शनिवार, 23 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. बीबीसी मराठी बातम्या
Written By

मोदींना ‘मॉब लिंचिग’बद्दल खुलं पत्र लिहिणाऱ्या सेलिब्रिटींना कंगना, प्रसून जोशींचं प्रत्युत्तर

'जय श्रीराम'च्या घोषणांमुळे निर्माण झालेले वाद आणि जमावाकडून होणाऱ्या हत्यांबद्दल विविध क्षेत्रातील 49 दिग्गजांनी चिंता व्यक्त केली होती. अनुराग कश्यप, मणी रत्नम, शुभा मुद्गल, रामचंद्र गुहा, कोंकणा सेन शर्मा यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना तसं पत्रही लिहिलं होतं. सरकारच्या हेतूवर प्रश्नचिन्ह उपस्थित करणाऱ्या या पत्राला 61 कलावंतांनी पत्रातूनच उत्तर दिलं आहे.
 
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि सरकारच्या पाठिशी उभं राहणाऱ्यांमध्ये अभिनेत्री कंगना राणावत, सेन्सॉर बोर्डाचे अध्यक्ष प्रसून जोशी, दिग्दर्शक मधुर भांडारकर, विवेक अग्निहोत्री, शास्त्रीय नृत्यांगना सोनल मानसिंह यांच्यासह 61 जणांचा समावेश आहे. जय श्रीराम आणि मॉब लिंचिंगवर प्रश्नचिन्ह उपस्थित करणाऱ्यांचा राजकीय पक्षपात आणि सोयीस्कर त्रागा व्यक्त होत असल्याची टीका कंगना राणावत, प्रसून जोशी, मधुर भांडारकर यांच्यासह अन्य कलाकारांनी केली आहे. तशा आशयाचं खुलं पत्रच त्यांनी लिहिलं आहे.
 
या पत्रात म्हटलं आहे, "23 जुलै 2019 ला पंतप्रधानांना संबोधून लिहिलेलं खुलं पत्र वाचून आम्हाला आश्चर्य वाटलं. देशाच्या सद्सदविवेकबुद्धीच्या 49 स्वयंघोषित रक्षकांनी जी चिंता व्यक्त केली आहे, त्यातून त्यांचा राजकीय पक्षपातीपणा आणि उद्दिष्टं दिसून येत आहेत."
 
"पंतप्रधान नरेंद्र मोदींची नकारात्मक प्रतिमा रंगवण्याचा हा प्रयत्न आहे. ज्यावेळेस नक्षलवाद्यांच्या हल्ल्यामध्ये गरीब आदिवासींचा बळी जात होता, तेव्हा 'खुलं पत्र' लिहिणारे हे सर्वजण कोठे होते? फुटीरतावाद्यांनी काश्मिरमधील शाळा जाळण्याची धमकी दिली, तेव्हाही हे सर्व गप्प होते. भारताचे तुकडे करण्याच्या घोषणा दिल्या जात असतानाही हे लोक गप्पच होते," असं या पत्रात म्हटलं आहे. सरकारच्या समर्थनार्थ उभ्या राहिलेल्या या सर्वांनी म्हटलं आहे, की आमच्या मते मोदी सरकारच्या काळात सरकारवर टीका करण्याची, वेगळा विचार मांडण्याची सर्वाधिक मुभा आहे.
 
49 जणांचं पंतप्रधानांना पत्र
आपल्या राज्यघटनेनं देशातल्या सर्व नागरिकांना समान मानलं आहे. त्यामुळे मुस्लिम, दलित आणि इतर अल्पसंख्याकांची जमावाकडून होणारी हत्या लगेच थांबायला हवी. 2016मध्ये दलितांविरुद्ध अॅट्रोसिटीच्या 840 घटना घडल्याचं NCRBच्या आकडेवारीवरून समोर आलं आहे. आम्हाला यामुळे धक्का बसला आहे. गुन्हा सिद्ध होण्याचं प्रमाण कमी झालं आहे, असं या पत्रात म्हटलं आहे.
 
1 जानेवारी 2009 ते 29 ऑक्टोबर 2018 दरम्यान धार्मिक द्वेषामुळे घडलेल्या गुन्ह्यांची संख्या 254 इतकी होती. यामध्ये जवळपास 91 जणांना जीव गमवावा लागला होता, तर 579 जण जखमी झाले होते. यांतील 62 टक्के घटनांचे बळी मुस्लिम ठरले होते, असंही या पत्रात नमूद केलं आहे.
 
पंतप्रधान मोदी, तुम्ही मॉब लिंचिंगवर संसदेत टीका केली आहे. पण ते पुरेसं नाही. प्रत्यक्षात काय कारवाई केली? असा प्रश्न या सर्वांनी विचारला आहे. देशात 'जय श्रीराम' ही घोषणा आता वादाचं मूळ बनली आहे. 'जय श्रीराम'च्या नावानं अनेक लिंचिंग होत आहे. धर्माच्या नावाखाली अशी हिंसा बघणं धक्कादायक असल्याचं पत्रात म्हटलं आहे.