रविवार, 26 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. बीबीसी मराठी बातम्या
Written By
Last Modified: बुधवार, 22 डिसेंबर 2021 (14:32 IST)

माजलगाव : माकडांनी सूड म्हणून कुत्र्यांची 200 पिलं मारली? लवूळ गावात नेमकं काय घडलं?

मराठवाड्यातील माजलगावमधलं लवूळ हे गाव गेल्या आठवडाभरात जगभरातल्या माध्यमांमध्ये झळकलं. त्याचं कारण येथील माकड आणि कुत्र्यांमधील संघर्षाच्या बातम्या.
 
या बातम्यांमध्ये बरेच दावे करण्यात आले. माकडांनी कुत्र्यांची 200 पिलं मारल्याचंही अनेकांनी म्हटलं. बीबीसी मराठीनं प्रत्यक्ष गावात भेट देत या दाव्यांची सत्यता पडताळली, तेव्हा मात्र काहीसं वेगळं चित्र समोर आलं.
 
मराठवाड्यातल्या बीड जिल्ह्यातील माजलगावपासून अवघ्या पाच ते सात किलोमीटर अंतरावरचं लवूळ हे गाव. 1980 मध्ये जुनं गाव धरणात गेल्यानं याठिकाणी पुनर्वसन झालेलं हे नवं गाव म्हणजे लवूळ क्रमांक 1.
 
गावाची लोकसंख्या ही पाच हजारांपेक्षा जास्त तसंच गावाचं क्षेत्रफळही मोठं. गावात शाळा, बँक अशा सोयी सुविधांसह पायाभूत सुविधाही अगदी उत्तम. माजलगाव धरणातील बॅकवॉटरमुळं शेतीला मुबलक पाणी असल्यानं ऊसाची शेतीही बहरलेली आहे.
बीड जिल्ह्यातलं आर्थिक दृष्ट्या सर्वात श्रीमंत गावांपैकी एक अशीही या गावची ओळख असल्याचं काही जणांनी सांगितलं. पण ऊस उत्पादन आणि ऊसतोड मजूर अशा एकाच नाण्याच्या दोन बाजूही याठिकाणी पाहायला मिळतात.
 
गावात घडलेल्या या संपूर्ण घटनाक्रमाबाबत माहिती घेण्यासाठी आम्ही लवूळ गावात पोहोचलो. गावची लोकसंख्या भरपूर आणि सकाळची वेळ असल्यानं अनेक लोक ठिकठिकाणी घोळक्यानं सकाळच्या भेटीगाठी आणि चर्चांमध्ये रमलेले होते.
 
गावात प्रवेश केल्यानंतर अगदी काही अंतरावर असलेल्या लवूळ ग्रामपंचायत कार्यालयात आम्ही पोहोचलो आणि या संपूर्ण घटनेबाबतच्या चर्चांना सुरुवात झाली.
 
गावातील कामाच्या निमित्तानं आलेली मंडळी, ग्रामपंचायत सदस्य, इतर कर्मचारी या सगळ्यांनीच चर्चेत हिरारीनं सहभाग घेत, आपापल्या परीनं सगळं काही कसं घडलं हे सांगायला सुरुवात केली.
 
माकडं आली आणि...
साधारणपणे गेल्या आठवड्यामध्ये चर्चेमध्ये आलेला हा प्रकार लवूळ गावामध्ये तीन महिन्यांपेक्षाही जास्त आधी म्हणजे सप्टेंबरच्या महिन्यापासून सुरू झाल्याचं गावकऱ्यांबरोबरच्या चर्चेतून समोर आलं.
 
सप्टेंबर महिन्याच्या सुरुवातीला दोन माकडं लवूळ गावामध्ये आली.
"गावात तशी वानरं किंवा माकडं नाहीत, कधीतरी येतात पण तीही फार त्रास देत नाहीत. मात्र यावेळी ही माकडं आल्यानंतर वेगळाच प्रकार गावात घडू लागला," असं ग्रामपंचायत सदस्य रवींद्र शिंदे यांनी सांगितलं.
 
ही माकडं कुत्र्याच्या पिलांना उचलून झाडांवर किंवा उंच घरांवर नेऊ लागली. सुरुवातीला गावकऱ्यांना हे फारसं समजलं नाही, मात्र नंतर हळूहळू माकडं कुत्र्याची पिलं पळवत असल्याचं त्यांच्या लक्षात आलं.
 
