- रेहान फजल
समोरासमोर लढाई झाली तर कुकरी हे सगळ्या प्रभावी हत्यार ठरतं असं गोरखा रेजिमेंटच्या ट्रेनिंगमध्ये शिकवलं जातं. या कुकरीने माणसाचा गळा कसा कापायचा याचं प्रशिक्षणही त्यांना देण्यात येतं. 1997 साली 1/11 गोरखा रायफलमध्ये सामील झालेल्या लेफ्टनंट मनोज कुमार पांडे यांना त्यांचं शौर्य सिद्ध करायचं होतं. दसऱ्याच्या पूजेदरम्यान त्यांना बकऱ्याचा बळी द्यायचा होता.
परमवीर चक्र विजेत्यांवर 'द ब्रेव्ह'हे पुस्तक लिहिणाऱ्या रचना बिश्त रावत सांगतात, "क्षणभरासाठी मनोज काहीसे विचलित झाले, पण नंतर त्यांनी सपकन वार करत बकऱ्याचं शीर उडवलं. बकऱ्याच्या रक्ताचे थेंब त्यांच्या चेहऱ्यावर उडाले. नंतर खोलीत जाऊन त्यांनी किमान डझनभरवेळा आपला चेहरा धुतला. पहिल्यांदाच जाणूनबुजून केलेल्या हत्येच्या अपराधीपणाचं ओझं दूर करण्याचा प्रयत्न ते कदाचित करत होते. मनोज कुमार पांडे आयुष्यभर शाकाहारी राहिले. त्यांनी कधी दारुलाही स्पर्श केला नव्हता."
पुढच्या दीड वर्षामध्ये मनोज कुमार यांच्या मनातली दुसऱ्याचा जीव घेण्याविषयची कुतरओढ काहीशी कमी झाली. हल्ल्याची आखणी करणं, प्रत्यक्ष हल्ला आणि अचानक छापा टाकत शत्रूला टिपण्यात ते आता निष्णात झाले होते. हाडं गोठवणाऱ्या थंडीमध्ये साडे चार किलोंची बॅकपॅक घेऊन बर्फाच्छादित डोंगरांवर चढाई करण्याचं कौशल्यंही त्यांनी मिळवलं. त्या बॅकपॅकमध्ये त्यांची स्लीपिंग बॅग, लोकरी सॉक्सचा जास्तीचा जोड, दाढीचं सामान असणारा किट आणि घरून आलेली पत्रं असतं. भूक लागली की ते कडक झालेल्या शिळ्या पुऱ्यांवर ताव मारत आणि थंडीपासून बचाव करण्यासाठी गरम मोज्यांचा वापर हँडग्लोव्हजसारखा करत.
सियाचिनहून परतताना आलं कारगिलचं बोलावणं
11 गोरखा रायफल्सच्या पहिल्या बटालियननं सियाचिनमधला तीन महिन्यांचा कार्यकाळ पूर्ण केला. त्यानंतर सगळे ऑफिसर्स आणि सैनिक पुण्यातल्या 'पीस पोस्टिंग' (शांततामय परिसरातलं पोस्टिंग)ची वाट पाहत होते. बटालियनची एक 'अॅडव्हान्स पार्टी' पुण्यात दाखलही झाली होती. सगळ्या सैनिकांनी आपले थंडीसाठीचे कपडे आणि हत्यारं परत केली होती. बहुतेक सैनिकांना सुटीही मिळाली होती. जगातली सर्वात जास्त उंचीवरील युद्धभूमी असणाऱ्या सिचाचिनमध्ये राहून येण्याचे परिणामही सैनिकांवर होतात.
