शनिवार, 28 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. बीबीसी मराठी बातम्या
Written By
Last Modified: मंगळवार, 12 डिसेंबर 2023 (22:59 IST)

BBC च्या भारतातील कामकाजाची पुनर्रचना

बीबीसीने भारतातील कामकाजाची पुनर्रचना करण्याचा निर्णय घेतला आहे. नवीन रचना ही भारताच्या थेट परकीय गुंतवणुकीच्या (FDI) च्या नव्या नियमांनुसार असेल.बीबीसीचे चार वरिष्ठ कर्मचारी बीबीसीमधून बाहेर पडत, एक नवीन कंपनी स्थापन करतील. 'कलेक्टिव्ह न्यूजरुम' असं या नव्या कंपनीचं नाव असेल. त्यात बीबीसीच्या सहा भाषांचा समावेश आहे.
 
बीबीसीच्या न्यूज गॅदरिंगचं कामकाज भारतातच असेल आणि ते बीबीसीशी संलग्न असेल.
 
बीबीसीच्या भारतातील कार्यालयांमध्ये आयकर विभागाने सर्वेक्षण केलं होतं. त्यानंतर हा निर्णय घेण्यात आला.
 
भारतातील थेट परकीय गुंतवणुकीअंतर्गत येणाऱ्या नव्या नियमांनुसार, कोणत्याही डिजिटल न्यूज कंपनीला भारतात फक्त 26 टक्के परदेशी गुंतवणूक घेता येते.
 
याचाच अर्थ असा की, एखादी कंपनी भारतात डिजिटल बातम्या प्रसिद्ध करत असेल, तर त्या कंपनीच्या बहुतांश भागाची मालकी भारतीयांकडे असावी.
 
भारतीय भाषांच्या प्रमुख रुपा झा या 'कलेक्टिव्ह न्यूजरुम'च्या मुख्य कार्यकारी अधिकारी असतील. त्यांच्यासोबत मुकेश शर्मा, संजॉय मुजुमदार आणि सारा हसन हे देखील कंपनीची धुरा विविध पदांवर सांभाळणार आहेत.
 
बीबीसी हिंदी, बीबीसी गुजराती, बीबीसी मराठी, बीबीसी पंजाबी, बीबीसी तामिळ आणि बीबीसी तेलुगू या सहा प्रादेशिक सेवांमधले कर्मचारी आता 'कलेक्टिव्ह न्यूजरुम'साठी काम करतील. तसंच, बीबीसी इंडियाच्या युट्यूब चॅनलसाठी काम करणारे कर्मचारी सुद्धा नव्या कंपनीचा भाग असतील.
 
रुपा झा म्हणाल्या, “आपल्या विविधतेने नटलेल्या देशात बीबीसीच्या विविध भाषेतील सेवा विविधांगी बातम्या देतील. त्यात लोकांच्या ज्ञानात वेगवेगळ्या पद्धतीने भर घालतील याची भारतीय प्रेक्षकांनी खात्री बाळगावी. बीबीसी आणि कलेक्टिव्ह न्यूजरुम या दोन कंपन्यांमध्ये झालेल्या करारानुसार हे कामकाज चालेल.”
 
आयकर विभागाने बीबीसीच्या मुंबई आणि दिल्लीतील कार्यालयात सर्वेक्षण केलं होतं. कंपनीने थेट परकीय गुंतवणुकीचे नियम पाळले नसल्याचा आरोप आयकर विभागानं या तपासणीनंतर केला होता.
 
भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावरील माहितीपट बीबीसीनं यूकेमध्ये प्रदर्शित केला. त्यानंतर म्हणजे फेब्रुवारी महिन्यात बीबीसीच्या भारतीय कार्यालयांचं सर्वेक्षण करण्यात आलं होतं.
 
सध्या बीबीसीच्या विविध भारतीय भाषांमध्ये 300 पेक्षा अधिक कर्मचारी काम करतात. बीबीसीने त्यांची हिंदी सेवा 1940 मध्ये सुरू केली होती.
 
बीबीसी न्यूजचे डेप्युटी सीईओ जोनाथन मुन्रो म्हणाले की, "बीबीसीच्या भारतातील कामाला समृद्ध असा इतिहास आहे. कलेक्टिव्ह न्यूजरूमच्या माध्यमातून ही परंपरा आणखी वृद्धिंगत होईल."
 
Published By- Priya Dixit