गुरूवार, 26 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. बीबीसी मराठी बातम्या
Written By

मँचेस्टरच्या आजीची तुरुंगात जायची इच्छा झाली पूर्ण

आयुष्यात काहीतरी अतरंगी गोष्टी करण्याची सगळ्यांची इच्छा असते. मँचेस्टरमध्ये एक खापरपणजी आहे. तिनेही एक इच्छा व्यक्त केली, तुरुंगात जाण्याची आणि ती काही अंशी पूर्णही झाली.
 
होजी बर्ड नावाची आजी आयुष्यभर अतिशय छान वागली. आता आयुष्याच्या संध्याकाळी तिला काहीतरी खोडकरपणा करायची इच्छा झाली आणि तिची रवानगी थेट तुरुंगात झाली.
 
शनिवारी हा सगळा प्रकार झाला. मात्र त्यांची नात पाम स्मिथ यांच्या मते पोलिसांनी तिला तुरुंगात टाकताना एक लक्ष्मणरेषा आखली.
 
म्हणजे काय तर प्रत्यक्ष तुरुंगात टाकण्याऐवजी तिची कसून चौकशी केली. इतकंच नाही तर तिला चहा आणि केकही खायला दिलं.
 
या होजी आजीला सहा मुली, 20 नातवंडं, 28 पतवंडं, 2 खापरपतवंडं आहेत. या आजीवर चोरीचा आळ होता.
 
"आजीवर एका किराण्याच्या दुकानातून वस्तू चोरल्याचा आरोप होता." त्यावर "मी तिथून कधीच वस्तू घेत नाही." असं उत्तर तिने दिलं.
 
"पोलिसांनी तिला बेड्या घातल्या आणि व्हॅनमध्ये बसवून घेऊन गेले आणि तिची कसून चौकशी केली. तिला तुरुंगातही जायचं होतं मात्र तिथे पोलिसांनी मर्यादारेषा आखून दिली. त्याऐवजी तिला चहा आणि केक दिले."
 
या अनुभवामुळे आजी फारच उत्साहित होती. ती आपला अनुभव रविवारी सगळ्यांना सांगत होती असं तिच्या नातीने सांगितलं.
 
हा अनुभव दिल्याबद्दल आम्हाला आनंद झाला असं ट्विट मँचेस्टर पोलिसांनी केलं आहे.