समोरच्या शत्रूपेक्षा इथलं हवामान हे सर्वांत जास्त धोकादायक असतं. सगळेच सैनिक अतिशय थकलेले होते. जवळपास प्रत्येकाचं वजन 5 किलोंनी कमी झालं होतं. तेव्हाच अचानक बटालियनला आदेश मिळाला. बटालियनच्या उरलेल्या सैनिकांना पुण्याला न जाता कारगिलमधील बटालिककडे जाण्यास सांगण्यात आलं. पाकिस्तानने त्या भागामध्ये मोठी घुसखोरी केल्याच्या बातम्या येत होत्या. मनोज यांनी नेहमीच पुढे राहून आपल्या सैनिकांचं नेतृत्व केलं आणि दोन महिने सुरू राहिलेल्या या ऑपरेशनदरम्यान कुकरथाँग, झुबरटॉपसारख्या शिखरांवर पुन्हा ताबा मिळवला. त्यांच्यावर पुढची कामगिरी सोपविण्यात आली होती खालोबार शिखर ताब्यात घेण्याची. कर्नल ललित राय या संपूर्ण मोहिमेची जबाबदारी सांभाळत होते.
सर्वांत अवघड खालोबार
त्या मिशनबद्दल कर्नल ललित राय सांगतात, "त्यावेळी आम्हाला चहूबाजूंनी घेरण्यात आलं होतं. पाकिस्तानी आमच्यावर लक्ष ठेवून होते. ते उंचावर आणि आम्ही खाली होतो. त्यांना याचा फायदा मिळत होता. म्हणूनच आम्हाला एका विजयाची गरज होती. त्यामुळे सैनिकांचं मनोधैर्य वाढलं असतं.
"लढाईच्या दृष्टीने खालोबार टॉप महत्त्वाचा भाग होता. आमच्या शत्रूंसाठी ते एकप्रकारचं 'कम्युनिकेशन हब' होतं. त्यावर ताबा मिळाला तर पाकिस्तानला इतर ठिकाणी रसद पोहोचवता येणार नाही आणि तिथल्या चौक्याही अडचणीत येतील असं आम्हाला वाटलं. त्यांच्या परत पळून जाण्याच्या मार्गातही यामुळे अडथळा येणार होता. थोडक्यात सांगायचं तर खालोबार टॉपमुळे या संपूर्ण युद्धाचं चित्रच पालटलं असतं."
वेगाने येणाऱ्या मशीन गनच्या गोळ्या
हा हल्ला करण्यासाठी गोरखा रायफल्सच्या दोन कंपन्यांची निवड केली गेली. कर्नल ललित रायदेखील त्या लोकांसोबतच चालत होते. ते काहीशा अंतरावर असतानाच पाकिस्तानने त्यांच्यावर जोरदार गोळीबार करायला सुरुवात केली आणि सगळे सैनिक विखुरले. कर्नल राय सांगतात, "वरून जवळपास 60-70 मशीन गन्स आमच्यावर गोळ्यांचा वर्षाव करत होत्या. वरून तोफांचे गोळेही डागण्यात येत होते. रॉकेट लाँचरपासून ग्रेनेड्सपर्यंत सगळ्याचा वापर ते लोक करत होते." "मशीन गनच्या गोळ्यांचा वेग प्रति सेकंद 2900 फूट असतो. गोळी तुमच्या बाजूने गेली तरी कोणीतरी जोरात धक्का दिल्यासारखं वाटतं. कारण त्याच्यासोबत एक 'एअर पॉकेट'ही येतं."
"आम्ही खालोबार टॉपच्या सुमारे 600 गज खाली असतानाच आमच्यावर दोन भागांमधून तीव्र फायरिंग होऊ लागलं. कमांडिंग ऑफिसर म्हणून मी विचारात पडलो. पुढे सरकलो असतो तर सगळेच मारले जाण्याची शक्यता होती. कमांडिग ऑफिसरमुळेच सगळे मेले, अशी नोंद इतिहासात झाली असती. पुढे चढाई केली नसती यांनी आपलं लक्ष्य साध्य करण्याचा प्रयत्नही केला नाही, अशी टीका झाली असती." "सकाळ होण्याआधी वर पोचतील अशी दोन पथकं बनवण्याचा मी विचार केला. कारण दिवसा उजेडी आम्ही सगळे वाचणं कठीण झालं असतं. या परिस्थितीमध्ये माझ्या सगळ्यात जवळ असणारा ऑफिसर होता कॅप्टन मनोज पांडे."