गावातील वेगवेगळ्या घटनांचा क्रम
माकडं पिलांना उचलून झाडांवर किंवा घरांवर नेत होती. पण काही कुत्र्याची पिलं झाडावरून किंवा इमारतीवरून पडल्यामुळं दगावली. त्यामुळं वानरं कुत्र्याच्या पिलांना मारत आहेत, अशी चर्चा सुरू झाली आणि ती चर्चा पसरली देखील.
 
मग गावात एक एक बातमी पसरू लागली. माकड कुणाच्या मागे लागलं, तर कुणी अचानक माकड समोर आल्यानं पडलं आणि जखमी झालं, अशा एक ना अनेक घटना.
 
सीताराम नायबळ यांच्याबरोबरही असाच अपघात घडला. ते पिलांना खाली उतरवण्यासाठी घरावर चढत होते. पण तेवढ्यात माकड आलं म्हणून ते घाबरले आणि कुत्र्याच्या पिलाला सोडत त्यांनी खाली उडी मारली.
या घटनेत वायबळ यांच्या दोन्ही पायांच्या टाचेला फ्रॅक्चर झाले दोन्ही पायांत रॉड टाकावे लागले. जवळपास एक ते दीड लाख रुपये उपचारासाठी लागले असं त्यांनी सांगितलं. तीन महिन्यांनंतर अजूनही अगदी सावकाश अर्ध-अर्ध पाऊल टाकत त्यांना चालावं लागतंय. एक-दोन मिनिटांपेक्षा जास्त ते चालूही शकत नाही.
 
मग काय? कुठं मुलांच्या मागे माकड धावलं, तर कुठं लोकं भीतीनं घराची दारं लावून बाहेर बसली असं सर्वकाही सुरू झालं. त्यामुळं हे प्रकरण ग्रामपंचायतीपर्यंत पोहोचलं.
 
'वनविभागाचं सुरुवातीला दुर्लक्ष'
गावामध्ये सगळीकडं भीतीचं वातावरण पसरलं. त्यामुळं ग्रामपंचायतीनं वनविभागाकडे याबाबत तक्रार करून मदत मागायचा निर्णय घेतला आणि त्यानुसार कारवाई सुरू झाली.
 
"सप्टेंबर महिन्यामध्येच 12-13 तारखेच्या सुमारास या संदर्भात पत्रव्यवहार केला. पण त्याला फारसा काही प्रतिसाद मिळाला नाही," असं ग्रामविकास अधिकारी नानासाहेब शेळके यांनी सांगितलं.
त्यानंतर पुन्हा पत्रव्यवहार करण्यात आला. त्याकडंही दुर्लक्षच झालं. मात्र गावकऱ्यांनी विषय लावून धरल्यानं अखेर वनविभागनं एक दोन वेळा पथकं पाठवली पण त्यांनी केवळ पाहणी केली आणि ते निघून गेले असं गावातील तंटामुक्तीचे अध्यक्ष राधाकिसन सोनवणे यांनी सांगितलं.
 
त्यानंतर अखेर गावकऱ्यांनी माध्यमांकडे धाव घेतली आणि माध्यमांमध्ये याची प्रसिद्धी आणि चर्चा झाल्यानंतर तातडीनं या प्रकरणी कारवाई करण्यात आली अशी माहितीही त्यांनी दिली.
 
कुत्र्याच्या पिलाच्या मदतीनंच पकडली माकडं
माध्यमांमध्ये चर्चा वाढल्यानंतर धारूर येथील वन विभागानं अखेर या वानरांना पकडण्यासाठी नागपूर येथील पथकाशी संपर्क साधला आणि त्यांना पाचारण करण्यात आलं.
 
नागपूर येथील पथकानं सापळा लावला आणि त्याद्वारे शनिवारी (19 डिसेंबर) या वानरांना पकडलं. ही माकडं कुत्र्याच्या पिलांना उचलून नेत असल्यामुळं वानरांना पिंजऱ्यात बोलावण्यासाठी त्यात कुत्र्याचं पिलू ठेवण्यात आलं.
 
या पिलाला नेण्यासाठी ही वानरं पिंजऱ्यामध्ये आली आणि त्यांना पकडण्यात वनविभागाच्या पथकाला यश आलं.
 
या वानरांना पकडल्यानंतर त्यांना नैसर्गित अधिवासामध्ये सोडून दिल्याची माहिती वडवणी येथील वनअधिकारी डी.एस.मोरे यांनी बीबीसी मराठीबरोबर बोलताना दिली.
 
