे की रायगडावर आल्यावर संभाजींनी सोयराबाई आणि आपल्या इतर सावत्र मातांचं सांत्वन केलं.
 
चिटणीसांची ही वर्णनं चुकीची असल्याचं वा. सी. बेंद्रे यांनी 'छत्रपती संभाजी महाराज' या पुस्तकात मांडलं आहे. शिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतर सोयराबाई पुढे दीड वर्षं जिवंत होत्या, असं ते लिहितात.
 
प्रसिद्ध इतिहासकार जदूनाथ सरकार यांनी 'Shivaji and His Time' या 1919 साली प्रकाशित झालेल्या पुस्तकात याच चिटणीस बखरीचा दाखला घेतला आहे.
 
याच चिटणीस आणि सभासद बखरींच्या आधारे संभाजींच्या चरित्रावर अनेक नाटकं मोठमोठ्या नाटककारांनी लिहिली आहेत आणि संभाजीची चुकीची प्रतिमा जनमानसात रुजवली गेली, असं इतिहास संशोधक इंद्रजित सांवत यांचं म्हणणं आहे.
 
संभाजी महाराजांविरोधात कट
शिवाजी महाराजांच्या मृत्यूच्या 9 महिन्यानंतर 16 जानेवारी 1681 या दिवशी संभाजी महाराजांनी आपला राज्याभिषेक करून घेतला.
 
"त्याआधी कैद केलेल्या प्रधान आणि अधिकाऱ्यांची सुटका केल्यानंतर त्यांना पदं बहाल करण्यात आली. पण कैदेत असताना मोरोपंत पेशवे यांचं निधन झालं होतं," असं डॉ. जयसिंगराव पवार सांगतात.
 
छत्रपती संभाजी गादीवर बसल्यानंतर रायगडावरची बंडाळी थांबेल, अशी शक्यता वाटत होती. पण संभाजी राजांविरुद्ध दोन कट रचले गेले. ते ही राज्याभिषेकानंतर अवघ्या सहा-सात महिन्यांमध्ये.
 
पहिला कट राजाला विष देऊन मारण्याचा तर दुसरा अकबराची मदत घेऊन सत्तेवरून पायउतार करण्याचा. दोन्ही घटना रायगडवर घडल्या.
 
मुंबईकर इंग्रजांनी या कटांविषयी लिहिलं आहे असं इतिहासकार सांगतात. 'छत्रपती संभाजी, एक चिकित्सा' या पुस्तकात डॉ. जयसिंगराव पवार लिहितात: '8 सप्टेंबर 1681मध्ये इंग्रजांनी लिहिलंय की संभाजीराजांविरुद्ध केलेल्या कटात अण्णाजी दत्तो पंत, सोयराबाई, हिरोजी फर्जंद होते. त्यात त्यांनी सुलतान अकबराला गोवण्याचा प्रयत्नही केला होता. पण तो त्याला बधला नाही. उलट त्याने गुप्त दूत पाठवून संभाजीराजाला ताबडतोब माहिती दिली.'
 
जेधे शकावलीतही या कटांविषयी लिहिलं गेलंय: 'या कटात राणी सोयराबाई, अण्णाजी दत्तो पंत, बाळाजी आवजी, हिरोजी फर्जंद अशी 25 हून अधिक माणसं गोवली गेली होती. त्यांना देहांताची शिक्षा दिली. सोयराबाईने आपली बेअदबी टाळण्यासाठी विष प्राशन करून आत्महत्या केली असावी.'
 
इतिहासकार गो. स. सरदेसाई यांची 'मराठेशाहीची रियासत' 1935 साली प्रकाशित झाली. त्यात ते लिहितात: 'व्यसनी व लहरी राजाचे हातून राष्ट्रसंरक्षण होणे शक्य नाही, अशी रायगडावरील पुष्कळ जाणत्या मंडळींची भावना झाली होती. हिरोजी परत रायगडावर गेल्यानंतर त्यांचा सोयराबाई, आण्णाजी पंत मंडळींशी विचारविनिमय झाला असला पाहिजे. पहिल्या एक-दोन महिन्यांत संभाजी आणि अकबर हे दोघेही आपापल्या कुचंबणेच्या स्थितीत असता रायगडावर एक गुप्त कट करण्यात आला. त्याचा उद्देश संभाजीस काढून राजारामास गादीवर बसवावे असा होता.'
 
