अमृता दुर्वे
पावसाळा आणि मंगेश पाडगावकरांची नवी कविता हे पूर्वी एक समीकरण होतं. सध्या मुंबईकरांच्या बाबतीत हे समीकरण झालंय पावसाळा आणि आरजे मलिष्का.
कारण गेली तीन वर्षं दर पावसाळ्यात आरजे मलिष्का एक नवं विडंबन घेऊन येते आणि फक्त मुंबईच नाही तर देशभरात त्यावर चर्चा होते.
यावर्षीही मलिष्काने हिंदी चित्रपटांमधल्या चंद्रावर असणाऱ्या गाण्यांचा व्हीडिओ केलाय. मुंबईच्या रस्त्यावरील खड्डे हे चंद्रासारखे आहेत असा संदर्भ देऊन तिने हा व्हीडिओ केला आहे. लाल साडी नेसलेल्या एका विवाहितेच्या रूपातली मलिष्का खड्ड्यांकडे पाहत आपली 'करवा चौथ' साजरी करताना दिसते.
मलिष्काच्या युट्यूब चॅनलवर प्रसिद्ध करण्यात आलेला हा व्हीडिओअल्पावधीतच व्हायरल झाला.
पण यावेळी शिवसेनेने मलिष्काच्या व्हिडिओकडे दुर्लक्ष करायचं ठरवलेलं दिसतंय. "आम्ही तिच्याकडे लक्ष देणार नाही, आम्ही मुंबईसाठी आमचं काम करत राहू," असं शिवसेना नेते यशवंत जाधव यांनी 'द हिंदू' वर्तमानपत्राशी बोलताना सांगितलं.
कोण आहे मलिष्का?
'मुंबई की रानी' म्हणून रेडिओवर मिरवणारी आरजे मलिष्का म्हणजेच मलिष्का मेंडोन्सा. मुंबईतच वाढलेली मलिष्का ही रेड एफएफ (Red FM) 93.5 ची प्रसिद्ध रेडिओ जॉकी आहे. 'मॉर्निंग नंबर 1 विथ मलिष्का' हा तिचा शो गेली अनेक वर्षं लोकप्रिय आहे. आरजे म्हणून काम करत असताना लोकांना गाणी, गप्पा, किस्से आणि बॉलिवूड गॉसिप देण्यासोबतच सामाजिक घडामोडींवर ही ती भाष्य करते.
मुंबईतल्याच झेवियर्स कॉलेमजमधून बीए आणि एमए केल्यावर मलिष्काने सोफाया कॉलेजच्या मीडिया स्कूलमधून सोशल कम्युनिकेशन मीडियाचा कोर्स केला. 2000-2003 मध्ये खासगी रेडिओ स्टेशन्स सुरू झाली आणि या क्षेत्रातल्या नवीन संधी खुल्या झाल्या. मलिष्कानेही एका रेडिओ स्टेशनमध्ये काम करायला सुरुवात केली. रेडिओ जॉकी म्हणून काहीशी स्थिरावत असतानाच ते रेडिओ स्टेशन बंद पडलं आणि नोकरीचा शोध पुन्हा नव्याने सुरू करावा लागला. मलिष्काने तिच्या 'TEDx' टॉकमध्ये याविषयीचे अनुभव सांगितले आहेत.
याच दरम्यान एकदा तिने तिच्या घराबाहेर सुरू असलेल्या राजकीय कार्यक्रमामुळे सोसायटीतल्या लोकांना होणाऱ्या त्रासाविरुद्ध आवाज उठवला आणि त्यांना माफी मागायला लावली. आपल्यातही समाजतल्या काही चुकीच्या गोष्टी बदलण्याची ताकद असल्याची जाणीव तेव्हा पहिल्यांदा झाल्याचं, मलिष्का या 'TEDx' टॉकमध्ये सांगते.
नवखी आरजे ते 'मुंबई की रानी'
'TEDx' टॉकमध्ये मलिष्का सांगते, "खासगी रेडिओला सुरुवात झाली तेव्हा हे माध्यम अगदी औपचारिक होतं. मी ते माझ्या स्टाईलनुसार बदललं आणि मोकळंढाकळं केलं. आणि नंतरच याच माध्यमाने माझं आयुष्यच बदलून टाकलं. तुम्हाला जर यशस्वी व्हायचं असेल तर इतर कोणासारखं होण्याऐवजी तुम्ही स्वतःचं 'बेस्ट व्हर्जन'व्हायला हवं. जगाचं तुमच्याकडे लक्ष असणं ही एक प्रकारची शक्ती - पॉवर आहे. आणि जर तुम्ही तिला योग्य दिशा दिलीत तर तिचा चांगल्या कामांसाठी वापर होऊ शकतो."