"मनोजला मी सांगितलं, की तुझी पलटण घेऊन वर जा. मला वर चार बंकर दिसत आहेत. त्यांच्यावर हल्ला करून ते नष्ट कर." कर्नल राय सांगतात, "सेंकदभराचाही वेळ न दवडता हा तरूण ऑफिसर रात्रीच्या अंधारात, कडाक्याच्या थंडीत आणि बॉम्बचा मारा सुरू असताना वर चढून गेला."
शेवटचा घोट राखून ठेवला
रचना बिश्त रावत सांगतात, "रायफलचं 'ब्रीचब्लॉक' कडाक्याच्या थंडीमुळे गार होऊन जाम झालं असतं. ते गरम राहण्यासाठी मनोजनं ते आपल्या गरम मोज्यांनी झाकून ठेवलं. त्यावेळी तापमान शून्याच्याही खाली होतं. पण तरीही खड्या चढाईमुळे भारतीय सैनिकांचे कपडे घामाने भिजले होते.
"प्रत्येक सैनिकाकडे पाण्याची 1 लीटरची बाटली होती. पण अर्धा रस्ता पार होईपर्यंत त्यांचं सगळं पाणी संपून गेलं. खरं तर चारही बाजूंना बर्फ होता पण हल्ल्यांमधल्या स्फोटकांच्या दारूने तो इतका प्रदूषित झाला होता की तो खाणं शक्यच नव्हतं." "कोरड्या पडलेल्या ओठांवर मनोज सारखी जीभ फिरवत होते. पण त्यांनी पाण्याच्या बाटलीला हात लावला नाही. त्यात फक्त एक घोट पाणी उरलं होतं. पाण्याचा तो घोट त्यांना मिशनच्या शेवटापर्यंत राखून ठेवायचा होता."
एकट्याने उद्ध्वस्त केले तीन बंकर्स
कर्नल राय पुढे सांगतात, "तिथे चार बंकर्स आहेत असं आम्हाला वाटलं होतं. पण मनोजने वर जाऊन सांगितलं, की इथे तर सहा बंकर्स आहेत. प्रत्येक बंकरमधून दोन मशीन गन्स आमच्यावर आग ओतत होत्या. थोड्या अंतरावर असणाऱ्या दोन बंकर्सना उद्ध्वस्त करण्यासाठी मनोजने हवालदार दिवाण यांना पाठवलं. दिवाण यांनीही फ्रंटल चार्ज करत ते बंकर्स उद्ध्वस्त केले. पण त्यांना गोळी लागली आणि ते शहीद झाले."
"इतर बंकर्स उडवण्यासाठी मनोज आणि त्यांचे साथीदार जमीनवर सरपटत अगदी जवळ गेले. बंकर उडण्याची एकच पद्धत असते. बंकरमध्ये ग्रेनेड टाकून आतमध्ये बसलेल्यांना संपवणं. मनोजने एका मागोमाग एक तीन बंकर्स उद्ध्वस्त केले. पण चौथ्या बंकरमध्ये ग्रेनेड फेकण्याचा प्रयत्न करत असतानाच त्यांच्या शरीरात उजव्या बाजूला गोळ्या घुसल्या आणि ते रक्तबंबाळ झाले."
हेल्मेट भेदून डोक्यातून आरपार गेल्या 4 गोळ्या
"सैनिकांनी त्यांना सांगितलं की सर, आता फक्त एकच बंकर उरलाय. तुम्ही इथे बसून पहा. आम्ही तो उडवून येतो. पण या शूर आणि कर्तव्यनिष्ठ सैनिकानं हे ऐकलं नाही. " "त्यांनी सांगितलं, की कमांडिंग ऑफिसरनी हे काम माझ्याकडे सोपवलंय. म्हणून हल्ल्याचं नेतृत्व करणं आणि कमांडिंग ऑफिसरला आपली 'व्हिक्टरी साईन' दाखवणं ही माझी जबाबदारी आहे."