'मृत पिलांचा आकडा वाढतच गेला'
माध्यमांमध्ये बातम्या आल्या आणि त्यामुळं सगळ्यांचं लक्ष या प्रकरणाकडे वेधलं गेलं. मात्र त्यामागचं कारण होतं या संपूर्ण घटनेतील कुत्र्याच्या मृत पिलांचा आकडा.
 
सुरुवातीला काही माध्यमांच्या वृत्तांमध्ये हा आकडा 10 ते 15 पासून सुरू झाला आणि काही दिवसांतच तो कित्येक पटींनी वाढला. काही माध्यमांनी तर वानरांनी कुत्र्यांची 250 पिलं मारल्याचाही दावा केला.
लवूळ गावातील ग्रामस्थांनी बीबीसी बरोबर बोलताना दिलेल्या माहितीमध्ये गावातील लोकांच्या आकड्यांमध्येच तफावत असल्याचं आढळून आलं.
 
काही जणांनी कुत्र्यांची 50 ते 60 पिलं मारल्याचा दावा केला, तर काही जणांनी 100 पेक्षा अधिक आणि काही जणांनी थेट 200 पिलं मारली गेली असं बोलताना सांगितलं.
 
चर्चा करत असताना गावातील काही लोकांनी आकडे हे जास्तीचे असून प्रत्यक्षातला आकडा 50 पेक्षाही कमी असल्याचंही सांगितलं. त्यामुळं याबाबच्या संपूर्ण संभ्रमामुळं नेमका आकडा काय हा प्रश्न मात्र अनुत्तरितच राहिला.
 
मात्र, गावातील लोकांद्वारे मिळालेला अधिकृत आकडा कमीत कमी 50 ते 60 हाच होता.
 
असे सर्व आकडे समोर आलेले असताना, वन अधिकारी डी.एस.मोरे यांनी मात्र सगळेच आकडे खोटे ठरवले आहेत. प्रत्यक्षात केवळ तीन ते चार पिलं मेली असावी असं मोरे यांनी बीबीसीबरोबर बोलताना सांगितलं.
 
कारणासंबंधीही अफवांचं पीक
कुत्र्याच्या मृत पिलांचा आकडा जसा वाढत गेला तसे गावामध्ये हे प्रकार सुरू झाल्यापासूनच अफवांचं पिकही आल्याचं पाहायला मिळालं.
 
यात अनेक प्रकारच्या अफवांचा समावेश होता. पण सर्वात महत्त्वाचं म्हणजे या संपूर्ण प्रकाराची सुरुवात कशी झाली त्याबाबतची अफवा चर्चेचा विषय ठरली.
 
आधी कुत्र्यांनी माकडाच्या पिलाला मारलं होतं, त्यामुळं वानरं कुत्र्याची पिलं नेऊन त्यांना वरून खाली टाकून त्यांचा जीव घेत आहेत, ही ती अफवा होती.
आम्ही गावातील लोकांना याबाबत विचारलं तेव्हा, नेमकं माहिती नाही पण गावात अशी चर्चा आहे असं गावकरी म्हणाले सोबतच इतरही काही चर्चा असल्याचं ऐकायला मिळालं.
 
"माकडाचं पिलू मेल्यामुळं ते वेडं झालं आणि कुत्र्याच्या पिलाला ते स्वतःची पिलू समजून घेऊन फिरत आहे," असंही गावातले काही लोक म्हणत असल्याचं ग्राम पंचायत सदस्य रवींद्र शिंदे म्हणाले.
 
'काही पिलं वाचवली'
"मुलं शाळेत जायलाही घाबरू लागली होती. घरातली पुरुष मंडळी शेतात किंवा कामासाठी बाहेर गेल्यानंतर महिला भीतीपोटी बाहेरही पडत नव्हत्या," असं लक्ष्मण भगत यांनी सांगितलं.
 
लक्ष्मण भगत यांच्या वाड्याच्या छतावर अनेक दिवस माकडांचा मुक्काम होता. जवळपास आठ ते दहा कुत्र्यांची पिलं माकडांनी त्यांच्या वाड्याच्या छतावर आणून ठेवली होती.
 
"रात्रीच्या वेळी माकडांसह या पिलांचा प्रचंड आवाज येत होता. त्यामुळं घरातली लहान मुलं घाबरायला लागली होती. पण उपाशी असल्यामुळं कुत्र्याची पिलं ओरडत असावी असं त्यांना वाटलं. त्यामुळं दुसऱ्या दिवसापासून त्यांना पिलांसाठी भाकर, दूध ठेवायला सुरुवात केली.
 