मलिष्काने काम करायला सुरुवात केली तेव्हा मनोरंजन हेच खासगी एफएम स्टेशन्सचं उद्दिष्टं होतं. राजकारण, धर्म आणि सेक्स याविषयी बोलायला बंदी होती. मग सामान्य माणसाच्या आयुष्याशी निगडीत गोष्टींवर चर्चा करायची कशी? मलिष्काने यावर मार्ग काढला.
लहान असताना तिला सगळ्या मुलांना जमवून नाटुकली, नाच, गाणी सादर करायला आवडायची. तेच तिने पुन्हा एकदा रेडिओच्या माध्यमातून करायला सुरुवात केली. अनेक सामाजिक प्रश्न तिने या माध्यमातून मांडले.
पण त्या सगळ्यांत जास्त गाजली ती तिच्या मुंबईतल्या खड्ड्यांविषयीची मोहीम.
खड्डे आणि मलिष्का
दर पावसाळ्यात मुंबईच्या रस्त्यांवर पडणाऱ्या खड्ड्यांविषयी मलिष्काने 2017 मध्ये भाष्य केलं. 'मुंबई तुला बीएमसीवर भरोसा नाय का?' हे मलिष्काचं गाणं व्हायरल झालं. आणि मुंबई महापालिकेवर सत्ता गाजवणाऱ्या शिवसेनेची नाराजी मलिष्काने ओढावून घेतली. मलिष्कावर बीएमसीतल्या सत्ताधाऱ्यांनी टीका तर केलीच पण तिच्या घरातल्या झाडांच्या कुंड्यांमधून डेंग्यूच्या डासांच्या अळ्या मिळाल्याचं सांगत मलिष्काच्या घरी नोटीस पाठवण्यात आली. शिवसेनेच्या किशोरी पेडणेकरांनी तिला तिच्याच गाण्याच्या चालीवरच्या गाण्यातून प्रत्युत्तरही दिलं.
पण मी फक्त खड्डेच नाही तर मुंबईच्या सर्वच प्रश्नांबद्दल बोलत असल्याचं मलिष्काने उत्तरादाखल एका व्हिडिओतून सांगितलं. "रेडिओच्या 'पॉटहोल उत्सव'च्या माध्यमातून आम्ही दरवर्षी खड्ड्यांविषयी बोलतो आणि ते खड्डे भरण्यात आल्यानंतर आभारही मानतो, पण हे गाणं व्हायरल झालं. लोकांनी त्याबाबत चर्चा केली म्हणून मी नसताना माझ्या घरी जाऊन झडती घेणं योग्य आहे का?" असा सवाल मलिष्काने या व्हिडिओतून केला होता.
2018 मध्ये मलिष्काने पुन्हा खड्ड्यांविषयी भाष्य केलं. यावेळी झिंगाटच्या धर्तीवरचं 'गेली मुंबई खड्ड्यात' गाणं तुफान गाजलं. वर्षभरापूर्वी थेट मुंबई महापालिकेचं नाव घेणाऱ्या मलिष्काने यावेळी बीएमसीचं नाव न घेता मुंबईतल्या रस्त्यांवरच्या खड्ड्यांची परिस्थिती मांडली.
महापालिकेचं मलिष्काला आमंत्रण
मुंबईतल्या खड्डयांविषयी लागोपाठ दोन वर्षं गाणी करणाऱ्या मलिष्काला यावर्षीच्या पावसाळ्याच्या सुरुवातीला खुद्द महापालिकेनेच पाहणीसाठी येण्याचं आमंत्रण दिलं. मुंबई महापालिकेचे आयुक्त प्रवीण परदेशी यांनी आपल्या टीमसोबत मलिष्काला पावसाळ्यापूर्वीच्या तयारीचा आढावा दिला. महापालिकेची कार्यपद्धती आणि पावसाळ्यादरम्यान रस्त्यांची कामं कशी होतात याविषयीची माहिती मलिष्काला देण्यात आली.
मलिष्का फक्त खड्ड्यांबद्दल बोलते का?
रेडिओच्या माध्यमातून मलिष्काने विविध मोहीम राबवल्या आहेत.
2015मध्ये मलिष्काने सुरू केलेली 'Don't Be Horny' ही हॉर्न वाजवण्याच्या सवयीच्या विरोधातली मोहीम गाजली.
तिने वेश्या व्यवसाय करणाऱ्या महिलांच्या मुलांसाठी निधी उभा केला, नॅशनल असोसिएशन फॉर ब्लाईंड (NAB)साठी 50 लाख गोळा केले, तर सरकारी शाळांमध्ये जाणाऱ्या मुलांच्या शिक्षणासाठी 30 लाखांचा निधी गोळा करायलाही मदत केली.
तिची 'बजाओ फॉर कॉज' मोहीम आणि भर उन्हात उभं राहून काम करणाऱ्या सगळ्यांना पाणी देण्याचं आवाहन करणारी 'चार बोतल रोजका' मोहीमही गाजली होती.