"सरपटत सरपटत ते चौथ्या बंकरच्या अगदी जवळ गेले. तोपर्यंत त्यांना खूप रक्तस्त्राव झाला होता. त्यांनी उभं राहून ग्रेनेड फेकण्याचा प्रयत्न केला. तितक्यात पाकिस्तानी सैनिकांनी त्यांना पाहिलं आणि मशीन गन वळवत त्यांच्यावर चार गोळ्या झाडल्या." "त्या गोळ्या त्यांचं हेल्मेट भेदत डोक्यातून आरपार गेल्या. पाकिस्तानी सैनिक एडी 14.7 एमएमची मशीन गन वापरत होते. त्यांनी मनोज यांच्या डोक्याची चाळण केली आणि ते जमिनीवर कोसळले." "पण मरता मरताही ते म्हणाले, 'ना छोडनूँ..' म्हणजे त्यांना सोडू नका. त्यावेळी त्यांचं वय होतं 24 वर्षं 7 दिवस." "त्यांनी भिरकावलेल्या ग्रेनेडचा पाकिस्तानी बंकरमध्ये स्फोट झाला. काही लोक मारले गेले, काहींनी पळून जायचा प्रयत्न केला. आपल्या जवानांनी स्वतःकडची कुकरी काढली आणि त्यांचा काटा काढत चारही बंकर्स शांत केले."
फक्त 8 भारतीय जवान बचावले
या अतुलनीय शौर्यासाठी कॅप्टन मनोज कुमार पांडे यांना भारतातला सर्वोच्च शौर्य पुरस्कार - परमवीर चक्र (मरणोत्तर) देण्यात आला. या मोहिमेदरम्यान कर्नल ललित राय यांच्या पायावर गोळी लागली. त्यांनाही वीर चक्र देण्यात आलं. पण या विजयाची मोठी किंमत भारतीय सैन्याला चुकवावी लागली. राय सांगतात, की ते दोन कंपन्या सोबत घेऊन वर गेले होते. त्यांनी खालोबारवर भारतीय झेंडा फडकवला तेव्हा त्यांच्यासोबत फक्त 8 जवान उरले होते. इतर सगळे मारले गेले होते किंवा जखमी झाले होते.
त्या शिखरावर या सैनिकांना अन्न-पाण्याशिवाय तीन दिवस काढावे लागल्याचं राय सांगतात. जेव्हा हे लोक त्याच रस्त्याने खाली उतरले तेव्हा चहूबाजूंना सैनिकांचे मृतदेह पडले होते. बहुतेक मृतदेह बर्फात गोठले होते. भारतीय सैनिकांनीच ते मोठ्या दगडांच्या आड लपवले होते. त्यांच्या रायफली पाकिस्तानी बंकर्सच्या दिशेने रोखलेल्या होत्या आणि बोटं ट्रिगरवर रुतलेली होती. मॅगझीन तपासून पाहिलं तर त्यांच्या रायफलमध्ये एकही गोळी शिल्लक नव्हती. तिथे गोठून ते एकप्रकारे 'आईस ब्लॉक' झाले होते. सांगायची गोष्ट म्हणजे आपले जवान शेवटच्या श्वासापर्यंत आणि शेवटच्या गोळीपर्यंत झुंजत राहिले.
कर्नल राय सांगतात, "तसं पहायला गेलं तर कॅप्टन मनोज कुमार पांडेंची उंची होती फक्त 5 फूट 6 इंच. ते हसरे होते. नेहमी उत्साहात असायचा हा तरूण ऑफिसर. मी त्यांना कोणतंही काम दिल्यावर ते पूर्ण करण्यासाठी जीवाची बाजी लावायचे. त्यांची उंची लहान असली तर शौर्य, झुंजारपणा, इमानदारी आणि कर्तव्यनिष्ठेबाबत बोलायचं झालं तर कदाचित ते आपल्या फौजेतले सर्वात महान व्यक्ती होते. या बहादुर माणसाला मी मनापासून सॅल्यूट करतो."
