बुधवार, 27 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. बीबीसी मराठी बातम्या
Written By

नरेंद्र मोदी यांना वाराणसीत आव्हान देणारे अजय राय काँग्रेसविरोधात बोलत आहेत? फॅक्ट चेक

वाराणसी मतदारसंघातून नरेंद्र मोदी यांच्याविरोधात निवडणूक लढवणारे अजय राय आपल्याच पक्षाविरोधात बोलत आहेत, असा दावा करणारा व्हीडिओ फेसबुक आणि ट्विटरवर व्हायरल होतोय.
 
गेल्या गुरुवारी मोदींविरुद्ध काँग्रेसने वाराणसीतून अजय राय यांच्या नावाची घोषणा केली होती. त्यानंतर हा व्हीडिओ बाहेर आला. पण त्यापूर्वी वाराणसीतून मोदींच्या विरुद्ध काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियंका गांधी निवडणूक लढवतील, अशी सर्वत्र चर्चा सुरू होती.
 
फेसबुकवर या व्हीडिओबरोबर लोकांनी लिहिलंय, "वाराणसीमध्ये मोदींच्या विरुद्ध उभे असलेले काँग्रेसचे उमेदवार अजय राय काय म्हणत आहेत, नक्की ऐका." या व्हीडिओमध्ये दिसणारी व्यक्ती अजय राय असल्याचं सांगितलं जात आहेत. "मायलेकाची जोडी इतका जुना काँग्रेस पक्ष नष्ट करत आहेत," असं ती व्यक्ती बोलताना ऐकू येतंय.
"घराणेशाही आमच्या पक्षासाठी घातक आहे. हे माझं वैयक्तिक मत आहे. मात्र जेव्हा तुम्ही कोअर कमिटीच्या बैठकीला जाता, तेव्हा आई मुलाने राजकारण उद्ध्वस्त करण्याची तयारी केली आहे, हे नीट समजून घ्यावं," असं ती व्यक्ती बोलताना दिसतेय.
 
पण बीबीसीच्या फॅक्ट चेक टीमने पडताळणी केल्यावर लक्षात आलं की व्हीडिओतील मिशी असलेली व्यक्ती कुणीतरी भलतीच आहे. तिचा काँग्रेसशी संबंधित नाही, असंही लक्षात येतं. या व्हीडिओत दिसणारी व्यक्ती भोपाळमध्ये राहणारी आहे. त्याचं नाव अनिल बुलचंदानी आहे आणि ते एक व्यापारी आहेत.
 
अनिल बुलचंदनी यांनी सांगितलं की हा व्हीडिओ त्यांनी 8 फेब्रुवारी 2019 ला पोस्ट केला होता. व्हीडिओबरोबर त्यांनी लिहिलं होतं, "माझ्याकडून नाट्यरूपांतर." बीबीसीशी बोलताना त्यांनी सांगितलं की, "मी हा व्हीडिओ एका चित्रपटाच्या ऑडिशनसाठी तयार केला होता. या चित्रपटासाठी माझी एका आमदाराची भूमिका होती." त्यांच्या या दाव्याची पडताळणी बीबीसी स्वतंत्रपणे करू शकत नाही.
 
भाजपचे सक्रिय समर्थक
या व्हीडिओच्या संदर्भात अनिल बुलचंदनी यांनी 12 एप्रिलला एक फोटो पोस्ट केला होता. त्यात "माझ्यापेक्षा माझा व्हीडिओ जास्त व्हायरल झाला आहे," असं लिहिलं होतं. अनिल बुलचंदन यांनी बीबीसीला सांगितलं की त्यांना भाजपची विचारधारा आवडते आणि ते पक्षाचे सक्रिय समर्थक आहेत. भोपाळ मतदारसंघातील भाजपच्या उमेदवार प्रज्ञा सिंह ठाकूर यांच्यासह इतर काही भाजप नेत्यांबरोबर त्यांचे फोटो दिसत आहेत.