शुक्रवार, 8 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. बीबीसी मराठी बातम्या
Written By
Last Modified: बुधवार, 5 मे 2021 (17:51 IST)

मराठा आरक्षण : 'माझ्या भावाचं बलिदान व्यर्थ गेलं, हीच भावना आज माझ्या मनात आहे'

श्रीकांत बंगाळे
मराठा आरक्षण सुप्रीम कोर्टाने फेटाळलं आहे. मराठा समाजातील नागरिकांना शैक्षणिक किंवा सामाजिकदृष्ट्या मागास घोषित करता येऊ शकणार नाही, असं सुप्रीम कोर्टाने स्पष्ट केलं.
 
मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून जुलै 2018मध्ये औरंगाबाद जिल्ह्यातल्या काकासाहेब दत्तात्रय शिंदे या आंदोलकानं गोदावरी नदीत उडी मारून जीव दिला होता. मूळ गंगापूर तालुक्यातील कानडगावचे काकासाहेब शिंदे यांनी कायगाव टोका येथील नव्या पुलावरून उडी घेतली होती. यासदंर्भातला एक व्हीडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता.
 
काकासाहेब यांचे लहान भाऊ अविनाश शिंदे हे 26 वर्षांचे आहेत.
 
अविनाश शिंदे यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या निकालावर बीबीसी मराठीला प्रतिक्रिया देताना म्हटलं, "आजचा मराठा आरक्षणाविषयीचा सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय दु:खद आहे. न्यायालया असा निकाल देईल, असं वाटलं नव्हतं. राज्य सरकारनं योग्य भूमिका मांडायला हवी होती."
"माझ्या भावानं मराठा आरक्षणासाठी जे बलिदान दिलं, ते व्यर्थ ठरल्याचीच भावना आज माझ्या मनात आहे. मी, माझे घरचे आम्हाला सगळ्यांना वाटत होतं की, माझ्या भावाचं बलिदान व्यर्थ नको जायला, पण आजचा दिवस आमच्यासाठी खूप दु:खद आहे," अविनाश शिंदे सांगतात.
 
ते पुढे म्हणाले, "मराठा समाजानं आरक्षणासाठी किती दिवस रस्त्यावर उतरायचं हा प्रश्न आहे. आजही आमच्या पदरी निराशाच पडली आहे. सध्या कोरोनाचा काळ आहे त्यामुळे कोरोनाची स्थिती लक्षात घेता समाजानं आपली प्रतिक्रिया द्यावी, असं मला वाटतं."
 
दरम्यान, मराठा आरक्षणासाठी आम्ही संपूर्ण तयारी करत असल्याचं राज्य सरकारनं वेळोवेळी म्हटलं होतं. भाजप सरकारपेक्षा अधिक वकिल मराठा आरक्षणासाठी नेमल्याचंही महाविकास आघाडी सरकारनं स्पष्ट केलं होतं.
 
कोण होते काकासाहेब शिंदे?
28 वर्षांचे काकासाहेब शिंदे पेशाने ड्रायव्हर होते. त्यांच्या घरात आई, वडील आणि भाऊ असे चौघेच जण. गंगापूर तालुक्यातील आगर कानडगाव हे त्यांचं मूळ गाव. तिथे घरी दोन एकर शेती.
 
शेतीवर उपजीविका चालत नाही म्हणून काकासाहेब यांनी ड्रायव्हर म्हणून नोकरी सुरू केली. त्यांच्यावर घर अवलंबून होतं.
गंगापूरमधून शिवसेनेचे माजी आमदार अण्णासाहेब माने यांचा मुलगा संतोष माने यांच्या गाडीचे काकासाहेब शिंदे ड्रायव्हर होते.
 
अविनाश शिंदे यांनी त्यावेळी बीबीसी मराठीशी बोलताना म्हटलं होतं की, काकासाहेब यांना मिळणाऱ्या 15 हजार रुपये पगारातच त्यांचं घर चालत होतं.
 
नेमकं काय घडलं होतं?
जुलै 2018मधील घटनेविषयी अविनाश यांनी बीबीसी मराठीला सांगितलं, "त्या दिवशी आंदोलनात आम्ही दोघं बरोबरच होतो. आजपर्यंत मराठा समाजाची जेवढी आंदोलनं झाली, त्यावेळेस काकासाहेब माझ्याबरोबरच असायचे. आंदोलन सुरू असताना त्यांनी गोदावरीमध्ये उडी घेतली. ते असं काही करतील याची आम्हाला कल्पना नव्हती. त्याला पोहता येत नव्हतं."
"आम्ही कायगाव टोका इथं आंदोलन करणार असल्याची माहिती पोलीस आणि प्रशासनाला दिलेली असताना त्यांनी काहीच उपाययोजना केलेल्या नव्हत्या. आंदोलनकर्त्यांनी जलसमाधी घेण्याचा इशारा दिलेला असतानाही नदीकाठी अँब्युलन्स किंवा होड्या नव्हत्या. लाईफ जॅकेट किंवा जीवरक्षक नव्हते.
 
"काकासाहेब यांना नदीतून बाहेर काढण्यासाठीही कुणी नव्हतं. आमच्याच लोकांनी स्थानिक मच्छिमारांच्या मदतीनं त्यांना बाहेर काढलं. थर्माकोलच्या होड्या घेऊन ते नदीत उतरले होते. आमच्या लोकांनी काकासाहेब यांना गंगापूर इथं आणलं. पण तोपर्यंत सगळं संपलं होतं," अविनाश यांनी पुढे सांगितलं.