बासरी वाजवण्याचा प्रयत्न
कॅप्टन मनोज कुमार पांडेंना लहानपणापासून सैन्यात जाण्याची हौस होती. लखनऊच्या सैनिक शाळेतून शिक्षण घेतल्यानंतर ते एनडीएची परीक्षा उत्तीर्ण झाले. आईवर त्यांचा खूप जीव होता. ते खूप लहान असताना त्यांची आई त्यांना एकदा जत्रेला घेऊन गेली.
रचना बिश्त रावत सांगतात, "त्या जत्रेतमध्ये अनेक गोष्टी विकायला होत्या. पण लहानग्या मनोजला आकर्षित केलं एका लाकडी बासरीने. ती विकत घेण्याचा हट्ट त्यांनी आईकडे केला. त्याने दुसरं एखादं खेळणं घ्यावं म्हणून आईने समजावण्याचा प्रयत्न केला. काही दिवसांनंतर हा मुलगा बासरी फेकून देईल, असं आईला वाटलं होतं. पण त्याने अजिबात न ऐकल्याने शेवटी त्यांनी 2 रुपयांची ती बासरी विकत घेतली.
"पुढची 22 वर्षं ती बासरी मनोज कुमार पांडेंजवळ होती. ते रोज ती काढून थोडावेळ वाजवत आणि मग पुन्हा आपल्या कपड्यांमध्ये ठेवून देत. ते सैनिकी शाळेत गेल्यावर आणि त्यानंतर खडकवासला, डेहराडूनला गेल्यावरही ही बासरी त्यांच्यासोबत होती. मनोज यांची आई सांगते, की कारगिलला जाण्याआधी ते होळीच्या सुटीसाठी घरी आले होते तेव्हा ही बासरी आपल्या आईजवळ ठेवून गेले होते."
शिष्यवृत्तीच्या पैशांनी वडिलांसाठी घेतली सायकल
अगदी शेवटपर्यंत मनोज कुमार पांडे सरळसाधं आयुष्य जगले. परिस्थिती फारशी चांगली नसल्याने त्यांना शाळेला चालत जावं लागे. त्यांची आई एक आठवण सांगते. अखिल भारतीय स्कॉलरशिप टेस्ट पास करत मनोज सैनिकी शाळेसाठी पात्र ठरले. त्यानंतर त्यांना हॉस्टेलला रहावं लागे. एकदा त्यांना पैशांची गरज होती तेव्हा आईने स्कॉलरशिपचे मिळणारे पैसे वापरायला सांगितले. मनोजचं उत्तर होतं, की मला या पैशांनी बाबांसाठी नवीन सायकल घ्यायची आहे. कारण त्यांची सायकल आता जुनी झालीये. एक दिवस खरंच या शिष्यवृत्तीच्या पैशांनी मनोजने आपल्या बाबांसाठी नवी सायकल घेतली.
एनडीएची मुलाखत
मनोज पांडे यांना उत्तर प्रदेशातील 'सर्वोत्कृष्ट कॅडेट' जाहीर करण्यात आलं होतं. एनडीएसाठीच्या मुलाखतीत त्यांना विचारण्यात आलं, "तुम्हाला सैन्यात का भरती व्हायचंय ?" मनोज यांचं उत्तर होतं, "परमवीर चक्र जिंकण्यासाठी." इंटरव्ह्यू घेणारे अधिकारी एकमेकांकडे पाहून हसले. कधी कधी अशाप्रकारे बोलून गेलेल्या गोष्टी खऱ्या होतात. मनोज कुमार पांडे यांची एनडीएमध्ये निवड तर झालीच आणि त्यांनी देशातला सर्वोच्च शौर्य पुरस्कार - परमवीर चक्रही मिळवलं. पण हे पदक घेण्यासाठी ते स्वतः उपस्थित नव्हते. 26 जानेवारी 2000 रोजी तत्कालिन राष्ट्रपती के. नारायणन यांच्या हस्ते मनोज यांचे वडील गोपीचंद पांडे यांनी हजारो लोकांसमोर हे पदक स्वीकारलं.