संबंधित माहिती
- महाराष्ट्र-कर्नाटक सीमावादाच्या मुद्द्यावरून अजित पवार एकनाथ शिंदे आमनेसामने
- मराठी खासदाराला बेळगावमध्ये प्रवेश नाकारला, कर्नाटक सरकारनं पत्रात म्हटलं
- लिओ वराडकर : मूळ कोकणचे असलेले आयर्लंडचे पंतप्रधान जेव्हा त्यांच्या गावी आले होते
- मविआचा महामोर्चा आणि भाजपाचं माफी मागो आंदोलन, महाराष्ट्राच्या राजकारणाला आक्रमक वळण का लागलंय?
- क्रोएशियाला तिसरं स्थान; मोरोक्कोवर केली मात
'कसाबच्या चेहऱ्यावर जराही पश्चाताप नव्हता, उलट विजयी भाव होते, ते आजही क्लेश देतात'
Anjali Kulthe
अंजली कुलथे यांनी गुरुवारी व्हीडिओ लिंकच्या माध्यमातून संयुक्त राष्ट्र संघटनेला संबोधित केलं. संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेत जागतिक दहशतवादविरोधी दृष्टिकोण: आव्हानं आणि पुढचा मार्ग या विषयावर उहापोह झाला.
कुलथे यांनी संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेत 26/11 हल्ल्यादरम्यानचे अनुभव सांगितले. मुंबईवर हल्ला झाला तेव्हा अंजली कुलथे कामा अँड एल्बलेस हॉस्पिटल फॉर वूमन अँड चिल्ड्रन मध्ये नर्स म्हणून कार्यरत होत्या.
'मला एका गोष्टीचं समाधान आहे की त्या रात्री मी 20 गरोदर महिला आणि त्यांच्या पोटात असलेल्या बाळांचा मी जीव वाचवू शकले. पण त्या रात्री मृत्यूचं तांडव आणि भीती आजही मनातून गेलेली नाही. त्या रात्री मी आणि माझ्या अनेक सहकाऱ्यांनी मिळून जीवाची बाजी लावून अनेक गरोदर बायकांचा जीव वाचवला हेच त्यातलं त्यात समाधान'
'हल्ल्याच्या महिनाभरानंतर एकमेव जिवंत दहशतवादी अजमल कसाबची ओळख पटवण्यासाठी मला बोलावलं होतं. न्यायालयात साक्ष देण्याबाबत माझ्या घरच्यांना भीती वाटत होती. पण मी साक्षीदार होण्याचा निर्णय घेतला'. त्या पुढे म्हणाल्या, 'तुरुंगात मी कसाबला ओळखलं. त्याने मला हसत हसत सांगितलं की मॅडम तुम्ही माझी खरी ओळख पटवली आहे. मी अजमल कसाबच आहे. कसाबला कोणताही पश्चाताप नव्हता. त्याला केलेल्या कृत्याबद्दल शरम वाटत नव्हती. त्याच्या मनात जराही अपराधीपणाची भावना नव्हती. त्याच्या चेहऱ्यावर विजयी झाल्याचा भाव होता. तो चेहरा आणि त्याच्यावरचे विजयी भाव मला आजही क्लेश देतात'.
'जगातल्या कुठल्याही दहशतवादी हल्ल्याची बातमी मी वाचते किंवा पाहते तेव्हा मला पीडितांचे कुटुंबीय, लहान मुलं, आईवडील यांच्याबद्दल वाईट वाटतं. ते अख्खं आयुष्य या हल्ल्याच्या कटू आठवणी विसरू शकत नाही'
मुंबई हल्ल्यातील पीडित अजूनही न्याय मिळण्याच्या प्रतीक्षेत आहेत कारण हा हल्ला घडवून आणणारे आजही मोकाट आहेत. अनेकांनी जीव गमावला, अनेकांनी पालक गमावले, बहीणभाऊ गमावले. असंख्य लोक आजही त्या हल्ल्याच्या धक्क्यातून सावरलेले नाहीत.
या परिषदेच्या माध्यमातून मी आंतरराष्ट्रीय समुदायाला आवाहन करते की 26/11 हल्ल्याच्या सूत्रधारांना पकडून कठोरात कठोर शिक्षा व्हावी. जेणेकरून पीडितांसाठी हा अध्याय संपेल.
अंजली यांनी कसाबसह हल्लेखोरांना रुग्णालयात शिरताना पाहिलं. त्यांनी सुरक्षारक्षकांची हत्या केली तेही पाहिलं. 26/11 रोजी हल्लेखोरांनी मुंबईला लक्ष्य करत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस रेल्वे स्टेशन, नरिमन हाऊस, कामा रुग्णालय, लिओपोल्ड कॅफे, द ओबेरॉय ट्रायडंट हॉटेल, ताज हॉटेल आणि टॉवरवर हल्ला केला. भारताचे परराष्ट्र मंत्री एस.जयशंकर यांनी अंजली यांचे आभारी मानले आहेत.
जयशंकर म्हणाले, अंजली कुलथे यांची साक्ष या गोष्टीची आठवण करुन देते की 26/11 हल्ल्यासह असंख्य दहशतवादी घटनातील पीडितांना न्याय मिळणे बाकी आहे.
अंजली कुलथे यांनी अजमल कसाबला ओळखलं होतं आणि त्याच्याविरुद्ध साक्षही दिली होती. 21 नोव्हेंबर 2012रोजी कसाबला फाशी देण्यात आली. पुण्यातल्या येरवडा तुरुंगात कसाबचं दफन करण्यात आलं.
Published By- Priya Dixit