रविवार, 26 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. बीबीसी मराठी बातम्या
Written By
Last Modified: गुरूवार, 9 मे 2019 (11:20 IST)

IPL 2019: ऋषभ आणि पृथ्वीमुळे हैदराबाद सनरायजर्स स्पर्धेबाहेर

बुधवारी आयपीएल-12मध्ये दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध हैदराबाद सनरायजर्स असा सामना रंगला. हा एलिमिनेटर्स सामना होता. या मॅचमध्ये हैदराबादची टीम पराभूत झाली. दिल्ली आणि चेन्नईमध्ये पुढील सामना होणार असून यापैकी जो संघ जिंकेल तो मुंबई इंडियन्स विरोधात अंतिम सामना खेळणार आहे.
 
दिल्लीसमोर 163 रनांचं उद्दिष्ट होतं. पृथ्वी शॉची दमदार अर्धशतकी खेळी आणि ऋषभ पंतच्या 49 धावांच्या साहाय्याने दिल्लीने हे लक्ष्य गाठलं.
 
ही मॅच रोमांचक झाली. नेमका कोणता संघ जिंकेल हे सांगता येणं कठीण होतं.
 
दिल्लीने नाणेफेक जिंकून प्रथम फिल्डिंग घेतली. हैदराबादने 162 धावा काढल्या. नंतर दिल्लीची टीम बॅटिंगसाठी उतरली. 14 ओव्हरमध्ये दिल्लीच्या तीन विकेटच्या मोबदल्यात 111 धावा झाल्या होत्या. ऋषभ पंत आणि कोलिन मुनरो ख्रीजवर आपले पाय रोवून खेळत होते.
 
15वी ओव्हर रशीद खानने टाकली. पहिल्याच बॉलवर रशीदने मुनरोला क्लीन बोल्ड केलं. या विकेटनं हैदराबादच्या आशा पल्लवित केल्या. याच ओव्हरच्या चौथ्या बॉलवर अक्षर पटेल तंबूत परतला.
 
आता दिल्लीचं काही खरं नाही असं वाटत असताना पुढच्याच ओव्हरमध्ये ऋषभ पंतने थंपीच्या ओव्हरमध्ये 22 धावा कुटल्या.
 
18 ओव्हर पूर्ण झाल्यावर दिल्लीचा स्कोअर होता 155. विजयासाठी दिल्लीला 12 धावा हव्या होत्या. दिल्ली हे लक्ष्य सहज गाठेल असं वाटत असतानाच ऋषभ पंतची विकेट पडली. जेव्हा पंत आउट झाला तेव्हा सात बॉलमध्ये पाच रनांची आवश्यकता होती. शेवटच्या ओव्हरमध्ये कीमो पॉलने चौकार ठोकून दिल्लीला जिंकून दिलं.