रविवार, 26 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. बीबीसी मराठी बातम्या
Written By
Last Modified: रविवार, 30 मे 2021 (12:59 IST)

निकीता कौल: पुलवामा हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या मेजरच्या पत्नी बनली लष्करात लेफ्टनंट

पुलवामा हल्ल्यात मृत्यूमुखी पडलेले मेजर विभुती शंकर धौंडीयाल यांच्या पत्नी निकीता कौल यांनी भारतीय सैन्यदलात प्रवेश मिळवला आहे.
 
बहुराष्ट्रीय कंपनीतील नोकरी सोडून त्यांनी लष्करी सेवेत दाखल होण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर अवघड मानली जाणारी परीक्षा पास झाल्यानंतर एका वर्षाचं करून कठोर प्रशिक्षण पूर्ण करून निकीता यांनी हे यश मिळवलं आहे.
 
वूमन स्कीमच्या माध्यमातून घेण्यात येणाऱ्या परीक्षेतून त्या भारतीय लष्करात दाखल झाल्या आहेत. भारतीय लष्करात निकीता कौल यांची लेफ्टनंट पदावर नेमणूक करण्यात आली आहे.
शनिवारी (29 मे) आयोजित भारतीय लष्कराच्या दीक्षांत सोहळ्यामध्ये निकीता यांनी पहिल्यांदाच लष्करी गणवेश आपल्या अंगावर चढवला. लष्कराच्या नॉर्दर्न कमांडचे प्रमुख लेफ्टनंट जनरल वाय. के. जोशी यांनी निकीता कौल यांच्या खांद्यावर लष्कराचे स्टार लावून त्यांना लष्करी सेवेत दाखल करून घेतलं.
14 फेब्रुवारी 2019 रोजी जम्मू-काश्मीरमधील पुलवामा परिसरात वाहनातून जाणाऱ्या लष्करी जवानांवर कट्टरवाद्यांनी हल्ला केला होता. यामध्ये तब्बल 40 जवान मृत्यूमुखी पडले होते.
 
या हल्ल्याच्या चार दिवसांनी पुलवामा परिसरातच एक चकमक झाली. या चकमकीत पुलवामा हल्ल्याचा सूत्रधार कामरान याला कंठस्नान घालण्यात लष्कराला यश आलं होतं. मात्र यादरम्यान झालेल्या गोळीबारात मेजर विभुती शंकर धौंडीयाल चार जवान मृत्यूमुखी पडले होते.
 
या घटनेनंतर विभुती यांची पत्नी निकीता यांची मुलाखत ANI वृत्तसंस्थेने घेतली होती.
 
"मला सहानुभूती नको. आपण एकजूट आणि कणखर राहूयात," अशी प्रतिक्रिया निकीता यांनी त्यावेळी दिली होती.
 
तेव्हाच त्यांनी आपल्या पतीपासून प्रेरणा घेत भारतीय लष्करात दाखल होण्याचा निर्धार मनाशी पक्का केला. त्यानंतर निकीता यांनी दिल्लीतील एका बहुराष्ट्रीय कंपनीतील नोकरीचा राजीनामा देऊन लष्करी सेवेत दाखल होण्यासाठी परीक्षेचा अभ्यास सुरू केला.
 
सहा महिन्यांनी त्यांनी लष्कराच्या शॉर्ट सर्व्हीस कमिशन (SSC) परीक्षेत यश मिळवलं. पुढे सर्व्हीस सिलेक्शन बोर्डाच्या (SSB) मुलाखतीतही त्या पास झाल्या. त्यानंतर गेल्या एका वर्षापासून निकीता यांचं प्रशिक्षण चेन्नईच्या ऑफिसर्स ट्रेनिंग अॅकॅडमीत (OTA) सुरू होतं.
प्रशिक्षण यशस्वीरीत्या पूर्ण केल्यानंतर निकीता यांची नियुक्ती भारतीय लष्करात लेफ्टनंट पदावर करण्यात आली आहे.
 
सोशल मीडियावर कौतुक
निकीता यांनी भारतीय लष्करात प्रवेश करताच त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होण्यास सुरुवात झाली आहे. सोशल मीडियावर सध्या निकीता कौल यांचीच चर्चा आहे.
 
निकीता यांना लष्कराचे स्टार लावत असतानाचे फोटो आणि व्हीडिओ सर्वत्र व्हायरल होऊ लागले आहेत.
अनेक मान्यवर आणि सेलिब्रिटी निकीता यांच्या यशाबद्दल त्यांचं अभिनंदन करत आहेत. सोशल मीडियावर विविध पोस्ट लिहून लोक त्यांचा गौरव करताना दिसत आहेत.
 
माजी क्रिकेटपटू आणि खासदार गौतम गंभीर यांनी निकीता यांचा व्हीडिओ शेअर करत एक ट्विट केलं.
 
"कुणी अभिनेता किंवा क्रिकेटर नव्हे तर ही महिला खरी हिरो आहे. म्हणूनच भारताला आपण पितृभूमी न म्हणता मातृभूमी असं संबोधतो," जय हिंद. असं गौतम गंभीर म्हणाले.