सोयराबाईंचा मृत्यू नेमका कसा झाला?
रायगडावरील कटाच्या थरारनाट्यानंतर सोयराबाई यांचा मृत्यू 27 ऑक्टोबर 1681 या दिवशी झाला, अशी नोंद आहे. पण तो नेमका कसा झाला, याचे ठोस पुरावे उपलब्ध नाहीत.
 
अण्णाजी दत्तो, बाळाजी आवजी चिटणीस, येरुजी पंत यांना मृत्युदंड दिल्याचे उल्लेख आहेत. पण सोयराबाईंना मारलं याविषयी संदर्भ साधनांमध्ये पुरावा नाही, असंही कोल्हापूरमध्ये वास्तव्यास असलेले इतिहास संशोधक इंद्रजित सावंत सावंत सांगतात.
 
गिरीश कुबेरांच्या पुस्तकावर पहिल्यांदा आक्षेप सावंतांनीच नोंदवला होता: "इतिहासात शिवछत्रपतींच्या अष्टप्रधानमंडळीतील अण्णाजी दत्तो पंत, बखरकार चिटणीस, नाटककार राम गणेश गडकरी, रियासतकार गो.स. सरदेसाई यांच्यापासून संभाजी महाराजांची बदनामी करण्याचं काम होत होतं. त्यांचीच री ओढण्याचं काम गिरीश कुबेर यांनी केलंय. छत्रपती संभाजी महाराजांचं असं खोट्या प्रतिमेसह चरित्र समोर आणणं म्हणजे संभाजी उर्फ शंभूराजांच्या बदनामीचे षडयंत्र आहे."
 
पुस्तकावरून झालेल्या वादावर बीबीसी न्यूज मराठीने लेखक गिरीश कुबेर यांची बाजू जाणून घेण्याचा प्रयत्न केला. गिरीश कुबेर यांना पाठवलेल्या प्रश्नांवर त्यांनी हे लेखी उत्तर दिलं: "रेनेसाँ स्टेट ही सातवाहनापासून आधुनिक काळापर्यंतच्या महाराष्ट्राची 'कहाणी' आहे. असं पुस्तक छत्रपती शिवाजी आणि त्यांचे वारसदार यांच्यावरील प्रकरणाशिवाय पूर्ण झालं नसतं. मी जे काही लिहिलंय त्यासाठी जदुनाथ सरकार आणि जसवंत लाल मेहता यांच्यासारख्या अनेक मान्यवर इतिहासकारांनी लिहिलेल्या विद्वत्तापूर्ण कामांचे संदर्भ घेतले आहेत. संदर्भासाठी घेतलेल्या स्रोतांची यादी पुस्तकाच्या अखेरीस समाविष्ट करण्यात आली आहे."
 
अनेक दस्तावेज वाचल्यानंतर आणि अनेक इतिहासकारांशी बोलल्यानंतर हे लक्षात येतं की सोयराबाई आणि संभाजी महाराज या दोघांमध्ये वितुष्ट होतं, सत्तेसाठी चढाओढ होती. त्या दोघांनी एकमेकांविरोधात संघर्ष केल्याचे ऐतिहासिक उल्लेख आढळतात.
 
पण तथ्यांवर आधारित लिखाणाच्या अभावामुळे मराठा इतिहासातल्या काही गोष्टी छातीठोकपणे सांगणं अवघड होऊन बसतं. सोयराबाईंचा मृत्यू हा तसाच एक मुद्दा आहे.
 
त्यात आताची मराठा समाजाची अस्मिता आणि एकंदर महाराष्ट्राचं राजकारण या एका भोसले घराण्याभोवती फिरतंय. त्यामुळे इतिहासाची चिकित्सा करू पाहणाऱ्यांची परिस्थिती आणखीनच कठीण होऊन बसली आहे.