हे दूध आणि भाकरी यामुळं त्यांच्या छतावरील काही पिलांचा जीव वाचला आणि आज ती पिलं भगत यांच्या घरासमोर फिरतानाही दिसत आहेत.
 
वानरांनी असं का केलं असावं?
वनअधिकारी डी.एस.मोरे यांनी वानरं कुत्र्याची पिलं का नेतं याबाबतही माहिती दिली. कुत्र्यांच्या अंगावर बारीक उवा, पिसवे असतात आणि माकडं ती खात असतात. ते खाण्यासाठी म्हणून ते पिलांना उचलून नेतात.
मोठी कुत्री सहजासहजी वानरांच्या हाती लागत नाहीत. लहान पिलू हे त्यांचं इजी टार्गेट ठरतं आणि ते त्याला विरोधही करू शकत नाही. त्यामुळं ते अशाप्रकारे पिलाला उचलून नेतात.
 
उचलून नेल्यानंतर त्याच्या अंगावरचे पिसू वगैरे खाल्ल्यानंतर माकड त्या कुत्र्याच्या पिलांना झाडावरच किंवा घरांच्या छतावरच सोडून देतं. तिथं कुत्र्याच्या पिलाला दोन-तीन दिवस अन्न पाणी मिळत नाही. त्यामुळं उपासमारीनं ते मरतात.
 
त्याचबरोबर एवढ्या उंचीवरून पिलांना खाली येता येत नाही. खाली उतरण्याचा प्रयत्न करत असताना पडून या पिलांचा मृत्यू झाला असावा असं मोरे यांनी सांगितलं.
 
तज्ज्ञ काय म्हणतात?
औरंगाबाद येथील सिद्धार्थ उद्यानात असलेल्या प्राणीसंग्रहालयामध्ये अनेक प्रकारचे प्राणी आहेत. डॉ.बी.एस.नाईकवाडे यांनी याठिकाणी दीर्घकाळ सेवा बजावलेली आहे. त्यांच्याकडूनही माकडांच्या या वर्तनाबाबत जाणून घेण्याचा प्रयत्न आम्ही केला.
 
"माकडं ही त्यांना त्रास देणाऱ्याबाबत डूक (राग) धरू शकतात आणि बदला घेण्यासाठी रागात काही तरी करू शकतात हे खरं आहे. मात्र, तसं असलं तरी हे जे काही सांगितलं जात आहे ती अतिशयोक्ती आहे," असं डॉ. नाईकवाडे म्हणाले.
 
लाईफ केअर अॅनिमल असोसिएशन संघटनेचे अध्यक्ष धनराज शिंदे यांनी याबाबत एक वेगळी शक्यताही व्यक्त केली.
 
माकड हा प्रचंड उत्सुकता असलेला प्राणी आहे. त्यामुळं उत्सुकतेपोटी त्यानं असं वर्तन केलं असल्याची शक्यता असू शकते असं म्हटलं आहे.
 
'अफवांमुळे संघर्ष वाढणार'
माकडांनी गावातील थेट कोणावरही हल्ला केला नाही असंही ते म्हणाले. वानराला घाबरून पळताना काही अपघात झाले, पण माकडानंच हल्ला केल्याचा प्रकार घडला नाही, असं वन अधिकारी मोरे यांनी सांगितलं.
 
अशा प्रकारे माकडांविरोधात टोळी युद्धाचे प्रकार झाले तर, इतर गावांमध्ये माकडं आल्यास घाबरून लोकांकडून त्यांच्या विरोधात काहीतरी कृती घडू शकते. माकडांकडूनही त्यावर स्वसंरक्षणार्थ काही तरी घडणार.
 
या सर्वात पुन्हा वानरं हल्ला करतात अशा चर्चा होतील असंही ते म्हणाले. त्यामुळं अशा प्रकारच्या अफवांमुळं भविष्यात आणखी अडचणी वाढण्याची शक्यताही त्यांनी व्यक्त केली.
 
तीन महिन्यांपासून लवूळ या गावामध्ये सुरू असलेल्या या नाट्यावर अखेर पडदा पडला आहे. या प्रकारानंतर गावात अनेक कुत्री फिरताना दिसत आहे. काही ठिकाणी कुत्र्यांची पिलंही आहेत. मात्र आता माकडं याठिकाणी नाहीत, त्यांना पुन्हा त्यांच्या अधिवासात सोडण्यात आलं आहे. मात्र, त्यांनी कुत्र्याची पिलं मारल्याच्या चर्चा मात्र या गावात आता कायम राहणार.