फेब्रुवारी महिन्यात ऑनलाईन पद्धतीनं होणार म्हाडाची रद्द झालेली परीक्षा
पेपर फुटीच्या प्रकरणामुळं म्हाडाच्या रद्द झालेल्या परीक्षेचं नवं वेळापत्रक ठरलं आहे. फेब्रुवारी महिन्यामध्ये 1 ते 15 फेब्रुवारी या दरम्यान ऑनलाईन पद्धतीनं ही परीक्षा होईल.
परीक्षेच्या नेमक्या तारखा म्हाडातर्फे संकेतस्थळावर जाहीर केल्या जाणार आहेत. म्हाडानं या परीक्षेची जबाबदारी आता टीसीएस कंपनीकडे दिली आहे. यापूर्वीही अशा परीक्षा घेण्याचा अनुभव कंपनीला आहे.
यापूर्वी परीक्षेची जबाबदारी असलेल्या कंपनीतील वरिष्ठ अधिकाऱ्यानंच पेपर फोडण्याचा कट रचला होता. त्यामुळं परीक्षा रद्द करण्यात आली होती.
याआधीची म्हाडाची ही परीक्षा 12 डिसेंबरला होणार होती. पण परिक्षेपूर्वीच्या मध्यरात्री राज्याचे मंत्री जितेंद्र आव्हाडांनी ट्वीट करत परीक्षा पुढं ढकलली होती. पेपरफुटीचा कट उघड झाल्यानं ती रद्द करण्यात आली होती.